Monday, August 4, 2025

 वृत्त क्रमांक 808 

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी 18 बालके मुंबईकडे रवाना

 

नांदेड दि. 4  ऑगस्ट :  श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 डी इको तपासणी शिबिर 16 जुलै रोजी घेण्यात आले होते. या शिबिरामधून 18 हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र  झालेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुंबई येथे आज रवाना करण्यात आले.

 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली या बालकांना तपासणी करण्यात आली होती. सदरील कार्यक्रमांतर्गत मागील वर्षीपासून 125 बालकांच्या ह्र्दय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या असून  इतर आजाराच्या 634 शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.  एकूण 76 बालकांना श्रावण यंत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आल्याने त्यांचा बहिरेपणा दूर झाला आहे. यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शाळा, अंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना असलेल्या आजारापासून मुक्त करण्यासाठी वेळीच औषधोपचार आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने पालक व शिक्षक यांच्याद्वारे समाधान व्यक्त होत आहे.

 

याकामी अनिल कांबळे आरबीएसके जिल्हा कार्यक्रम समन्वयक, विठ्ठल तावडे डीइआयसी व्यवस्थापक श्रीमती अनिता चव्हाण आणि गुनानंद सावंत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व डीइआयसी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी  यांनी परिश्रम घेतले.

00000





 वृत्त क्रमांक 807 

एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये  : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

 

जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण, पोषणाबाबत घेतला आढावा

 

नांदेड दि. 4  ऑगस्ट :  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांची अंमलबजावणी करताना कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावनी, आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली, नियतन, उचल, वाटप, अन्न वितरणप्रणालीबाबतच्या तक्रारी, पोषण, पोषण आहार याअनुषंगाने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, डॉ. सान्वी जेठवाणी, तालुक्याचे पुरवठा निरीक्षण, एकात्मिक महिला व विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, मनपा, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आदींची उपस्थिती होती.

 

नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या, पुरवठा विभागाचे कार्यालये याठिकाणी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्या नावाचे बोर्ड तात्काळ दर्शनी भागात लावावेत अशा सूचना अध्यक्ष महेश ढवळे त्यांनी दिल्या. शासनाच्या कल्याणकारी योजना गरजू लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. मय्यत, स्थलांतर, लग्न होवून बाहेर गावी गेलेल्या महिला यांची यादी तात्काळ तयार करुन ताळमेळ काढा. जोपर्यत सर्वेक्षण होणार नाही तोपर्यत याद्या अद्ययावत होणार नाहीत याची काळजी तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांनी घ्यावी. त्यांच्या नियंत्रणाखाली रेशन दुकानांचे नियंत्रण करा. मागेल त्याला रेशन आणि रेशनकार्ड द्या अशा सूचना आयोगाचे अध्यक्ष श्री. ढवळे यांनी दिल्या. यासोबत त्यांनी शहरी भागात वर्दळीच्या ठिकाणी भिक्षुक महिला व मुलांचा सर्वे करुन त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, म्हणजे खऱ्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचल्याचा आनंद होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड यांनी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांची तालुकानिहाय संख्या, शिधापत्रिकांची संख्या, मोफत अन्नधान्याचे वाटप, आधार सींडीगची माहिती, नियतन, उचल वाटप, इष्ठांक, जिल्ह्यातील एकूण गोदामे व क्षमता, नव्याने वितरीत केलेल्या शिधापत्रिका याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

 

शालेय पोषण आहार : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना

नांदेड जिल्ह्यातील शाळेत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सहाय्याने शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवून देण्यात येतो. या अंगणवाडीतील मुलांना पोटभर जेवण मिळते का, शाळेत ज्या तांदुळाची खिचड शिजविण्यात येते त्यांची चव, दर्जा तपासा, डब्बामुक्त जिल्हा करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. यासाठी वारंवार शाळांना भेटी द्या, शाळांना वितरण केलेल्या खाद्य मालाची तपासणी करण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना द्या अशा महत्वाच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष श्री. ढवळे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यावेळी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी व त्यांना वितरीत करण्यात आलेल्या आहाराबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच अंगणवाडी व सुपरवायझर यांनी गरजू व पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ मिळवून देण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच कमी वजनाची बालके, गरोदर माता, जन्मापूर्वी कमी वजन असलेली बालके यांचा शोध घेवून त्यांच्यावर तात्काळ उपाययोजना करा निर्देश श्री. ढवळे यांनी दिले. जिल्ह्यातील तांडा, वस्त्या, आदिवासी पट्टे या भागातील लहान मुलांना पोषण होईल यादृष्टीने सर्वानी काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

तृतीयपंथीय यांना रेशन कार्ड व राशन मिळण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. तसेच तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करणार असून त्यांचे प्रश्न शासनस्तरावर मांडणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

00000







वृत्त क्रमांक 806

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

नांदेड विमानतळावर आगमन व हिंगोलीकडे प्रस्थान 

 

नांदेड, 4 ऑगस्ट :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. 

 

हिंगोली येथील भव्य कावड यात्रा नियोजित  कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण केले.

00000








उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमान तळावरुन विमानाने मुंबईकडे प्रयाण.







वृत्त   दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केंद्रीय पथकाकडून...