Wednesday, March 11, 2026

 वृत्त क्रमांक 

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

नांदेड दि. ११ मार्च :- श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे 11 ते 17 मार्च 2026 या कालावधीत पिंपळगाव महादेव (ता. अर्धापूर) येथे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सुमारे 100 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

या शिबिराचे उद्घाटन पिंपळगाव महादेवच्या सरपंच सौ. वर्षा शिवाजीराव खंडागळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सुभाष नामदेवराव कल्याणकर (संचालक, भा.च.सं.सा.का. येळेगाव), उपसरपंच उध्दवराव बालासाहेब कल्याणकर, कपील दुधमाने, संस्थेचे प्राचार्य व्ही. डी. कंदलवाड, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हिंगोले, ग्रामविकास अधिकारी एकनाथ कदम, राम कल्याणकर, गोविंद कल्याणकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिबिरार्थी व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य व्ही. डी. कंदलवाड यांनी ‘स्वच्छ व हरित भारत’ या संकल्पनेवर आधारित या शिबिरामध्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अशा निवासी शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवा भाव, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले.

या शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, रस्ते दुरुस्ती, साक्षरतेचे महत्त्व, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिनेश पोतदार यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्र. गटनिदेशक मोहन कलंबरकर यांनी केले.

०००००



 वृत्त क्रमांक 

वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन                                      

नांदेड दि. 11 मार्च :- गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 'उष्माघात' टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

उन्हाळ्यात आरोग्याला जाणवणारे संभाव्य त्रास

प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन खालील समस्या जाणवू शकतात:

अतिसार (Diarrhea) आणि उलट्या. चक्कर येणे किंवा प्रचंड थकवा जाणवणे. डोकेदुखी आणि अस्वस्थता. त्वचेला खाज येणे किंवा घामोळ्या होणे. उष्माघात: हा अत्यंत गंभीर प्रकार असून यात शरीराचे तापमान अचानक वाढते आणि रुग्ण बेशुद्ध पडू शकतो.

काय करावे? 

 भरपूर पाणी प्या: तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. घराबाहेर पडताना काळजी: डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा. पेय पदार्थांचे सेवन: लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस (ORS), नारळ पाणी आणि घरगुती नैसर्गिक पेयांचे सेवन वाढवा. पोशाख: हलके, सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. आहार, आहारात काकडी, टरबूज, द्राक्षे यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करा.

काय टाळावे? 

दुपारची वेळ: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळा.

व्यसने: मद्यपान, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेल्या पेयांचे सेवन टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते.

शिळे अन्न: उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते, त्यामुळे शिळे किंवा उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका.

श्रमाची कामे: कडक उन्हात कष्टाची किंवा व्यायामाची कामे करणे टाळावे.

उष्माघात झाल्यास करावयाच्या उपाययोजना

जर एखाद्या व्यक्तीला उन्हाचा त्रास होऊन चक्कर आली किंवा बेशुद्ध पडल्यास: रुग्णाला तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे. त्याच्या अंगावरील कपडे सैल करावेत.  थंड पाण्याने शरीर पुसून काढावे (Ice Packs असल्यास मानेवर आणि काखेत ठेवावेत). रुग्ण शुद्धीवर असल्यास त्याला पाणी किंवा ओआरएस द्यावे. तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे.

विशेष सूचना : लहान मुले, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उष्णतेच्या लाटेत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काहीही त्रास जाणवल्यास घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

00000



 वृत्त क्रमांक 

दिव्यांग लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत युडीआयडी कार्ड सादर करावे -तहसीलदार संजय वारकड 

नांदेड ,दि. ११ मार्च :- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नांदेड तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले दिव्यांग प्रमाणपत्र (UDID कार्ड) 25 मार्च 2026 पर्यंत तहसील कार्यालयात सादर करावे, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे. 

निर्धारित कालावधीत कागदपत्रे सादर न केल्यास अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड तालुक्यात सध्या या योजनेअंतर्गत एकूण 1 हजार 207 दिव्यांग लाभार्थी लाभ घेत असून त्यांना शासनाकडून दरमहा 2 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते. मात्र, प्रशासकीय नोंदीनुसार यापैकी 833 लाभार्थ्यांनी अद्याप ‘युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड’ (UDID) तहसील कार्यालयात जमा केलेले नाही.

लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड व आधार कार्डची झेरॉक्स आपल्या गावातील तलाठी यांच्याकडे जमा करावी किंवा थेट तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात सादर करावी. यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शासनाच्या नियमानुसार लाभार्थ्यांची पडताळणी करणे आवश्यक असल्याने दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड व आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, जेणेकरून अनुदानाचा लाभ विनाव्यत्यय सुरू राहील, असेही तहसीलदार संजय वारकड यांनी सांगितले.

०००००

  वृत्त क्रमांक   राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन नांदेड दि. ११ मार्च :- श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद...