वेळेत उपचार व स्वच्छता यातच लम्पी आजारावर नियंत्रण !
राज्यातील पशुधनांमध्ये विशेषत: गोवंशीय प्राण्यांमध्ये लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव बहुतांश जिल्ह्यात आढळून आला आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय विभागामार्फत मोठया प्रमाणात लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकरी व पशुपालक यांना उपाययोजनाची माहिती वेळेत होण्यासाठी विविध माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाच्या प्रयत्नामुळे व उपाययोजनामुळे जिल्ह्यात आजच्या स्थितीला लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी गोठ्यातील स्वच्छता व बाधित असलेल्या जनावरांना गोठ्यापासून वेगळे करुन त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरु करावेत, असे आवाहन पशुसवंर्धन विभागाच्यावतीने वेळोवेळी करण्यात येत आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी घाबरून न जाता बाधित पशुचा वेळेत उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो.
लम्पी रोगाचा प्रसार हा डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दुषित चारा-पाणी याद्वारे होतो. या रोगाचा संसर्ग कॅप्रीपॉक्स या विषाणूमुळे होत आहे.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी
चारा कमी खाणाऱ्या जनावराची तात्काळ ताप मोजावी व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करावा. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करावी. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डास, माश्या, गोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करुन बंदोबस्त करावे. निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येवू नयेत म्हणून औषध लावणे व गोठयामध्ये औषधांची फवारणी करावी. आजारी जनावरांवर विषारी औषध फवारणी करु नये, रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांना स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध करावे.
लम्पी रोगाची लक्षणे
अंगावर 10 ते 20 मि.मि. व्यासाच्या गाठी, सुरुवातीस भरपूर ताप, डोळयातून नाकातून चिकट स्त्राव, चारा खाणे पाणी पिणे कमी अथवा बंद, दुध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणे, त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतु पडू नये यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे.
पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार पशुपालकांनी लसीकरण करुन घ्यावे, पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आदींनी लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक. 18002330418 अथवा मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा टोल फ्री क्र. 1962 वर संपर्क साधावा.
लम्पी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या शासनाने पुर्ण लसीकरण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. जनावराचे लसीकरण करण्यासाठी सर्व पशुसंवर्धन विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. ज्या गावात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघा पर्यंत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. 5 किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्यात येत आहे.
लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य दिले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी 30 हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी 25 हजार रुपये, लहान कारवडी असल्यास 16 हजार रुपये मदत दिली जात आहे. याव्यतीरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात 11 ऑक्टोंबर 2022 पर्यंत लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 697 आहे. जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन 4 लाख 998 एवढ्या पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 83 गावे लम्पी बाधित आहेत. या गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 36 हजार 150 एवढे आहे. यातील 697 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 433 एवढी आहे. बाधित गावाच्या पाच किमी परिघातील गावातील पशुधन संख्या ही 1 लाख 38 हजार 974 एवढी आहे. जिल्ह्यात लम्पी आजारामुळे मृत पशुधनाची संख्या 29 एवढी झाली आहे. लसमात्रा 4 लाख 34 हजार 250 उपलब्ध आहे.
अलका पाटील,
उपसंपादक,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
0000