Thursday, December 15, 2022

 दिव्यांगांना सहानुभुती म्हणून नव्हे तर

अंगभुत कलागुणांच्या विकासासाठी संधी आवश्यक

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

दोन दिवसीय दिव्यांग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप

जिल्ह्यातील 75 शाळांमधून 541 स्पर्धक सहभागी

 

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- इतर सक्षम व्यक्ती प्रमाणेच दिव्यांगांच्या मनात आत्मविश्वास जागृत असतो. त्यांच्याकडे पाहतांना आपल्या सहानुभुतीची गरज नसते. वाट्याला आलेल्या दिव्यंगत्वावर त्यांनी त्यावर मात करून त्यांनी जे कौशल्य विकसीत केलेले असते ते अधिक लाखमोलाचे असते. त्यांच्या अंगी असलेल्या अंगभुत कलागुणांना वाव मिळावा, त्याचा विकास व्हावा यादृष्टिने क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसारखे विविध उपक्रम वारंवार उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  

 

येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या समारंभास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, अपर जिल्हाधिकारी बोरगावकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिव्यांगप्रती कर्तव्य तत्पर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यात संत बाबा सुखदेव सिंघजी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. अर्चना बजाज, कमल कोठारी, ॲड दिलीप ठाकूर, नेरली कुष्ठधामचे मनोहर जाधव, प्रेमकुमार फेरवाणी यांचा समावेश आहे. संत बाबा सुखदेवसिंघजी यांच्यावतीने त्यांच्या अनुयायींनी सन्मान स्विकारला.

 

या स्पर्धेत अंध, मतिमंद, अस्थिव्यंग व मुकबधीर अशा एकुण जिल्ह्यातील 75 शाळांचा समावेश होता. किनवट येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम स्वागत गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गितांवर, लावणी व इतर गाण्यांवर आपले नृत्य सादर केले. विजेत्या स्पर्धकांना व शाळांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी राजेश कपुर, चंद्रकांत अटकळीकर, पंजाबराव अंबोरे यांनी सांस्कृतिक स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले.

0000 








काळेश्वर येथील जलक्रीडा सुविधेचे प्रस्ताव

तांत्रिक मान्यतेसाठी सादर करा

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

विष्णुपुरी जलाशय परिसरात विकसित होणाऱ्या

पर्यटन केंद्र व साहसी जलक्रीडा योजनेचा आढावा  

 

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- नांदेड येथील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने विष्णुपुरी जलाशयात पर्यटन व साहसी व जलक्रीडा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. नांदेड येथील श्री तख्त सचखंड हुजूर साहिब गुरूद्वाराच्या माध्यमातून व जिल्ह्यातील माहूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या निमित्ताने भाविक-पर्यटकांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील या शक्तीस्थळासमवेत विष्णुपुरी जलाशयातील साहसी जलक्रीडा सुविधा कामांचे तांत्रिक प्रस्ताव संबंधित यंत्रणेने त्वरीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले, नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे  कार्यकारी अभियंता आशिष चौगले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीत जलक्रीडा व्यवस्थापन समितीस लागणारी नाहरकत प्रमाणपत्र, तांत्रिक मान्यता, पाण्याची पातळी, सुरक्षितता याबाबत चर्चा करण्यात आली. विष्णुपुरी धरणात आजुबाजुच्या परिसराच्या पुनर्विकासासह बोटिंग क्लब आणि ॲडव्हेंचर पार्कचे प्रस्तावित बांधकाम, मल्टी ॲडव्हेंचर टॉवर आणि जायंट स्विंग स्थापित करणे, झिप लाइन, रोप कोर्स आणि मुलांच्या खेळाची उपकरणे, बोट क्लबसाठी विविध प्रकारच्या बोटी उपलब्ध करुन देणे आदी कामांचा यात समावेश आहे. यातील बोट क्लबसाठी विविध प्रकारच्या ज्या बोटी लागणार आहेत त्याची तांत्रिक मान्यता महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले.

00000 

सुधारित वृत्त

गुंठेवारी संचिका व कागदपत्र इतर  संबंधित विभागात सुरक्षित 

 

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनमध्‍ये असलेल्‍या ग्रामीण गुंठेवारी कक्षास 15 डिसेंबर 2022 रोजी रात्री 12.10 वाजेच्‍या दरम्‍यान अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाने ही आग विझवली आहे. या घटनेत गुंठेवारी विभागात असलेल्‍या गुंठेवारीच्‍या संचिका तसेच निवडणुकीचे जुने नमुने असलेले रेकॉर्ड हे 5 ते 10 टक्‍के अंशत: जळाले आहे. गुंठेवारीच्‍या प्रकरणांमध्‍ये नगररचना कार्यालयाचा अभिप्राय घेण्‍यात येतो. नगररचना विभागाचे हे अभिप्राय व प्रमाणित नकाशाच्‍या मुळ प्रती नगररचना कार्यालयात उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे अंशत:  जळालेल्‍या  गुंठेवारीच्‍या संचिकेची पुर्नरबांधणी होऊ शकते. त्‍यामुळे जनतेने घाबरु नये असे, आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी कक्षाचे प्राधिकृत अधिकारी  यांनी केले आहे.

00000

लेख

 दृष्टी आणि श्रवणापलीकडची अनूभुती !

