Wednesday, October 16, 2024

 वृत्त क्र. 948 

परदेशातून आयात केलेले फटाके साठवणूक व विक्रीस प्रतिबंध


नांदेड दि. 16 ऑक्टोबर : दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता फटाके विक्रीला परवानगी देणारे सर्व यंत्रणांनी  करावयाच्या कार्यवाहीबाबत सुसुत्रता आणण्यासाठी व निश्चित कार्यपध्‍दती आवश्‍यक असल्‍याने सबंधित यंत्रणा यांना पुढीलप्रमाणे सुचना जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केल्या आहेत.


त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक नांदेडआयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकानांदेड सर्व उपविभागीय दंडाधिकारी जिल्‍हा नांदेडसर्व कार्यकारी दंडाधिकारी जिल्‍हा नांदेडसर्व  मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) जिल्‍हा नांदेड व ईतर प्राधिकरण यांना पुढीलप्रमाणे सुचना निर्गमित करण्यात येत आहेत.

विदेशी फटाक्यांची साठवणूकविक्री व वितरण होणार नाही याकरीता संबंधित यंत्रणांनी  सतर्क रहावे. त्याचप्रमाणे नियमित तपासणी करावी. विदेशी फटाक्यांची  साठवणूकविक्री व वितरण होत असल्याच्या बाबी  निदर्शनास आल्यास त्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी. सर्व फटाका आस्थापनांची  सर्व समावेशक तपासणी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यातजेणे करुन विदेशी फटाक्यांची साठवणूक आणि विक्री होणार नाही. सर्व ई कॉमर्स कंपनी व स्थानिक विक्रेते यांच्या मार्फत विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची तसेच स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.


अनधिकृत फटाक्यांची दुष्परिणाम या विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकासर्व उपविभागीय दंडाधिकारीसर्व  तालुका दंडाधिकारी व सर्व मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) जि.नांदेड यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात पत्रकार परिषदा आयोजित करुन सर्वांना मार्गदर्शन करावे व सदर कार्यात लोकसहभाग वाढविण्याकरीता जनजागृती  करावी.


उपविभागीय दंडाधिकारी सर्व यांनी  दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ फटाके विक्री करण्याचे परवाने मंजूर करतांना विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक  व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता मा.सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक 728/2015 मध्ये दिनांक 23 ऑक्टोबर 2018 व दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी  दिलेल्या मार्गदर्शक  सुचना सर्व परवानाधारकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व याबाबत स्थानिक पातळीवर जाहिर प्रसिध्दी  देण्यात यावी.


विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणेत्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनिय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी जवळ बाळगत असेलत्याचा साठा करत असेल किंवा त्यांची विक्री करत असेलअशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी.

आगामी दिपावली सणाच्या कालावधीत आयुक्तनांदेड वाघाळा शहर महानगरपालिकानांदेडसर्व उपविभागीय दंडाधिकारी जि.नांदेडसर्व तालुका दंडाधिकारी जि.नांदेड  व सर्व मुख्याधिकारी (नगरपालिका/ नगरपंचायत) जि.नांदेड यांनी  त्यांचे  कार्यक्षेत्रात भरारी पथकाची नियुक्ती  करावी. सदरच्या भरारी पथकाने  विदेशी  फटाक्यांची  साठवणूकविक्री व वितरण होत असल्याच्या बाबी  निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ कारवाई करावी.


तसेच मा.राष्‍ट्रीय हरित लवाद न्‍यायालयनवी दिल्‍ली यांचेकडील निर्देशानूसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेडनगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रामध्‍ये दिपावली कालावधीत फटाके वाजविण्‍यांची वेळ सकाळी 6 ते 8 (दोन तास) आणि रात्री 8 ते 10 ( दोन तास ) असेल त्‍यानूसार काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबतची तपासणी हे पोलीस विभाग व सबंधित महानगरपालिका  व  नगरिपरिषद/नगरपंचायत करतील, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

00000

 वृत्त क्र. 947 

तात्‍पुरता फटाका परवाना देण्यास मुदतवाढ

 

नांदेड दि. 16 ऑक्टोबर : दिपावली सण 2024 अनूषंगाने तात्‍पुरता फटाका परवाना देण्याबाबत अंशतः बदल करण्‍यात आला असून बुधवार 23 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  

 

वर्ष-2024 मध्‍ये दिपावली उत्‍सव 28  ऑक्‍टोंबर ते 3 नोव्‍हेंबर या कालावधीत साजरा होत आहे. त्‍यानुषंगाने नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीची मुदतवाढ 23 ऑक्‍टोबर पर्यत देण्‍यात आली आहे. याव्‍यतीरिक्‍त 3 ऑक्‍टोबर रोजी दिलेले जाहीर प्रगटनामधील अटी  व शर्ती कायम राहतील, असे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 946

 

पहिल्‍या 48  व 72 तासात करावयाच्या

कार्यवाहीला पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

 

नांदेड दि. 16 ऑक्टोबर :- महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्‍यात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. नांदेड उत्‍तर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची आदर्श आचारसंहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 48 व 72 तासात करावयाची कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे प्रशासनाने आवाहन केले आहे.

