Monday, October 16, 2017

आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची
माहिती सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :- मासिक वेतन ऑक्टोंबर 2017 चे देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आवाहन असे सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
माहिती बाबतचे सप्टेंबर 2017 अखेरचे इ-आर-1 त्रैमासिक विवरणपत्र मंगळवार 31 ऑक्टोंबर 2017 पर्यंत भरावयाची मुदत आहे. www.mahaswayam.gov.in ऑनलाईन इ.आर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापुर्वीच कळविण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी व फोन नंबर, पत्ता टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही आवाहन सहायक संचालक यांनी केले आहे.

000000
राष्ट्रसंघ दिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा
ध्वज राष्ट्रध्वजासमवेत उभारावा
नांदेड दि. 16 :- संयुक्त राष्ट्रसंघ दिनानिमित्त मंगळवार 24 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील ज्या शासकीय कार्यालयावर दररोज राष्ट्रध्वज लावण्यात येतो त्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजासमवेत संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज उभारण्यात यावा.
भारतीय ध्वजासंहिता नुसार जेव्हा राष्ट्रध्वजाच्या बरोबर संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज फडकविण्यात येतो तेंव्हा तो सामान्यत: ध्वजस्तंभाच्यासमोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्यादृष्टिने त्याच्या अगदी डावीकडे राष्ट्रध्वज असावा. 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघ दिन म्हणुन साजरा करणे हा वार्षिक कार्यक्रम आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक दि. 18 ऑक्टोंबर 2012 रोजी दिलेल्या सुचनानुसार योग्य ती कार्यवाही करुन त्याचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश संबंधीत कार्यालयांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.  

00000
गोदावरी नदीकाठच्या गावांना
अतिदक्षतेचा इशारा
नांदेड दि. 16 :- माजलगाव धरणाची पूर्णसाठा क्षमता 454 द.ल.घ.मी. असून पूर्ण संचय पातळी 431.80 मी. आहे. माजलगाव धरणामध्ये 10 ऑक्टोंबर रोजी 80 टक्के (387.00 द.ल.घ.मी.) पाणीसाठा निर्माण झाला असून पाणीपातळी 430.90 मी. आहे. धरणाचा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास व धरणामधील पाणी आवक वाढल्यास धरणाचे पूर नियंत्रणासाठी कोणत्याही क्षणी सिंदफणा नदी पात्रात पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्यास नदीपात्रात जवळ जावू नये, तसेच पाण्यामुळे जीवीत या वित्त हानी होऊ नये यासाठी गोदावरी नदी व सिंदफना नदीकाठचे गावांना अतिदक्षतेचा इशारा कार्यकारी अभियंता माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथ जि. बीड यांनी दिला आहे.

00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत
नांदेड दि. 16 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2017-18 साठी इच्छूक व्यक्ती, संस्थांकडून प्रस्ताव  मागविण्यात येत आहेत. परीपूर्ण प्रस्ताव 3 प्रतीत मंगळवार 24 ऑक्टोंबर 2017 पूर्वी  जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, शास्त्रीनगर नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
महिला व बालविकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला समाज सेविका व स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच इतर समाज सेविका व संस्थांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने महिला समाज सेविका व स्वयंसेवी संस्थेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते.
राज्यस्तरावर महिला  समाज  सेविकेसाठी प्रत्येक  वर्षी एक पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रोख रु. 1,00,001 स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. पुरस्काराचे पात्रता व स्वरुप पुढील प्रमाणे आहे. राज्यस्तर पात्रता महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजीक कार्याचा अनुभव असावा. तसेच ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
विभागीयस्तर पात्रता- महिला व बालविकास क्षेत्रात किमान 7 वर्षाचा सामाजीक कार्याचा अनुभव असावा.  नोंदणीकृत संस्थेस दलीतमित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्‍त असावी. तसेच  तिचे कार्य व सेवाही पक्षातील व राजकारणापासून  अलिप्त असावी. स्वरुप रोख रु. 25,001/- स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.
जिल्हास्तर पात्रता- महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षाचा सामाजीक कार्याचा अनुभव असावा. तसेच ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. स्वरुप रोख रु. 10,001/- स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.
अर्हता धारण असणाऱ्या इच्छूक व्यक्ती, संस्थांनी अर्हतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव धारकांचा कार्याचा तपशील, रनिंग वृत्तपत्र फोटोग्राफ्स, सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे. यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय असल्यास त्याचा तपशील इत्यादी. विभागीय पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, रनिंग वृत्तपत्र कात्रणे, संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय असल्यास त्याचा तपशील, संस्था नोंदणी प्रमाणपत्र घटनेची प्रत. या सर्व बाबींचा समावेश करुन परीपुर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
दिवाळी पहाट कार्यक्रमात 18 ते 20 ऑक्टोबरपर्यंत
गोदावरीच्या बंदाघाटवर नांदेडकरांना बहारदार कार्यक्रमांची मेजवानी
        नांदेड, दि. 16 :- जिल्हा प्रशासन नांदेड, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि गुरुव्दारा बोर्ड व नांदेड नागरी सांस्कृतिक समितीच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी घेतला जाणारा व दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेला बंदाघाट येथील गोदावरीच्या रम्य काठावरील त्रिदिवसीय दिवाळी पहाट यावर्षी 18, 19, 20 ऑक्टोबर रोजी गोदावरीच्या बंदाघाटवर सकाळी साडेपाच वाजता संपन्न होत आहे. यावर्षीच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमात नांदेडकरांना दिवाळी निमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वा. गुरुभजन व शबद कीर्तन तसेच पहाटे 5.30 वा. सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन सुप्रसिध्द निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे असून सुप्रसिध्द सिनेकलावंत व टीव्हीस्टार म्हणून प्रसिध्द असलेले  त्यागराज खाडीलकर यांचेसह सौ.आरती दिक्षीत पुणे व टिव्ही गायिका पल्लवी अनदेव यांचा सहभाग आहे. त्याच रोजी सायंकाळी ६.३० वाजता नांदेडमध्ये प्रथमच मराठी गझलचा बहारदार मुशायरा गझल दिवाळी होणार आहे. यात डॉ.सुनंदा शेळके, जयसिंगपूर, शरद धनगर, धुळे, डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर आतम गेंदे, पालम, प्रपुâल्ल कुलकर्णी, नांदेड, संजय बामणीकर नांदेड, प्रा.सौ.सुहासिनी देशमुख, नांदेड हे मान्यवर गझलकार सहभागी होणार असूनर, गझल निवेदन गझलकार व कवी बापू दासरी नांदेड यांचे असणार आहे. यात प्रमुख उपस्थिती संत बाबा बलविंदरसिंगजी आणि  प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते शमा प्रज्वलीत केली जाईल.
गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता गुरुव्दारा शबद किर्तन व सकाळी ५.३० वाजता कोलकत्याचे सुप्रसिध्द गायक पंडित ब्रजेश्वर मुखर्जी यांची शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताची पहाटे मैफल होणार आहे.
शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा पहाट हा कार्यक्रम पहाटे ५.३० वाजता लेकी माहेराच्या या संगीत मैफिलीत नांदेड माहेर असलेल्या गायिकांचा आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती दिग्दर्शन पत्रकार विजय जोशी यांचे असून निवेदन अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे यांचे लाभणार आहे. यात सौ.प्रज्ञा देशपांडे- पळसोदकर, सौ.वर्धिनी जोशी- हयातनगरकर, सौ.विद्या कोलते- एडके, सौ.देवश्री साने-पाठक,हर्षा देशमुख या गायिका सहभागी होणार आहेत.
या सर्व दिवाळी मुहूर्तावरील सुश्राव्य कार्यक्रमांचा आस्वाद नांदेडच्या रसिकांनी घ्यावा, शक्यतो शहरात एकाच व्यासपीठावर दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले असल्याने अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, नांदेड मनपाचे आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, गुरुव्दारा बोर्डाचे अधीक्षक ठाणसिंग, उपायुक्त रत्नाकर वाघमारे तसेच सांस्कृतिक समन्वयक तथा अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांनी केले असून, हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी दैनिक प्रजावाणीचे माध्यम सहकार्य लाभले आहे. तसेच शंतनू डोईफोडे, अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे, बापू दासरी, विजय जोशी, गोवर्धन बियाणी, लक्ष्मण संगेवार, वसंत मैय्या, सुरेश जोंधळे, हर्षद शहा, उमाकांत जोशी, विजय होकर्णे, गोविंद पुराणिक, प्रमोद देशपांडे  आदी सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
0000000


