Friday, June 4, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित

तर 173 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 46 अहवालापैकी  150 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 66 तर अँटिजेन तपासणीद्वारे 84 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 136 एवढी झाली असून यातील 86 हजार 973  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 768 रुग्ण उपचार घेत असून 25 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 890 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 30, हदगाव 2, मुदखेड 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 12, किनवट 3, उमरी 2, भोकर 2, लोहा 2, हिंगोली 3, देगलूर 2, माहूर 3, परभणी 2 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 35, देगलूर 3, किनवट 4, उमरी 1, नांदेड ग्रामीण 16, हदगाव 4, माहूर 1, परभणी 2, अर्धापूर 1, हिमायतनगर 2, मुदखेड 5, हिंगोली 2, बिलोली 2, कंधार 2, नायगाव 2, यवतमाळ 1 असे एकूण 150 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 173 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 4,  मुखेड कोविड रुग्णालय 4, लोहा कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, किनवट कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 25, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 130 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 768 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 36, माहूर कोविड केअर सेंटर 4, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 26, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  6, देगलूर कोविड रुग्णालय 7,  हदगाव कोविड रुग्णालय 3, लोहा कोविड रुग्णालय 5,  भोकर कोविड केअर सेंटर 1,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 385, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 224, खाजगी रुग्णालय 56 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 120 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 52 हजार 986

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 51 हजार 609

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 136

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 86 हजार 973

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 890

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.49 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-36

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-169

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 768

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-25

00000

 

 

छतावरील पाऊस पाणी संकलन व पूनर्भरण विषयावर

संचालक डॉ. कलशेट्टी यांनी केले ऑनलाईन मार्गदर्शन 

 

नांदेड, दि. 4 (जिमाका) :- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षे-2021 निमित्त भूजल तांत्रिक बाबींची संपूर्ण माहिती व जनजागृती करण्यासाठी भूजलाशी निगडित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. याअनुषंगाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी छतावरील पाऊस पाणी संकलन व पूनर्भरण या विषयावर झुम व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेद्वारे नुकतेच प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मार्गदर्शन केले. 

भूजल विषयक तांत्रिक बाबींची माहिती व जनजागृतीत भूजल पूनर्भरण विहीर व विंधन विहीर, छतावरील पाऊस पाणी संकलन व पूनर्भरण, नांदेड जिल्ह्याची संक्षिप्त माहिती व जलचक्र, पाणी तपासणी व पाणी गुणवत्ता, जलसंधारण उपाययोजना पारंपारिक व अपारंपारिक उपाययोजना, पाण्याचा ताळेबंद, पाणी टंचाई अहवाल पाणी पुरवठा उद्भव सर्वेक्षण, भूजल मुल्यांकन व निरीक्षण विहीर व विंधन विहीर या विविध विषयांचा समावेश आहे.  

यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी तांत्रिक सादरीकरण केले. नगरपालिका प्रशासन अधिकारी जयंत दांडेगावकर, नगरपालिका / नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगर अभियंते, जिल्हा नेहरु युवा केंद्राच्या श्रीमती चंदा रावळकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख श्रीमती प्रा. सरोदे, एमएसडब्लुचे विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील इतर नागरिकांनी असे जवळपास 80 श्रोत्यांनी या वेबिनारमध्ये आपला सहभाग नोंदविला होता.

00000

 

महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण

अधिनियमांतर्गत मंगळवारी कार्यशाळा

नांदेड, दि. 4 (जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत अधिनियमाची तोंड ओळख होणे व या अंतर्गत तक्रार समितीचे गठण, कार्यकारी मंडळाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या आदी माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची कार्यशाळा मंगळवार 8 जून 2021 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुपारी 3 ते सायं 6 या वेळेत करण्यात आले आहे.

 

या प्रशिक्षणास सर्व विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावे व त्यांच्या अधिकार क्षेत्रातील कार्यलय प्रमुखांना उपस्थित राहण्याची सूचना विभाग प्रमुखांनी त्यांच्या स्तरावरुन निर्गमीत कराव्यात. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या आस्थापनेत 10 किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असेल त्यांनी प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

00000

 

तलावातील गाळ घेऊन जाण्यास इच्छुक

शेतकऱ्यांनी मागणी नोंदवावी 

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, दि. 4 (जिमाका) :- धरणामधील दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे त्यातील पाणी साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. यासाठी शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवाय मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ही मोहिम घेतली असून शेतकऱ्यांनी धरणातील हा सुपिक गाळ घेऊन जाण्यासाठी मागणी नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.  

