Tuesday, August 30, 2016

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील
नेत्रदान चित्रप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 30 :-  नेत्रदानाची जनजागृती व्हावी यासाठी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेबर 2016 या  कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे नेत्रदान पंधरवाड्यानिमित्त नेत्रदान चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांसाठी चित्रप्रदर्शन सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत खुले राहील , या प्रदर्शनाचे नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.      
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता  डॉ. काननबाला येळीकर यांच्या हस्ते संपन्न झाले.  यावेळी प्राध्यापक डॉ. संतोष सिरसिकर, नेत्र विभाग प्रमुख डॉ. विवेक  सहस्रबुद्धे, सहयोगी प्राध्यापक डॉ. राऊत, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. बोडके यांची उपस्थिती होती.  
इच्छुकांना मरणोत्तर नेत्रदानाचे  संकल्प  अर्ज भरण्याची  व्यवस्था  करण्यात आली आहे. मागील पाच वर्षामध्ये जिल्ह्यात जवळजवळ 100 नेत्रांचे संकलन जनतेच्या सहकाऱ्याने शक्य झाले आहे. गरजू रुग्णांना याचा लाभ झाल्याचे समाधान मिळू शकले अशी भावना विभाग प्रमुखानी व्यक्त केली.  
            या उपक्रमासाठी मार्गदर्शन प्राध्यापक डॉ. सहस्रबुद्धे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. गुंटूरकर, डॉ. इंगळे, डॉ. भोसीकर यांचे लाभले. कार्यक्रमाचे संयोजन वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याखाता, रेसिडेंट डॉक्टर्स, इन्चार्ज सिस्टर्स, श्री. कंधारकर, जिल्ह्यातील नेत्रचिकित्सा अधिकारी श्री. दीक्षित, श्री. तातोडे, श्री. घोडके, श्री. कागबटटे, श्री. मांजरमकर तसेच नेत्रदान समुपदेशक श्रीमती ज्योती पिंपळे, श्री. गजानन टेकाळे, श्री. मोजेस  यांनी केले.

000000
गुंडेगाव येथे फिरते लोकन्यायालय, कायदेविषयक शिबीर संपन्न 
नांदेड, दि. 30 :- गुंडेगाव येथे नुकतेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने फिरते लोकन्यायालय व कायदेविषक शिबीर असे उपक्रम संपन्न झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  नांदेडच्या अध्यक्षा  न्या.  सविता बारणे यांच्या निर्देशानुसार या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
            ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या फिरते लोकन्यायालय उपक्रमाच्या प्रारंभी बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  न्या. ए. आर. कुरेशी यांनी भारतीय नागरीकांचे मुलभूत कर्तव्य (आर्टिकल 51 ए भारतीय घटना) नदी, नाले, जंगल, वन्य प्राणी, पाण्याचे स्त्रोत यांचे संरक्षण व सुधारणा तसेच पर्यावरण संरक्षण याबाबत माहिती दिली.
फिरत्या लोकन्यायालयाचे पॅनल प्रमुख निवृत्त जिल्हा न्यायाधीश भीमराव नरवाडे पाटील यांनी  ‘‘बेटी बचाव, बेटी पढाओ’’ याबाबत माहिती देतानाच परस्परातील वाद न वाढविता ते सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन केले.   
अॅड.  प्रविण अयाचित यांनी हिंदू विवाह कायदा याविषयी माहिती दिली. तत्पुर्वी अॅड. श्रीमती झगडे यांनी महिलांना कौटुंबिक हिंसाचार अधिनियम याविषयी माहिती दिली. अॅड. एच. आर. जाधव यांनी फारकतीचे कायदे व अॅड. वाकोडे  यांनी  विधी सेवा प्राधिकरणाच्या तरतूदी व लाभ याबाबत मार्गदर्शन केले.
तत्पुर्वी गुंडेगाव येथील  सरपंच दासराव  हंबर्डे यांनी गुंडेगावास विविध पातळीवर तसेच राष्ट्रपतींकडून  विविध  पुरस्कार  मिळाल्याचे सांगून हे पुरस्कार  गावक-यांच्या सहकार्याने झाल्याचे सांगीतले.

00000000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझासंकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा
Ø  निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
Ø   पंधरा, दहा व पाच हजार रुपयांची पारितोषिके
Ø   एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे
 मुंबई, दि. 22: महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये, 5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
            महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, भाग्यश्री योजना, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी  संबंधित जिल्हा माहिती कार्यालय आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे हाय रिझॉल्युशन (एचडी) छायाचित्रे dgiprnews01@gmail.com या ई मेल पत्यावर  दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा.त्यासाठी समन्वयक वरिष्ठ सहायक संचालक अजय जाधव (9702973946),dloajayjadhav2012@gmail.com), सहायक  संचालक सागरकुमार कांबळे (8605312555),  (ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.


