Friday, May 10, 2024

  वृत्त क्र. 417

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दोन बालविवाह थांबविले


 ·  जिल्हाधिकाऱ्यांनी केले संपूर्ण यंत्रणेचे कौतुक


नांदेड दि. 10 :- जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी व बालविवाहाला आळा घालण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या वेळोवेळीच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दिनांक 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होणार नाही यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क असतांनाच जिल्ह्यात दिनांक 10 मे रोजी बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली. प्राप्त माहितीची शहानिशा केली असता दोन्ही विवाहातील मुली अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. हे बालविवाह थांबविण्याकरिता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  आर. आर. कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही बालविवाह रोखण्यात यश प्राप्त झाले. 


जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांनी तात्काळ संबंधित कुटुंबाची माहिती घेतली. यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पाचे विजय बोराटे तसेच लोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित ग्रामसेवक तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे ऐश्वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले, निलेश कुलकर्णी यांनी कुटुंबाचे समुपदेशन करून सदरील बालविवाह थांबविला. दोन्ही बालविवाह थांबविण्यात प्रशासनास यश प्राप्त झाल्याबद्दल संपूर्ण यंत्रणेचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कौतुक केले.

0000

 वृत्त क्र. 416

उन्हाळयात प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 10 :- प्राण्याचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि अनावश्यक वेदना टाळण्यासाठी सर्व वाजवी उपाययोजना करण्याची जबाबदारी प्राणी मालकांची आहे. ही जबाबदारी व कर्तव्य टाळल्यास प्राण्यांतील क्रुरता अधिनियम 1960 मधील कलम 11 (1) च्या तरतुदीनुसार ही बाब क्रुरता ठरते. तसेच हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे उन्हाळयात वाढत्या उच्च तापमानात प्राण्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होवू नये यासाठी त्यांची योग्य काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त  डॉ. राजकुमार पडीले यांनी केले आहे.

 

उच्च तापमानामुळे प्राण्यांच्या शरीर व चयापचय प्रक्रीयेत बदल घडून येतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते व त्यामुळे शरीर व चयापचय प्रक्रीयेत बदल घडून येतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते व रक्त प्रवाहावर परिणाम होतो. यामुळे जनावरे कमी खाद्य खातात व पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्याचा प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. तसेच स्त्रीबीज आणि माजाच्या प्रक्रीयेवर सुध्दा परिणाम होतो. त्यामुळे विर्य गुणवत्ताबिजांड व गर्भधारणेचे प्रमाण कमी होवून प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. याबाबी टाळण्यासाठी उन्हाळयात प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

पुरेसा निवारा 

प्राणी दिवसभर सावली असलेल्या भागात राहतील याची खातरजमा करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल साहित्यापासून निवारा तयार करावा.  प्राण्यांना नैसर्गिक सावली उपलब्ध व्हावी व त्यांचे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी निवाऱ्याची सभोवताली वृक्षारोपन करावे.

 

पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करुन देणे

उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणे ही गुरुकिल्ली आहे. प्राण्यांना उन्हाळयात सहजगत्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुरेशा प्रमाणात व नियमितपणे स्वच्छ पाणी द्यावे.

 

उष्णतेच्या तणावाची लक्षणे

थकवा येणेजास्त श्वासोश्वासाची गरज भासणेआळस येणेलाळ गाळणेहद्याचे ठोके  वाढणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. प्राण्यामध्ये ही लक्षणे दिसून आल्यासतात्काळ पशुवैद्यकीय उपचार करावेत. प्राण्याच्या काळजीसाठी जबाबदार असलेल्या सर्व व्यक्ती संस्थानी अत्यंत उष्णतेच्या प्रतिकूल परिणामापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय उपाययोजना कराव्यातअसेही आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 415

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 10 :- नांदेड जिल्ह्यात 21 मे 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 मे 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...