Thursday, June 12, 2025
वृत्त क्रमांक 609
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांचा दौरा
नांदेड दि. 12 जून :- महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा हे 14 व 15 जून रोजी दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 14 जून रोजी पुणे येथून विमानाने सायं. 5.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे प्रयाण. सायं. 6 ते 6.30 वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे राखीव. सायं. 6.30 वा. तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण. सायं 6.40 ते रात्री 7.40 पर्यंत तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरूद्वारा नांदेड येथे राखीव. रात्री 7.40 वा. तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरूद्वारा नांदेड येथून शासकीय अतिथीगृहाकडे प्रयाण. रात्री 7.50 वा. शासकीय अतिथीगृह येथे आगमन व मुक्काम.
रविवार 15 जून रोजी सकाळी 8 वा. शासकीय अतिथीगृह येथून हिंगोली जिल्ह्यातील जरोदा ता. कळमनुरीकडे प्रयाण. हिंगोली जिल्ह्यातून दुपारी 3.10 वा. अर्धापूर तालुक्यातील प पु संतबाबाजी श्री जगदिशजी महाराज गोशाळा ग्राम बाबापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.40 वा. ग्राम बाबापूर येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं 6.10 वा. विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.
00000
वृत्त क्रमांक 608
कृषि तंत्र पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु
नांदेड दि. 12 जून :- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषीतंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. 25 जून पर्यंत मुदत असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेशाची माहिती पुस्तिका प्रवेश अर्जासह http://vnmkv.agridiplomaadmission.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्र शिक्षण विद्याशाखेअंतर्गत 8 घटक शासकीय अनुदानित 1 घटक शासकीय विनाअनुदानित तसेच 51 खाजगी विनाअनुदानित कृषि तंत्र विद्यालय कार्यरत आहेत. 15 ऑक्टोंबर 1963 पासून नांदेड येथे स्थापन कृषि तंत्र विद्यालय जुने व या क्षेत्रातील मातृभाषेतून शिक्षण देणारे उच्च दर्जाचे विद्यालय आहे.
कृषि पदविका अभ्यासक्रमातून प्रथम वर्षाकरिता कृषी मुलतत्वे, प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, फळे भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, कृषी अवजारे यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती, पीक संरक्षण, ग्रामीण समाजशास्त्र कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान तसेच द्वितीय वर्षाकरिता सेंद्रिय शेती, बीजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन, फुल शेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, शेतमाल प्रक्रिया, सहकार पतपुरवठा व पणन त्याचबरोबर या शिक्षणाच्या धर्तीवर प्रकल्प अहवालातून आळंबी उत्पादन, गांडूळ खत निर्मिती, फुल शेती, शेडनेट शेती, कुक्कूटपालन, वराहपालन, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग इत्यादी उद्योगात रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते.
कृषि पदवीधारकास कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, जलसंपदा विभागामध्ये कालवा निरीक्षक, सहकारी साखर कारखाना व महामंडळात नोकरीच्या संधी, शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश झाल्यास कृषी शिक्षक म्हणून शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात सेवेच्या संधी आहेत. कृषी सेवा केंद्र खते व बियाणे परवाना मिळविण्यासाठी पात्र अभ्यासक्रम असून केवळ नांदेड येथील विद्यालयात आयराईज प्रकल्पांतर्गत सिजेंटा फाउंडेशनचे कोर्स करण्याची संधी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास खते बियाणे कीटकनाशक व बुरशीनाशक बनविणाऱ्या नामांकित कंपनीत नोकरीची संधी तसेच स्वयम रोजगारासाठी उद्योग उभारण्यास प्रकल्प सहायता देखील मिळते. कृषीतंत्र पदविका प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 वर्षाची वयोमर्यादा व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वयाची अट 5 वर्षांनी शिथिलक्षम राहील. माजी सैनिकासाठी 45 वर्ष आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परीक्षा मंडळाची माध्यमिक शाळा परीक्षा एस. एस. सी. 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण प्रवेशासाठी इयत्ता दहावीची मूळ गुणपत्रके, ऑनलाईन अर्ज व तात्पुरता प्रवेशपत्र, विद्यालय किंवा शाळा सोडल्याचा मूळ दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, 12 टक्के गुणांचा अभिभार मिळवण्यासाठी सात/बारा शेतकरी किंवा भूमिहीन शेतमजूर असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, गॅप असल्यास गॅप प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
कृषी प्रवेशासाठी
येथे करा अर्ज
कृषी
तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश माहिती पुस्तिका प्रवेश अर्जासह http://vnmkv.agridiplomaadmission.ac.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नांदेड येथील
कृषी तंत्र विद्यालयात प्रवेशाकरिता कोड क्रमांक 431235 हा असून यासाठी संपर्क
प्रभारी शिक्षण विजेश जाधव 9356839738 या क्रमांकावर करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार (8329174300) यांनी केले आहे.