विशेष प्रसिद्धी मोहिम लेख क्र. 2

स्‍वच्‍छ भारत अभियानातून गावांचा कायापालट
            सर्वांनी गाव स्‍वच्‍छ करावं, तेणे आरोग्‍य नांदते, बरवे घाण-खतातूनी नवनवे वैभव येईल उदयासी हा राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रामगीतेतला संदेश ग्राम विकासाच्‍या वैभवासाठी महत्‍वाचा आहे.
         
   जोपर्यंत गावात कायम स्‍वच्‍छता राहणार नाही तोपर्यंत गावाची संपन्‍नता वाढणार नाही. महात्‍मा गांधी यांनी देखील स्‍वच्‍छतेचं स्‍वप्‍न उरी ठेवून गावाकडं चला असा संदेश दिला तर भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्‍वच्‍छतेचं तेज हे सोन्‍याहून सुंदर आहे त्‍यासाठी प्रत्‍येकानं झटलं पाहीजे असा संदेश दिला आहे. 
            खरोखरच ग्रामीण भागातील नागरीकांचं आरोग्‍य उंचाविण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य शासन प्रयत्‍न करत आहे. या प्रयत्‍नाला लोकसहभागाची आवश्‍यकता आहे. लोक सहभागातून स्‍वच्‍छ भारत मिशन यशस्‍वी करण्‍यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्‍टोबर 2014 रोजी या अभियानाला व्‍यापक स्‍वरुप दिलं. दिल्‍ली इथल्‍या लाल किल्‍ल्‍यावर स्‍वच्‍छतेचा विषय सर्वांसमोर ठेवून देश स्‍वच्‍छ करण्‍याचं आवाहन केलं. 2 ऑक्‍टोंबरला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. येत्‍या सन 2019 पर्यंत संपूर्ण भारत देश हागणदारी मुक्‍त करण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी केला आहे.
           
