Friday, February 7, 2025

 वृत्त क्रमांक 159 

हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा !

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन 

नांदेड दि. 7 फेब्रुवारी : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी HSRP बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या यांच्या सुचनेनुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम 31 मार्च 2025 अशी आहे. 

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना HSRP बसविण्याकरिता शासनाने 3 संस्था, उत्पादकांची निवड राज्य शासनाने अधिसुचनेद्वारे केली आहे. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे 3 झोन मध्ये विभागणी करुन मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड, मे. रिअल मेझन इंडीया लिमीटेड व FTA HSRP Solution Pvt.Ltd या 3 संस्था, उत्पादकांची निवड करण्यात आली आहे. 

हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता Appointment पध्दत सुरु करण्यात आली असून त्यासाठी वाहन प्रकारानुसार दरआकारणी केली जाईल. झोन 1 करिता मे रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली असून वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटकरिता https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. याव्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रक्टरकरिता दर 450 रुपये, तीन चाकी वाहनांकरिता 500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांकरिता 745 रुपये इतका दर आकारला जाणार असुन या व्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे व सदर शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे. 

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे HSRP बसविण्याकरिता Appointment घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत, नियुक्त केलेले अधिकृत HSRP फिटमेंट केंद्रावर वाहन मालकांना एचएसआरपी बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही. 

करिता नांदेड जिल्हयातील वाहनमालक ज्यांची वाहने वाहनधारकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झ गालेल्या ज्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही अशा सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी वर नमूद केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 31 मार्च 2025 पूर्वी बसवून घ्यावी असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. तसे न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविण्यासाठी दंड आकारणी परिवहन विभागातर्फे करण्यात येईल. करिता सदर प्रकारे दंड टाळण्यासाठी 31 मार्च 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 158 

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड 

नांदेड दि. 7 फेब्रुवारी : नुकताच राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेत रब्बी ज्वारी व करडई या पिकाचे उत्पन्न व उत्पादन बाबतीत योग्य नियोजन करून भरघोस पिक घेऊन नांदेड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावले आहेत. 

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. 

या पिकस्पर्धेत लोहा तालुक्यातील सायाळ येथील कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून ओळखले जाणारे तसेच खंडीभर लाल कंधारी गाई जनावरे सांभाळून शेती करणारे शेतकरी रत्नाकर पाटील ढगे सायाळकर यांनी जिल्ह्यातून रब्बी ज्वारीमध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून रुपये 30,000 चे पारितोषिक मिळवीले  आहे. त्यांनी सांगितले की, यश मिळवताना जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या त्रीसूत्रीचा वापर करून एक आदर्श उत्पादन घेण्यास मी यशस्वी झालो आहे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यांनी आपल्या शेतीत सतत सुधारणा घडवून आणल्या आहेत. विपरीत परिस्थितीत चांगले उत्पादन घेऊन त्यांनी पंचक्रोशीत आपली छाप सर्वसामान्य शेतकरी वर्गात निर्माण  केल्यामुळे आज हजारो शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे धडे गिरवीताना पाहावयास मिळत आहेत. त्यांनी चालवत असलेल्या अन्नदाता सुखी भव या ग्रुपवर ते अनेक शेतकरी बांधवांना विनामुल्य शेती पिक मशागत व एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करत असतात तसेच लाल कंधारी जातीचे त्यांच्याजवळ वीस जनावरे आहेत.   

तसेच करडई या पिकामध्ये देगलूर तालुक्यातून माधव शंकरराव पाटील रा.चैनपूर यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून रोख रक्कम 50,000 चे पारितोषिक  व सुनील नामदेव चिमणपाडे रा. कुडली यांनी द्वितीय क्रमांक मिळवून रोख रक्कम 40,000 चे पारितोषिक मिळवण्याचा बहुमान मिळविला आहे. यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक पिकपद्धतीचा अवलंब केला. योग्य वाण, योग्य वेळी मशागत, शेंद्रीय खताचा मुबलक वापर करून जमिनीचा कस वाढवून जमिनीचा पोत सुधारून व योग्य खताचा ताळमेळ घालून शेती क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन राज्यस्तरावर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला. 

राज्यस्तरावर करडई या पिकात प्रथम व द्वितीय क्रमांक व रब्बी ज्वारी या पिकात तृतीय क्रमांक आल्याबद्दल दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी विजेते शेतकऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. व पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

000

 वृत्त क्र. 157

शासकीय सेवा व योजनांचे आज किनवट येथे महाशिबीर 

भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे  9 फेब्रुवारीला उद्घाटन   

नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक 

नांदेड दि. 7 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवासमिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने 8 फेब्रुवारी रोजी तालुका क्रिडा संकुल, किनवट जिल्हा नांदेड येथे शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच 9 फेब्रुवारीला भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी व न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या हस्ते होणार आहे. 

समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्येशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या योजना व मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

 तालुका क्रिडा संकुल किनवट या ठिकाणी दिनांक 8 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वा. या महाशिबिराचे उद्घाटन समारंभ होत असून महाशिबीरामध्ये विविध शासकीय सेवा व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी या महाशिबीराचा मोठ्या संख्येत उपस्थित राहून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सुरेखा कोसमकर प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,  नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे. तसेच 9 फेब्रुवारीला भोकरी येथील न्यायालयाच्या विस्तरीत इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही कार्यक्रमाला न्यायमुर्ती शैलेश ब्रम्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

00000






 




 #कृषीस्वावलंबनयोजना




#बारावीपरीक्षा विशेष लेख                                                                                                                    ...