गरीब, गरजुंना आधार देण्यासाठी
सर्वोतोपरी प्रयत्न - पालकमंत्री
खोतकर
निराधारासाठींच्या योजनांतील
अनुदान वितरण संपन्न
नांदेड, दि.
1 :- गरीब, गरजूंना
आधार देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे
प्रतिपादन राज्याचे
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे केले. जुने नांदेड गाडीपुरा परिसरातील रेणुकामाता मंदिर येथे
आयोजित संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना खाते-पुस्तक, सानुग्रह अनुदान
तसेच शिधापत्रिकांचे वाटप असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात
पालकमंत्री खोतकर प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी संत
बाबा बलविंदरसिंघजी प्रमुख उपस्थित होते. तसेच आमदार हेमंत पाटील, संजय गांधी
निराधार योजना नांदेड समितीचे अध्यक्ष जम्मुसिंह ठाकूर, नगरसेवक अन्नपुर्णा ठाकूर,
नगरसेवक बाळू खोमणे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर,
संजय गांधी योजनेचे तहसिलदार बाबाराव मोरे, शिवसेनेचे पदाधिकारी भुजंगराव पाटील,
मिलिंद देशमुख, धोंडू पाटील, प्रकाश कौडगे, अवतारसिंघ, मनोज भंडारी आदींची उपस्थिती
होती.
पालकमंत्री खोतकर
म्हणाले की, सामान्य नागरिकांनाही जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठीच शासनाची
ध्येय धोरणे आहेत. त्यासाठीच अशा योजनांतून पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ
पोहचविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जातो. त्यासाठी समाजातील विविध घटक आणि
प्रशासनातील समन्वयही महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने या कार्यक्रमांद्वारे मोठ्या
प्रमाणात निराधार आणि गरजुंपर्यंत लाभ पोहचविला जातो आहे, ही समाधानाची बाब आहे.
सुरवातीला
जम्मुसिंह ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. वर्षभरात सुमारे पंधराशे निराधारांना
योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आजच्या कार्यक्रमात विविध
योजनांतर्गत गरजू अशा सुमारे पाचशे लाभार्थ्यांना खातेपुस्तक, सानुग्रह अनुदान
तसेच शिधापत्रिका देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार हेमंत
पाटील यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना,
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ
निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा
गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा योजनांतर्गत
विविध लाभार्थ्यांना धनादेशांचे, खाते-पुस्तक तसेच शिधापत्रिकांचे वितरण करण्यात
आले.
सिडकोतील स्पर्धा मार्गदर्शन केंद्रास पालकमंत्री खोतकर यांची भेट
सिडको परिसरातील आण्णाभाऊ साठे सेवाभावी
संस्था, जिरोणा यांच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
केंद्राच्या नवव्या तुकडीचे पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
पालकमंत्री खोतकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. ते म्हणाले
की, नवी पिढी मार्गदर्शनाबाबत आणि संधीबाबत सुदैवी आहे. ही पिढी आयटी-बिटीच्या
युगातील पिढी आहे. त्यामुळे आयुष्यातील या विद्यार्थीदशेत काही वर्षे मेहनत
करण्याची जिद्द ठेवा. त्यामुळे पुढे आयुष्यभराची शिदोरी निर्माण होऊ शकते.
त्यामुळे या विद्यार्थी दशेतच पुस्तके, ग्रंथांशी मैत्री करा. शंभर टक्के
प्रामाणिकपणे प्रयत्न करा, यश तुमचेच असेल.
यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी या
केंद्राच्या वाटचालीबाबत समाधान व्यक्त करून, केंद्रास अभ्यासिका, वसतीगृह आदी
सुविधांबाबत सर्वोतोपरी मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. बार्टी-पुणेच्या
उपक्रमांतर्गंत चालविण्यात येणाऱ्या या मार्गदर्शन केंद्राच्या वैशिष्ट्यांबाबत
संचालक डॅा. जी. सी. जिरणेकर यांनी माहिती दिली.
सांगवीतील रस्त्याचे पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण
सांगवीतील प्रभाग क्र. 3 ब अंतर्गत एमजीएम कॉलेज
ते बजरंगनगर हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या
हस्ते लोकार्पण करण्यात आले. नगरसेविका नागाबाई कोकाटे यांच्या वार्ड विकास
निधीतून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. लोकार्पणाच्या या कार्यक्रमास आमदार
हेमंत पाटील, नगरसेविका नागाबाई कोकाटे, दत्ता कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य बबन
बारसे आदींची उपस्थिती होती.
000000