Friday, March 20, 2020


जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने
21 22 मार्चला बंद ठेवण्याचे आदेश
नांदेड दि. 20 :- कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शनिवार 21 मार्च व रविवार 22 मार्च 2020 रोजी नांदेड जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांना वगळून इतर सर्व प्रकारचे आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश नांदेडचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांना सुट देण्यात आली असून शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतुक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल, पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने, सर्व प्रसार माध्यमे व अत्यावश्यक सेवा पुरविणारे माहिती तंत्रज्ञान संस्था, आपात्कालीन / अत्यावश्यक सेवा देणारी आस्थापने  वगळून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या कामात कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कुचराई, दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हीड 19 उपायोजना नियम 2020 मधील तरतुदी व आपत्ती व्यवस्थापना अधिनियम 2005 च्या कलम 51 व इतर अनुषंगिक कायदानुसार कारवाई करण्यात येईल.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकाने / आस्थापनाधारका विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे. 
00000


मद्य विक्रीचे दुकाने 31 मार्च पर्यंत बंद
नांदेड दि. 20 :- आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी मद्य विक्री अनुज्ञप्ती (सीएल-3), विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2, एफएल-3 व एफएल-4), बिअर विक्री किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-बीआर-2), पॉपी-2 अनुज्ञप्त्या तसेच किरकोळ ताडी विक्री केंद्र (टिडी-1) अनुज्ञप्ती शनिवार 21 मार्च ते मंगळवार 31 मार्च 2020 रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 22 मार्चला
मराठवाडयातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना
नांदेड दि. 20 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी दि. 21 22 मार्च 2020 रोजी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी  मराठवाडयातील आठही जिल्हयांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी आज व्हीसीव्दारे सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणुला रोखण्यासाठी जनतेने स्वयस्फुर्तीने बंद पाळणे आवश्यक आहे.  दि. 21 22 मार्च रोजी जनतेने घराबाहेर पडू नये, अशी  सूचना त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर  विभागीय आयुक्तांनी मराठवाडयातील आठही जिल्हयांतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश  दिले आहेत.
सदर दोन दिवसांच्या बंदमधून पुढील आस्थापनांना वगळण्यात आले आहे. यामध्ये शासकीय/निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने औषधे दुकाने, विदयुत पुरवठा, ऑईल पेट्रॉलियम ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमं, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना यांना वगळून आठही जिल्हयांतील सर्व आस्थापना दुकाने दि. 21 22 मार्च 2020 रोजी बंद ठेवावेत, असे विभागीय आयुक्तांनी सूचित केले आहे.
******


कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय
रास्तभाव दुकानामध्ये घ्यावयाची दक्षता
नांदेड दि. 20 :-  कोरोना विषाणूचा प्रसार तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तुचे वितरण करतांना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणीत करुन धान्य वाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारामार्फत धान्य मिळवणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट / अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही.
कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानावर गर्दी न करता रास्त भाव दुकानदार अन्न-धान्य वितरणासाठी पात्र लाभार्थी यांना ज्याप्रमाणे टोकन देवून ज्या नियोजितवेळी दुकानावर धान्य घेण्यासाठी यावे अशा सुचना देतील, त्याचवेळेस रास्त भाव दुकानात जावून अन्न धान्य प्राप्त करुन घ्यावे. तसेच धान्य घेण्यास आलेले लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानात उचीत अंतर ठेवून रांगेत उभे राहतील. याची दक्षता रास्तभाव दुकानदार व लाभार्थ्यांनी घ्यावी, ही सुविधा 31 मार्च 2020 पर्यंत लागू राहील.
लाभार्थ्यांना मार्च 2020 कालावधीत धान्य मिळण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास संबंधीत तहसिल कार्यालयास दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधीत कार्यालयास ईमेल करावा अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयाशी दुरध्वनीवरुन संपर्क अथवा ईमेल करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय
कार्यालयातील उपस्थिती
नियंत्रित करण्याबाबत आदेश
नांदेड दि. 20 :- कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाचे तातडीचे व महत्वाचे काम चालू राहण्याचे दृष्टीने संबंधीत विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलवता त्यांना आळीपाळीने 50 टक्के बोलवावे. (यामध्ये सुट देत असताना भेदभाव होणार नाही याअनुषंगाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची जन्म दिनांकाची सम / विषम दिनांक लक्षात घ्यावी परंतू यामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त  कर्मचारी उपस्थित राहणार नाही याची देखील दक्षता घ्यावी). सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, कार्यालयास उपलब्ध करुन दयावा. तसेच त्या पत्त्यावर ते उपलब्ध आहेत याची दक्षता घ्यावी. कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना प्राप्त झाल्यास त्यांना त्यानुसार कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य राहील.
हा आदेश सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच त्यांच्या प्रशासकिय नियंत्रणाखालील कार्यालयांना लागू राहणार नाही. त्याचप्रमाणे क्षेत्रिय स्तरावर ज्या अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कामकाजाचा भाग म्हणून कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते अशा कार्यालयांना त्याचप्रमाणे आपत्कालीन, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कार्यालयांना हा आदेश लागू राहणार नाही.
सामान्य प्रशासन विभागाचा 18 मार्च 2020 रोजीचा शासन निर्णयात नमूद अटी व शर्तीचे पालन करणे संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी राज्य शासकीय कार्यालयांना 31 मार्च 2020 पर्यंत आपतकालीन परिस्थिती म्हणून लागू राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000


