Wednesday, July 19, 2017

पीक विमा नोंदणी, पीक कर्ज वाटप
बँकांनी तातडीने करावे - जिल्हाधिकारी डोंगरे
          नांदेड, दि. 19 :- शेतकऱ्यांसाठी बँकांनी सकारात्मक राहून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे पीक विमा नोंदणी व पीक कर्ज वाटप तातडीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजना खरीप हंगाम-2017 जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात आज संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.   
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. पी. घुले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत वरणकर, नाबार्डचे व्यवस्थापक राजेश धुर्वे, विमा प्रतिनिधी आर. ए. कुदळे, सुरेश साळवे, उपविभागीय कृषि अधिकारी एम. टी. गोंडेस्वार, व्ही. व्ही. भरगंडे, बी. पी. कदम, कृषि उपसंचालक श्रीमती एम. पी. सोनवणे, तसेच विविध बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी, तालुका कृषि अधिकारी, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले,  बँकांनी नागरिकांच्या सेवेसाठी काम करत असताना शेतकऱ्यांना बँकसेवेत कोणतीही अडचण येणार नाही याबाबत दक्ष रहावे. बँक कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांसाठी दिलेल्या उद्दीष्टानुसार पीक कर्ज व पीक विमा उतरविण्याची बँकेची ही जबाबदारी आहे. यात गरजू शेतकरी सुटला नाही पाहिजे याबाबत बँकांनी गांभीर्याने काम करावे. बँकेकडून पीक कर्ज घेतले नाही म्हणून शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारु नका. बँकांनी खातेदार किंवा बिगर खातेदार हा विचार न करता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे. बँकांनी पीक विमा ऑफलाईन नोंदणी करताना काळजी घेऊन वेळेत ऑनलाईन माहिती भरुन प्रक्रिया पुर्ण करावी. यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा प्रलंबीत राहणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना बँकेचे सर्व सहकार्य राहिले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले.     
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी  थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना 10 हजार रुपयाचे तातडीचे कर्ज, सुलभ पीक कर्ज वाटप अभियान व पीक विम्याबाबत बँकनिहाय सविस्तर आढावा घेतला. पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2017 आहे. शेतकऱ्यांच्या सोईसाठी कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी), आपले सरकार सेवा केंद्रात, बँकेमार्फत शेतकऱ्यांसाठी गावपातळीवर पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ऑनलाईन पीक विमा नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीवरील उपायांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देऊन उपयुक्त सुचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना बँकेद्वारे पीक कर्ज व पीक विमा उतरविण्यासाठी बँका सकारात्मक राहतील, असे विविध बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शेवटी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी आभार मानले.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...