नांदेड जिल्हा नागरी स्वच्छता अभियानात
मराठवाड्यात अव्वल, उमरीचे हागणदारी मुक्तीसाठी कौतूक
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या प्रयत्नाला यश
नांदेड, दि. 13 :- स्वच्छ महाराष्ट्र
अभियानातंर्गत हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांच्या कामागिरीसाठी
नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा दुहेरी तूरा खोवला गेला आहे. स्वच्छ भारत
अभियान-नागरी क्षेत्रात औरंगाबाद विभागांतर्गत सर्वाधिक शौचालय बांधकाम पुर्ण
केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचा तसेच मराठवाडा विभागात पहिली हागणदारीमुक्त
नगरपरीषद ठरलेल्या उमरी नगरीचा आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाच्यावतीने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी
हा सत्कार स्विकारला, तर उमरी नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख,
उपाध्यक्ष राजाबाबू सारडा, मुख्याधिकारी निता अंधारे यांनी सत्कार स्विकारला.
मुंबईत झालेल्या या
कार्यक्रमात व्यासपीठावर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, नगरपालिका (प्रशासन) संचालनालयाचे आयुक्त
विरेंद्रसिंग उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात स्वच्छ
महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी क्षेत्रातील स्वच्छता अभियानासाठी जिल्हाधिकारी
सुरेश काकाणी यांनी पुढाकाराने नियोजन केले. त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील
बारा नगर परिषदा व चार नगरपंचायतीमध्ये स्वच्छता मोहिमांचे नियोजनबद्ध प्रयत्न
करण्यात आले. त्यामुळे या नगरपरीषदा-नगरपंचायतीमध्ये स्वच्छता या घटकासाठी सकारात्मक
स्पर्धा सुरु झाली. जिल्ह्यात 2015 मध्ये नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांमधील
सार्वजनिक तसेच वैयक्तीक स्वच्छता घटकांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शौचालय
बांधकामाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. या नगरीपरिषदांमधील सार्वजनिक स्वच्छतेसाठी
सामुहीक प्रयत्नांबरोबरच विविध घटकांना प्रोत्साहीत करण्यासाठीही प्रयत्न करण्यात
आले. तर दुसरीकडे वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी नगरपरीषद प्रशासन विभागाच्या
बैठकीत वारंवार आढावा घेण्यात आला. त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांतील
पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून प्रयत्न
करण्यात आले. यामुळेच शौचालयांच्या बांधकामाला अपेक्षीत गती मिळाली. त्याद्वारे
बांधकामांचे फोटोही राज्यात सर्वाधिक प्रमाणात नांदेड जिल्ह्यातून अपलोड करण्यात
आले. शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट 22 हजार 927 इतके होते. त्यापैकी आता 13 हजार
701 शौचालयांचे बांधकाम पुर्ण होत आले आहे. त्यातील 8 हजार 167 बांधकामांचे फोटो
अपलोड करण्यात आले आहे. सार्वजनिक तसेच वैयक्तीक शौचालयांच्या अभियानात तब्बत 30
हजार 330 तास इतक्या तासांचे श्रमदान करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरी
भागातील स्वच्छता अभियानाने गती घेतली आहे. ग्रामीण तसेच नागरी भागातील स्वच्छता
अभियानात जिल्हा कुठल्याही परिस्थितीत मागे राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन
प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रीया जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी व्यक्त केली
आहे. डिसेंबर 2016 अखेर भोकर, हदगाव, मुदखेड, अर्धापूर व माहूर या सहा नगरपरीषदा
तर जानेवारी 2017 अखेर देगलूरसह, बिलोली, धर्माबाद, कंधार, किनवट व कुंडलवाडी व
लोहा नगरपरीषदा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
नायगाव व हिमायतनगर नगरपंचायतीच्या हागणदारीमुक्तीसाठी मार्च 2017 पर्यंतचा
कालावधी निर्धारीत केला आहे.
जिल्हाधिकारी श्री.
काकाणी यांनी नगरपरीषद प्रशासन विभागाच्या अधिकारी विद्या गायकवाड यांच्यासह,
सर्वच नगरपरीषद-नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या प्रयत्नांचेही कौतूक केले आहे.
या नागरी भागातील नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन, नांदेड
जिल्ह्याला नागरी स्वच्छता अभियानातही अग्रेसर ठेवण्यात योगदान द्यावे, असे
आवाहनही केले आहे.
हागणदारीमुक्त
महाराष्ट्राच्या निर्धारात नांदेडही आघाडीवर...
स्वच्छ महाराष्ट्र
अभियानात 2 आँक्टोंबर 2017 पर्यंत पुर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील या कार्यक्रमात व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी उपस्थित गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, नगरपालिका (प्रशासन) संचालनालयाचे आयुक्त
विरेंद्रसिंग यांनीही या निर्धाराच्या फलकावर स्वाक्षऱ्याही केल्या. त्याचप्रमाणे नांदेड
जिल्हाच्यावतीने जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनीही स्वाक्षरी केली. नांदेड
जिल्हयातील नागरीक नेहमीच सकारात्मक प्रयत्नांना साथ देतात. या त्यांच्या
पाठबळावरच नांदेड जिल्हाही स्वच्छतेत आघाडीवर राहील याच विश्वासाने स्वाक्षरी
केल्याचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नमूद केले.
0000000