Friday, June 11, 2021

 

भोसी ग्रामपंचायतीच्या शेतातील विलगीकरण उपायाचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतूक

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सरपंच ताराबाई देशमुख व आरोग्य टिमशी साधला संवाद

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या निमित्ताने आता या संकल्पनेलाच लोकाभिमुख चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्यातील असंख्य ग्रामपंचायतींनी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातही अभूतपूर्व काम करुन अभिनव संकल्पना राबविल्या. एरवी शहर आणि महानगरात मर्यादित असलेल्या व्हॉटस्ॲपसारख्या सोशल मीडियाचा उपयोग आपल्या खेड्यात कोरोना येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी करुन यातही नवीन मापदंड निर्माण केला, या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच आणि ग्रामस्थांचा गौरव केला.

 

कोरोनातून गावाला सुरक्षित ठेवत राज्यातील विविध ग्रामपंचायतींनी आपआपल्या गावात अनेक अभिनव प्रयोग राबविले, अशा अभिनव प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील प्रातिनिधिक ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पद्मश्री पोपटराव पवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब ज-हाड यांच्यासह राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील भोसी गावाने आपला वेगळा पायंडा निर्माण केला. या गावाने साध्य केलेल्या या यशाची माहिती प्रत्यक्ष सरपंचाकडून व्हावी या उद्देशाने या व्हिडिओ कॉन्फरन्सला भोसीच्या सरपंच ताराबाई प्रकाशराव देशमुख यांना निमंत्रित केले होते. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व आरोग्य विभागाची टिम सहभागी झाली होती.

 

सुमारे 2 तास चाललेल्या या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला. राज्यातील लॉकडाऊन अजून उठलेले नाही तर ज्या-ज्या गावांमध्ये कोरोनाचे प्रमाण अटोक्यात आले आहे अशा गावांमध्ये विविध स्तरावर वर्गवारी करुन सवलत दिली असल्याचे स्पष्ट केले. राज्यात लसीकरणाचा तुटवटा जरी असला तरी ज्या प्रमाणात लसीची उपलब्धता होत आहे त्यानुसार लसीकरण मोहिम ग्रामीण भागापर्यंत सक्षम चालावी याची खबरदारी आरोग्य विभागातर्फे घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्या-त्या गल्ली निहाय, लोकसंख्या निहाय टिम तयार करुन त्या-त्या टिममधील सदस्यांनी वेळोवेळी जागरुकतेची भूमिका घेतली तर अशा भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. आरोग्याच्या सुविधा ग्रामपातळीपर्यंत उपलब्ध होण्यासाठी विविध सुविधा शासन पुरवित आहे तथापि या सुविधांची अत्यावश्यकता पडू नये याची काळजी ग्रामस्थांनी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.

 

ग्रामविकास मंत्र्यांकडून गावे कोरोनामुक्त करण्याचा विश्वास

कोरोनामुक्त गाव स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गावे कोरोनामुक्त करू असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी 14 व्या आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोना प्रतिबंधात्मक सुविधांसाठी ग्रामपंचायतींना मोठ्याप्रमाणात निधी दिल्याची माहिती दिली. कोरोना मुक्त गावाची स्पर्धा ही स्पर्धा न रहाता लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली

 कोरोनामुक्त गावाची संकल्पना लोकमनात रुजवली

गावखेड्याचा आढावा घेऊन कोरानामुक्त गावाची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी लोकमनात रुजवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, यासाठी राज्यातील गावे खुप नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानातील जबाबदारी ओळखून गावे आपल्या गाव कुटुंबाची काळजी घेत आहेत. यावेळी टास्कफोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक आणि पोपटराव पवार यांनी ही मार्गदर्शन केले.

 गावाच्या बाहेर शेतातील गृहविलगीकरण ठरले प्रभावी

आम्ही गावातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सर्वप्रथम ग्रामपंचायतची बैठक घेऊन कडकडीत जनता कर्फ्यू लागू केल्याची माहिती भोसीच्या सरपंच ताराबाई देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितली. बाहेरील एकाही व्यक्तीला गावामध्ये प्रवेश दिला नाही. जे बाधित झाले त्यांना गावाबाहेर शेतामध्ये गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. जे वयोवृद्ध व इतर आजारांनी त्रस्त होते त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये हलवले. या विविध प्रयत्नातून 119 बाधितांवरुन आम्ही गावातील कोविड-19 बाधितांची संख्या शुन्यावर खाली आणली. यात ग्रामीण आरोग्य विभागाने विविध दक्षता घेऊन तात्काळ तपासणी व तात्काळ उपचार यावर भर दिल्याने गावातील कोरोनाला आटोक्यात आणल्याचे सरपंच देशमुख यांनी सांगितले.

