Monday, May 11, 2026

 नांदेड तालुकास्तरीय मान्सून पूर्व आढावा बैठक संपन्न

नांदेड, दि. ११ मे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने नांदेड तालुकास्तरीय मान्सून पूर्व आढावा बैठक आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पार पडली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ हे होते.

बैठकीस तहसीलदार संजय वारकड, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग (इरिगेशन), महावितरण (एमएसईबी), कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध तालुकास्तरीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये आगामी मान्सून दरम्यान उद्भवू शकणाऱ्या अतिवृष्टी, पूर परिस्थिती, नदी-नाल्यांना येणारे पाणी, शहर व ग्रामीण भागातील साचणारे पाणी, वीजपुरवठा खंडित होणे, धोकादायक व जीर्ण इमारती, रस्ते व पुलांची स्थिती, नाल्यांचे खोलीकरण व स्वच्छता, झाडे पडण्याच्या घटना, शेती पिकांचे नुकसान, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत व बचाव कार्य याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून आपत्तीपूर्व तयारी पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या. विशेषतः शहर व ग्रामीण भागातील संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करून तेथे आवश्यक उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. 

तसेच पूरप्रवण भाग, नदीकाठची गावे, नाल्यालगतची वस्ती, धोकादायक इमारती तसेच पाणी साचणारे भाग यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले.

तहसीलदार संजय वारकड यांनी महसूल विभाग, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील यंत्रणांनी सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक विभागाने आपापल्या नियंत्रण कक्षांची माहिती अद्ययावत ठेवून आवश्यक मनुष्यबळ व साहित्य सज्ज ठेवावे, असे सांगितले.

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेस शहरातील नाले, गटारी व पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांची तात्काळ स्वच्छता व दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागास धोकादायक रस्ते व पुलांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तर महावितरण विभागास वीजवाहिन्या व विद्युत खांबांची तपासणी करून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी कृषी विभागास शेतकऱ्यांना हवामानाबाबत मार्गदर्शन करणे, संभाव्य पिकनुकसान टाळण्यासाठी उपाययोजना सुचविणे तसेच ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांनी आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना तात्काळ माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पोलीस प्रशासनास वाहतूक नियंत्रण, बचाव कार्य व आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखण्याबाबत निर्देशित करण्यात आले.

बैठकीदरम्यान विविध विभागांकडून करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी आपापसातील समन्वय अधिक मजबूत ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

सदर बैठकीमुळे आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासन अधिक उपाययोजनांवर भर देत आहे.

0000




 वृत्त क्रमांक 

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग

नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग 

नांदेड, दि. 11 मे : नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार इसापूर धरण प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. सर्व संबंधित गावातील ग्रामस्थांनी पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.    

नागरिकांनी कालवा, नाल्यातून बेकायदेशिर पाणी उपसा (पंपीग) करु नये व पाण्याची नासाडी टाळावी जेणेकरुन सर्व गावांना पाणी मिळणे सोयीस्कर होईल. पाणी टंचाई निवारणासाठी जलसंपदा विभाग कटिबध्द असून उर्वरित पाण्याचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे केले जाईल, अशी माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

30 मार्च 2026 च्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यासाठी 3.00 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 4.00 दलघमी व 1 मे 2026 च्या आदेशान्वये 5.00 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.  

विसर्ग व लाभक्षेत्र 

इसापूर धरणातून थेट पाणी सोडण्यास्तव विमोचक नसल्याकारणाने कालवा प्रणालीमधून नियमित कालवा आवर्तनाचे वेळापत्रकाप्रमाणे संयुक्तीक होईल अशा विमोचकाद्वारे 5 एप्रिल 2026 रोजी पासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 11 मे 2026 अखेरपर्यत एकूण मागणी 12.00 दलघमी पैकी 6.81 दलघमी इतके पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आले आहे. 

तालुकानिहाय गावे

नांदेड जिल्हा- 

गुरफळी, बाभळी, बनचिंचोली, वाटेगाव, हरडफ, धोत्रा, कामारी, पिंपरी, डोल्हारी, सिरपल्ली, सिल्लोड, एकंबा, कौठा, बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ, साप्ती, मनुला (बु), म्हाटाळा, पेवा दिघी, घारापुर, पळसपूर, डोल्हारी व विरसणी या गावांचा समावेश आहे. 