नांदेड जिल्‍ह्यात गोदावरी, पैनगंगा, मन्याड, लेंडी सारख्या मोठ्या नद्या व इतर लहान नद्या वाहतात. सिंचन सुविधेच्यादृष्टिने जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान-मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. पावसाच्या असमतोलनामुळे जिल्ह्यातील काही धरणे ही कोरडी झाली आहेत. हे लक्षात घेता त्यातील गाळ काढण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्‍हा परिषदेअंतर्गत असलेल्या 335 तलावापैकी 94 तलाव गाळ काढणे योग्‍य आहे. या तलावात एकूण 10 लाख 44 हजार क्‍युबिक मिटर इतका गाळ आहे. तसेच जिल्‍हा जल व मृद संधारण विभागाकडे 16 तलाव असून त्‍यामध्‍ये 42 हजार 67 घनमीटर गाळ आहे. हा गाळ काढण्‍यासाठी येत्या 20 दिवसात गाळ काढणे व शेतकऱ्यांच्‍या शेतात टाकण्‍यासाठी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन त्‍यानुसार याद्या व इतर नियोजन केले जात आहे.    

या कामासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेतला जात असून यात संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, अनुलोम आदी संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत 12 तालुक्यातील 48 गाव / पाझर तालावातील गाळ काढण्याचे काम प्रगतीवर आहे. यातून सुमार 3.35 घनमीटर गाळ काढण्यात आलेला असून सदरचा सुपिक गाळ 271.20 हेक्टर क्षेत्रावर टाकण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ घेऊन जाण्यासाठी पुढे सरसावे व याबाबत संबंधित तालुक्यातील तहसिलदार यांच्याकडे मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 5 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 7 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी व कौठा या 7 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, हैदरबाग, शिवाजीनगर, कौठा, जंगमवाडी, दशमेश, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको या 11 केंद्रांवर कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी देण्यात येईल. या केंद्रांवर प्रत्येकी 150 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. हे डोस प्राधान्याने 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दिले जातील.

 

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, उमरी या 8 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन देण्यात आले असून हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. ग्रामीण रुग्णालय नायगाव केंद्रावर कोव्हॅक्सीनचे 30 डोस उपलब्ध असून हे सुद्धा दोन्ही वयोगटातील व्यक्तींच्या दुसऱ्या डोसाठीच दिले जातील. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध असून ही लस 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींसाठी प्राधान्याने दिली जाईल. 

 

जिल्ह्यात 3 जून पर्यंत एकुण 4 लाख 38 हजार 670 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 4 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 27 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 25 हजार 700 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 53 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त वृक्ष लागवड मोहिमेसाठी

नागरिकांनी पुढे सरसावे   

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

नांदेड, दि. 4 (जिमाका) :- बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास रोखायचा असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आता सर्वांनाच शुद्ध हवेचे, प्राणवायुचे महत्व पटले असून निसर्गातून ज्या झाडातून आपल्याला प्राणवायु मिळतो त्याच्या लागवडीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे सरसावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची मोहिम विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हाती घेण्यात आलेली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात प्रत्येक व्यक्ती मागे किमान तीन झाडे लावण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिले आहेत. त्यानुसार ही वृक्षलागवड मोहिम लोकचळवळीत रुपांतर करुन अधिकाधिक यशस्वी करण्याचे नियोजन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले गेले आहे.

 

नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 33.60 लक्ष असून प्रत्येक व्यक्ती मागे 3 वृक्ष गृहित धरुन एकुण उद्दीष्ट हे 100.80 लक्ष वृक्ष लागवडीचे निर्धारित केले आहे. वृक्षलागवडीच्या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय अशा सर्व घटकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यात मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व शहरातील उत्सफुर्त सहभाग नोंदवून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

00000

विशेष लेख

 

वृक्ष लागवडीतून

झाडांनाही श्वास देऊ यात !

