Tuesday, December 5, 2017

जिल्हा नियोजन समितीच्या
7 सदस्यांसाठी पोटनिवडणुक कार्यक्रम
नांदेड दि. 5 :- नांदेड जिल्हा नियोजन समिती पोटनिवडणूक 2017 साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मोठे नागरी क्षेत्र या मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांकडून बुधवार 6 ते शनिवार 9 डिसेंबर 2017 या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहेत. या नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवार 11 डिसेंबर 2017 रोजी होणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज दिली.
या पोटनिवडणुकीसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील निवडून आलेल्या उमेदवारांमधून एकूण 7 सदस्य नांदेड जिल्हा नियोजन समितीवर निवडून द्यावयाचे आहेत. या सात उमेदवारांपैकी अनुसूचित जातीसाठी 1, ना.मा.प्र. 2 त्यापैकी 1 जागा ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण एकूण 4 जागा त्यापैकी महिलासाठी 2 जागा असे उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत.  
मतदानासाठी एकूण 81 मतदार असून त्यापैकी 38 पुरुष व 43 स्त्री मतदार आहेत. आवश्यकता असल्यास मतदान रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 ते सायं 5 या कालावधीत पार पडणार असून यासाठी गुप्त मतदान पध्दतीने पसंती क्रमानुसार मतदान करण्यात येणार आहे. मतमोजणी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर नांदेड येथे मंगळवार 26 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 वा. सुरु होणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

000000
सकारात्मक उर्जेच्या सहवासात सतत रहा
- प्र. जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड दि. 5 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नकारात्मक बाबीपासून रहावे, त्याचा आपल्या अभ्यासावर मनावर परिणाम होऊ देता सकारात्मक उर्जेच्या सहवासात सतत राहण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
   "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित दरमहा 5 तारखेच्या  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात आज अध्यक्षस्थानावरुन श्री. पाटील बोलत होते. पुणे येथील प्रा. सचिन ढवळे यांचे एमपीएससी सीसॅट   शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेतील गणीत, बुध्दीमता आकलन क्षमता या विषयावर व्याखान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांची उपस्थिती होती
श्री. पाटील म्हणाले की, अभ्यास करताना ताण-तणावापासून दुर ाहण्यासाठी आवडीचे चांगले चित्रपट पहाणे, संगीत कणे, पुस्तक वाचणे यासारख्या मन प्रफुलीत करणारे छंद जोपासण्याचा सल्ला विद्यार्थी मित्रांना दिला. प्रा. सचिन ढवळे यांनी दिवसभरातील आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सीसॅट, णि, बुध्दीमता चाचणी आकलनक्षमता याविषयी उदाहरणासह मागदर्शन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या द्धती विद्यार्थ्यांनी त्यासाठी करावयाची तयारी याविषयी अभ्यासपुर्ण माहिती त्यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
 विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रा. ढवळे यांचे ग्रामगिता देऊन स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात 'इतनी शक्ती हमे देना दाता' या प्रेरणा गीताने करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे  यांनी  त्रसंचालन मुक्तीराम शेळके यांनी तर आभार प्रदर्शन आरती कोकुलवार  यांनी केले.
कार्यक्रम यशस्वतेसाठी प्रताप सुर्यवंशी, संजय कर्वे, कोंडीबा गाडेवाड, बाळू पावडे, श्रीजी इज्जपवार, रघुवीर श्रीरामवार ,लक्ष्मण शनेवाड, सोपान यनगुलवाड, ज्ञानेश्वर शनेवाड, कृष्णा वाईकर यांचे सहकार्य लाभले.

000000
जिल्ह्यातील नागरी भागात गुरुवारी
"प्लास्टिक वेचा" मोहिमेचा दुसरा टप्पा
नांदेड, दि. 5 :- प्लास्टिक मुक्ती अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील नागरी भागात गुरुवार 7 डिसेंबर रोजी प्लास्टिक वेचा मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे अवाहन प्र. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.  
दैनंदिन जीवनात शहरी भागात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्लास्टिक कचरा मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्लास्टिक वापरात प्रामुख्याने कॅरिबॅग, खाद्यपदार्थाचे वेष्टन, पाण्याची बॉटल, दुधाची पिशवी आदीचा समावेश आहे. प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी घातक असुन त्यासाठीचे दुष्परिणाम सर्वत्र पहावयास मिळतात. प्लास्टिक मुक्ती अभियानात प्रामुख्याने भविष्यात प्लास्टिकचा संपुर्ण वापर बंद करणे व सध्या अस्तित्वात असलेला कचऱ्याची विल्हेवाट लावणे असे दोन महत्वाचे टप्पे आहेत. यासाठी शासनाने संपुर्ण प्लास्टिक मुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात 27 नोव्हेंबर रोजी प्लास्टिक वेचा मोहिमेचा पहिला टप्पा राबविण्यात आला होता. यावेळी 607 अधिकारी, कर्मचारी, 463 एनजीओ, महिला बचतगट, नागरीकांनी सहभाग घेऊन ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. ज्यामध्ये 2 हजार 182 किलो एवढया मोठया प्रमाणात प्लास्टिक गोळा करण्यात आले होते.
या मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्याबाबत औरंगाबादचे विभागीय आयुक्त यांनी निर्देशीत केल्यानुसार या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी व त्याचे अधि‍नस्त असलेले कर्मचारी, नागरीक, महिला बचतगट, शाळा-कॉलेज मधील विद्यार्थी व सेवाभावी संस्था आदीची मदत घेण्यात येणार आहे, असे नगरपालिका प्रशासन विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

