Thursday, December 16, 2021

 अल्पसंख्यांक हक्क दिन 18 डिसेंबरला 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून शनिवार 18 डिसेंबर 2021 हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. 

अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणवी, माहिती देण्यासाठी ऑनलाईन वेबिनारद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन ऑनलाईन वेबिनार इत्यादीद्वारे जास्तीत जास्त व्याख्यानमाला, परिसंवाद, चर्चासत्र आदी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले.

00000

 18 डिसेंबर रोजी अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस” वेबीनार द्वारे साजरा करण्यात येणार 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव किंवा माहिती देण्यासाठी शनिवार 18 डिसेंबर 2021 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वा. ऑनलईन वेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून नांदेड येथील ॲड. सरदार अमनपालसिंघ स्वर्णसिंघ कामठेकर व ॲड एम. एस. युसूफजई हे संबोधित करणार आहेत. 

 

संयुक्‍त राष्‍ट्रसंघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्‍ट्रीयवांशिकधार्मिक आणि भाषिक अल्‍पसंख्‍याकांच्‍या हक्‍काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्‍तृत केला आहे. त्‍यानुसार अल्‍पसंख्‍याक नागरिकांना त्‍यांची संस्‍कृतीभाषाधर्मपरंपरा इत्‍यादींचे संवर्धन करता यावे यादृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याबाबत राष्‍ट्रीय आयोगाने सूचना दिल्‍या आहेत. त्‍यानुसार प्रत्‍येकवर्षी दि. 18 डिसेंबर हा दिवस जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस म्‍हणून राबविण्‍यात येतो. 

 

अल्‍पसंख्‍याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी कोविड-19 च्‍या विषाणुच्‍या संसर्गाची पार्श्‍वभूमी विचारात घेता केंद्र व राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनेनुसार लोकसहभागाबाबत देखील योग्‍य खबरदारी घेवून 18 डिसेंबर हा दिवस अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस म्‍हणून ऑनलाईन / वेबिनार इत्‍यादी पद्धतीने साजरा करण्‍याबाबत सूचना दिल्‍या आहेत.

 

या दिवसाच्‍यानिमित्ताने अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव किंवा माहिती करुन दिली जाणार आहे. त्‍याअनुषंगाने 18 डिसेंबर 2021 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता पुढील ऑनलाईनवेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येत आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून ॲड. सरदार अमनपालसिंघ स्वर्णसिंघ कामठेकर व ॲड एम. एस. युसूफजई हे संबोधित करणार आहेत. 

Join Zoom Meeting

https://us05web.zoom.us/j/4108912932?pwd=RHBMQytYUHk3RXdDZIpISWVQckQxZz09

Meeting ID: 4108912932

Passcode: Enej6v       

अल्‍पसंख्‍यांक समाजातील नागरीकांनी वरील लिंकवर जॉईन होऊन आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

000000

 शस्त्र परवानाधारकांनी

शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घ्यावा 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड जिल्‍हयातील शस्‍त्र परवाना धारकांनी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचे मार्फत निर्गमीत / अभिलेखात नोंद असलेले शस्‍त्र परवाने ज्‍याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी संपुष्‍टात येत आहे. अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा. 

परवानाधारकाने दिनांक 17  ते 31 डिसेंबर 2021  या कालावधीत आपला शस्‍त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नुतनीकरण शुल्‍क (चलनाने) शासन जमा करावे, आपले शस्‍त्र परवान्‍यातील असलेले अग्निशस्‍त्राची पडताळणी या कार्यालयात करुन, विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना सेतू समिती, जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दाखल करावा, सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 754 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 520 एवढी झाली असून यातील 87 हजार 843 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, आदिलाबाद 1, पुणे 1 असे एकुण 5 बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 1 असे एकूण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 22 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 20, खाजगी रुग्णालय 2 अशा एकूण 22 व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 87 हजार 884

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 83 हजार 854

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 520

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 843

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 11 जानेवारी रोजी 11.11 मिनिटांना जिल्हाभर राष्ट्रगीताद्वारे स्वातंत्र्याला वंदन

 - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 ⦁ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या प्रत्येक विभागाकडून विविध उपक्रमांचे नियोजन  

रिव्हर्स ऑफ इंडिया या उपक्रमांतर्गत शुक्रवार 17 डिसेंबर पासून   

नांदेड (जिमाका) दि. 16 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाने निर्देशीत केलेल्या पाच घटकांवर आधारीत जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. येत्या 11 जानेवारी रोजी सकाळी 11.11 मिनिटाला जिल्ह्यातील सर्व शाळांसह शासकीय, निमशासकीय सेवाभावी संस्था, कार्यालय या ठिकाणी राष्ट्रगीताद्वारे सामुहिकरित्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला अभिवादन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. शिक्षण विभागातर्फे या उपक्रमाबाबत समन्वय साधला जात असून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे यात अधिक योगदान असेल. ज्या ठिकाणी निवडणूक आचारसंहिता नाही अशा प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर शालेय शिक्षण समितीसह गावातील ज्येष्ठ नागरिकांनाही सन्मानाने निमंत्रीत करून यात त्यांचाही सहभाग घेण्यात यावा, असे निर्देशही डॉ. इटनकर यांनी दिले. 

