Thursday, May 7, 2026

वृत्त क्रमांक

रस्तासुरक्षा सरप्राईज गिफ्ट्सचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वितरण

नांदेड दि. 7 मे :- वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि 'सेफर इंडियन रोड्स' (Safer Indian Roads) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते उदात्त कार्यक्रमाचा शुभारंभ आज महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसर आयटीआय चौक येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज, वाहतूक पोलीस इन्स्पेक्टर भागवत नागरगोजे हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हेल्मेट आणि सीट बेल्ट घालून वाहतुकीचे नियम व कायदे पाळणाऱ्या नागरिकांना रस्ते सुरक्षा सरप्राईज भेटवस्तू आणि रस्ते चिन्हांचा तक्ता देऊन सन्मानित केले. नागरिकांशी बोलताना, त्यांनी रस्ते चिन्हांच्या तक्त्याचे प्रकाशन केले. जो शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि शाळांना दिला जाईल. ते म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक रस्ता वापरकर्त्याने वाहतुकीचे नियम व चिन्हे यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तसेच त्यांनी इतर रस्ता वापरकर्त्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, मोटार आणि मानवी लोकसंख्येच्या झपाट्याने वाढीमुळे धोकादायक #रस्ता वापरकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे आणि जीवघेणे रस्ते अपघात थांबवण्यासाठी प्रत्येक रस्ता वापरकर्त्याने आदराने रस्ते सुरक्षेचे पालन केले पाहिजे.

कार्यक्रमात पोलीस वाहतूक नांदेडचे संतोष तिडके, श्रीमती शिवकांथा जयलवालजी, घनशाम ओझा, परीक्षित ओझा, महेश तिवारी, भास्कर थेटे, सोनू उपाध्याय, तरुण तिवारी, विवेक तिवारी, वरुण तिवारी, श्रीमती ओझा, श्रीमती ओझा, श्रीमती स्वाती उपाध्याय, श्रीमती अनमोल पंडित, कु.नेतल तिवारी, कु.सृष्टी उपाध्याय, बेबी प्रमुघडा सहभागी झाले होते.

00000



















 वृत्त क्रमांक 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राच्या पडताळणीमध्ये विलंब 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले महसूल सहायकाला निलंबित  

नांदेड दि. 7 मे :- कंधार तालुक्यातील मानसपुरी येथील कु. गजेश्री व्यंकटराव गोरे यांची आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक संवर्गातून जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कनिष्ठ सहायक या पदावर निवड झाल्यामुळे त्यांच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS Certificate) प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करुन घेवून त्यांना 10 मार्च 2026 पर्यंत नियुक्ती द्यावयाची होती. संबंधित महसुल सहायक माधव हरी फुलवळे यांनी 23 मार्च 2026 रोजी मुदत संपल्यावर पडताळणी अहवाल सादर केला. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महसूल सहायक माधव हरी फुलवळे यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.

त्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद नांदेडकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो पडताळणीसाठी 23 सप्टेंबर 2025 रोजी कंधार तहसिलदार यांना पाठविण्यात आला होता. या तहसिल कार्यालयातील महसुल सहायक माधव हरी फुलवळे यांनी 23 मार्च 2026 रोजी तो पडताळणी अहवाल सादर केला.

परंतू या उमेदवाराच्या भरती प्रक्रियेची मुदत ही 10 मार्च 2026 रोजी संपुष्टात आल्यामुळे कु. गजेश्री गोरे यांना शासकिय नोकरी मिळण्यास अडचण निर्माण झाली. ही बाब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेत संबंधित महसूल सहायक माधव हरी फुलवळे यांना कारणे दाखवा नोटिस बजावून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यामुळे त्यांना शासन सेवेतून निलंबित केले.

00000

 वृत्त क्रमांक 

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यासाठी विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा

नांदेड, दि. 7 मे : यंदाच्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केल्याने संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या निर्देशानुसार हा आराखडा तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

आराखड्यानुसार धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात तसेच नदीकाठच्या जमिनींवर विशेष चारा लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता राहावी यासाठी मुरघास प्रकल्पांना गती दिली जाणार असून, भविष्यात चारा छावण्यांची वेळ येऊ नये यासाठी चारा साठवणुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच चारा साक्षरता अभियान राबवून पशुपालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. 

पशुपालकांनी कडबा कुट्टी यंत्राचा वापर करून चाऱ्याची बचत व योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत दुग्ध उत्पादक पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर सुधारित वैरण बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. बाहेरील जिल्ह्यात चारा वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे. 

राज्यात सध्या हिरव्या चाऱ्याची ४३.९८ टक्के आणि सुक्या चाऱ्याची २५.१२ टक्के तूट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एल-निनोमुळे पावसात घट झाल्यास ही तूट आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत पहिल्या टप्प्यात १०० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, चारा बियाणे खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) अकोला यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. बियाणे वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून या मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, पशुपालकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्रमांक   परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत   नांदेड दि. 26 मे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा राजपत्...