Monday, May 1, 2017

नांदेडच्या विकासाला गवसणी घालण्यासाठी
एकदिलाने प्रयत्न करु - पालकमंत्री खोतकर
महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ संपन्न
नांदेड दि. 1 :- नांदेडच्या विकासाच्या अमर्याद संधीना गवसणी घालण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करू या, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते झाले. ध्वजवंदनानंतर ते संदेशपर भाषणात बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलन आणि उत्साहात समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार-जवळगावकर, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर सौ. शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव,  विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, आदींचा समावेश  होता.
आपल्या शुभेच्छापर संदेशात पालकमंत्री खोतकर म्हणाले की, पावसाने दिलेली साथ आणि जलयुक्त शिवार अभियानासारख्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे जिल्ह्यात चांगले पाणीसाठे निर्माण करता आले आहेत. जलयुक्त शिवार अभियान हे लोकचळवळीमुळे यशस्वी झाले. त्यात नांदेड जिल्हावासियांनी दिलेले योगदान निश्चितच गौरवास्पद आहे. आगामी खरीप हंगामात 7 लाख 72 हजार 575 हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत आहे. त्यासाठी बियाणे, खते पुरेशी उपलब्ध व्हावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. पीक पद्धतीत सुनियोजित बदलाबाबतही आता शेतकरी बांधवांनी जागरूक रहावे लागेल. यातूनच शेतीपूरक उद्योग आणि शेतीला पशूपालन व्यवसायाचीही जोड मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठीही प्रयत्न सुरु आहे. त्याअंतर्गतच सुरु असलेल्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरीमोहिमेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विष्णुपूरी प्रकल्पाचे थकीत चाळीस कोटींचे वीज बील माफ करून सिंचनासाठी पाण्याच्या दोन पाळ्या देण्यात आल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
पालकमंत्री खोतकर यांनी जिल्ह्यातील विविध उपक्रमांचा गौरवाने उल्लेख केला. त्यामध्ये कॅशलेस व्यवहारासाठीचा डिजीधन मेळावा, पुरवठा विभागाची पीडीएमएमएस प्रणाली, उज्ज्वल नांदेड उपक्रम तसेच शहर सौंदर्यीकरणासाठीच्या आमदार हेमंत पाटील यांच्या बोलक्या भितींच्या उपक्रमाचा तसेच नांदेडहून सुरु झालेल्या पुर्ववत विमान सेवा यांचा समावेश होता.  ते म्हणाले की, शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रस्त्यांचे सदृढ जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत पश्चिम नांदेडमध्ये रेल्वे ओव्हरब्रीजचा प्रकल्प महत्त्वपुर्ण ठरेल. नांदेड जिल्ह्यात कृषी, औद्योगीक, पर्यटन अशा अनेकविध क्षेत्रात विकासाच्या अमर्याद संधी आहेत. त्यांना गवसणी घालण्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार अभियानातील जिल्ह्यातील कामांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील दानशूर घटकांनी पुढे यावे , असे आवाहनही श्री. खोतकर यांनी यावेळी केले.
समारंभात सुरवातीला पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री खोतकर यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील आणि सेकंड परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक शामराव राठोड यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलीस पथकाच्या तीन प्लाटूनसह, महिला पोलीसांचे पथक, जलद कृती दल, शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, अग्नीशमन दल, बुलेट रायडर संचलनात सहभागी झाले. पालकमंत्री खोतकर यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांना शुभेच्छाही दिल्या. व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.
पोलीस कवायत मैदान, क्रीडा संकुलाचे नामकरण संपन्न
ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय समारंभानंतर पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते नवीन पोलीस कवायत मैदानाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदान असे नामकरण करण्यात आले. या नामकरणाच्या कोनशीलेचे अनावरण पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर याच प्रांगणातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या इंद्रधनु
पोलीस क्लबचेही उद्घाटन करण्यात आले. जुन्या पोलीस कवायत मैदानाचे श्री गुरु गोबिंदसिंघजी क्रीडा संकुल असे नामकरण करण्यात आले आहे. त्या कोनशीलेचही पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी वाहतूक पोलीसांसाठीच्या तीन अद्ययावत मोटारी तसेच दोन व्हॅन्सचे उद्घाटनही पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. ‍जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे यांनी या सर्व उपक्रमांबाबत प्रास्ताविक केले.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...