000000
बालगृहातील मुलांसाठी
बाल महोत्सवाचे आयोजन
नांदेड, दि. 5 :- जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शासकीय, स्वयंसेवी संस्थामध्ये, बालगृहामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरु बालमहोत्सव 2017-18 चे आयोजन 6, 7 व 8 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
हा बालमहोत्सव जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपळकुंठा संचलित लहुजी साळवे निराधार निराश्रित बालकाश्रम, वसंत हायस्कुल जवळ, पोतदार कॉलेज समोर, धनगरवाडी रोड, साईबाबानगर वाडीपाटी, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या बाल महोत्सवादरम्यान मुलांच्या कबड्डी, क्रिकेट, गोळाफेक, थाळीफेक आदी मैदानी क्रिडा स्पर्धाचे तसेच सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बालमहोत्सवाचे उद्घाटन सोमवार 6 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचा समारोप शुक्रवार 8 डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती नांदेडचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी दिली आहे.

00000
तुर, कापुस, हरभरा पिकासाठी कृषि संदेश
नांदेड , दि. 5 :- कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या 5 तालुक्यात तुर, कापुस, हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. पिकावरील किडीपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांना कृषि संदेश उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी दिला आहे.
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनवलेरेट 20 इसी 8 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तुर शेंग माशीच्या नियंत्रणासाठी क्युनॉलफॉस 25 इसी 30 मिली प्रती 10 लिटर पाणी, एनएसई (निबोंळीतेल) 5 टक्के फवारणी करावी. हरभरा घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही 50 मिली प्रती हेक्टर किंवा एनएसई 5 टक्के फवारणी करावी, असेही कृषि संदेशात म्हटले आहे.

000000
रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन  
नांदेड , दि. 5 :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने गुरुवार 7 डिसेंबर 2017 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले मंगल कार्यालय, फुले मार्केट, आयटीआय जवळ नांदेड येथे सकाळी 11 वा. करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गरीब होतकरु तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी केले आहे.  
या रोजगार मेळाव्यात सेल्स ऑफिसर, हेल्पर, सुरक्षा गार्ड, आयटीआय ट्रेनी, प्रोडक्शन ट्रेनी या पदाची संख्या जवळपास 290 असून किमान शैक्षणिक पात्रता एस.एस.सी.पास वेतन 4 ते 18 हजार रुपये, वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. चार नामांकीत कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन एन्ट्री पास असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांनी केले आहे.  
आयटीएम (आयसीआय बँक) कंपनीत महिला व पुरुषांसाठी महाराष्ट्रात कुठेही सेल्स अधिकारी पदासाठी 50 जागा असून शिक्षण पदवी तर वय 20 ते 26 असणे आवश्यक आहे. अंदाजित वेतन (रुपये) 14 ते 18 हजार रुपये राहील. फ्लेमिंगो फार्मा कृष्णुर नांदेड या कंपनीत पुरुषांसाठी प्रोड्यूक्शन ट्रेनीच्या 10 पदासाठी शिक्षण डीफार्म तर वय 18 ते 25 असावे. कामाचे ठिकाण कृष्णुर ता. नायगाव अंदाजित वेतन  4 ते 6 हजार रुपये राहील. दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद कंपनीत पुरुषांसाठी हेल्परच्या 50 पदासाठी शिक्षण दहावी उत्तीर्ण वय किमान 18 वर्ष पुर्ण, कामाचे ठिकाण औरंगाबाद, अंदाजीत वेतन 8 ते 10 हजार रुपये राहील. तर याच कंपनीत पुरुषांसाठी सेक्युरिटी गार्डच्या 50 पदांसाठी दहावी उत्तीर्ण, वय 25 वर्ष किमान, कार्यक्षेत्र औरंगाबाद / नांदेड, अंदाजित वेतन  8 हजार ते 10 हजार रुपये राहील. पुरुषांसाठी आयटीआय ट्रेनीच्या 30 पदांकरीता शिक्षण टर्नर, फिटर इलेक्ट्रिशियन, वय किमान 22 वर्ष, कामाचे ठिकाण औरंगाबाद, अंदाजित वेतन 10 ते 12 हजार, रुपये राहील. औरंगाबाद येथील मारुती इंटरप्रायझेस कंपनीत हेल्परचा महिला व पुरुषासाठी प्रत्येकी 50 पदांसाठी कामाचे ठिकाण वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद अंदाजित वेतन 8 ते 12 हजार रुपये राहील.
सोबत आधार कार्ड , सेवायोजन (एम्ल्पॉयमेंट) नोंदणी कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दहावीची टिसी / सनद, जातीचा दाखला (असल्यास) या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणाव्यात. अधीक माहितीसाठी सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे  संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.  
0000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...