 

पहिल्‍या 48 तासात करावयाची कार्यवाही

सर्वच केंद्र शासनाचे व राज्‍य शासकीय,स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांच्‍या मालकीचे, सार्वजनिक ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, इमारती, जागा, संरक्षक भिंती मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील, रुग्‍णालये, दवाखाने, हॉल्‍स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, परिसर, पुल, उड्डाणपुल, विद्युत खांब, टेलिफोनचे खांब, बस, रेल्‍वे, विमाने, हेलिकॉप्‍टर, सर्व निमशासकीय वाहने, रुग्‍णवाहीका 2 इत्‍यादीवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी-माजी आमदार, मा.खासदार, मा.मंत्री महोदय, राजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्‍थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍य, जाहीराती निदर्शनास येऊ नये यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्‍टीत करणे.

 

पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाही

सर्व खासगी ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, घरे, कार्यालये, इमारती, दुकाने, संरक्षक भिंती, आस्‍थापना व सर्वच खाजगी ठिकाणे, रुग्‍णालये, दवाखाने, हॉल्‍स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सर्व खाजगी वाहने, बस, रेल्‍वे, विमाने, हेलिकॉप्‍टर, रुग्‍णवाहीका इत्‍यादी राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्‍थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍य निदर्शनास येऊ नये. यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्‍टीत करणे.

 

ही कार्यवाही करण्‍यासाठी वरील प्रमाणे नमूद ठिकाणांची निश्चिती आपले अधिनस्‍थ यंत्रणेमार्फत तात्‍काळ करावी. तसेच विषयांकीत निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच वरील नमूद प्रमाणे तसेच पत्रात नमूद निर्देशांनुसार आचारसंहिता अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी, असेही आवाहन 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

0000







वृत्त क्र. 945

निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर निर्बंध 

आचारसंहितेत काय करावे काय न करावे जाणून घ्या ! 

नांदेड दि. 16 ऑक्टोबर :- जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 व 16 नांदेड लोकसभा पोटनिवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारतीय  नागरीक  संरक्षण  संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे या ठिकाणी पुढील बाबी करण्‍यास विविध आदेशान्‍वये बंदी घातली आहे. 

विश्रामगृहावर बैठका बंद 

कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक/मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्‍याग्रह करणे. कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, इत्‍यादी. कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर बंदी आहे. 

लाऊडडस्पिकर परवानगीशिवाय नाही 

कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था पक्ष कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा) वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्‍या पुर्व परवानगीशीवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्‍त्‍यावरुन धावत असतांना त्‍यावरील ध्‍वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 6 वाजेपुर्वी व रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही.

ताफ्यात फक्त गाड्या 

कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाद्वारे निर्बंध घालण्‍यात आले आहे.

पक्ष कार्यालये नियंत्रित 

जिल्‍ह्यातील धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्‍या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापीत करता येणार नाही. वरील आदेश नांदेड जिल्‍ह्यासाठी निर्गमीत झाल्‍याच्‍या तारखेपासून दिनांक 27 नोव्‍हेंबर पर्यंत अंमलात राहतील.

मतदान केंद्र परिसरात कलम लागू

ज्‍याठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्‍याठिकाणापासून 200 मीटर परिसरात पक्षकारांना मंडपे उभारण्‍यास, दुकाने चालू ठेवण्‍यास  व  मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांचा वापर करण्‍यास, संबंधीत पक्षांच्‍या चिन्‍हांचे  प्रदर्शन  करण्‍यास तसेच सर्व प्रकारचे फेरीवाले, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास याद्वारे प्रतिबंध करण्‍यात आले आहे. 

भाषण विनापरवानगी नाही 

संबंधीत पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर याद्वारे निर्बंध घालण्‍यात आले आहेत. तसेच शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास  याद्वारे निर्बध घालण्‍यात आले आहे. 

नामनिर्देशनपत्र कार्यपद्धत 

नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस, तसेच वाहनाच्‍या ताफ्यामध्‍ये 3 पेक्षा जास्‍त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्‍या 100 मिटरचे परिसरात आणणेस, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या दालनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍यासाठी पाच व्‍यक्‍ती पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंध 

मतमोजणीची प्रक्रिया ही ज्‍या मतमोजणी केंद्रावर होणार आहे, त्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्‍ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांच्‍या वापरास व  मतमोजणीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंध करण्‍यात आले आहे. आदेश  23 नोव्‍हेंबर 2024 रोजी मतमोजनी सुरु झाल्‍यापासुन मतमोजणीचा कार्यक्रम पुर्ण होईपर्यंत अंमलात राहील.