 

संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील तब्बल 75 पेक्षा अधिक शाळेतील मुले मोठ्या कुतहलाने, आत्मविश्वासाने नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात जमले आहेत. या मुलात काही सहा वर्षाचे आहेत, काही सात, काही दहा तर काही पंधरा वर्षाचे आहेत. या मुलांपेक्षा त्यांच्या आई-वडिलांसाठी हा परिक्षेचा क्षण असल्यागत तेही मोठ्या उत्साहाने इथे दाखल झाले आहेत. हॉलच्या बाहेर काही मुले तयार होत आहेत. कोणी राम होत आहे तर कोणी लक्ष्मण तर कुठे वानरसेना शेपटी लावून तयार होत आहे.

 

हॉलमधील मुले एकमेकाच्या आधाराने आपले सादरीकरण करून बाहेर येत आहेत. यातील काही मुलांच्या चेहऱ्यांवर नवी धडकन जागविल्याचे भाव आहेत, तर काही मुलांच्या चेहऱ्यावर गाण्यातील बोलाप्रमाणे झाडाची सावली मिळाल्याचा आनंद आहे. बाहेर एका कोपऱ्यात ज्यांना ऐकू आणि बोलता येत नाही, अशा मुली संपूर्ण साजश्रृंगारासह तयार होऊन एकमेकीच्या चेहऱ्यांवरचा आत्मविश्वास टिपून घेत आहेत. त्यांना खूप काही बोलायचे आहे. ऐकीचे हात विजेच्या गतीने वर होऊन बोटांच्या खुणातील परीभाषा झरझर बोलते करीत आहे. कोणाला फोटो काढून घ्यायचे आहेत. या साऱ्या मुलांच्या भावभावनाला तोलत शिक्षक या मुलांना सांस्कृतिक स्पर्धेसाठी विश्वासाने स्टेजकडे घेऊन जात आहेत.

 

एखादा शासकीय उपक्रमाला भावभावनांचे किती किनार असू शकतात याची प्रचिती कोरोना नंतरच्या तीन वर्षाच्या खंडानंतर अधिकारी आणि कर्मचारी समजून घेत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षे व जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धा सर्वांनाच खूप काही शिकवून जात आहे. किनवट तालुक्यातील बोधडी येथील अंध विद्यालयातील मुलांनी वंदे मातरम गिताने राजेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभारंभ केला.   

 

समूह नृत्यामध्ये मुलांनी गितातील बोलानुसार ज्या स्टेप्स दिल्या आहेत त्यानुसारच वेळेवर सादर करणे साध्या मुलांसाठी खूप आव्हानात्मक अशी गोष्ट आहे. इथे तर क्षणाक्षणाला असंख्य बाबी विसरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गितातील शब्दानुसार हावभाव करून घ्यायचे आहेत. काही दृष्टीहीन मुले स्टेजवर आल्यावर आपले डोळे किलकिले करून मनातल्या मनात स्टेजवरील हॅलोजनचा स्पॉट लाईट उजळल्याचा भास करून घेत आहे. यातील काही मुलांना प्रेक्षक डाव्या बाजुला बसलेले आहेत असा भास झाल्यामुळे की काय त्याची मान सतत डाव्या बाजुला जात आहे.

 

जन्मापासूनच काही मुलांच्या डोळ्यावर लख्ख अंधाराचीच साथ दिली आहे. यातील काही मुलांना बोलते केल्यास तो आपल्या डोळ्यात उजळलेल्या लाखो किरणांची गोष्ट माहित आहे याची शाश्वती देत आहेत. ईश्वराने एक बाजु स्वत:कडे ठेवून एकच बाजु दिल्याबद्दल त्यांच्या मनात कोणती तक्रार नाही. एकमेकांना वाटेल तेवढे प्रेम व धैर्य देण्याची कसब त्यांनी अंगी बांधली आहे. या मुलांच्या मनातील ही ताकद पाहून शिक्षक आज पालकांच्याही कित्येक पलिकडे असलेल्या भुमिकेत स्वत:ला घेऊन गेले आहेत. आपल्या मुलांचे नृत्य चांगले व्हावे यासाठी स्टेजच्या समोर जिथून प्रकाश व ध्वनीची व्यवस्था झाली आहे त्या जागेवर उभे राहून स्वत: गिताच्या बोलाप्रमाणे फेर घेऊन तोही बेफाम नाचत आहेत. ज्यांना हात नाहीत त्यांचेही हात वर झाल्याचा भास हे पाहतांना होत आहे.    

 

या दोन दिवसीय या महोत्सवात पहिला दिवस हा क्रीडासाठी आणि दुसरा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अशी विभागणी व्यवस्थापन मंडळाने केली आहे. कालच्या क्रीडा स्पर्धांना दिव्यांगानी भरभरुन प्रतिसाद दिला. ज्यांना चालता येत नाही त्यांना धावण्याचे बळ या स्पर्धांच्या माध्यमातून घेता आले. आजच्या सांस्कृतिक, समूहगान, सामूहिक नृत्य आदी स्पर्धांनीही जिल्ह्यातील या दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांना नवी संधी मिळाली. सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेत ज्यांना आजवर संधी मिळाली नाही त्यांच्या दारापर्यंत संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश सामाजिक न्याय विभागाच्या या स्पर्धेतून सफल झाला नसेल तर नवलच.

 

विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...