000000
वृत्त क्रमांक 607
आधार नोंदणी केंद्राच्या सेवा वेळेत व पारदर्शक द्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले
· आधार केंद्र चालकांनी अतिरिक्त शुल्क आकारल्यास होणार कारवाई
· जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांसाठी कार्यशाळा संपन्न
नांदेड, दि. 12 जून :- मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील आधार केंद्रावर नागरिकांची खूप गर्दी दिसून येत आहे. यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सर्व शासकीय योजनांच्या मुळाशी आधार असून ते अपडेट नसेल तर नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आधार केंद्र चालकांनी आधार नोंदणी व सुधारणा केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा पुरवाव्यात. आधार केंद्र चालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीत अधिक सुधारणा करून नागरिकांच्या सोयीसाठी जबाबदारीने काम करावे. नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्यांच्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज नांदेड जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी चालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर तसेच जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांची उपस्थिती होती.
नागरिक अनेकदा आधार अपडेट अथवा नवीन नोंदणीसाठी आधार केंद्रात येतात, मात्र वेळेवर सेवा न मिळाल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. केंद्रावर उपस्थित कर्मचारी यांनी वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना सेवा द्यावी. तसेच याबाबत काही अडचणी किंवा शंका असतील तर त्या भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणाचे सहायक प्रबंधक, यूआईडीएआई क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे महेश शिंदे यांच्या मदतीने सोडवाव्यात. आधार नोंदणी करताना येणाऱ्या शंका व अडचणीचे निरसन करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी स्पष्ट सांगितले.
तालुक्याच्या ठिकाणी जे आधार नोंदणी केंद्र आहेत तिथे संबंधित तहसिलदारांनी भेट देवून पाहणी करावी. ज्या आधार केंद्र चालकांची कामगिरी सुमार दर्जाची आहे त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करुन घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले. यावेळी मुंबई यूआईडीएआई क्षेत्रीय कार्यालयाचे महेश शिंदे यांनी आधार केंद्र चालकांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. आधार केंद्र चालकांनी दैनंदिन कामकाज पार पाडताना येणाऱ्या शंका व अडचणी सोडविण्यासाठी प्रश्न विचारले त्यावर त्यांच्या अडचणी व शंकाचे निरसन केले. नवीन आधारकार्ड तयार करणे व सुधारणा करतांना महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक बाबींची माहिती यावेळी दिली.
000000
वृत्त क्रमांक 606
पीक स्पर्धेत सोयाबीन-मुग पिकात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड
· विजेत्या शेतकऱ्यांचे कृषि कार्यालयाने केले अभिनंदन
नांदेड दि. 12 जून :- नुकताच राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेत मुग व सोयाबीन या पिकाचे उत्पन्न व उत्पादन बाबतीत योग्य नियोजन करून भरघोस पिक घेऊन नांदेड जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावले आहेत. राज्यस्तरावर पिक स्पर्धेमध्ये क्रमांक आल्याबद्दल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी विजेते शेतकऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.
पीक स्पर्धेत सोयाबीन या पिकामध्ये आदिवासी गटामध्ये सोयाबीन या पिकात अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथील सुभाष विश्वनाथ यलसटवाड यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून रोख रक्कम 50 हजार रुपयाचे पारितोषिक मिळवण्याचा बहुमान मिळविला आहे. उमरी तालुक्यातील धानोरा बु येथील दिगांबर गंगाराम जगताप यांनी आदिवासी गटामध्ये सोयाबीन या पिकात राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून 30 हजार रुपयाचे पारितोषिक मिळवले आहे. तसेच सोयाबीन या पिकामध्ये सर्वसाधारण गटामध्ये किनवट तालुक्यातून दहेली येथील परमेश्वर रामजी चव्हाण यांनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून रोख रक्कम 40 हजार रुपयाचे पारितोषिक मिळविले आहे. आणि आपल्या शेतीमध्ये आधुनिक पिकपद्धतीचा अवलंब केला. योग्य वाण, योग्य वेळी मशागत, शेंद्रीय खताचा मुबलक वापर करून जमिनीचा कस वाढवून जमिनीचा पोत सुधारून व योग्य खताचा ताळमेळ घालून शेती क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन राज्यस्तरावर क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला.
लोहा तालुक्यातील सायाळ येथील कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून ओळखले जाणारे तसेच खंडीभर लाल कंधारी गाई जनावरे सांभाळून शेती करणारे शेतकरी रत्नाकर पाटील ढगे सायाळकर यांनी जिल्ह्यातून खरीप हंगामामध्ये मुग या पिकामध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून 30 हजार रुपयाचे पारितोषिक मिळवीले आहे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यांनी आपल्या शेतीत सतत सुधारणा घडवून आणल्या आहेत. विपरीत परिस्थितीत चांगले उत्पादन घेऊन त्यांनी पंचक्रोशीत आपली छाप सर्वसामान्य शेतकरी वर्गात निर्माण केल्यामुळे आज हजारो शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे धडे गिरवीताना पाहावयास मिळत आहेत.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता
वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन
विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण
उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात
येते.
