Tuesday, March 24, 2026

 वृत्त क्रमांक  

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी

कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर 

नांदेड दि. 24 मार्च :- इयत्ता 10 वीची परीक्षा 18 मार्च रोजी संपली आहे. दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आता पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता 11 वीसाठी प्रवेश घेणे. मागील वर्षापासून राज्यभर इयत्ता 11 वीचे प्रवेश हे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे झालेले होते. त्यानुसारच यंदा देखील सन 2026-27 साठी इयत्ता 11 वीचे प्रवेश ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच होणार आहेत. त्यामुळे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी प्रवेश प्रक्रिया सूरू होण्यापूर्वी कागदपत्रांची जूळवा-जूळव करुन घेणे व आवश्यक पूर्व तयारी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमीक माधव सलगर यांनी केले आहे. 

येत्या काही कालावधीत इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने नवीन पोर्टल कार्यान्वित होणार असून याद्वारे कॉलेजचे रजिस्ट्रेशन करणे, शाखा व विषयांची नोंदणी करण्याचे काम कॉलेजला करावयाचे असून त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी पोर्टल कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासन व विद्यार्थ्यांनी पूर्वीच पूर्वतयारी करुन आवश्यक कागदपत्रांची जूळवा-जूळव करुन ठेवावी, जेणेकरुन ऐनवेळी धावपळ होणार नाही व वेळेत रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण होईल, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे. 

नांदेड जिल्हयात मागील वर्षी 256 कॉलेजमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यंदा देखील त्या सर्व कॉलेजमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने पुढील कागदपत्रे पूर्वीच तयार करुन ठेवावीत. 

कॉलेज प्रशासनाने करावयाची पूर्वतयारी

·         कॉलेज मान्यतेचे सर्व आदेश

·         अतिरिक्त तुकडी, शाखा, विषय मान्यतेचे सर्व आदेश

·         माध्यमाच्या उल्लेखासह असलेले खाते मान्यता आदेश

·         मंडळ मान्यता आदेश

·         सन 2024-25 ची संचमान्यता व तुकडीनिहाय मंजूर प्रवेश क्षमता संख्या

·         कॉलेजचे बँक डिटेल्स

·         अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त असल्यास आदेश

·         उपलब्ध भौतिक सुविधा अभिलेखे

·         फी स्ट्रक्चर मान्यतेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव

·         इतर आवश्यक कागदपत्रे 

विद्यार्थ्यांनी व पालकांनी करावयाची पुर्वतयारी

·         दहावीचे गुणपत्रक

·         शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड

·         डोमिसाईल प्रमाणपत्र

·         जातीचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

·         नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

·         ईडब्लूएस प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

·         दिव्यांग विद्यार्थी प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

·         खेळाडू असल्यास प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

·         फोटो. 

सर्व कॉलेज प्रशासन, विद्यार्थी, पालकांनी वरीलप्रमाणे पूर्वीच सर्व कागदपत्रांची जूळवाजूळव केली तर ऐनवेळी कोणतीही धावपळ होणार नाही, असे आवाहन शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे.

000000

 


वृत्त क्रमांक  

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा 

नांदेड दि. 24 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी  हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 27 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी  क्रमांक 02462-251674 व सोनल मात्रे 8830807312 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक  

सोमवार 6 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड दि. 24 मार्च :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.

00000

 वृत्त क्रमांक  

आज मुदखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 24 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व बंदा बैरागी, बंदा सिंघजी बहादूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार 25 मार्च 2026 रोजी बंदा बैरागी, बंदा सिंघजी बहादूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुदखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 25 मार्च 2026 सकाळी 11  वा. पासून बंदा बैरागी, बंदा सिंघजी बहादूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुदखेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी  क्रमांक 02462-251674 व श्री. ल. चटलावार 8087484161 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक  

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पुर्णपणे माफ 

नांदेड, दि. 24 मार्च :-महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून, दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पुर्णपणे माफ केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँका, वित्तीय संस्थानी त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधिक्षक, पुणे यांनी दिले आहे. 

                                                                                                                                                                            सर्व बँका, वित्तीय संस्थाना शासन अधिसूचनेत नमुद केल्यानुसार शेती किंवा पीक कर्जाशी संबंधीत संस्थानी अभिस्वीकृती, रोखपत्र करारनामा, हक्कविलेख निक्षेप, हडप तारण किंवा तारण गहाण, हमीपत्र गहाणखत, प्रतिभुती बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सुचनापत्र किंवा घोषणापत्र किंवा यास संलग्न अशा कोणत्याही संलेखावर आकारणी योग्य असलेले दोन लाखांपर्यतचे मुद्रांक शुल्क पूर्णत: माफ करण्यात आले आहे. याबाबत काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश शासन अधिसूचनेद्वारे दिले आहेत.  

