Thursday, September 8, 2022

 वैज्ञानिक कुतूहल जोपासण्यासाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन एक प्रभावी माध्यम

- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे 

·49 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये थाटात उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-   विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला वाव देण्यासाठी तसेच वैज्ञानिक कुतूहल जोपासण्यासाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन एक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केले. 49 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ग्रामीण टेक्निकल कॅम्पस मध्ये उद्घाटन नुकतेच संपन्न झाले यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी बेंगलोरचे सहसंस्थापक रुपेश किनीकर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यांची उपस्थिती होती. 

प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रतिभा असते. विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला वाव देण्यासाठी विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये धाडस, आत्मविश्वास व सातत्य ही त्रिसूत्री रुजवावी असे त्यांनी यावेळी सांगितले. विज्ञान प्रदर्शनातून मांडलेल्या प्रयोगातून समाज उपयोगी प्रकल्पांची उभारणी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रदर्शनात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी मांडलेल्या ॲपचे व प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. प्रकल्पांच्या उभारणीसाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न व कुतूहल निर्माण झाले पाहिजेत कारण कुतूहलच विज्ञानाला जन्म देत असते. परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संघर्षाची प्रेरणा मनात जोपासावी. तसेच समाज माध्यमावर वेळ वाया न घालता वैज्ञानिक प्रकल्पांची निर्मिती करावी असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

यावेळी अँथम बायोसायन्सेस, बेंगलोरचे सहसंस्थापक रुपेश किनीकर यांनी उद्योगक्षेत्राला अभियंत्यांकडून असलेल्या अपेक्षा विशद केल्या. अभियंत्यांमध्ये जीवनभर शिक्षणाची वृत्ती, कल्पकता तसेच काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची क्षमता निर्माण करावी असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव विशद केला. 

यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसने विज्ञान प्रदर्शनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. प्रास्ताविकातून प्राचार्य, डॉ. विजय पवार यांनी कोचिंग संस्कृतीवर भाष्य करत दहावी नंतर विध्यार्थ्यानी बायोलॉजीसह गणित विषयाची कास धरावी असा आग्रह व्यक्त केला. कारण गणिताची कास धरल्यास विद्यार्थ्यांना मेडिकलसह कृषी, फार्मसी व अभियांत्रिकी क्षेत्राची द्वारे खुली होतात असे मत मांडले.  

प्रदर्शनातून प्राथमिक गटातून 48, माध्यमिक गटातून 48, आदिवासी गटातील 8 व शिक्षकांचे 10 प्रकल्प असे एकूण 1400 प्रकल्पांची मांडणी करण्यात आली. यात वूमेन्स सेक्युरिटी ॲप, हायड्रोजेन फ्युएल जेनेरेटोर, गणितीय मॉडेल, वीज निर्मिती व पाणी उपसा यंत्र, स्वयंचलित उपसा जल यंत्र, कोरोना व्हायरस मॉडेल, हायड्रॉलिक पॉवर, स्वयंचलित पाणी मोटार नियंत्रक हे प्रकल्प आकर्षणाचे केंद्र ठरले. हे प्रदर्शन 6 व 7 सप्टेंबर 2022 असे भरविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी देखील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या शालेय भेटींचे आयोजन करावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांनी केले आहे. सूत्रसंचालन डॉ. ओमप्रकाश दरक व आभारप्रदर्शन  प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. जवळपास 26 परीक्षक हे परीक्षणाचे काम पाहत आहेत. विज्ञान प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक पोकले हनुमंत, ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेडचे सुधीर शिंदे व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

00000

 सुधारित वृत्त क्र.  834 

त्यांच्या डोळ्यात आनंदही आणि अश्रुही ! 

·        पालकांनी मुलींना धैर्य द्यावे - आमदार भीमराव केराम

·        आपल्या कर्तव्यातून काही घरे उजळल्याचा सर्वोच्च आनंद - किर्तीकिरण पुजार 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- स्वत:च्या उपजत आदिवासी ज्ञानाला जवळ करत या मुलींच्या पालकांनी मनाची घालमेल सांभाळून शाळेत घातले. शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत या मुली निवासासह बारावी पर्यंत शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सिद्धही झाल्या. पुढे काय हा प्रश्न त्यांच्या समोर होता. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक किर्तीकिरण एच. पुजार  यांनी या मुलींच्या मनातील घालमेल ओळखली.

शिक्षणासाठी घरच्या मर्यादा लक्षात घेऊन या मुली जिद्दीने बारावी पर्यंत शिकल्या. पुढील शिक्षणापेक्षा कायदानुसार वय पूर्ण झाले की लागलीच लग्न लावून मोकळे होणे ही जवळपास सर्व आदिवासी पालकांची मानसिकता या मुलींच्या भविष्याला मर्यादा घालणारी आहे. यापेक्षा या मुलींना स्वयंरोजगाराच्यादृष्टिने, त्यांच्या पायावर त्यांना उभे करण्याच्यादृष्टिने दोन वर्षापूर्वी पुजार यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी बोलणे केले. सामाजिक कृतज्ञता आणि तत्परता यासाठी आदर्श मापदंड निर्माण करणाऱ्या टाटा कंपनीने यावर तात्काळ प्रतिसाद देत मुलींच्या निवडीसाठी सरळ किनवट गाठले. 

