Thursday, December 11, 2025

  वृत्त क्रमांक 1293

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी 

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 11 डिसेंबर :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2025 जिल्ह्यातील 64 केंद्रावर शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये या 64 परीक्षा केंद्रापासून 100 मिटरच्या परिसरात शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते रात्री 6 वाजेपर्यतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही असे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निर्गमित केले आहे.

तसेच परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, लॅपटॉप इ. तत्सम साहित्य परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात वापरण्यास व बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास, त्याचप्रमाणे वर दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1292

150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सअॅप चॅटबॉट कार्यान्वित

  व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित माहिती सहज होणार उपलब्ध

 नागरिकांनी व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणालीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन 

नांदेड दि. 11 डिसेंबर :-  महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणालीची सुरुवात केली आहे. नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि सुलभ प्रशासनाचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. तरी या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चॅटबॉट मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्वसमावेशक माहिती नागरिकांना सहज मिळावी यादृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. यासाठी क्युआर कोड स्कॅन करा किंवा 8668223326 या क्रमांकावर व्हॉटसअप संदेश पाठवा आणि जिल्हाधिकारी  नांदेड यांच्या माहिती, तक्रारी, योजना व संदर्भातील व्हॉटसअप सुविधांचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. 

व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबद्दलची परिपूर्ण माहिती, अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील, विविध विभाग व शासकीय योजनांची माहिती, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक सेवा, तक्रार निवारणासाठी आवश्यक दुवे व माहिती. 

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत जास्त दोन क्लिकमध्ये आवश्यक माहिती मिळावी, हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड व्हॉट्सअॅप चॅटबॉटमध्ये खालील सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरी सेवा, वरिष्ठ अधिकारी व विभागनिहाय संपर्क, जिल्हाधिकारी शाखांची माहिती, शासकीय योजना व आरटीएस सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, तक्रार निवारण प्रणाली, जमीन व महसूल इ. सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

नागरिकांना आवश्यक सुविधा सुलभ, पारदर्शक आणि तांत्रिक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

00000



 नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027

बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस

जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन

सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

नाशिक, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २० डिसेंबर, २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठविता येणार आहेत, असे विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी कळविले आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. तो दर बारा वर्षांनी एकदा राज्यातील नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीच्या काठावर भरतो. अमृत मंथनाच्या आख्यायिकेत येणारा हा कुंभमेळा श्रद्धा, पवित्रता आणि नवनिर्माणाच्या शाश्वत चक्राचे प्रतीक आहे. बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर, नाशिकची समृद्ध संस्कृती, मंदिरे आणि घाटांचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रतिबिंब या कुंभमेळ्यात दिसते.

नाशिकमधील रामायण स्थळांची भव्यता, नाशिकचे घाट, त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी नदीचा शाश्वत प्रवाह दोन्ही शहरांना एकत्र जोडतो. कुंभमेळा एक चैतन्यशील आणि जागतिकस्तरावर मान्यताप्राप्त आध्यात्मिक उत्सव म्हणून वाढत असताना २१ व्या शतकाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करतो. देशाच्या परंपरेत रुजलेली एक ताजी आणि गतिमान दृश्य ओळख निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. नवीन बोधचिन्हाची ओळख भूतकाळातील आवृत्त्यांच्या वारशावर आधारित असेल. भक्ती आणि एकतेची कालातीत भावना अशा स्वरूपात साकार करणारी पाहिजे. आधुनिक, संदर्भात्मक आणि भारत आणि जगभरातील विविध प्रेक्षकांसाठी दृश्यदृष्ट्या आकर्षक असे बोधचिन्ह असावे. एवढेच नव्हे, तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या संस्कृती, वारसा, स्थापत्य, विधी आणि नैसर्गिक सौंदर्यातून सहभागींना प्रेरणा मिळू शकेल. बोध चिन्ह संस्मरणीय असावे. ते सर्व व्यासपीठांवर श्रद्धा, उत्सव आणि कालातीत परंपरा व्यक्त करेल. ही रचना कुंभमेळा २०२७ साठी एक वेगळी दृश्य ओळख म्हणून काम करेल. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक साराचे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक हे बोध चिन्ह असावे.

बोधचिन्हासाठी…

▪ कमाल आकार ५ एमबी (पीडीएफ) असावा.

▪ स्पर्धेत दिलेल्या ले-आउटनुसार बोधचिन्हाची डिझाइन ए १ आकाराच्या पोस्टरवर असावे.