अवयवदानाचे परिवर्तन समाजात रुजविण्यासाठी
तरुणांनी संदेश दूत व्हावे - कुलगुरु डॅा. विद्यासागर
नांदेड शहरात महा-अवयदानात अभियानात भव्य जनजागरण फेरी

नांदेड, दि. 30 - मृत व्यक्तीलाही अवयदानामुळे पुढे अनेक व्यक्तींमध्ये देहरुपी उरता येते. त्यासाठी अवयवदानाचे परिवर्तन समाजात रुजविण्यासाठी तरुणांना संदेशदूत व्हावे लागेल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. पंडीत विद्यासागर यांनी आज येथे केले. महा-अवयवदान अभियानांतर्गत आयोजित भव्य जनजागरण फेरीच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे समारोप समारंभ झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर महा-अवयवदान अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अभियानाच्या समन्वय अधिकारी तथा डॅा. शंकरराव चव्हाण  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. काननबाला येळीकर, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा  शल्यचिकीत्सक डॅा. विजय कंदेवाड, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. भास्कर श्यामकुंवर, आयएमए-नांदेडचे अध्यक्ष डॅा. संजय कदम, निमा-नांदेडचे अध्यक्ष डॅा. डी. लक्ष्मण, डॅा. हंसराव वैद्य, लायन्स क्लबचे अध्यक्ष जयेश ठक्कर, रोटरीचे अध्यक्ष डॅा. दिपक मोरताळे, डॅा. करुणा पाटील, डॅा. वाय. एस. चव्हाण, गुणवंत पाटील-हंगरगेकर आदींची उपस्थिती होती.
 मरावे परी..देहरुपी उरावे.. या उक्तीच्या घोषणेसह... भव्य जनजागरण फेरी काढण्यात आली. तरूण, विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्तसहभागासह विविध स्वयंसेवी संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या फेरीला भव्य असे रुप प्राप्त झाले होते.
           
अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करताना कुलगुरु डॅा. विद्यासागर पुढे म्हणाले की, वैचारिक स्थित्यंतराच्या  काळात, आता मृत्युची संकल्पनाही बदलते आहे. विज्ञान-तंत्रज्ज्ञानामुळे मृतमेंदु संकल्पना पुढे आली. या नव्या संकल्पना आता स्विकाराव्या लागतील. मृत व्यक्तीलाही अवयवदानाच्या स्वरुपात अनेक व्यक्तींमध्ये  देहरुपी  उरता येते. यापुर्वी आपण ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे असे म्हणत असू, पण आता मरावे परी देहरुपी उरावे ही उक्तीही सत्यात आली आहे. हे वाक्य घेऊन, तरुणांनी समाजात जावे लागेल. इतरांमध्ये परिवर्तन घडवून आणताना , स्वतःपासून त्याची सुरवात करावी लागेल. अवयवदानाचे परिवर्तन समाजात रुजविण्यासाठी तरुणांना संदेशदूत व्हावे लागेल.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, अवयवदानाची  ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून आणि आपल्या कुटुंबापासून सुरवात करावी लागेल. पुर्वी रक्तदानाकरिता आणि कालांतराने  नेत्रदानाकरिता  अशी  चळवळ उभी करावी लागली होती. त्याचप्रमाणे अवयदानाकरिता समाजात जागृती निर्माण करण्यासाठी कुटुंबापासून सुरवात करावी लागेल. आगामी सण-उत्सवाच्या काळातही अवयदानाबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
समारंभाची सुरवात धन्वंतरी पुजनाने झाली. सक्षम संस्थेच्या सदस्यांनी स्वागतगीत सादर केले. जिल्हा  शल्यचिकित्सक  डॅा.  कंदेवाड यांनी प्रास्ताविक केले. रेडक्रॅास, लायन्स क्लब, शुभकरोंती फाऊंडेशन, रोटरी क्लब यांनी या अभियानासाठी उत्स्फुर्त सहकार्य केल्याचे डॅा. कंदेवाड यांनी नमूद केले. डॅा. गौरी जाधव यांनी अवयदानाच्या संकल्पनेबाबत सादरीकरण केले. सक्षमचे बी. डी. शिंदे, अधिष्ठाता डॅा. श्यामकुंवर, डॅा. येळीकर यांचीही समयोचित भाषणे झाली. डॅा. दिपक हजारी यांनी आभार मानले. डॅा. उज्ज्वला पवार यांनी पसायदान सादर केले. आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अवयदानाबाबतचे पथनाट्यही सादर केले.
तत्पुर्वी, आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणातून भव्य जनजागरण फेरीस सुरवात झाली. कुलगुरु डॅा. विद्यासागर, जिल्हाधिकारी श्री. काकाणी आदी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून फेरीस मार्गस्थ करण्यात आले. आयुर्वेद महाविद्यालय, शिवाजीनगर, महात्मा ज्योतीबा फुले पुतळा परिसर-आयटीआय चौक ते कुसुम सभागृह पुढे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह श्री  गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परिसर अशा मार्गावरून फेरी काढण्यात आली. फेरीत विविध राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सीग महाविद्यालय तसेच विविध स्वंयसेवी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आदींनी सहभाग घेतला. अवयदानाचे महत्त्व स्पष्ट करणारी घोषवाक्यांचे फलक, त्याबाबत घोषणा यामुळे फेरी लक्षवेधी ठरली. अतिरिक्त जिल्हाशल्य  चिकित्सक डॅा. एच. आर. गुंटूरकर, डॅा. व्हि. एन. भोसले, डॅा. दिपक शिरसीकर आदींनी फेरीचे व समारंभाचे संयोजन केले.

00000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...