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने

 

जगातील जवळपास सर्व वैद्यकीय चिकीत्सा आणि हॉस्पिटल गत वर्षभरापासून ऑक्सिजन उपलब्धतेच्या तणावाखाली राहिली. त्यावरुन आता प्रत्येकाला शुद्ध हवेचे मोल लक्षात आले आहे. कोविड-19 सारख्या आजाराने जो त्याच्या तावडीत सापडला, त्याच्या श्वसन यंत्रणेवर, फुफ्फुसावरच घाला घालून कोरोना मोकळा झाला. लाखो लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. ज्या श्वासावर आपले जीवन सुरू असते ती श्वासाची प्रक्रिया प्रत्येकाचे शरीर विनातक्रार सुरु ठेवत असते. श्वास आला काय आणि सोडला काय याची जाणीवही माणसाने कधी समजून घेतली नाही. जेंव्हा श्वास अडकायला लागला तेंव्हा प्रत्येकाला त्याचे मोल लक्षात यायला लागले.

 

श्वसन प्रक्रियेचे एक स्वतंत्र गणित आहे. स्वत:ची जाणिव न होऊ देता प्रत्येक शरीरात श्वसन यंत्रणा आपले गणित चालू ठेवते. असेच गणित निसर्गाचे आहे. आपल्या भवताली असलेल्या झाडांचे आहे. शरिराला लागणारी शुद्ध हवा ही झाडांची पाने आपल्याला देत राहतात. वातावरणातील विशुद्ध हवा घेणे आणि शुद्ध हवा सोडणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया निसर्गातील झाडे विनातक्रार करत असतात. ज्या झाडांपासून आपण शुद्ध हवा घेतो त्या झाडांकडे कृतज्ञतेच्या भावनेतून आपण पाहतो का हा प्रश्न ज्याचा त्याने एकदा का होईना, स्वत:ला विचारला पाहिजे. जी गोष्ट आपण आपल्या श्वसन यंत्रणेकडे दुर्लक्षून असतो तीच स्थिती झाडांच्या बाबतीत आहे, हे नाकारता येणार नाही.

 

आपल्या भारतात गतवर्षातील 30 जानेवारीला पहिला रुग्ण सापडला. तेंव्हा पासून आजच्या घडीला ही संख्या 2 कोटी 3 लाखांपेक्षा अधिक झाली. अजूनही यातून सुटकारा नाही. पूर्ण लसीकरण हा याच्यावरचा आजच्या घडीतील सर्वोत्तम उपाय असल्याचे संपूर्ण जगाने स्विकारले आहे. जे आजारी होते ज्यांना कोविड-19 ची बाधा झाली, ज्यांचे श्वास गुदमरले त्यांना आरोग्याचे महत्व पटले. ऐरवी निसर्गातून कोणतेही अपेक्षा न ठेवता आयुष्याला पुरुन उरणार एवढे ऑक्सिजन आपण निसर्गाला कोणताही मोबदला न देता घेत असतो त्याच ऑक्सिजनची किंमत किती असू शकते हे जे पॉझिटिव्ह होते त्यांनी मोजली आहे.

 

उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी केवळ चांगला आहार ठेवून भागत नाही, आहाराबरोबर चांगला व्यायाम ठेवूनही सर्व व्याधीपासून, कोरोनासारख्या साथीच्या आजारापासून सुटका होईलच याची शाश्वती राहिली नाही. या सर्वांसोबत ज्या पर्यावरणात, भवतालात आपण राहतो त्याच्याही आरोग्याची काळजी घेतल्या शिवाय दुसरा मार्ग नाही.

 

आजवर आपण प्रत्येक गावकुसात खळखळून वाहणाऱ्या लहान-मोठ्या ओहळापासून ते नद्या प्रदुषित होणार नाहीत अशी एकही कृती शिल्लक ठेवली नाही. प्रत्येक जिल्ह्यात जसे वातावरण आहे त्याला अनुरुप असलेली वनसंपदा व जैवविविधता जी हजारो वर्षांपासून आजवर जगत आली, वाढत आली तीही आपण शिल्लक ठेवली नाही. असंख्य प्रकारची परोपकारी वृक्षवल्ली केंव्हा दूर झाली त्याकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. निसर्गाचे एक जीवनचक्र असते. आकाशातल्या ओझोनच्या थरापासून ते पर्वत-डोंगरांचा माथा, पायथा आणि पुढे सपाट प्रदेशातून समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत हे चक्र जाते. ऐरवी माथ्यापासून पावसात पाण्याचा सुरु झालेला ओघळ थोडे खाली गेले की ओहळामध्ये रुपांतरीत होते. ओहळाचे हे पाणी थोडे खाली आले की मोठ्या ओहळात त्याचे रुपांतर होऊन नदीचे पहिले रुप आपल्याला दिसते. अश्या असंख्य उपनद्यातून, ओहळातून नदी आकार घेते. नदीच्या पोटात जे काही येते ते त्या-त्या भागातील माथ्यापासून हजारो वर्षांपासून चरा-चराने जे जपलेले असते तेच नदीत उतरत जाते. म्हणून प्रत्येक भागात नदी एक वेगळे रुप देते. नदी घनदाट झाडांच्या मुळांना पाणी देत त्याच्याच कुशीतून वाहत जाते. आता ती आपण कुसही ठेवली नाही, त्यात वाळूही ठेवली नाही आणि झाडेही ठेवली नाहीत.