*****




 नांदेड जिल्ह्यात 44 व्यक्ती कोरोना बाधित

एकाचा मृत्यू, तर 97 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 691 अहवालापैकी  44 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर अँटिजेन तपासणीद्वारे 28 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 870 एवढी झाली असून यातील 87 हजार 872 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 564 रुग्ण उपचार घेत असून 8 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दि. 11 जून 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे हदगाव येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 895 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 12, किनवट 1, हदगाव 1, लोहा 1 उमरी 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 14, हदगाव 1, मुखेड 1,  नांदेड ग्रामीण 3, कंधार 1, नायगाव 1, भोकर 1, लोहा 1, हिंगाली 2, देगलूर 1, मुदखेड 1, लातूर 1  असे एकूण 44 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 97 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 4,  मुखेड कोविड रुग्णालय 3,  हिमायतनगर तालुक्यातर्गंत 3, बारड कोविड केअर सेंटर 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, देगलूर कोविड रुग्णालय 2, माहूर तालुक्यातर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 58, किनवट कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 18 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 622 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  29, लोहा कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 1,किनवट कोविड रुग्णालय 17, देगलूर कोविड रुग्णालय 6,   हदगाव कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 349, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गह विलगीकरण 105, खाजगी रुग्णालय 33 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 116, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 128 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 70 हजार 954

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 68 हजार 624

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 870

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 872

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 895

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.70 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-198

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 564

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-8

00000

फोटो ओळी : नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कापूस व सोयाबिन पिकांमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या लागवड पद्धती या पुस्तिकेचे प्रकाशन करतांना कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे.

000000


 

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 12 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी अशा एकुण 15 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. तर ग्रामीण रुग्णालय बारड येथे कोव्हॅक्सिनचे 40 डोस उपलब्ध आहेत.  हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 9 जून पर्यंत एकुण 4 लाख 57 हजार 225 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 11 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 27 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 40 हजार डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 67 हजार 330 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

 

जलसंधारण उपाययोजना पारंपारिक,

अपारंपरिक या विषयावर वेबिनार संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-भू.स.वि.यं. सुवर्ण महोत्सवी वर्ष 2021 निमित्त भूजल विषयक तांत्रिक बाबींची संपूर्ण माहिती व जनजागृती होण्यासाठी भूजलाशी निगडीत विविध विषयावर वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत. आज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक आर.व्ही. पवार यांनी  जलसंधारण उपाय योजना, पारंपारिक व अपारंपरिक या विषयावर वेबिनारद्वारे सादरीकरण केले. यावेळी विद्यापीठातील भूगर्भशास्त्र, भूभौतिकशास्त्र आदी विभागातील विद्यार्थी  तसेच अभियांत्रिकी व इतर महाविद्यालयातील असे एकूण 60 च्यावर विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेतला असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी. गायकवाड यांनी कळविले आहे.

0000

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह

पाऊस व गारपीट होण्याची शक्यता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 11 जून 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार 11 ते 15 जून 2021 या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000


 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 16 जूनला

नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार 16 जून 2021 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

0000

सुधारित वृत्त

 'विकेल ते पिकेल'साठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कार्यक्षमता वाढवावी*

- पालक सचिव एकनाथ डवले
▪ जिल्ह्यातील कोविड-19 सह कृषि विभागाचा पालक सचिवांनी घेतला आढावा
नांदेड (जिमाका) दि. 11 :- विकेल ते पिकेल याचा अर्थ केवळ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल अथवा शेतीचे उत्पादन घेऊन बाजारात बसणे किंवा शेतकऱ्यांना बाजारात बसविण्यासाठी मदत करणे एवढ्या पुरताच मर्यादित नाही. कृषि विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्परांशी समन्वय साधत यादृष्टिने शेतकऱ्यांना व्यापक प्रमाणात मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करण्याचे कसब शेतकऱ्यांच्या अंगी यावे व हे प्रक्रिया करुन उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ व योग्य भाव कसा मिळेल याचे संपूर्ण कसब देण्यापर्यंतची भूमिका ही शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आहे. कृषि विभागातील विशेषत: ग्रामीण भागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी येवढी व्यापक भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहण्याचे निर्देश कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध विकास योजनांची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आणि नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांचे कृषि अधिकारी उपस्थित होते.
विकेल ते पिकेल यासाठी तालुका पातळीवरुन ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजेत, ज्या गतीने शेतकऱ्यांचे गटस्थापन करुन त्यांनी गुणवत्तापूर्ण केलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी ग्रामीण भागात कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे. ही दक्षता घेतली तरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालातून मिळतील, असे पालक सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले. कापसासारख्या पिकासाठी “एक गाव एक वान” जर लागवडीखाली आले, कापसाच्या उत्पादनाला काढणी पश्चात तंत्रज्ञानाची जोड मिळाली, गोळा केलेला कापूस कचरा विरहित जर गोळा केला गेला तर अशा कापसाला अधिकचा भाव मिळू शकेल. धागा चांगला यावा यासाठी कृषि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. स्मार्ट कॉटनसाठी अग्रह धरला पाहिजे व शिवाय कापसावर बोंडआळी व्यतिरिक्त बोंडसरसाठी अधिक दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यात देगलूर, अर्धापूर आणि इतर काही ठिकाणी करडी, हळद व इतर पिकातून झालेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रारंभी नांदेड जिल्ह्यातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा व शासनस्तरावरुन व्हावयाची कार्यवाही लक्षात घेऊन त्यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीस डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील तपासणीचे प्रमाण कोणत्याही परिस्थितीत कमी व्हायला नको याची दक्षता घेण्याचे निर्देश पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सुपर स्प्रेडर कालावधी आणि त्यासाठी योग्य ती घ्यावी लागणारी दक्षता आतापासूनच असायला हवी. ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्रावर टेस्ट किट्स आणि इतर बाबी उपलब्ध राहतील याबाबत दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
00000





  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...