00000

 वृत्त क्रमांक  

नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड दि. 24 मार्च :-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 24 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 24 व 25 मार्च 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 24 व 25 मार्च 2026 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

 वृत्त क्रमांक  

आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे

नांदेड, दि. 24 मार्च :- आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीव्‍दारे केली जाणार असून, अर्जदारांनी ऑनलाईन दाखल केलेल्‍या कागपत्रांचे आधारे शासन निर्णयानुसार पुढीलप्रमाणे गुणांकन करण्‍यात येईल. 

कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास ३० गुण, कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास २५ गुण, सीएससी केंद्र असल्यास २५ गुण याप्रमाणे गुणांकन राहील. 

मुलाखत प्रक्रिया :

एका गावासाठी एकापेक्षा जास्त अर्जदार असतील आणि त्यांचे गुण समान असतील तरच मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी २० गुण निश्चित आहेत. मुलाखतीच्‍या गुणांची विभागणी खालील प्रमाणे करण्‍यात येईल. 

तांत्रीक ज्ञान असल्‍यास 06 गुण, लोकसेवा हक्‍क अधिनियम 2025 चे ज्ञान असल्‍यास 04 गुण,  सामान्‍य ज्ञान व व्‍यक्तिमत्‍व, सामाजिक क्षेत्रात राबविलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्‍या कार्याचा अनुभव असल्‍यास- 10 गुण 

मुलाखत समिती

या समितीचे जिल्‍हाधिकारी हे अध्‍यक्ष तर पोलीस अधिक्षक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी,  आयुक्‍त नांदेड वाघाळा महानगर पालीका, अधिक्षक राज्‍य उत्‍पादन शुक्‍ल, अधिक्षक भुमी अभिलेख प्राचार्य श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रीकी महाविद्यालय, प्राचार्य शासकिय तंत्र निकेतन, महाप्रबंधक भारत संचार निगम लिमिटेड नांदेड, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जि.प.नांदेड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शिक्षणाधिकारी(माध्‍यमिक) जि.प., शिक्षणाधिकारी (प्राथमीक) जि.प., जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी जि.प., जिल्‍हा सूचना विज्ञान अधिकारी जि.का. हे सर्व सदस्य आहेत. तर सेतू समितीचे सदस्य सचिव हे निवासी उपजिल्‍हाधिकारी आहेत.

या समितीद्वारे मुलाखत घेण्‍यात येईल. अर्जदारांनी आपले सरकार सेवा केंद्र प्रक्रियेबाबत वेळोवेळी नांदेड जिल्‍हयाच्‍या संकेतस्थळावर https://nanded.gov.in भेट दयावी. कार्यालयास संपर्क साधु नये, यांची नोंद सर्व अर्जदारांनी घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक  

शंभर दिवसीय' क्षय रुग्ण शोध मोहिमेस सहकार्य करावे 

-जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सतीश कोपुरवाड 

नांदेड दि.२४ मार्च:- शंभर दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहिमेस आज २४ मार्च , जागतिक क्षयरोग दिनापासून सुरुवात झाली असून सदर मोहिमेत जिल्ह्यातील अति जोखीमग्रस्त भागातून विशेष मोहीमेअंतर्गत संशयीत क्षय रुग्णांना शोधून यांचे थुंकी नमुने घेण्यात येणार आहेत. यातून निदानीत होणाऱ्या क्षयरूग्णांना क्षयरोग प्रतिबंधीत औषधोपचाराने रोगमुक्त करणे उद्दिष्ट आहे . सदर मोहिमेत नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश कोपुरवाड यांनी केले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र नांदेड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमांतर्गत डॉ सतीश कोपुरवाड हे बोलत होते.

ते पुढे मार्गदर्शन करतांना असेही म्हणाले की , संशयित क्षय रुग्ण म्हणजे ज्या व्यक्तीस दोन आठवडे व पेक्षा जास्त दिवसाचा खोकला , रात्रीचा येणारा हलकासा ताप ,  वजनात घट होणे , भूक मंदावणे ,थुंकी वाटे रक्त पडणे असे असल्यास सदर व्यक्तीने आपल्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात जाऊन आपल्या  थुंकीची तपासणी करून घेणे आवश्यक आहे असे सांगितले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.अमृत चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले की क्षयरुग्णाने पूर्ण कालावधीचा औषधोपचार घेणे आवश्यक असून अर्धवट औषधोपचार घेतल्यास सदर रुग्ण एमडीआर व एक्स डी आर सारख्या घातक क्षयरोगाला आमंत्रण देतो हे उदाहरणे देवून पटवून दिले.  डॉ. गणपत मीरदुडे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहिम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे .

जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रमास जिल्हा क्षय रोग केंद्र येथील अधिकारी कर्मचारी आदि उपस्थित होते .

००००००



  वृत्त क्रमांक   दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर   नांदेड दि. 24 मार्च...