 

झाडे जगली तर श्वास जगेल, झाडे जगली तर पाऊस पडेल, झाडे जगली तर निसर्ग जगेल हे आजवर अनेकांनी सांगितले. सुंदरलाल बहुगुणा यांनी झाडाला कवेत घेऊन, झाडाला घट्ट मिठ्ठी मारुन एका साध्या चिपको आंदोलनातून संपुर्ण जगाला एका नवा विश्वास दिला. या आंदोलनाने फक्त झाडेच वाचली असे नाही तर आपल्या उत्तरदायित्त्वाची जाणीव अप्रत्यक्ष त्यांनी शासकीय यंत्रणासह मानवाला करुन दिली.

 

आज आपण ऑक्सिजन म्हटले की, ज्या गांभीर्याने लगेच पाहतो ते गांभीर्य पुन्हा एकदा कोविड-19 सारख्या आजाराने आपल्या लक्षात आणून दिले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनची गरज 2 हजार 800 मे. टन पर्यंत आपल्या भारतात गेली. दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढल्याने 5 हजार मे.टन प्रति दिवसापर्यंत प्राणवायूची गरज पोहचली हे विसरुन चालणार नाही. आपले असंख्य बाधित झालेले बांधव, माता-भगिनी, युवक हे प्राणवायुसाठी झगडत होते हे सत्य स्विकारावे लागेल.

 

एका व्यक्तीला वर्षभरात जेवढा प्राणवायु लागतो तो साधारणत: 7 ते 8 झाडे ही वर्षभरात पुरवतात. मानवा व्यतिरिक्त या चराचरात जेवढे प्राणी आहेत त्यांनाही प्राणवायुची आवश्यकता असते. आजवर ज्या गतीने बेसुमार वृक्षतोड झाली ती लक्षात घेता श्वासाचे, प्राणवायुचे आणि झाडाचे नाते नेमके काय आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकांना जेवढी झाडे लावता येतील, जगवता येतील ते सारे प्रयत्न मानवाकडून होणे अपेक्षित आहे. एकुण भौगोलिक क्षेत्राचा विचार करता त्यावर 33 टक्के हरित अच्छादन असणे आवश्यक आहे. मराठवाड्यात हे प्रमाण अवघ्या 5 टक्यापर्यंतच आहे. मी ज्या गल्लीत, भागात राहतो त्या भागात जर प्रत्येकाने हे 33 टक्क्याचे प्रमाण जपण्याचा प्रयत्न केला तरच राष्ट्रीय पातळीवर हे गणित साध्य होईल. अन्यथा उद्याच्या पिढीला आपण निर्मळ श्वास किती ठेवू हा प्रश्नच आहे.

 

मानवी जीवनात आपल्या भोवतालाचे असलेले हे महत्व लक्षात घेऊन, प्राणवायुची गरज लक्षात घेऊन, निसर्गाच्या शुद्धतेची गरज लक्षात घेऊन या जागतिक पर्यावरण दिनापासून शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड मोहिम हाती घेतली आहे. आपल्या औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यात अधिकाधिक लोकसहभाग द्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हावासियांना केले आहे.

