Tuesday, November 2, 2021

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत

जितेश अंतापूरकर विजयी 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या 30 फेऱ्यानंतर निवडणूकीचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केला. इंडियन नॅशनल कॉग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे 41 हजार 933 मताच्या फरकाने विजयी झाले. 

उमेदवार निहाय मतमोजणीत मिळालेले मते पुढीलप्रमाणे आहेत. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस 1 लाख 8 हजार 840), सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी  66 हजार 907) , उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी 11 हजार 348), विवेक पुंडलिकराव केरुरकर (जनता दल (सेक्युलर) 467),  प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी 155), डी. डी. वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) 215), अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष 143), गजभारे साहेबराव भीवा (अपक्ष 183), भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष 274), मारोती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष 243), श्रीमती विमल बाबूराव वाघमारे (अपक्ष 496), कॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष 486), नोटा (वरीलपैकी कोणीही) नाही (1 हजार 103) , रद्द झालेले मतदान 30 आहे, असे एकुण 1 लाख 90 हजार 890 एवढे मतदान झाले आहे. या देगलूर पोटनिवडणूकीसाठी एकुण 150 अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले होते.

00000




 जिल्हास्तरीय समितीसाठी इच्छूक पात्र महिलांनी

11 नोव्हेंबरपर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) 2 :-  जिल्हास्तरावरील विविध समित्या एकत्रित करुन सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती गठित करण्यात येणार आहे. इच्छूक व पात्र महिला संघटना, संस्था व कायद्याच्या संदर्भात कार्यरत अशासकीय महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कार्याचा अनुभवासह परीपूर्ण प्रस्ताव गुरुवार 11 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय शास्त्रीनगर, भाग्यनगर नांदेड येथे सादर करावेत. 

जिल्हा महिला बाल विकास विभागांतर्गंत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील विविध समित्या एकत्रित करुन सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती गठित करण्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. या समितीमध्ये स्थानिक महिला संघटनाचे, संस्थाचे दोन प्रतिनिधी तसेच महिलांच्या कायद्या संदर्भात कार्यरत 5 अशासकीय महिला कार्यकर्त्याची अशासकीय सदस्य म्हणून निवड करावयाची आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांकावर  (02462-261242) संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  डॉ. अब्दुल रशिद शेख यांनी केले आहे.   

00000

 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे  

नांदेड दि. 2  (जिमाका) :- महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती- 2019 योजनेंर्तगत 197 खातेदारांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यांनी आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्ती योजनेची रक्कम जमा करता येणार नाही. यासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेबर 2021 या कालावधी पासून जिल्हास्तरावर आधार प्रमाणिकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती सहकारी संस्थेच्या उपनिबंधक डॉ. शुभांगी  गोंड यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. 

नांदेड तालुक्यात या योजनेंतर्गत 6 हजार 519 पात्र कर्जखात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 6 हजार 322 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून 197 खातेदारांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहेत. या योजनेतील 197 पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतानाही संबंधित लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही. आधार प्रमाणिकरण व तक्रार निराकरण टप्यावरील प्रलंबित कामकाज विशेष मोहिमेव्दारे पूर्ण करण्याच्या सूचना प्रधान सचिव (सहकार) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. 

विशेष मोहिमेंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक असून आधार प्रमाणिकरणासाठी ही अंतिम संधी आहे. नांदेड तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरण करून  घ्यावे, असेही आवाहन उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...