Thursday, December 23, 2021

सुधारित वृत्त-

रब्बी हंगामातील पिकासाठी संयुक्त खतातून योग्य मात्रेत खत दयावे

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकाची काढणी पूर्ण झालेली असून रब्बी हंगामातील पिकाची पेरणी सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने हरभरा व गहु ही पिके आहेत. रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्ह्यात उपलब्ध आहेत. परंतू बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा डीएपी खताच्या वापराकडे दिसून येतो. त्यामुळे बाजारात डीएपी खताची मागणी वाढलेली आहे. उपलब्ध संयुक्त खतामधून पिकाच्या शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी खताचा आग्रह न धरता संयुक्त खतातून पिकास योग्य मात्रेत खत दयावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. 

बाजारात 10:26:26, 15:15:15, 12:32:16 व 20:20:0:13 ही संयुक्त खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सिंगल सुपर फॉस्पेट, म्युरेट ऑफ पोटॅश 24 :24:00 ही खते सुद्धा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी करताना वरील संयुक्त खते दयावीत. हरभरा पिकासाठी एकरी 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 12 किलो पालाश देण्यासाठी 10:26:26 हे 75 किलो वापरल्यास एकरी 1 हजार 765 रुपये किंवा 15:15:15 हे खत 50 किलो अधिक‍ सिंगल सुपर फॉस्पेट 50 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 40 किलो वापरल्यास 2 हजार 492 रुपये किंवा डीएपी 75 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो वापरल्यास 2 हजार 320 रुपये खर्च येतो. 

गहू (कोरडवाहू) पिकाला 40:20:0 एकरी मात्रा देण्यासाठी 20:20:0:13 हे खत 100 किलो अधिक 50 किलो युरियामधून दिल्यास एकरी 2 हजार 766 रुपये तसेच बागायती वेळेवर गहू पेरण्यासाठी 40:20:20 ही मात्र देण्यासाठी 10:26:26 हे खत 80 किलो अधिक युरिया 43 किलो वापरल्यास एकरी 4 हजार 940 रुपये खर्च येतो. 

उशीरा पेरण्यात येणाऱ्या गव्हासाठी एकरी 32:16:16 नत्र, स्फुरद व पालाश देण्यासाठी 15:15:15 हे खत 100 किलो अधिक युरीया 40 किलो दिल्यास 2 हजार 813 रुपये किंवा डीएपी 35 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 80 किलो अधिक 35 किलो युरीया दिल्यास 2 हजार 690 रुपये किंवा 20:20:0:13 हे खत 80 किलो अधिक म्युरेट ऑफ पॉटेश 80 किलो अधिक 50 किलो युरिया मधून दिल्यास एकरी 3 हजार 850 रुपये खर्च येतो. यावरून डीएपी खताऐवजी इतर संयुक्त खते वापरल्यास खर्चात बचत होते. शिफारशीप्रमाणे मात्रा सुद्धा देता येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिकासाठी डीएपी ऐवजी संयुक्त व इतर खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्ट्या जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अधिकारात असलेल्या सन 2022 या वर्षाकरीता नांदेड जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या यात्रा व सणाच्या दिवशी जाहीर करण्यात आल्या आहेत. 

शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022 रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम (रहे) कंधार ऊर्स निमित्त, शुक्रवार 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन आणि गुरुवार 22 डिसेंबर 2022 रोजी श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा पालखी सोहळा मि. मार्गशीर्ष कृ. 14 या तीन स्थानिक सुट्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेअंतर्गतची कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील. हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही, असेही या अधिसुचनेत नमूद केले आहे.

00000

 

 वृध्द साहित्यिक व कलावंतानी मानधन योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजना शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येते. या योजनेचे प्रस्ताव गट विकास अधिकारी पंचायत समितीमार्फत मागविण्यात येतात. शासनाने याबाबत कार्यक्रम आखून दिलेला आहे. परंतु अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे सन 2021-22 या वर्षासाठी वृध्द कलावंताचे अर्ज स्विकारण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. तरी वृध्द साहित्यिक व वृध्द कलावंतानी 15 जानेवारी 2022 पर्यत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके यांनी केले आहे.

अर्ज भरण्याचे निकष व अटी पुढीलप्रमाणे आहेत. वृध्द कलावंताचा परिपूर्ण भरलेला स्वाक्षरीसह अर्ज, कलावंताचे कमीत कमी वय 50 वर्षा पेक्षा जास्त असावे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र 48 हजार पर्यत असावे, जन्म तारखेचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला/वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र), रहिवासी प्रमाणपत्र, किमान 15 ते 20 वर्षापासून कला साहित्य क्षेत्रात योगदान केल्याचे पुरावे, प्रमाणपत्र, इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचे शपथपत्र नोटरी केलेले असावे असेही कळविण्यात आले आहे.