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हाती घ्यावयाच्या विविध उपक्रमांबाबत डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे व्यापक बैठक नुकतीच झाली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 

रिव्हर्स ऑफ इंडिया या उपक्रमांतर्गत शुक्रवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 11 या कालावधीत अधिकारी-कर्मचारी, अशासकीय संस्था व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून गोदावरी नदीच्या परिसराची स्वच्छता, सपाटीकरण व हेरीटेज वॉकसाठी रस्ता तयार करणे, रविवार 19 डिसेंबर रोजी त्रीकूट ते मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र मॅराथॉन स्पर्धा, सोमवार 20 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा व देशभक्तीपर गीत, छायाचित्र स्पर्धा, मंगळवार 21 डिसेंबर रोजी एकात्मतेची शपथ व योगाशिबीर, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, बुधवार 22 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य, नाटक इत्यादी स्पर्धा व महिलांच्या सहभागाने नदीपात्रात दिवे लावून दिपोत्सव आदी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभाग, महसूल विभाग व संबंधित विभागामार्फत तयारी पूर्ण केली जात आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने रोजगार व कौशल्य विभाग, आयटीआय येथे रोजगार मेळावे आयोजित करण्यावर शासनाने भर दिला आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राकडे लागणाऱ्या मनुष्यबळांची माहिती घेऊन त्या-त्या ठिकाणी अनुभवी कुशल बेरोजगारांसह प्रशिक्षणार्थ्यांनाही संधी दिली जावी यावर संबंधित विभागाने भर द्यावा, असे त्यांनी निर्देश दिले. 

क्रीडा विभागातर्फे नवीन वर्षाच्या स्वागत दिनी म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी सायकल मॅरॉथान व सगरोळी येथील सैनिक विद्यालयात सुर्यनमस्कार महोत्सव हाती घेण्यात आला आहे. तर कृषि विभागातर्फे "विकेल ते पिकेल" अंतर्गत जिल्ह्यातील 75 शेतकऱ्यांचा सन्मान, फळबाग लागवड योजना व इतर योजनेच्या माध्यमातून 75 हजार झाडांपैक्षा अधिक लागवड, धान्य महोत्सव आदी उपक्रम घेतले जात आहेत. महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातील 100 अंगणवाड्याचे रुपांतर स्मार्ट अंगणवाडीमध्ये केले जाणार आहे.‍

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी स्वतंत्र कॅम्प घेऊन दहावी, अकरावी, बारावी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचे वाटप 26 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याबाबतही त्यांनी शिक्षण विभागाला सांगितले. याचबरोबर आठवड्यातील ठरावीक दिवस निश्चित करून गावातील समस्या व प्रशासकीय गरजा गावपातळीवरच सुटण्यासाठी प्रशासन आपल्या गावी ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.  सर्व संबंधित विभागाद्वारे याबाबत समन्वयाने नियोजन करण्यावर भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

000000


 नदीसमवेत आपलेही जगण्याचे प्रवाह समजून घेण्यासाठी 

येत्या रविवारी "पीस वॉक"चे आयोजन 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत विशेष उपक्रम 

रविवारी बंदाघाट येथे सकाळी 8 वा. आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- ज्या-ज्या भागातून नदी वाहत पुढे जाते त्या-त्या ठिकाणी संस्कृती बहरत जाते. याची अनुभूती घेतच मानवी पिढ्या विकसित होत आल्या आहेत. आपल्या नांदेड जिल्ह्याला गोदावरीचा समृद्ध वारसा मिळाला आहे. एका अर्थाने गोदावरी आपल्या सांस्कृतिक, वैचारिक, आध्यात्मिक विकासाचे शक्तीस्थळ आहे. अनेक पिढ्या या काठावर घडल्या. या पिढ्यांचे शेवटचे अस्तित्वही तिने सामावून घेतले. आपल्या काठावरील अनेक धुरांचे लोट तिने तेवढ्याच संवेदनेने कवेत घेतले. गोदावरी म्हणजे चैतन्य. गोदावरी म्हणजे जन्मोजन्मोची सोबती. गोदावरी म्हणजे उत्साह. गोदावरी म्हणजे संयम. गोदावरी म्हणजे प्रतिबिंब ज्याचे-त्याचे. प्रत्येक प्रवाहाला ती आपल्यात सामावून घेत आली आहे. तिच्याकडे जसे आपण पाहू तसा साक्षात्कार ती आपल्याला देत राहते. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोदावरी नदीच्या कृतज्ञतेपोटी जिल्हा प्रशासनातर्फे "पीस ऑफ वॉक" हा एक अभिनव कार्यक्रम येत्या रविवारी घेण्यात आला आहे. शांतीचे अभ्यासक डॉ. जॉन चेल्लादुराई, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत आणि साहित्यिक मनोज बोरगावकर यांच्या संवादातून आपल्या जगण्याचे प्रवाह व जीवनाचे आध्यात्मिक संदर्भ समजून घेतले जातील. 