0000
वृत्त क्रमांक 605
दहावी-बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
नांदेड दि. 12 जून :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा जून-जुलै 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रवेशपत्र (हॉलतिकीट ) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर गुरुवार 12 जून 2025 पासून Admit Card या लिंकव्दारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाइन प्रवेशपत्राबाबत
सूचना
जून-जुलै 2025 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी इ. 10 वी व 12 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. ज्या आवेदनपत्रांना "Paid” असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे “Paid Status Admit Card" या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील.
अति विलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे "Extra Seat No Admit Card" या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्म तारीख व इतर दुरुस्त्या असल्यास अथवा विषय, माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात.
ज्या आवेदनपत्रांना Paid असे Status प्राप्त झाले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status अपडेट होवून "Late Paid Status Admit Card" या Option द्वारे त्यांची प्रवेशपत्र उपलब्ध होतील. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित
माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट
काढून त्यावर लालशाईने द्वितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेश पत्र द्यावयाचे
आहे. जून-जुलै 2025 च्या इ. 10 वी व 12 वी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक,
शिक्षक, मुख्याध्यापक,
प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ
महाविद्यालयांनी या बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असेही आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 604
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वृक्ष लागवड
नांदेड, दि. १२:- आजच्या काळात झपाटयाने होणाऱ्या औदयोगिकरणामुळे वृक्षतोड मोठया प्रमाणात होत आहे. त्याचा परीणाम जागतिक तापमान वाढीवर होत आहे. नागरीकांच्या आरोग्याची सुरक्षा तसेच भावी पिढीच्या भविष्यासाठी हरीत नांदेड अभियान- 2025 राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका, गुरूव्दारा लंगर साहिब नांदेड, वक्षमित्र फाउंडेशन नांदेड तसेच श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने औदयोगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे १२ जून २०२५ रोजी १०१ वृक्ष लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमूख अतिथी म्हणून उपायुक्त नितीन गाढवे, सहा. आयुक्त रमेश चवरे क्षेत्रीय कार्यालय क्र.3, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुर्यवंशी एस. व्ही. , उपप्राचार्य तथा प्रबंधक कंदलवाड व्ही. डी. हे उपस्थित होते.
तसेच आयएमसी सदस्य हर्षदभाई शहा, अभिजीत रेणापूरकर, प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या स्वाती बहेनजी, मिना बहेनजी, उदयान अधिकरी डॉ मिर्झा बेग, तसेच मोठया प्रमाणात पर्यावरण प्रेमी नागरीक संस्थेतील सर्व कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे रा.से.योजनेचे कार्यक्रमाधिकारी दिनेश पोतदार यांनी केले.
००००००
वृत्त क्रमांक 603
प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात
15 ते 30 जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन
माहूर 4 तर किनवट तालुक्यातील 128 गावांचा समावेश
शिबिरात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण
नांदेड दि. 12 जून :- प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात नांदेड जिल्ह्यातील माहूर व किनवट तालुक्यातील गावांमध्ये 15 ते 30 जून 2025 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना विविध आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.
आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे आदिवासी जमातींच्या सामाजिक व आर्थिक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश असून नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील 128 गावे तर माहूर तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे.
दिनांक 15 ते 30 जून 2025 या कालावधीत किनवट तालुक्यातील 55 गावांमध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड, मतदान, राशनकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, पीएम किसान, जनधन खाते, सिकलसेल आजाराची तपासणी इत्यादी आवश्यक कागदपत्रे या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियानात शिबिराचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. दि. 15 जून रोजी जावरला, 16 जून रोजी बोध, उनकदेव, पिंपळगाव सी, निचपूर, 17 जून रोजी पिंपळगाव की,थारा, पाटोदा ची, बेल्लोरी धा, 18 जून रोजी सावरगाव, नंदगाव, तल्हारी, पाथरी, 19 जून रोजी चिंचखेड, नागापूर, उमरी बा, दहेली तांडा, 20 जून रोजी धारसांगवी सी, मांडवी, कोठारी सी, पाटोदा बु, पिंपळगाव सी, 23 जून रोजी सिंदगी मो, राजगड, अंबाडी, लोणी, 24 जून रोजी कनकवाडी, बेल्लोरी की, मारेगाव व , घोटी, 25 जून 2025 रोजी घोगरवाडी, मांडवा की, कोठारी ची, बोधडी खु, 26 जून रोजी प्रधानसांगवी, बेंदी , चिखली बु., बोधडी बु., 27 जून रोजी आंदबोरी ची, सिंगारवाडी, परोटी, सावरी, 28 जून रोजी रिठा, जलधरा, भीसी, ईस्लापूर, कोसमेट, 30 जून रोजी शिवणी, आंदबोरी ई. मलकाजम, आप्पाराव पेठ तर माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी येथे 16 जून रोजी तर वझरा शे. फ. येथे 23 जून रोजी, 30 जून रोजी साकुर व मलकागुडा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 640 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी नांदेड, दि. 19 जून :- जिल्ह्यातील बेरोजगार ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...