ज्या आदिवासी मुलींना स्वत:ला सिद्ध करायचे आहे अशा मुलींनी पुढे यावे असे आवाहन करून प्रकल्प संचालक पुजार यांनी आदिवासी तालुका असलेल्या किनवट येथे दोन दिवसीय शिबिर आयोजित केले. याची यवतमाळ, धारणी येथील केंद्रांना कल्पना देऊन तेथील मुलींनाही निमंत्रित केले. दिनांक 6 व 7 सप्टेंबर रोजी झालेल्या दोन दिवसीय शिबिरासाठी 600 मुली यात सहभागी झाल्या. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने एक स्वतंत्र मानव संसाधन विभागाचे पथक बेंगळूरू येथून दाखल झाले. त्यांनी त्यांच्या निवड पद्धतीने यातील तब्बल 410 मुलींची निवड केली. या सर्व मुलींना बेंगळूरू येथे विशेष प्रशिक्षण देऊन तेथून 50 किमी अंतरावर असलेल्या होसुर येथील टाटाच्या मोबाईल पार्टस् व इलेक्ट्रॉनिक्स विभागात रुजू केले जाणार आहे. 

तलाईगुडापाडा येथील या मुलींपैकी एक असलेले पालक राजाराम मडावी यांनी आपल्या मुलीच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. हा आनंद व्यक्त करतांना राजाराम व त्याची पत्नी अत्यंत भाऊक झाली. आमच्या पिढ्यांनी तालुक्याबाहेर जास्त दूरचे जग कधी बघितले नाही. मात्र पुजार यांच्या एका छोट्याशा प्रयत्नातून मुलगी बेंगळूरूला जाते ती सुद्धा नौकरीसाठी असे सांगून आपल्या आनंद अश्रुंना वाट मोकळी करून दिली. याच भावना इतर पालकांच्या नसतील तर नवलच !  

 पालकांनी मुलींना धैर्य द्यावे

- आमदार भीमराव केराम

आदिवासी भागातील मुलींना शासनाच्या विविध योजनांमुळे शिक्षणाची संधी मिळाली. मुलींच्या पालकांनीही थोडे धैर्य दाखवून शिक्षणासाठी त्यांना बाहेर वसतीगृहात ठेवण्यास अनुमती दिली. हे जरी खरे असले तरी शिक्षण घेतल्यानंतर मुलींना जेंव्हा स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते तेंव्हा पालकांनी वेगळा विचार न करता धैर्याने त्यांच्या सोबत उभे राहून मुलींना हिंमत द्यावी असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट व प्रकल्प संचालक किर्तीकिरण एच पुजार यांनी हाती घेतलेल्या या विशेष उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. टाटा सारखी कंपनी किनवटच्या आदिवासी भागात येते हे आम्हा सर्वांसाठी भूषणाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या कर्तव्यातून काही घरे उजळल्याचा

सर्वोच्च आनंद - किर्तीकिरण पुजार  

आपली शासकीय कर्तव्य बजावताना वास्तविक पाहता प्रत्येकाला समाज ऋण फेडण्याची, समाजाप्रती कृतज्ञता जपण्याची संधी मिळत असते. आदिवासी प्रकल्पातील काम हे मानवी मुल्यांना, मागास असलेल्या घरांना नवा प्रकाश देणारे असते. शासनानी ज्याही काही योजना हाती घेतलेल्या आहेत त्या या घटकातील प्रत्येकांना प्रकाश वाटा दाखविणाऱ्या आहेत. मी फक्त यांच्या रोजगारा संदर्भात टाटा कंपनीसमवेत बोललो व याला यश आल्याची भावना आदिवासी प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त केली.

00000










 



 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित

 नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  162 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1, किनवट 2, मुखेड 1, कंधार 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 9 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 445 एवढी झाली असून यातील 1 लाख 732  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकूण 2  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 12,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 9 असे एकूण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 17 हजार 865
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 96 हजार 993
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 445
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 732
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-
 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 वृत्त क्र.  832 

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी
ऑनलाईन अर्ज सादर करावेत
 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छूक असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज तात्काळ समितीकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे. 

शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याने चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही त्यांनी समितीने दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. त्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रती जोडून ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावेत. जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांस आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही, असे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे असेही आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्र.  831 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना

मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड (जिमाका), दि. 8 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करणे ही योजना सुरू केली. नांदेड जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचतगटांनी http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. त्याची सत्यप्रत शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 पर्यंत समाज कल्याण नांदेड यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र.  830 

गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी 

भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

 

नांदेड (जिमाका), दि. 8 :- गणेशोत्सव विसर्जन मार्गात भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मिरवणूक मार्गात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे यादृष्टीकोणातून नांदेड शहर व‍ जिल्ह्यात शुक्रवार 9  सप्टेंबर 2022 रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत.

 

मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) अन्वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत. आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार 10 सप्टेंबर 2022  रोजी भरविण्यात यावेतअसे आदेशात स्पष्ट केले आहे.   

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...