महाराष्‍ट्रात स्‍वच्‍छता अभियानाला सन 1995 पासून सुरुवात झाली खरी परंतु लोकांची मानसिकता बदलण्‍यापूर्वी दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्‍यांना थेट शौचालय बांधून देण्‍याचा उपक्रम झाला परंतु या शौचालयाचा वापर झाला नाही. आगोदर लोकांची मानसिकता बदलने आवश्‍यक आहे. यासाठी सन 2002 पासून केंद्र शासनानं संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानाला सुरुवात केली यातून मोठया प्रमाणात ग्रामीण भागात प्रबोधन झालं. त्‍यानंतर निर्मल भारत अभियानाच्‍या स्‍वरुपात हे अभियान आलं. जी गावं शंभर टक्‍के हागणदारीमुक्‍त झाली, सांडपाणी आणि घनकचरा यांचं व्‍यवस्‍थापन केलं अशा गावाला महामहिम राष्‍ट्रपती यांच्‍याहस्‍ते निर्मल ग्राम पुरस्‍कारानं गौरविण्‍यात आलं त्‍यानंतर आता स्‍वच्‍छ भारत मिशन नावानं देशभर ही मोहिम राबवली जात आहे. पूर्वी लाभार्थ्‍यांना 4 हजार 600 रुपये प्रोत्‍साहन अनुदान दिलं जात होतं. आता या अभियानातून बारा हजार रुपयांचा लाभ दिला जातोय. यात दारिद्रय रेषेवरील भूमिहीन शेतकरी, अल्‍पभूधारक शेतकरी, महिला प्रधान कुटुंब आणि अपंग कुटुंब यांचा समावेश करण्‍यात आल्‍यामुळं शौचालय बांधकामानं मोठा वेग घेतला आहे.
उघडयावरील शौचविधी, गावातील दूर्गंधी, उघडी गटारं, कच-यांचे ढिगारे यामुळं सुमारे 80 टक्‍के आजार मानवाला जडतात शिवाय महिलांची मोठी कुचंबना होते. आजारपणावर लाखो रुपये खर्च होतो. अतिसार, हगवण यासारख्‍या आजारामुळं लहान बालकाचं मृत्‍यूचं प्रमाण वाढतच आहे. यावर आळा घालण्‍यासाठी शौचालय बांधकाम आणि गाव तसेच परिसर स्‍वच्‍छता असणं आवश्‍यक आहे. याच्‍या प्रबोधनासाठी गावपातळीवर प्रभात फेरी, स्‍वच्‍छतेच्‍या म्‍हणी, विद्यार्थी स्‍वच्‍छतादूत उपक्रम, महिला प्रबोधन, कलापथक आदींचा माहिती, शिक्षण आणि संवादासाठी वापर केला गेला आणि गेल्‍या पाच ते सात वर्षापासून देशात स्‍वच्‍छतेच्‍या क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं पहिलं स्‍थान कायम ठेवलं आहे. मात्र गावाला मिळणारा पुरस्‍कार आणि मिळणारं अनुदान यापूर्ते शौचालय न बांधता त्‍याचा सर्व कुटुंबांनी वापर केला तरच गावाचं आरोग्‍य अबाधित राहणार आहे.
            गेल्या तीन वर्षात नांदेड जिल्‍हयात शौचालय बांधकामाची कामे उत्‍कृष्‍ट कामे करण्‍यात आली आहेत. सन 2014 साली 1 हजार 895 शौचालय, 2015 साली 22 हजार 147 शौचालय, 2 हजार 016 सालात 36 हजार 831 शौचालय, 2017 सालात 56 हजार 107 शौचालय तर चालू वर्षात आत्‍तापर्यंत 41 हजार 710 शौचालय बांधली गेली आहेत. नांदेड जिल्‍हयात शौचालय बांधकामासह स्‍नानगृहेही बांधली आहेत. दरम्‍यान सांडपाणी व्‍यवस्‍थापनासाठी शोषखड्डयाचा उपक्रम राज्‍यात नांदेड पॅटर्न म्‍हणून ओळखला गेला असून राज्‍य शासनानेही नांदेड पॅटर्ननुसार चौदाव्‍या वित्‍त आयोगातून शोषखड्डे करण्‍याचा शासन निर्णयही काढण्‍यात आला आहे.