 

आपल्या गल्लीतील, कॉलनीतील मोकळ्या जागेवर, शहरातील मोकळ्या जागेवर, शेतामध्ये, शेताच्या बांधावर, पडिक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा, कॅनॉलच्या दुतर्फा, नदी-नाल्यांच्या काठावर प्रत्येक व्यक्तींनी जिथे शक्य होईल तिथे किमान 3 झाडे लावावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

येत्या जागतिक पर्यावरण दिनी अर्थात 5 जून पासून या मोहिमेचा शुभारंभ केला जात आहे. विविध संकल्पनांचा सदर वृक्षलागवड करतांना वापर करता येईल. यात घनवन लागवड म्हणजेच कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांची लागवड, गाव तेथे देवराई म्हणजेच देवस्थान परिसरामध्ये धार्मिक दृष्ट्या महत्वाच्या वृक्षांचे वन तयार करता येईल. रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड सार्वजनिक विहिरींच्या सभोवती वृक्ष लागवड, स्मृती वनांची निर्मिती, नदी-नाले यांच्या काठावर बांबु लागवड आदी उपक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाने सुचविले आहे.

 

कोविड-19 मध्ये आपले जे आप्तेष्ट गेले त्यांना शेवटचा संस्कार करण्यापूर्वी साधे पाहताही आले नाही. जे बाधित गेले त्यांना या आजाराने जिवंत असतांना भेटूही दिले नाही. ज्या व्यक्तींचे या आजाराने श्वास कोंडल्या गेले त्यांचे शेवटचे कार्यही आप्तेष्टांना करता आले नाही. या आजाराने आप्तेष्टांना गळा भेट घेऊन कडकडून भेटताही आले नाही. दुसऱ्या बाजुला ज्या झाडांपासून आपण ऑक्सिजन घेतो त्या झाडांना कडकडून मिठी मारायची झाली तर कोणत्याच झाडाने पॉझिटिव्ह असले तरी नाकारले नाही. प्रत्येक झाडाने ते अबोल जरी असले तरी या आव्हानातून सावरण्याचा विश्वास दिला. नुकतेच निधन पावलेले चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांना स्मरुन लोकसहभागातून वृक्ष लागवडीच्या या चळवळीत आपण प्रत्येकजण कटिबद्ध होऊ यात. झाडाला साक्षी ठेवून यावर्षी किमान 3 तरी झाडे लावून ती जगवू यात. ज्या प्रमाणात आपण निसर्गाकडून घेत आहोत त्या प्रमाणात त्याला वापस करण्याचा हा काळ सगळ्यांना खूप काही शिकवूण जाणारा आहे.

 

-         विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी नांदेड.

 

नांदेडच्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेस

राष्ट्रीय पातळीवरील एनएबीएलची मान्यता

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून अभिनंदन 

 

नांदेड, दि. 4 (जिमाका) :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेस राष्ट्रीय पातळीवरील एनएबीएल (नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर कॅलीब्रेशन ॲड टेस्टिंग लॅब्रोराटरी ) ची मान्यता मिळाली असून तसे अधिस्विकृती प्रमाणपत्र कॉलिटी कॉन्सील ऑफ इंडिया बोर्ड यांच्याकडून प्रयोग शाळेस प्राप्त झाले आहे. एनएबीएलचे ॲक्रिडिटेशन मिळणारी महाराष्ट्रातील ही दुसऱ्या क्रमांकाची तर मराठवाड्यातील पहिल्या क्रमांकाची पाणी तपासणी प्रयोगशाळा म्हणून हा गौरव झाल्याने नांदेडच्या शिरपेचात या यशाने मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील कार्यरत असलेल्या सर्व संशोधकाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

 

नांदेड जिल्ह्यात जिल्हा पातळीवरील एक प्रयोगशाळा तर तालुक्यांसाठी कंधार, मुखेड, गोकुंदा, उमरी, हदगाव, देगलूर अशा 7 प्रयोगशाळा आहेत. या प्रयोग शाळांमार्फत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व स्त्रोतांमधील पाण्याची तपासणी करुन दिली जाते. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पाण्याची तपासणी करायची आहे अशा शेतकऱ्यांकडून शासनाने ठरवून दिलेले शुल्क घेऊन त्याही पाण्याची तपासणी करुन दिली जाते. ग्रामपंचायत, शहर, महानगर आणि शेतीसाठी अत्यंत अत्यावश्यक असलेल्या या पाणी गुणवत्ता प्रयोग शाळेस मिळालेले एनएबीएलची मान्यता ही गुणवत्तेच्यादृष्टिने आश्वासक ठरली आहे. ही मान्यता नांदेडच्या प्रयोगशाळेस मिळाली असून आता यापुढे या प्रयोगशाळेची जबाबदारी आणि प्रमाणिकीकरण करण्यासाठी अधिकाधिक मान्यताप्राप्त उपकरणाची आणि लागणाऱ्या सर्व साहित्यांची अत्यावश्यकता महत्वपूर्ण राहिल.

