Tuesday, April 18, 2023

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून गुरुवार 20 एप्रिल 2023 चे सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. 

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  20 एप्रिल 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 विद्यार्थ्यांनी आवश्यक दाखले

व प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :- इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. निकालानंतर प्रवेशासाठी कालावधी मर्यादित असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेली दाखले व प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्यासाठी सेतु सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

 

तहसिल कार्यालयामार्फत उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, भूमिहिन प्रमाणपत्र इ. दाखले वितरीत करण्यात येतात. निकालानंतर पुढील प्रवेशासाठी असणारा मर्यादित कालावधी, त्याच वेळी तहसिल कार्यालयात विविध दाखल्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाचे प्रमाण मोठया प्रमाणात असते. त्यामुळे सर्व अर्जाची तपासणी करण्यास वेळ लागतो. केलेल्या अर्जात काही त्रुटी असल्यास त्याची पुर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच सेतु केंद्रामार्फत मोठया प्रमाणात प्रमाणपत्रांची आवक वाढून ऑनलाईन प्रमाणपत्र ज्या सर्व्हरद्वारे देण्यात येतात ते सर्व्हर युजर्सच्या संख्या जास्त असल्यामुळे हँग होणे, स्लो होणे अशा अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी तात्काळ अर्ज करुन वेळेआधीच प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे तहसिल कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.  

 

मागील आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 कालावधीत तहसिल कार्यालयामार्फत उत्पन्न प्रमाणपत्र 39 हजार 573, रहिवासी दाखला 4 हजार 812, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 13 हजार 100 व इतर प्रमाणपत्र 16 हजार 687 असे एकूण 74 हजार 172 प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी व तहसिलदार नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार काशिनाथ डांगे, अव्वल कारकून विद्यासागर पिंलगुडे, तलाठी गणेश जोंधळे यांनी प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

0000

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...