यवतमाळ जिल्हा-

टाकळी, राजापूरवाडी, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड, देवसरी,दिघडी, ऊंचवडद, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, भोजनगर, बिटरगाव, रतननाईकनगर, बोडका, पिंपळगाव, पेंदा, लिंगी, मुरली, मुळावा, हातला, दिवट, पिंपरी, पळशी, नागापूर, बारा चातारी, बोरी, कोप्रा, मानकेश्वर व सिंदगी या गावांचा समावेश आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी दिली. 

00000

 वृत्त क्रमांक 

नांदेड ग्रामीण मंडळातील त्रिकुट येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न

शिबिरात 745 दाखले व 896 प्रमाणपत्रांचे वितरण 

नांदेड, दि. ११ मे  : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” चे आयोजन नांदेड ग्रामीण मंडळातील मौजे त्रिकुट येथील  गणपती मंदिर येथे  करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांची माहिती घेऊन लाभ घेतला.

सदर शिबिरास नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंदराव पा.तिडके बोंढारकर उपस्थित होते. तसेच उपविभागिय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, मंडळ कृषी अधिकारी सुनिल सानप ,महावितरणचे अभियंता राखे, बाळू पाटिल मोरे ब्राम्हणवाडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळातील विविध गावांचे सरपंच व इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार आनंदराव तिडके बोंढारकर यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. या शिबिराच्या माध्यमातून महसुली कामे तात्काळ मार्गी लागत आहेत. यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असून “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत महसूल, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालकल्याण, विशेष सहाय्यनयोजना, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक, निवडणूक विभाग तसेच आपले सरकार सेवा केंद्र,आधार केंद्र चालक यांच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत नागरिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या शिबिरामध्ये सातबारा व ८-अ चे एकूण 745 दाखले वितरित करण्यात आले. तसेच उत्पन्न, रहिवासी, वय, जातीचे तसेच अल्पभूधारक प्रमाणपत्र आदी मिळून एकूण 896 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय  गांधी निराधार योजनेअंतर्गत 03 लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले असून 15 लाभार्थ्यांच्या प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात आली.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले. तसेच सलोखा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या गट अदलाबदलीद्वारे सातबाराचे वितरण करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सन २०२५-२६ मध्ये ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.

शिबिरामध्ये विविध विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. विशेषतः सातबारा व ८-अ वितरण, आधार दुरुस्ती, आपले सरकार सेवा केंद्र, जनगणनेतील स्व-गणना, आरोग्य तपासणी, वन विभाग, विशेष सहाय्य योजना (संजय गांधी निराधार योजना ),कृषी विभाग,महावितरण, क्रिडा विभाग, शिक्षण विभाग,आशाताई व अंगणवाडी ताई ,आपले सरकार सेतू केंद्र आदी स्टॉलना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी विविध योजनांची माहिती घेऊन अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार महसूल  सुनील माचेवाड तसेच मंडळ अधिकारी  अनिरुद्ध जोंधळे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी वसंत मंगल व सचिन उपरे तसेच तालुक्यातील महसूल सेवक श्रीमती आरती सारंग व अजिंक्य सुरोशे यांनी परिश्रम घेतले.

00000





वृत्त क्रमांक 

नांदेडमध्ये जलसंधारण कामांना वेग 379 पैकी 177 कामे पूर्ण ; 

भूजल वाढीसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नांदेड, दि. 11 मे : एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मृद व जलसंधारण विभागामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या एकूण 379 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 177 कामे पूर्ण झाली असून 202 कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत 1 लाख 78 हजार 668 मीटर खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून आणखी 86 हजार 583 मीटर खोलीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचून होणारे नुकसान कमी होणार असून भूजल पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. परिणामी पाणीटंचाई निवारण, सिंचन सुविधा आणि शेती उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे.

याशिवाय, जलसंधारण कामांच्या परिसरात एक लाख बांबू लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बांबू लागवडीमुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान, ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत सन 2025-26 मध्ये आतापर्यंत 54 तलावांमधून गाळ काढण्यात आला आहे. 584 शेतकऱ्यांनी 9 लाख 63 हजार 243 घनमीटर गाळ शेतात टाकला आहे. त्यामुळे संबंधित भागातील पीकपद्धतीत बदल होऊन गहू, हळद आणि कापूस यांसारख्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन रोजगारासाठी होणारे स्थलांतरही कमी होण्यास मदत होत आहे.