 

या यशासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक आर. बी. पवार, एस. पी. राठोड, अमित झिरंगे, गुणवत्ता व्यवस्थापक व्ही. एम. गड्डमवाड, तांत्रिक व्यवस्थापक एस. जे. शेख, रासायनिक श्रीमती पोपलाईकर, अनुजैविक तज्ज्ञ अन्नदाते, भवानकर, वाघतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

  

नांदेड जिल्ह्यातील 1604 खेड्यांपैकी

1 हजार 450 खेड्यांनी कोरोनाला केले हद्दपार !

यापुढेही जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अधिक दक्षता घेतील

-         जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर 

नांदेड, दि. 4 (जिमाका) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तावडीतून ग्रामीण भागही सुटला नाही. असंख्य खेड्यांमध्ये कोरोना पोहचला असता या खेड्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दक्षतेने पेलून जिल्ह्यातील 1 हजार 450 खेड्यांना कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बळ दिले. यात ग्रामपंचायतींचे, पंचायती समित्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या त्रीसुत्रीचा गावपातळवीर अंमल व्हावा यासाठी भरीव योगदान राहिले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील अंगणवाडी सेविकेपासून ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंतची सर्व यंत्रणा पुर्ण सक्षमतेने कार्यरत राहिल्यामुळे जिल्ह्याला हे यश साध्य करता आले. कोरोनाचे आव्हान अजून संपले नसून खेड्यातील लोकांसह ग्रामपंचायतींनी गाफिल न राहता अधिक जबाबदारीने यापुढे दक्षता घेतली तर नांदेड जिल्हा हा कोरोनामुक्तीच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण जिल्हा असेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. 

कोरोनाच्या या दोन्ही लाटेत नांदेड जिल्ह्यातील एकुण 16 तालुक्यांमधील सुमारे 271 गावांनी आपल्या गावाच्या हद्दीत कोरोनाला शिरकाव करु दिला नाही. यात सर्वाधिक गावे किनवट सारख्या आदिवासी तालुक्यातील आहेत. येथील 77 खेड्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाला येऊ दिले नाही. याच्या खालोखाल हदगाव 42, कंधार 39, लोहा 22, भोकर 16, माहूर 17, मुदखेड 15, नांदेड 12, हिमायतनगर 9, देगलूर 7, अर्धापूर 4, धर्माबाद 4, उमरी 4, मुखेड 2 व बिलोली 1 अशी तालुक्यातील खेड्यांची संख्या आहे. 

नायगाव तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीने लसीकरणाच्याबाबतीत आपला अपूर्व ठसा उमटविला आहे. या गावात 45 वय वर्षे वयावरील 528 व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष निर्धारित केले होते. या दिलेल्या लक्षाची 100 टक्के पूर्ती करुन या खेड्याने लसीकरणाला नवा विश्वास दिला. भोकर तालुक्यातील भोसी ग्रामपंचायतीने कोरोनाच्या आव्हानावर यशस्वी मात करता यावी यासाठी जे बाधित आले त्यांना गावातील शिवारात-शेतात विलगीकरण करुन त्या ठिकाणी सर्व सुविधा, औषधे उपलब्ध करुन दिली. यामुळे भोसी गावातील दुसऱ्या लाटेत 14 मार्च ते 12 मे या कालावधीत 119 बाधितांवर पोहचलेली संख्या खाली शुन्यावर आणण्यापर्यंत यश मिळविले. आजच्या घडिला भोसी गावात एकही बाधित नाही, हे विशेष. 

ग्रामीण भागातील आरोग्याचे विशेषत: कोरोना आव्हानावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक खेड्यात घरोघरी जाऊन सर्वे, आवश्यकता भासतील त्यांच्या तपासण्या आणि तात्काळ बाधितांवर औषधोपचार ही त्रिसूत्री कटाक्षाने पाळली. 

कोरोना अजून हद्दपाल झालेला नसून त्याचे आव्हान कायम आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांची अधिक काळजी घेण्याचे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे. मोठ्या कष्टातून कोरोनामुक्तीच्या बाबत आजच्या घडिला ज्या 1 हजार 450 खेड्यांनी यश संपादन केले आहे ते यापुढेही टिकविण्यासाठी अधिक दक्षता घेतील अशा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...