Tuesday, December 16, 2025

 वृत्त क्रमांक 1305

१८ डिसेंबरपासून माळेगाव यात्रेला सुरुवात

भव्य कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांसाठी सर्वांगीण सुविधा

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची माहिती


नांदेड, दि. १६ डिसेंबर:- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथे श्री खंडोबाची भव्य यात्रा येत्या १८ डिसेंबरपासून सुरू होत असून १८ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत नांदेड जिल्हा परिषदेमार्फत भव्‍य कृषी प्रदर्शन, विविध सांस्कृतिक, कृषी व पशुसंवर्धन विषयक स्‍पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, सहआयुक्‍त डॉ. प्रवीणकुमार घुले, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूर अंदेलवाड, नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चेन्‍ना, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे आदींची उपस्थिती होती.

चौकट

माळेगाव यात्रेतील विविध कार्यक्रम याप्रमाणे- १८ डिसेंबर रोजी श्री खंडोबाची पालखी पूजन व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, १९ डिसेंबर रोजी पशु, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व दुग्ध स्पर्धांचे उद्घाटन तसेच महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. २० डिसेंबर रोजी कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी महिला आरोग्य शिबिर तसेच लावणी महोत्सव, २३ डिसेंबर रोजी पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच कुस्त्यांची प्रचंड दंगल, २४ डिसेंबर रोजी पारंपरिक लोककला महोत्सव, तर २५ डिसेंबर रोजी शंकरपटाचे (बैलजोडी-बैलगाडा शर्यत) आयोजन करण्यात आल्‍याची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली. 

यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेमार्फत फिरती शौचालये, आरोग्य सेवा, मुबलक शुध्‍द पाणीपुरवठा, विजपुरवठा, सीसीटिव्‍ही कॅमेरे, पशुसंवर्धनासाठी दवाखाने, ॲम्बुलन्स आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी माळेगाव यात्रा नियोजन पोस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाची चित्रफीत दाखविण्यात आली. यावर्षी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध स्पर्धांमधील बक्षिसांच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आल्याची माहितीही यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली. 

चौकट

माळेगाव यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, जिल्हा परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शनास भेट देऊन यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले.

000000



  वृत्त क्रमांक 1304

जिल्हा रुग्णालयात हृदयरोग निदान व आरोग्य शिबीर संपन्न

शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया

नांदेड दि. 16 डिसेंबर :-  राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 15 डिसेंबर रोजी 2 डी इको तपासणी शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची 2 डी इको तपासणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा  रुग्णालय, नांदेड येथे आयोजीत करण्यात  करण्यात आली होती. या शिबिरात जिल्ह्यातील एकूण 181 बालकांची तपासणी करण्यात आली असून, किम्स हॉस्पिटल, ठाणे  येथे एकूण  75 पात्र बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील सर्व प्रसूती केंद्रामध्ये जन्माला येणाऱ्या बालकाची, प्रसूतीदरम्यान निर्माण झालेल्या गुतागुंतीमुळे ज्यांना एसएनसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या नवजात बालकांची, आशांमार्फत गृहभेटी दरम्यान आढळून आलेल्या बालकांची व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत बालकांची तपासणी दरम्यान त्याच्यातील जन्मजात व्यंग ओळखण्यासाठी तपासणी व आवश्यकतेनुसार उच्य उपचारासाठी डीईआईसी (District early intervention centre- जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र) येथे संदर्भ सेवा देण्यात येतात. सदरील डीईआईसी अंतर्गत विविध स्तरावरून संदर्भित लाभार्थ्यांच्या 4 D's विशेषतः  नवजात बालकांमधील आढळून येणारे व्यंग (Birth Defects)  लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार (Deficiencies) व वाढीच्या समस्या (Developmental Delay) इत्यादी प्रकारच्या 4 D's चे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य औषधोपचार करण्यात येतात व गरजेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येते.  

