Wednesday, January 6, 2021

 

बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज

करण्यास 18 जानेवारी मुदतवाढ

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरुन नियमित शुल्कासह www.mahassscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सोमवार 18 जानेवारी 2021  पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.    

नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल सरल डेटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने मंगळवार 5 जानेवारी 2021 ते सोमवार 18 जानेवारी 2021 हा कालावधी आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream) पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखा 5 ते 18 जानेवारी 2021 पर्यंत आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करुन चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत सोमवार 25 जानेवारी 2021 पर्यंत आहे.

 

 अर्ज भरावयाच्या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी व त्याबाबत पूर्वसूचीवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर पूर्वसूची चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी. 

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व पूर्वसूची जमा करण्याची मुदत 28 जानेवारी 2021 पर्यंत राहील. इयत्ता 12 वी परीक्षेची अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. 

कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने व विशेषत: आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. शासन निर्णय 14 ऑगस्ट 2020 नुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी नियमित विद्यार्थ्यांची विज्ञान, कला व वाणिज्य शाखांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकरण्यासाठी सरल डाटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. या सरल डाटावरुन नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांची माहिती सरलडाटावर उपलब्ध नाही त्यांनी ऑल अप्लीकेशनच्या लिंक मधून प्रचलीत पद्धतीने अर्ज भरावीत. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांची, पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती SARAL Data मध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईन भरावयाची आहेत. त्याच्या तारखा वरीलप्रमाणे कॉलम नं. 3 नुसार निश्चीत करण्यात आल्या आहेत. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित  विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरण्यात यावे. यावर्षी नव्याने फॉर्म नं. 17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची सन 2021 मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार असल्याने उपरोक्त कालावधीत या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येवू नयेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी गतवर्षीप्रमाणेच परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाऊनलोड करुन चलनावरील नमूदप्रमाणे मंडळाच्या Virtual Account मध्ये एनइएफटी किंवा आरटीजीएसद्वारे वर्ग करावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी  एनइफटी किंवा आरटीजीएसद्वारे वर्ग केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच अंकाऊट नंबर व आयएफसी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास सदर रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांची राहील. 

सन 2021 मधील परीक्षेसाठी फेब्रुवारी-मार्च 2020 अथवा नोंव्हेबर-डिसेंबर 2020 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळीसर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेंतर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापुर्वीच असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होणार नाही. याबाबतच्या स्पष्ट सूचना विभागीय मंडळ स्तरावरुन सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात याव्यात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त कालावधीमध्ये संबंधित प्रशिक्षण संस्थेद्वारे ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. नियमित अर्ज भरण्याची मुदत वाढीनंतर पुन:श्च मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

000000

 

 


 

11 जानेवारीला आरटीओ कार्यालयाचे

अनुज्ञप्तीचे कामकाज राहणार सुरु

नांदेड (जिमाका) दि. 6 :- श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा पालखी सोहळ्यानिमित्त सोमवार 11 जानेवारी  2021 रोजी नांदेड जिल्ह्याला स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. यादिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ पक्की अनुज्ञप्ती चाचणी तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज पूर्वनियोजित मुलाखतीनुसार केले जाणार आहे. अर्जदारांची गैरसोय होऊ नये यासाठी सोमवार 11 जानेवारीला हे कामकाज सुरु राहणार आहे. याव्यतिरिक्त इतर कामकाज होणार नाही याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी केले आहे.  

000

 

34 कोरोना बाधितांची भर तर

37 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 6 :- बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 34 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 15 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 78 अहवालापैकी 1 हजार 38 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 691 एवढी झाली असून यातील 20 हजार 572 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 342 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 6 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 576 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, जिल्हा  रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 12, खाजगी रुग्णालय 5, मुखेड कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 1, भोकर तालुक्यांतर्गत 2 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.84 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 16, हदगाव तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, हिंगोली 1 असे एकुण 19 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6, मुखेड तालुक्यात 5, कंधार 1, अर्धापूर 1, देगलूर 1, परभणी 1 असे एकुण 15 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 342 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 17, मुखेड कोविड रुग्णालय 19, महसूल कोविड केअर सेंटर 9, देगलूर कोविड रुग्णालय 18, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 148, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 57, हैद्राबाद येथे संदर्भीत 3, खाजगी रुग्णालय 41 आहेत.   

बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 177, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 64 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 86 हजार 947

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 61 हजार 151

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 691

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 572

एकुण मृत्यू संख्या-576

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.84 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-03

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-393

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-342

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-06.           