शस्‍त्रास्‍त्रे बाळगण्‍यास बंदी

शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या व्‍यक्‍ती, दंडाधिकारी शक्‍ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, बँकेच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेवरील अधिकारी व महाराष्‍ट्र शासन गृह विभाग यांचे दिनांक 20 सप्‍टेंबर 2014 च्‍या मार्गदर्शक सूचनानूसार जिल्‍हयातील छाननी समितीने वगळलेल्‍या शस्‍त्र परवानाधारका व्‍यतीरीक्‍त इतर सर्व परवाना धारक व्‍यक्‍तींना परवाना दिलेली शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर व शस्‍त्र बाळगण्‍यास  या आदेशान्‍वये प्रतिबंध करण्‍यात अर्थात बंदी घालण्‍यात आले आहे. 

जिल्‍हाधिकारी कार्यालयापुढे गर्दी नको

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय (जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड) येथे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍यासाठी येणा-या उमेदवारांच्‍या वाहनाच्‍या ताफ्यामध्‍ये तीन वाहने व शासकीय कर्तव्‍य पार पाडणारे शासकीय कर्मचारी, अधिकारी यांचे वाहने वगळता इतर सर्व वाहनास सदर रस्‍त्‍यावरुन वाहतुकीस याद्वारे प्रतिबंध  करण्‍यात येत आहे. 

परवानगी घेऊन छापा 

इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे या प्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत.  

 जातीचे मेळावे बंद 

जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबीरांचे, मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत 27 नोव्हेंबर पर्यंत निर्बंध घातले आहेत. निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत. निवडणूकीचे प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, ईमारत, आवार, भिंत ईत्यादीचा संबंधीत जागा मालकाचे परवानगी शिवाय व संबंधीत परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत. 

परवानगी शिवाय झेंडा नको 

फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 27 नोव्हेंबर पर्यंत अंमलात राहतील.  

 ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध 

ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वाजण्यापुर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा. ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि ईतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहीती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत) अंमलात राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिद्धी करावी असेही आदेशात स्पष्ट केले आहे.   

0000

#विधानसभानिवडणूक२०२४

 #विधानसभानिवडणूक२०२४

वृत्त क्र. 944

 

40 दिवसांसाठी 24 तास सतर्क रहा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         प्रशासन इलेक्शन मोडमध्ये ;नोडल अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक

·         नाकाबंदी सुरू ; होर्डिंग काढणे, फलके साफ करण्याला गती

·         कर्मचाऱ्यांनो ! मुख्यालय सोडू नका ; मोबाईल बंद ठेवू नका

·         विधानसभा,लोकसभा निवडणूक समर्थपणे यशस्वी करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 16 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन 'इलेक्शन मोड 'मध्ये आले आहे. सर्व नोडल अधिकारी, जिल्हा परिषद महानगरपालिका पोलीस विभागाच्या जवळपास 70 शीर्षस्थ अधिकाऱ्यांची आज मॅरेथॉन बैठक झाली. यामध्ये 40 दिवस 24 तास सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले.

 

नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेले स्पष्ट निर्देश पुन्हा एकदा सर्वांच्या लक्षात आणून दिले. निवडणूक आयोगाने यावर्षी मतदार संख्या वाढविण्याचे नाकाबंदी काटेकोर करण्याचे निर्देश दिले आहे.

 

त्यामुळे निवडणूक काळामध्ये काळा पैशाची होणारी देवाणघेवाण, दारू, अन्य अमली पदार्थ, पैशाची देवाणघेवाण, भेट वस्तूंचे वाटप यावर नियंत्रण आणण्याचे निर्देश दिले आहे. यासोबतच बिनचूक सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राबविण्यासाठी आयोग आग्रही आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील नियोजन करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह जवळपास 70 विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

24 तासात 36 तासात व 72 तासात काय करावे याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट संदेश दिले आहे. त्या सर्व कर्तव्याची पूर्तीचा आढावा या वेळेस घेण्यात आला. होर्डिंग मोठ्या प्रमाणात काढण्यात यावे.कोणत्याही कार्यालयामध्ये दर्शनी भागात कोणत्याही राजकीय व्यक्तीचे व मतदारावर प्रभाव टाकणारे कोणतेही साहित्य राहणार नाही, याची काळजी घेण्याची यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

शासकीय आदेश काढू नका

आचारसंहिता लागली असल्यामुळे कोणतीही नवीन तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, देण्यात येऊ नये. तसेच कार्यालयीन आवक जावक मध्ये कोणत्याही पत्राची देवाणघेवाण होता कामा नये, नवे आदेश, कामे सुरू करू नये. सर्व विभाग प्रमुखांनी आजच्या तारखांमध्ये कार्यालयीन कामकाज बंद करावे, तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामांमध्ये स्वतःला झोकून द्यावे,या काळामध्ये कोणालाही विनापरवानगी मुख्यालय सोडू नका असे स्पष्ट करण्यात आले.