            नांदेड जिल्‍हयात जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी तालुकस्‍तरावर गट विकास अधिकारी, विस्‍तार अधिकारी व ग्रामसेवकांच्‍या बैठका घेऊन गावपातळीवर प्रत्‍यक्ष शौचालय बांधकामाचे प्रात्‍यक्षिक करुन स्‍वच्‍छतेची लोकचळवळ निर्माण केली आहे. त्‍यांच्‍या सोबतीला जिल्‍हयाचे जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही शौचालय बांधकाच्‍या राष्‍ट्रीय कार्यात मोठा सहभाग दिला आहे. त्‍यांनी महसूल विभागालाही या मोहिमेत सहभागी करुन घेतला आहे. संकल्‍प स्‍वच्‍छतेचा, स्‍वच्‍छ महाराष्‍ट्राचा या राज्‍यस्‍तरीय अभियानात नांदेड जिल्‍हयातील शौचालय नसलेल्‍या कुटूंबांना भेटी देवून शौचालय बांधकामाचे प्रबोधन करण्‍यात आले. यातून अर्धापूर व मुदखेड तालुका शंभर टक्‍के हागणदारीमुक्‍त घोषित करण्‍यात आला आहे. सध्‍या देशभर स्‍वच्‍छता ही सेवा हे विशेष अभियान चालू असून या अभियानात जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन कक्षाच्‍यावतीने मिशन 181 उपक्रम राबविला जाणार आहे. नांदेड जिल्‍हयातील अर्धापूर, मुदखेड व धर्माबाद ही तीन तालुके शंभर टक्‍के हागणदारीमुक्‍त झाले आहेत. तसेच जिल्‍हयातील 520 ग्रामपंचायती आजपर्यंत हागणदारीमुक्‍त झाल्‍या आहेत. उर्वरीत ग्रामपंचायती हागणदारीमुक्‍त करण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्‍या मार्गदर्शनात फास्‍ट ट्रॅक 75, मिशन दस अश्‍वमेध व फोर्स फिनिक्‍स हे उपक्रम जिल्‍हयात शौचालय बांधकामासाठी राबविले जात आहेत. या मिशनमोड उपक्रमातून नांदेड, माहूर, हिमायतनगर, हदगाव व उमरी हे तालुके लवकरच हागणदारीमुक्‍त केली जाणार आहेत. या मोहिमेतून संपूर्ण जिल्‍हा दिलेल्‍या उद्दिष्‍टापूर्वी हागणदारीमुक्‍त करण्‍याचा संकल्‍प जिल्‍हा प्रशासनाने केला आहे. शौचालय बांधकामासाठी जिल्‍हास्‍तरीय व तालुकास्‍तरीय मेळाव्‍यातून केलेल्‍या उपक्रमातून झालेल्‍या प्रबोधनातून गावा-गावात स्‍वच्‍छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोहिमेला जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा, उपाध्‍यक्ष, सर्व सभापती, लोकप्रतिनीधी सहभागी होऊन या अभियानाला चालना दिली आहे.
            यामधून शौचालय नसलेल्‍या कुटुंबांच्‍या दारावर लाल रंगाचे स्टिकर्स तर शौचालय असलेल्‍या कुटुंबाच्‍या दारावर हिरव्‍या रंगाचे स्टिकर्स चिटक‍वण्‍यात आले. लाल स्टिकर्स लावल्‍यामुळं आपलं कुटुंब धोक्‍यात आहे. यातून बाहेर पडण्‍यासाठी शौचालय बांधकामाची जणू स्‍पर्धाच लागली असल्‍याचं चित्र आज ग्रामीण भागात दिसत आहे. तसेच विविध प्रसारमाध्‍यमांमध्‍ये, केंद्र आणि राज्‍य शासनाचे अधिका-यामार्फत होणारं प्रबोधन, दूरचित्रवाणीच्‍या जाहीराती आणि गावाचं विस्‍तारीकरणं यामुळं प्रत्‍येक कुटुंब आता शौचालय बांधण्‍यासाठी प्रवृत्‍त झाला आहे. शौचालय बांधल्‍यानंतर लाभार्थ्‍यांना बारा हजार रुपयांचा लाभ त्‍यांच्‍या थेट बँकेत जमा करण्‍यात येत आहेत. यामुळे लोकांचाही या अभियानावर विश्‍वास बसला आहे. हाच विश्‍वास नांदेड जिल्‍हयाला हागणदारीमुक्‍तीसह स्‍वच्‍छ व निर्मल करण्‍यास प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. 

मिलिंद व्‍यवहारे ,
जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक
तथा माहिती शिक्षण व संवाद तज्ञ
जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्ष

जिल्‍हा परिषद नांदेड.

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...