सन 2026-27 साठी या अभियानांतर्गत 28 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून अंदाजे 8 लाख 58 हजार 135 घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ 488 शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाने दिली.

00000





वृत्त क्रमांक 

शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतूनही प्रवेश 

नांदेड, दि. 11 मे :-  अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी किनवट प्रकल्पाअंतर्गत मुलींचे 6 व मुलांचे 9 असे एकुण 15 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. शैक्षणिक सत्र 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आली आहेत, असे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

किनवट प्रकल्पातील जिल्हास्तर वसतीगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी,  पदवीत्तर, डिप्लोमा व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आणि तालुकास्तर वसतीगृहामध्ये इयत्ता 8 वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदवीत्तर, डिप्लोमा व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विद्यार्थ्यांनी निकाल जाहिर झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत ऑनलाईन परिपूर्ण कागदपत्रासह http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. 

प्रवेशाची प्रक्रिया गुणवत्ता तथा शासन नियमानुसार करण्यात येईल. वसतीगृहात रिक्त जागेच्या अधिन राहुनच प्रवेश देण्यात येईल ज्या विद्यार्थ्याचा वसतीगृहात प्रवेश होणार नाही. अशा विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वंयम योजनेत वसतीगृह प्रवेश संपल्यावर वळती करण्यात येणार आहे. परंतु त्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वसतीगृहाचा अर्ज करतानांच पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना (चेक बॉक्स क्लिक करुन) निवड करणे अनिवार्य आहे. 

विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशाकरीता मुदतीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरण्यात यावा. विद्यार्थ्याचे आधार प्रमाणिकरण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधार नंबर व बँक खाते नंबरचे सिंडिग असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्याचे आधार सिंडिग नसल्यास त्या विद्यार्थ्यांनी संबधित बँकेशी संपर्क करुन आधार सिंडिंग करुन घेणे आवश्यक आहे. तरच डीबीटीचा लाभ मिळेल अन्यथा DBT चा लाभ मिळणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे.   

वसतीगृहातील मंजुर क्षमता व रिक्त जागेची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृहाचे गृहपाल किंवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. शैक्षणिक सत्र 2026-27 शासकीय आदिवासी मुलां-मुलींचे वसतिगृह निहाय रिक्त जागेचे विवरण जिल्हास्तर व तालुकास्तर पुढीलप्रमाणे आहे. 

मंजूर क्षमता 125 असलेल्या वसतीगृहातील सन 2025-26 मधील रिक्त जागा शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह नांदेड क्र. 1 येथे 61 आहेत. त्यानुसार  शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह नांदेड क्र. 2 रिक्त जागा 53, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह नांदेड रिक्त जागा 86, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह भोकर रिक्त जागा 43, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह भोकर 49, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह हिमायतनगर 87, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह हिमायतनगर 82, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह किनवट 35, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट (पुर्व) 19 तर मंजूर क्षमता 75 असलेल्या वसतीगृहात शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह हदगाव 31, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह हदगाव 32, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह माहुर 21, शासकीय आदिवासी मुलीचे वसतीगृह माहुर 29, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट (पश्चिम) 18 तर शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट येथे 25 रिक्त जागा आहेत. 

सर्व नवीन विद्यार्थ्यांनी परीक्षेचा निकाल जाहिरात झाल्याच्या दिनांकापासून 30  दिवसांपर्यंत   htt://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करुन युजर आयडी आणि पासवर्ड तयार करुन जाहिर झाल्याच्या दिनांकापासुन 30 दिवसापर्यंत ऑनलाईन अर्ज न्यू हा पर्याय निवडावा. तसेच अर्जासोबत विद्यार्थ्यानी पुढील प्रमाणे शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावेत. 

शैक्षणिक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला टिसी झेराक्स, शेवटच्या वर्षाची गुणपत्रीका, अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला चालुवर्ष, महाविद्यालय प्रवेश घेतल्याची पावती किवा बोनाफोईड, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, बॅक पासबुक झेरॉक्स, दहावी व बारावी गुणपत्रक, कॅपरॉऊडमध्ये निवड झाल्याची छायाकिंत प्रत. इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करुन सदर अर्जाची हॉर्डकॉपी संबंधित वसतीगृहाच्या गृहपाल यांच्याकडे सादर करुन सादर केलेल्या अर्जाची पोच घ्यावी. 