 

ड्युटीत बदल होणार नाही

निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य असून या यंत्रणेसाठी सर्वोच्च कार्य आहे. त्यामुळे दिलेले काम नाकारणे. सोपवलेल्या कार्यभार परस्पर बदलणे. अधिकाऱ्यांवर दबाव आणणे अशा प्रकारचा कोणताही प्रकार अधिकारी कर्मचाऱ्यांनी करू नये. केवळ दोन दिवसांच्या कामासाठी वेगवेगळी कारणे सांगणाऱ्या व टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ड्युटी बदलवण्यासाठी दबाव आणणे, मागणी करणे त्यासाठी प्रयत्न करणे,कोणत्याही कर्मचाऱ्यांनी करू नये, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक कार्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले

 

निवडणूक आयोग सर्वोच्च

वडणूक काळात तालुका स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्ट सूचनांचे पालन करावे. त्यांनी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहू नये. निवडणूक काळामध्ये सर्व अधिकारी भारत निवडणूक आयोगाच्या अधिपत्यात येतात. आयोगाच्या निवडणुकांबाबतच्या स्पष्ट सूचना आहे. अतिशय कणखर व कडकपणे या सूचनांचे पालन करावे. त्याच पद्धतीने कोणाचाही दबाव न घेता कोणाच्याही आमिषाला बळी न पडता सक्त कारवाई करावी, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तालुकास्तरावरील उपजिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी असून त्यांच्या नेतृत्वात सक्षमतेने काम करण्याचे स्पष्ट केले.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी यावेळी दोन्ही निवडणुका एकाच वेळी होत असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात एकाच वेळी 288 ठिकाणी निवडणुका होत असल्याने या काळात अन्य जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस कुमक मिळणार नाही. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळामध्ये पोलीस विभागाने सक्षमतेने कार्य करण्याचे आवाहन केले. सी व्हिजिल अॅपमुळे वेळेत प्रतिसाद देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे त्यामुळे भरारी पथक व स्थिर निगराणी पथकाने पोलीस दलाशी योग्य समन्वय राखण्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 होर्डींग बॅनर विनापरवानगी नको

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी होर्डिंग बॅनर आजच्या आज काढून टाकण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. महानगरपालिका आयुक्तांनी या संदर्भातील कार्यवाही सुरू असून उद्यापर्यंत हे कार्य पूर्ण होईल असे स्पष्ट केले. तसेच या काळामध्ये कोणीही विनापरवानगी होर्डिंग बॅनर लावू नये, तसे केल्यास कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

 

विश्रामगृहे तहसिलदारांकडे

निवडणूक निरीक्षक प्रत्येक विधानसभा  क्षेत्रामध्ये या काळात येणार आहे. त्यामुळे तालुक्याचे सर्व विश्रामगृह अद्यावत करण्याचे निर्देश यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. या काळात संबंधित तहसीलदारांना विश्रामगृहासंदर्भातील निर्णय घेऊ देण्याचे निर्देश देण्यात आले.

 

मतदारसंघात मतमोजणी

यावेळी मतमोजणी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात होणार आहे. लोकसभेची मतमोजणी विद्यापीठ परिसरात तर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिणची मतमोजणी तंत्रनिकेतन मध्ये होणार आहे. या ठिकाणी देखील व्यवस्था करण्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

 

छापेमारी, जप्ती प्रमाण वाढवा

स्थिर निगराणी पथक व भरारी पथकांच्या कारवाईवर जिल्ह्यातील निवडणुकांच्या सक्त कारवाईचे निकष लागतात. त्यामुळे या पथकातील कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्या. कार्य तत्पर कर्मचाऱ्यांची नेमणूक करा. मोठ्या प्रमाणामध्ये नाकाबंदी आणि अवैध दारू, पैसा पकडल्या गेला पाहिजे. सामान्य नागरिकांना या काळामध्ये कोणताही त्रास न होता त्यांच्यावर कोणाचाही प्रभाव नसला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 स्वीपचे कार्य दुप्पटीने वाढवा

 मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकांना सहभागी व्हावे वाटेल अशा पद्धतीने प्रत्येक मतदान केंद्र सर्व सोयीने तयार ठेवा. या काळामध्ये मतदान करणे या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये नागरिकांना उस्फूर्तपणे सहभागी करून घ्या. यावेळी नांदेड जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात असेल यासाठी स्वीप चमूने दुप्पट जोमाने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

00000










समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...