000000

 

पत्रकारितेतील नव्या पिढीला मार्गदर्शनासाठी

ज्येष्ठ पत्रकारांनी पुढे सरसावण्याची गरज

-         जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे 

दर्पण दिनानिमित्त भवताल, माध्यमे आणि आपण

परिसंवादात मान्यवरांचे मार्गदर्शन 

नांदेड, (जिमाका) दि. 6  माध्यमे ही समाजाचा आरसा असतात. समाजाचे प्रतिबिंब माध्यमात उमटतात. समाजातील चांगल्या वाईट बदलांचे प्रतिबिंब देत असतांना माध्यमांवर अधिक जबाबदारी येऊन पडते. समाजातील सहिष्णुता, एकात्मता टिकून राहण्यासाठी माध्यमांची जबाबदारी मोठी असून नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांचे योगदान अधिक आवश्यक व गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. दर्पणदिनामित्त जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने एमजीएम महाविद्यालयात आयोजित 'भवताल, माध्यमे आणि आपण' या परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर हे किनवट येथे आदिवासी आरोग्य शिबिरासाठी असल्याने त्यांनी झुमद्वारे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, प्राचार्य गणेश जोशी, ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी, संपादक शंतनु डोईफोडे, मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन, आकाशवाणीच्या श्रीमती राजश्री मिरजकर, भारत होकर्णे, कुंवरचंद मंडले, विजय जोशी, माजी जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे तसेच जिल्ह्यातील माध्यमाचे प्रतिनिधी, पत्रकार, विद्यार्थी आदी उपस्थित होते. 

मागील 6 जानेवारी ते यावर्षीच्या 6 जानेवारीपर्यंत गेलेला कालखंड हा सर्वच दृष्टिने सर्व घटकाला नवे स्थित्यंतर देणारा ठरला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जी भयावता व धास्ती समाजात निर्माण झाली होती ती धास्ती घालवून समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम माध्यमांनी व माध्यमातील प्रतिनिधींनी अत्यंत जबाबदारीने केले या शब्दात जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी पत्रकारांच्या योगदानाचा गौरव केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कोविड-19 मुळे जे व्यक्ती बाधित झाले त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी प्रशासनाने जी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तेवढीच पराकाष्ठा पत्रकारांनीही समाजात अफवा पसरु नयेत यादृष्टिने वस्तुस्थिती वेळोवेळी समाजापुढे मांडून लोकशिक्षकाची भूमिका बजावली आहे. 

लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या आवाजाला महत्व आहे. हे लक्षात घेऊन आज माध्यमातील क्रांतीमुळे जी वेगवेगळी डिजिटल माध्यमे समोर येत आहेत त्याचे आपण स्वागत करुन या माध्यमांसाठी काम करणाऱ्या नव्या पिढीला नैतिक आणि लोकशाही मुल्यांचे बळ दिले पाहिजे, असे रापतवार यांनी स्पष्ट केले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची जशी आवश्यकता असते त्याच धरतीवर लोकशाही भक्कम करण्यासाठी पत्रकारांवर समाजाच्या शिक्षणासाठी लोकशिक्षकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांनी माध्यमशास्त्राच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना पत्रकार हा समाजाचा  चौकीदार, पहारेकरी असून पत्रकारामध्ये नैतिकता व चारित्र्य या गोष्टी असणे अंत्यत आवश्यक असल्याचे सांगितले. 

यावेळी प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे यांनी दर्पणदिन हा पत्रकारासाठी आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचे स्पष्ट करुन गत एक वर्षातील कोरोनाचे आव्हान स्विकारुन माध्यमांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. या काळात बातम्या आणि बातम्यांचे संपादन करतांना कधी नव्हे तेवढी काळजी घ्यावी लागली असे स्पष्ट केले. घटनेतील 19 व्या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला दिलेली मुभा ही कुणाच्या अधिकारावर व स्वातंत्र्याला धक्का पोहचविणारी तर नाही ना याची अधिक काळजी घेण्याचे शिक्षण गतवर्षाने माध्यमाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक नांदेड टाइम्स उर्दूचे संपादक मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन यांनी आपल्या मनोगतात नांदेडच्या पत्रकारिता क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी असून या क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच यावेळी आकाशवाणीच्या राजश्री मिरजकर यांनी विद्यार्थींनींना या क्षेत्रात आवाहन करुन उपस्थिती विद्यार्थींनींना प्रोत्साहन दिले. इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे भारत होकर्णे, कुंवरचंद मंडले यांनीही यावेळी संवाद साधला. 

प्राचार्य गणेश जोशी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करुन एमजीएम महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. पत्रकारिता प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न होण्यासाठी महाविद्यालयातर्फे आवर्जुन पत्रकार दिनासारखे उपक्रम सातत्याने विनाखंड सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शितल महाजन यांनी केले.

0000



  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...