00000

 विशेष सहाय्य योजनेतर्गत लाभार्थ्यांनी

हयात व उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावेत 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- मनपा हद्दीतील संगायो, इंगायो, श्राबायो या विशेष सहाय्य योजनेतर्गतच्या लाभार्थ्यांनी आपले हयात व उत्पन्न प्रमाणपत्र 15 दिवसांच्या आत तहसिलदार संजय गांधी योजना नांदेड शहर कार्यालयात किंवा तलाठी संजय गांधी निराधार शहर बी.टी. शेळके मो. क्र. 9890534021 यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन नांदेडचे संगायो शहर तहसिलदार यांनी केले आहे. 

विशेष सहाय्य योजनेतर्गत लाभार्थी संजय गांधी निराधार, विधवा, अपंग, दुर्धर आजार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेत शासन निर्णयातील तरतुदीनुसार लाभार्थ्यांचे हयात असल्याबाबतची तपासणी वर्षातून एकदा 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत करण्यात येते. यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी हयात व उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावेत असेही कळविण्यात आले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 660 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 540 एवढी झाली असून यातील 87 हजार 859 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यातील 1 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, खाजगी रुग्णालय 6 अशा एकूण 26 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 91 हजार 539

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 87 हजार 475

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 540

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 859

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-2021 परीक्षा रविवार 2 जानेवारी 2022 रोजी नांदेड शहरातील 32  परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात परीक्षेच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे.  

नांदेड शहरातील विविध 32 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 10 ते सायं 5 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 9 हजार 792 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,  एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

000000

 नागापूर येथे प्रशासन आपल्या गावी योजनेचा शुभारंभ

-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  गावातील लोकांच्या प्रशासकीय पातळीवर असलेल्या विविध समस्या व कामाचे निराकरण गाव पातळीवरच व्हावे  या उद्देशाने प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम आज भोकर तालुक्यातील नागापूर येथे संपन्न झाला. गुड गव्हर्नन्स वीकअंतर्गत हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनाशी निगडित असलेल्या कामांबाबत तालुका व जिल्ह्याच्या पातळीवर जाण्याचे काम पडता कामा नये. त्यांचे प्रश्न व समाधान संबंधित विभाग प्रमुखांकडून गावातच व्हावे या दृष्टीने यावर्षी गुड गव्हर्नन्स वीकउपक्रमाची संकल्पना प्रशासन आपल्या गावी अशी ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी देवून कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार राजेश लांडगे,  गटविकास अधिकारी अमित राठोड व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. 

महास्वराज्य अभियान 2021-22 अंतर्गत प्रशासन आपल्या गावी हा उपक्रमाचा शुभारंभ झाला. ग्राम स्तरावर लोकसहभागातून ग्रामस्वच्छता व  ग्रामविकासास चालना मिळण्यासाठी स्मार्ट ग्राम हा उपक्रम प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. भोकर तालुक्यातील विविध कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी मंडळनिहाय उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  या उपक्रमात भोकर तालुक्यातील 21 गा

वांची स्मार्ट ग्रामच्या माध्यमातून चळवळ उभी होत आहे. आज या उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या तहसील कार्यालय
, पंचायत समिती, भूमी अभिलेख, पुरवठा विभाग, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालविकास, ग्रामविकास, शिक्षण, महसूल, निवडणूक, विद्युत वितरण कंपनी सहकार आदी विभागाकडून विविध विषयासंदर्भातील माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. यावेळी कोविड लसीकरण, आरोग्य तपासणी, जनावरांचे लसीकरण आदी उपक्रम घेण्यात आले.

00000


 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने

जिल्ह्याला "मोतीबिंदू मुक्त" करण्याचा निर्धार

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सुविधेबाबत विशेष लक्ष 

नांदेड (जिमाका) 23 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक वैशिष्ट्यपूर्ण विशेष उपक्रम नांदेड जिल्ह्याने हाती घेतले आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू सारख्या वेळेवर उपचार कराव्या लागणाऱ्या आजाराचा समावेश करून मोठा दिलासा देण्याचे नियोजन आरोग्य विभागातर्फे केले गेले आहे. कोविड-19 या वातावरणात अनेकांनी मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया पुढे ढकलून अधिकचे संकट ओढावून घेण्याला आमंत्रण दिले आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरीक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाहीत यादृष्टिने नांदेड जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा‍ निर्धार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