▪ बोधचिन्हाची रंगीत, कृष्ण्धवल प्रतिमा आणि बोधचिन्हाबाबत माहिती देणारी १५० शब्दांची टिपणी असावी.

▪ स्वाक्षरी केलेल्या आणि स्कॅन केलेल्या अटी आणि शर्तींची कमाल आकार १ एमबी (पीडीएफ) फाइल.

▪ संकल्पना टीप, पोस्टर, प्रतिमा, फाइल नावासह, अर्जदाराची ओळख स्थापित करण्यासाठी नाव, संस्थेचे नाव किंवा कोणतेही संदर्भ यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती नसावी. 

▪ या निकषांचे पालन न करणाऱ्या नोंदी अपात्र ठरवल्या जातील.

▪ सहभागींनी वर नमूद केल्याप्रमाणे २ स्वतंत्र फाइल्स सादर कराव्यात. योग्यरित्या स्वाक्षरी केलेले घोषणापत्र नसल्यास, प्रवेशिका अपात्र ठरवली जाईल.

▪ ही स्पर्धा भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी खुली आहे. डिझाइन, आर्किटेक्चर आणि कला क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. 

▪ ही स्पर्धा व्यावसायिक डिझायनर्स, कलाकार, ब्रॅण्ड डिझायनर्स आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडू शकणाऱ्या सर्वांसाठी खुली आहे. 

▪ प्रत्येक सहभागीला फक्त १ प्रवेशिका पाठविण्याची परवानगी राहील. सहभागी स्पर्धकाचे वय किमान १२ वर्षे असावे. एखाद्या गटाने प्रवेशिका दिली असेल, तर एका व्यक्तीला संघाचा प्रमुख आणि प्रवेशिका म्हणून मानले पाहिजे.

▪ बोधचिन्हाची दृश्य ओळख विशिष्ट ओळख घटकांसह प्रदर्शित केलेली पाहिजे.

▪ रंगांचा पॅलेट, दृश्य आकृतिबंध, टाइपफेस, दृश्य अँकर आणि त्याचे अनुप्रयोग जसे की, साइनेज, ब्रँडिंग, स्ट्रीट फर्निचर, प्रवेश पास, स्टेशनरी, झेंडे, व्यापारी माल इत्यादींवर दाखवले पाहिजे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी अधिक माहितीसाठी www.mygov.in  किंवा ntkmalogocompetition@gmail.com  या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी केले आहे. 

०००००

वृत्त क्रमांक 1291

सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस प्रत्येकाने योगदान द्यावे -अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड

जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 

नांदेड दि. 11 डिसेंबर :- देशसेवेत सैनिकांच्या अतुलनीय योगदानामुळे प्रत्येक देशवासियांच्या मनात सैनिकाबद्दल सर्वोच्च स्थान आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याची संधी आहे. प्रत्येक नागरिकांनी ध्वजदिन निधीस आपले जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाडे यांनी केले. 

जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनात ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, विविध माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष रामराव थडके, पठाण हयुन, लक्ष्मण देवदे, दत्ता पोतगन्ते, प्रकाश कस्तुरे, विठ्ठल कदम, ज्ञानेश्वर डूमणे, नागनाथ बासरे, कमलाकर शेटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलीत झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली. 

वर्ष 2024-25 साठी शासनाने जिल्हयाला 50 लाख 50 हजार रू.एवढे उद्दिष्ट दिले होते. यात नांदेड जिल्हयाने 30 लाख 40 हजार रू. जमा करुन 60.19 टक्के पुर्ण केले आहे. वर्ष 2025-26 साठी शासनाकडुन 50 लाख 50 हजार एवढे उद्दिष्ट मिळाले असुन हे उद्दिष्ट निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यात येईल असे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सांगितले.

दिलेले उद्दिष्ट वेळेच्या आत पुर्ण केल्याबद्दल शासनाने नांदेड जिल्हयाचा गौरव प्रित्यर्थ स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला आहे. या संकलनात जिल्हयातील ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालये तथा महाविदयालय यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचा सत्कार अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हयातील वीरनारी, वीरमाता-पिता यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष गौरव पुरस्कारांचे १ लाख ४० हजार रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत सुभेदार अर्जुन जाधव यांनी केले आणि कॅप्टन बळीराम गिराम, कल्याण संघटक यांनी आभार मानले.

000000




    वृत्त क्रमांक 1293 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी  परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. 11 डिसेंबर :- जवाहर नवोदय वि...