राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज संध्याकाळी साडेसात वाजता माहूर गडावरील रेणुका देवीचे दर्शन घेतले. माहूर येथून ते पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावी रवाना झालेत.
Saturday, April 5, 2025
वृत्त क्रमांक 356
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी
मृतांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुंज येथे रविवारी विशेष सहायता शिबीर
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील घटनाक्रमानंतर शासनाकडून कुटुंबांचे सांत्वन
नांदेड व हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही आढावा
नांदेड /हिंगोली, दि.५ एप्रिल: वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रैक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तर मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी (दि.६) गुंज येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारच्या दुर्घटनेची दखल प्रधानमंत्री कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. घटनेतील कुटुंबांच्या पाठीशी शासन उभे राहिले असून आज नांदेड व हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा या घटनाक्रमाचा आढावा घेतला.
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज त.आसेगाव येथील ९ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्र.२०१ मध्ये शेती कामासाठी जात होते. सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील ७ महिलांचा मृत्यू झाला.
त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता, त्यांनी व्हिडीओची तात्काळ दखल घेतली. त्या व्हिडीओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले. तसेच मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयाची आर्थिक मदतही जाहीर केली आहे.
तसेच आज शनिवारी (दि.५) रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी मौजे गुंज त. आसेगाव येथील मयतांच्या वारस, नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेचे लाभ, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ, शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ, व इतर अनुषंगीक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मयतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांकडून देण्यात आली.
तहसीलदार श्रीमती दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशाने उद्या रविवार (दि.६) रोजी गुंज त. आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबाराचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत, मंडळ अधिकारी, विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी, पळसगाव त. माळवटा यांना आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कळविले आहे.
***
वृत्त क्रमांक 355
नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार
नागरिकांनी, ऑटोचालकांनी नोंद घेण्याचे आवाहन
नांदेड, दि. ५ एप्रिल :- नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्त करण्यासाठी मर्यादित कालावधी करिता नांदेड बस स्टॅन्ड बंद करण्यात येत आहे. ते कौठा मैदानावर स्थानांतरीत करण्यात येत आहे,याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
या नव्या निर्णयानुसार 12 एप्रिल पासून जुने बसस्थानक रस्त्यासाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी या निर्णयासाठी सहकार्य करावे व संबंधित यंत्रणेने ठरलेल्या वेळेच्या आधी रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड रेल्वेस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. बराच काळाचा निर्णय प्रलंबित होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेतल्या होत्या. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात असुविधा होऊ शकते. ऑटो चालकांनी या काळात प्रवाशांना मदत करावी. तसेच ऑटो चालक व अन्य प्रवासी वाहतुकीला आवश्यक पूरक व्यवस्था कौठा मैदान येथे निर्माण करण्यात येत आहे.
विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्य बसस्थानक येथील रस्त्यांच्या दुरूस्तीच्यावेळी ड्रेनेजलाईन, पाईपलाईन, फायबर केबल यासंदर्भातील सर्व अडथळे तातडीने दुरूस्त करण्याबाबत बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय नव्या बसस्थानकाची तात्पुरती व्यवस्था होताना प्रवाशांची सुरक्षितता, तात्पुरते शौचालय, स्वच्छता गृहे व अन्य अनुषंगिक व्यवस्था तसेच वाहतुकीमध्ये होणाऱ्या बदलामुळे कि.मी. अंतरातील नवे टप्पे निश्चित करण्याचे काम सर्व संबंधित विभागाने वेळेच्या आत करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड तहसिलदार, आगार व्यवस्थापक, पोलीस वाहतुक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन विक्रमी वेळेत हा रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
0000
वृत्त क्रमांक 370 गीग व प्लॅटफॉर्म वर्कर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन नांदेड, दि. 11 एप्रिल :- केंद्रीय श्रम व रोजगार मं...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...