कोविड-19 च्या कालावधीत मोतीबिंदू व इतर आजारांबाबत आरोग्य विभागात असलेल्या आवश्यक सुविधा तत्पर ठेवून केवळ कोविडच्या भितीपाई अनेकांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पुढे ढकल्या. तथापि ही शस्त्रक्रिया वेळेवर करणे आवश्यक असून जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील लोकांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत चांगला हा उपक्रम असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

वृद्धापकाळात मोतीबिंदू हा सर्वसामान्यपणे आढळून येणारा आजार असून सन 2010 च्या सर्वेक्षणामध्ये 50 वर्षे वयावरील वयोगटात 1.38 टक्के, 60 ते 70 वयोगटात 3.48 टक्के व पुढे 10.89 टक्के एवढे प्रमाण आहे. सन 2015 च्या सर्वेक्षणात सदर प्रमाण अनुक्रमे 1.17 टक्के, 2.59 टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील हे प्रमाण कमी करण्यासाठी नागरीकांनीही तेवढ्याच उत्सफूर्तपणे यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

मोतीबिंदू मुक्त नांदेड जिल्ह्यासाठी असे आहे नियोजन 

हे अभियान नांदेड जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण, सर्वेक्षण आणि शस्त्रक्रिया या तीन उपक्रमांमार्फत नियोजन केले आहे. यात या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, महापालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांचे विशेष प्रशिक्षण केले जात आहे. हे प्रशिक्षण 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण केले जाईल. 

दिनांक 1 ते 20 जानेवारी 2022 पर्यंत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांनी तपासलेल्या संशयीत मोतीबिंदू रुग्णांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय नेत्र रुग्णालय येथे नेत्र व तज्ज्ञ, चिकित्सा अधिकारी यांच्याकडे पुन्हा निदान केले जाईल. 

या नंतर तज्ज्ञांमार्फत उपरोक्त ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात विविध तपासण्या करून शस्त्रक्रियेचे नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हा प्रशासनाचा हा अभिनव उपक्रम असून नागरीकांनीही यात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

00000

 आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालयातील

जुन्या वाहनाचा 4 जानेवारीला लिलाव 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  प्रकल्‍प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालयाचे स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एम. एच.01- झेड ए 0644 या वाहनाचे निर्लेखन करण्‍यात आलेले आहे. या वाहनांची विक्री बोली लावून करावयाची आहे. बोली बोलणाऱ्या व्‍यक्तींनी मंगळवार 4 जानेवारी 2022 रोजी प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यालय गोकुंदा रेल्वे गेटजवळ किनवट येथे दुपारी  12 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन किनवटचे एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एस. पुजार यांनी केले आहे. 

स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एम. एच.01- झेड ए 0644  हे  नादुरुस्‍त अवस्‍थेत असून निर्लेखित करण्यात आलेले आहे. हे वाहन लिलावात बोली लावून विक्री करावयाचे आहे.  लिलावात भाग घेणाऱ्यांनी पुढील अटी व शर्तीची पुर्तता करणे बंधनकारक आहे. शासकीय किंमतीपेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही. बोली बोलणारे व्‍यक्तींनी बोली बोलण्‍याच्‍या पुर्वी 5 हजार रुपये अनामत रक्‍कम म्‍हणुन रोखपाल यांच्‍याकडे जमा करुन पावती घ्‍यावी. अनामत रक्‍कमेची पावती घेतल्‍याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही. आधारकार्ड , पॅनकार्डची झेरॉक्‍स स्‍वसाक्षांकित करुन अटी व शर्तीच्‍या अर्जासोबत जोडाव्यात. लिलावाच्‍या दिवशी  बोली / देकार अर्जाचा नमुना या कार्यालयाकडून देण्‍यात येईल. अर्ज भरल्‍याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही. हे वाहन स्‍क्रॅपमध्‍ये विक्री करण्‍यात येत असल्‍याने हे वाहन रस्‍त्‍यावर चालविता अथवा वापरता येणार नाही याची नोंद घ्‍यावी. 

लिलावाव्‍दारे विक्री करण्‍यात येणाऱ्या वाहनांचा तपशिलात वाहनाचे नाव- स्विफ  डिझायर, वाहनाचा प्रकार- पेट्रोल, वाहन खरेदी वर्ष- 2010, वाहनाचे आयुर्मान 15 वर्ष, किमी- 2 लाख 40 हजार. वाहनाचा झालेला वापर 3 लाख 26 हजार 826 किमी, वाहन इंजन क्रमांक के 12 एमएन 4019502, वाहन चेसिस क्रमांक एम ए 3 इएसकेडी 500236980 याप्रमाणे आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार यांनी दिली आहे. 

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...