सर्व जुने विद्यार्थ्यानी आपले परीक्षेचे निकाल अद्याप जाहिर झाले नसेल अशा विद्यार्थ्यानी निकाल जाहिर झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. सदर जुन्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज Renew हा पर्याय निवडावा जुन्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेवुन वसतीगृहाचा ऑनलाईन अर्ज वसतीगृह गृहपाल यांचे कडे सादर करावा तेव्हाच प्रवेश निच्छित होईल असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. असे समजुन त्यांचे जागी नवीन विद्यार्थ्यास प्रवेश दिल्या जाईल यांची संबधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेची सुवर्ण संधी

अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलींना शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याना 12 वी नंतर उच्च शिक्षण जिल्हास्तरावर शिक्षण घेणारे व 10 वी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाला तालुकास्तरावर शिक्षण घेणारे विद्यार्थी परंतु शासकीय व अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रित प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता आधार संलग्न बँक खात्यात थेट रक्कम पात्र विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वंयम योजनेचा लाभ दिला जातो. 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वंयम योजनेकरीता संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. शाळा सोडल्याचा दाखला, टिसी झेराक्स, शेवटच्या वर्षाची गुणपत्रीका, अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला चालु वर्ष, महाविद्यालय प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफोईड, आधार कार्ड, बँक पासबुक झेराक्स, एसएससी व एचएससी  गुणपत्रक, वडिलांचे स्वंयम घोषणापत्र, विद्यार्थ्यांचे स्वयम घोषणापत्र, कॅपरॉऊडमध्ये निवड झाल्याची छायाकिंत प्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करुन सदर अर्जाची हॉड कॉपी संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्यकडे सादर करुन सादर केलेल्या अर्जाची पोच घेण्यात यावी. पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेकरीता विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in या संकेस्थळाचा वापर करुन Swayam च्या टॅबवर क्लिक करुन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 11 मे : नांदेड जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्रमांक 

गोसीखुर्दच्या मुख्यअभियंता पदी 

अजय दाभाडे यांची नियुक्ती

नांदेड दि. ११ मे : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांची गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने नुकतेच याबाबत आदेश जारी केले आहेत. दाभाडे यांनी यापूर्वी विविध सिंचन प्रकल्पांवर काम केले असून त्यांना प्रशासकीय आणि तांत्रिक अनुभव आहे.

अजय दाभाडे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात अधीक्षक अभियंता म्हणून काम केले आहे. विविध मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. गोसीखुर्द प्रकल्प हा विदर्भातील महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असून, या प्रकल्पाकडून शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या अपेक्षा जोडल्या गेल्या आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट ' असणाऱ्या वैनगंगा -नळगंगा नदी जोड प्रकल्पाची जबाबदारी ही त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.त्यामुळे या प्रकल्पाच्या गतीशील अंमलबजावणीची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.

नागपूर येथील सिंचन भवनातील कार्यालयात ते सध्या रुजू झाले आहे.विविध प्रकल्पातील अपूर्ण कामे पूर्ण करणे, कामांना गती देणे आणि सिंचन क्षमता वाढविणे हे दाभाडे यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामांना अपेक्षित गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

000000



सोमनाथ मात्र एक मंदिर नहीं बल्कि भारत की अटूट श्रद्धा और एकता का प्रतीक है। एक हजार वर्षों के विध्वंस ने भी इसकी महत्ता और इसके प्रति आस्था को कभी नहीं डिगने दिया। महादेव के 12 ज्योतिर्लिंगों में से सोमनाथ प्रथम है, और भारतीयों की अटूट आस्था के एक हजार वर्षों की स्मृति और 1951 में हुई प्राण प्रतिष्ठा के 75 वर्षों के अवसर पर देश भर में सोमनाथ स्वाभिमान पर्व मनाया जा रहा है। जिसके तहत विभिन्न कार्यक्रम जैसे भजन संध्या, कलश यात्रा, ॐकार मंत्र का जाप आदि आयोजित किये जा रहे हैं। आप सभी इन कार्यक्रमों में अपनी भागीदारी सुनिश्चित करें और अपनी संस्कृति और परंपराओं पर गर्व करें।

अधिक जानकारी के लिए क्लिक करें:
🔗



वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 11 मे : नांदेड जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्रमांक   नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 8 उमेदवारांचे 17 नामनिर्देशन अर्ज दाखल                          नांदेड, दि. 1 जू...