वेतन पडताळणी पथकाचे कामकाज
5 एप्रिल पर्यंत बंद राहणार
नांदेड दि. 20 :-  सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 18 मार्च 2020 अन्वये कोरोना विषाणुंचा संभाव्य प्रादुर्भावास प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासकीय निर्देशानुसार वेतन पडताळणी पथक, सहसंचालक कार्यालय, औरंगाबाद येथे सेवापुस्तकांची देवाण-घेवाण दि.05 एप्रिल 2020 पर्यंत बंद करण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद विभाग यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
0000


सार्वजनिक बांधकाम मंत्री, ना.श्री.अशोक चव्हाण, यांची नियोजित मध्यवर्ती प्रशासकिय संकुल परिसर असर्जन व विषणुपूरी येथील स्वर्गीय डॉ. शकररावजी चव्हाण यांचे नियोजित पुतळयाच्या जागेची पाहणी.
               
               
मा.ना.श्री.अशोकराव चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग तथा पालकमंत्री, नांदेड जिल्हा  यांनी आज दिनांक 20/03/2020 रोजी सा.बां.विभाग अंतर्गत मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, असर्जन व असर्जन (विष्णूपरी) येथील स्वर्गीय डॉ. शंकररावजी चव्हाण, यांच्या नियोजित पुतळयाच्या जागेंची पाहणी केली. 
                असरजन येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जागेची पाहणी आज मा.मंत्री महोदयानी केली.  मार्च अर्थसंकल्पामध्ये या जागेमध्ये नव्याने न्यायालयीन इमारतीचे व पायाभूत सोयी सुविधेची कामे मंजूर झालेली आहेत.  या अनुषंगाने मा.मंत्री महोदयानी या परीसरातील आराखडयाच्या विविध बांधकामाच्या अनुषंगाने विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.  संबंधीत जागेतील मोकळया व राखीव जागेची साफसफाई करून, त्या ठिकाणी जनतेसाठी तात्पुरता वॉकींग ट्रॅक बनविण्यात यावा.  तसेच, या जागेत भविष्यात होणाऱ्या मोठया सभा, सार्वजनिक कार्यक्रमासाठी वाहनतळ व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे. तसेच, हेलीपॅडसाठी देखील जागा निश्चित करून त्याबाबतचे नियोजन करण्यात यावे, या सूचनांचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे.
              
  तसेच, विष्णुपूरी-असर्जन  येथील काळेश्वर मंदीर परिसरात स्वर्गीय डॅा.शंकररावजी चव्हाण,याचा नियोजित पुतळयासाठी जागेची पाहणी करून, या परिसराचा पर्यटनाच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व पर्यटन विभाग यांनी एकत्रितरित्या आराखडा तयार करण्याबाबत मा.मंत्री महोदयांनी  सूचना दिल्या. तसेच हा प्रस्ताव पर्यटन विभागामार्फत शासनास सादर करण्याच्या अनुषंगाने पर्यटन विभाचे संचालक, श्री.अभिमन्यु काळे यांचेशी संपर्क साधून त्यांना याविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या.

            
    या प्रसंगी मा.विधानपरिषद सदस्य, श्री.अमरनाथ राजूरकर, विधानसभा सदस्य मा.श्री.मोहन हंबर्डे, श्री.अविनाश धोंडगे,अधीक्षक अभियंता, सा.बां.मंडळ, नांदेड, श्री. जी.एच.रजपूत, कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग, नांदेड इत्यादी  अधिकारी उपस्थित होते.
  

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...