दिनांक 19 डिसेंबर, रविवार रोजी बंदाघाट नांदेड येथे सकाळी 8 ते 8.45 या कालावधीत आयोजित या अभिनव कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

या कार्यक्रमात अधिकाधिक नांदेडकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले आहे. 

000000


 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  नांदेड जिल्ह्यात 18 डिसेंबर 2021 रोजी ते 1 जानेवारी 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 18 डिसेंबर 2021  ते शनिवार 1 जानेवारी 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

 

 सामाजिक न्याय विभागांतर्गत शिष्यवृतीसाठी

विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 16 :-   महाविद्यालयातील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षे 2021-22 च्या शिष्यवृतीचे अर्ज ऑनलाईन www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 31 जानेवारी 2022 पर्यंत करावेत. त्यानंतर शिष्यवृती अर्जाची छायांकित प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह आपल्या महाविद्यालयात सादर करावी.  असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले. 

तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी अभावी विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत अशा विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयांनी 31 जानेवारी पर्यंत त्रुटीची पुर्तता करुन तात्काळ फेरसादर करावेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विना अनुदानीत महाविद्यालयातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टल सुरु केले आहे, असेही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे. 

0000

 गोदाम बांधकाम व बीज प्रक्रिया संच अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी उत्पादक संघ / कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून अटी व शर्तीच्या आधीन राहून अर्ज मागविण्यात आली आहेत. अर्ज करण्यास 20 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

हे प्रस्ताव राष्ट्रीय बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र वखार महामंडळाचे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डीझायीन / स्पेसिफिकेशन व खर्चाच्या अंदाज पत्रकासह तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यास 15 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. 

लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल. महाराष्ट्र वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यानी जागेची निवड करावी. त्याची खात्री जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी करतील. या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालू आर्थिक वर्षात करणे बंधनकारक आहे. अपूर्ण बांधकाम डीझायीन/स्पेसिफिकेशन मध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी  उत्पादीत केलेल्या कृषि माल साठवणुकीसाठी शेतकऱ्याना योग्य व माफक दरात करण्यात यावा. 

कृषि विभागाच्या वतीने जिल्ह्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये शेतकरी उत्पादक संघ /कंपनी (एफपीओ/एफपीसी) साठी  गोदाम बांधकामाचा व बीज प्रक्रिया संचचा लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लाक्षांकाच्या आधीन राहून शेतकरी उत्पादक संघ /कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून विहित नमुन्यातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेतर्गत ज्या ठिकाणी गोदामाची व्यवस्था नाही व ज्या गावात हा कार्यक्रम राबवण्यात येतो. अशा परिसरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजने अंतर्गत कमाल 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा रु. 12 लक्ष 50 हजार या पेकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे. तसेच प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांना प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी (यंत्र सामुग्री व बांधकामासाठी) प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लक्ष रुपये यापैकी जे कमीत कमी अनुदान देय आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000

 नांदेड मनपा पोटनिवडणूक मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   

नांदेड (जिमाका)   दि. 16 :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्र. 13 अ पोटनिवडणूक निवडणूक 2021 साठी मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदानाच्या दिवशी  आणि  बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणीच्या दिवशी नांदेड शहरातील सर्व मतदान केंद्र  व मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निवडणूकीचे कालावधीत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्र. 13-अ पोटनिवडणूक निवडणूक 2021 ची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मंगळवार 21 डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून तसेच बुधवार 22 डिसेंबर रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे मतमोजणीच्या कामव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश नांदेड शहरात मंगळवार 21 डिसेंबर रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्र. 13-अ पोटनिवडणूक 2021 मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यत व मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील.

0000

 नगरपंचायत निवडणूक मतदान, मतमोजणी

केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका)   दि. 16 :- जिल्ह्यातील नगरपंचायत नायगाव, अर्धापूर व माहूर सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या अनुषंगाने मंगळवार 21 डिसेंबर रोजी मतदान केंद्रावर तर  बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निवडणूकीचे कालावधीत जिल्ह्यातील नगरपंचायत नायगांव, अर्धापूर व माहूर येथील सार्वत्रिक निवडणूक 2021 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मंगळवार 21 डिसेंबर रोजी मतदान केंद्र तर बुधवार 22 डिसेंबर रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे मतमोजणीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यत व मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात बुधवार 22 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...