Thursday, October 22, 2020

 

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी

192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित

आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत 

नांदेड, (जिमाका)दि. 22 :- अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच 192 पात्र उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद नांदेडच्या www.zpnanded.in या वेबसाईटवर आणि जिल्हा परिषदेच्या, नांदेड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयातील आवाराच्या भिंतीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रतिक्षा यादी 31 जुलै 2020 अखेर प्राप्त प्रस्तावाप्रमाणे घोषित करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीतील ज्या उमेदवारांचे प्रस्ताव अपूर्ण आहेत. अशा अनुकंपा धारकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही अथवा ज्येष्ठेतबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित अनुकंपा धारकांनी 30 ऑक्टोंबर 2020 पर्यंत त्यांचे म्हणणे लेखी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागास समक्ष अथवा ई-मेल आयडी dyceogadzpnanded@gmail.com सादर करावे. त्यानंतर आलेल्या आक्षेपाच्या विचार करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुधिर ठोंबरे यांनी केले आहे.

0000

 

 

 233 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

93 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-गुरुवार 22 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 233 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 93 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 30 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 63 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 175 अहवालापैकी 1 हजार 58 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 18 हजार 487 एवढी झाली असून यातील 16 हजार 736 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 129 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 43 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवार 21 ऑक्टोंबर रोजी नायगाव तालुक्यातील सोमठाणा येथील 60 वर्षाचा एका पुरुषाचा, शिवकल्याणनगर नांदेड येथील 85 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर गुरुवार 22 ऑक्टोंबर रोजी नांदेड तालुक्यातील पिंपळगाव येथील 44 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 495 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 5, मुखेड कोविड केंअर सेंटर 1, किनवट कोविड केंअर सेंटर 4, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 1, उमरी कोविड केंअर सेंटर 4, बारड कोविड केंअर सेंटर 2, कंधार कोविड केंअर सेंटर 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, बिलोली कोविड केंअर सेंटर 5, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 149, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 1, लोहा कोविड केंअर सेंटर 1, हदगाव कोविड केंअर सेंटर 4, खाजगी रुग्णालय 40 असे 233 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.68 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 20, अर्धापूर तालुक्यात 1, किनवट 1, कंधार 1, यवतमाळ 1, परभणी 1, लोहा 1, भोकर 1, माहूर 1, उमरी 1, हिंगोली 1 एकुण 30 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 35, अर्धापूर तालुक्यात 3,  मुदखेड 1, किनवट 3, हदगाव 1, उमरी 1, नांदेड ग्रामीण 5, भोकर 1, लोहा 8, माहूर 2, कंधार 2, यवतमाळ 1 असे एकूण 63 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 129 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 153, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 569, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 48, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 38, हदगाव कोविड केअर सेंटर 18, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 19, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 14, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 5, मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 5, लोहा कोविड केअर सेंटर येथे 10, मुदखेड कोविड केअर सेटर 11, माहूर कोविड केअर सेंटर 21, किनवट कोविड केअर सेंटर येथे 28, धर्माबाद कोविड केअर सेंटर 15, उमरी कोविड केअर सेंटर 7, कंधार कोविड केअर सेंटर येथे 9, अर्धापूर कोविड केअर सेंटर 7, भोकर कोविड केअर सेंटर 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 130, लातूर येथे संदर्भीत 1, हैद्रबाद येथे संदर्भीत 2 झाले आहेत. 

गुरुवार 22 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 71, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 84 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 2 हजार 910

निगेटिव्ह स्वॅब- 81 हजार 250

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 487

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 16 हजार 736

एकूण मृत्यू संख्या- 495

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.68

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 278,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 129,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 43. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

 

विशेष लोकअदालतीत 42 प्रकरणे सामोपचाराने निकाली

तर 2 कोटी 11 लाख 43 हजार रक्कमेची तडजोड 

नांदेड (जिमाका), दि. 22 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम आर. जगताप यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड येथील न्यायालयात मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणाबाबतच्या विशेष लोकअदालत नुकतीच 21 ऑक्टोंबर 2020 रोजी संपन्न झाली.  या लोकअदालतमध्ये एकुण 42  प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. दोन प्रकरणे अंशतः निकाली निघाली असून रुपये 2 कोटी 11 लाख 43 हजार एवढया रक्कमेची तडजोड झाली. 

लोकअदालत यशस्वी करण्यासाठी व जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्याकरिता प्रमुख जिल्हा न्यायाधीश, श्रीराम  आर. जगताप, जिल्हा न्यायाधीश -1 पॅनल प्रमुख  एस. एस. खरात व  जिल्हा न्यायाधीश -2  एन. गौतम तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आर. एस. रोटे तसेच नांदेड येथील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकिल सदस्य, पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.   

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम आर. जगताप यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार व सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी वृंद व लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले व यापुढेही अशीच सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

00000



 

रास्तभाव धान्य दुकानात तीन महिन्यांची साखर उपलब्ध 

नांदेड (जिमाका), दि. 22 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2020 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 94 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे. 

तालुका निहाय नियतन (क्विंटलमध्ये) पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड-193.5, अर्धापूर- 39, मुदखेड-33, कंधार-73.5, लोहा-147.5, भोकर-86.5, उमरी-54.5, देगलूर-135.5, बिलोली-105, नायगाव- 130.5, धर्माबाद-65, मुखेड-198, किनवट-454.5, माहूर-209, हदगाव-80, हिमायतनगर-89 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत 

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत सन 2020-21 या वर्षात बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण या पॅकेजचा लाभ मिळण्यासाठी mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन प्रणालीवर अर्ज दाखल करावेत असे, आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे. 

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत पुढील घटकाचा लाभ द्यावयाचा आहे. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या बाबी व उच्चत्तम अनुदान मर्यादा रुपये पुढीलप्रमाणे राहील. नवीन विहीर -2 लाख 50 हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्ती- 50 हजार, शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण-1 लाख रुपये, इनवेल बोअरींग-20 हजार रुपये, वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये, सुक्ष्म सिंचनसंच यामध्ये ठिंबक सिंचन-50 हजार रुपये तर तुषार सिंचन- 25 हजार रुपये, परसबाग- 500 रुपये, पंप संच -20 हजार रुपये, पीव्हीसी, एचडीपीई पाईप-30 हजार रुपये याप्रमाणे उच्च्त्तम अनुदान मर्यादा आहे. 

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थी निवडीबाबत अटी व शर्ती पुढीलप्रमाणे राहतील. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. स्वत:चे नावे किमान 0.20 (नविन विहीरीकरीता 0.40 हे.) हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहीजे. शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेचा सातबारा दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.(नगर पंचायत, नगरपरिषद व महानगर पालिका क्षेत्राबाहेरील)लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीचे शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. 1लाख 50 हजार पेक्षा जास्त नसेल तरच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. या करीता सन 2019-20 या वर्षाचा संबंधीत तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. परंपरागत वननिवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत प्राधान्याने लाभार्थी म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतर उर्वरीत अर्जदारांमधुन लॉटरी पध्दतीने लाभार्थी प्राधान्याक्रमानुसार निवडण्यात येतील. ग्रामसभेचा ठराव आवश्यक. प्रस्तावित नविन विहीर ही पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फुटापेक्षा जास्त अंतरावर असावी. ऑनलाईन अर्जांची मुळ प्रत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे जमा करुन त्यांची पोच घ्यावी. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...