या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय परके, निवासी वैद्यकीय अधिकारी, राजाभाऊ बुट्टे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, एनसीडी नोडल अधिकारी हनुमंत पाटील, जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ डॉ.साखरे, डॉ.पुष्पा गायकवाड, मेट्रन सुनीता राठोड यांच्या नेतृत्वात्वाखाली हृदयाचे आजार असलेल्या बालकांची २ डी इको तपासणी करण्यात आली. ही तपासणी किम्स हॉस्पिटल, ठाणे येथील लहान मुलांचे तज्ज्ञ डॉ. श्रीनिवासन एल. व डॉ.सोनिया कारापुरकर सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ञ या विशेषतज्ज्ञांच्या मार्फत पार पडले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनिल कांबळे आरबीएसके जिल्हा समन्वयक, एफएलसी अश्फाक शेख, संपूर्ण आरबीएसके वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डीईआयसी मधील अधिकारी कर्माचारी, जिल्हा रुग्णालयातील इंचार्ज सिस्टर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000




 वृत्त क्रमांक 1303

18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस  

नांदेड दि. 16 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून 18 डिसेंबर  हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाची माहिती सर्व नागरिकांपर्यत पोहचावी या उद्देशाने 18 डिसेंबर 2025 रोजी अल्पसंख्याक दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.  

अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव / माहिती होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयामध्ये अशासकीय समाजसेवी संस्थाच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यात भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद इत्यादीचा समावेश असावा. तसेच अल्पसंख्याक विकास विभागाचे 10 डिसेंबर 2025 रोजीची परिपत्रकातील सूचनानुसार कार्यक्रमांचे आयोजन करावे तसेच कार्यक्रमाचे आयोजन करताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी  व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. जिल्ह्यात सर्व विभाग प्रमुखांनी हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यात यावा  असे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1302

उपविभागीय अधिकाऱ्यांची वर्षभरात मोठी कारवाई ; 23 गंभीर गुन्हेगार तडीपार

 नांदेड, दि. 16 डिसेंबर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सन 2025 या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एकूण 23 गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रभावी कारवाई केली आहे.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर शस्त्र अधिनियम, पोक्सो आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून त्यांचा वयोगट 23 ते 35 वर्षे इतका आहे. पोलीस ठाण्यानिहाय तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड ग्रामीण  13, इतवारा 6, विमानतळ 2, वजिराबाद 1, शिवाजीनगर 1 अशी एकूण 23 गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईसाठी जिल्हाधिकारी  राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वेंजनें व श्री. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. शांतता, सुरक्षितता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती, संशयास्पद हालचाली किंवा कायदा मोडणाऱ्या बाबी निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाणे अथवा प्रशासनास माहिती द्यावी. सुरक्षित नांदेड घडवण्यासाठी सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

00000



  वृत्त क्रमांक 1301

Coffee with Collector उपक्रमांतर्गत जलतारा चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

नांदेड, दि. १६ डिसेंबर : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात सुमारे एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ जिल्ह्यातील विविध गावांमध्ये करण्यात आला असून “Catch the Rain – Where it Falls, When it Falls” या जलसंधारण संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पावसाचे अतिरिक्त पाणी शेतात मुरवून भूजलपातळी वाढवणे, जमिनीची धूप रोखणे, जमिनीची पोत सुधारणे, उत्पादनक्षमता वाढवणे व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

याच अनुषंगाने जलतारा चळवळीत सर्वाधिक व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व CSO प्रतिनिधींना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दर पंधरवड्याला शुक्रवारी “Coffee with Collector” या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व CSO प्रतिनिधींचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत कॉफी घेत कामकाजाचा अनुभव, अडचणी, उपाययोजना व नाविन्यपूर्ण संकल्पनांवर सखोल चर्चा करण्यात आली.

ग्रामपंचायत विभाग

या विभागातून ग्रामरोजगार सेवक धोंडू पाटील व ग्रामपंचायत अधिकारी एस. यु. मोरे,  (ग्रापं. लालवंडी, ता. नायगाव), लिपिक-सह-संगणक चालक ज्ञानेश्वर कयापाक, तांत्रिक सहाय्यक शिवहार कांबळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उकंडराव पवार, कृषी अधिकारी शिवराम मुंडे, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस (पंचायत समिती, किनवट) यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

कृषी विभाग

कृषी विभागातून कृषी सहाय्यक श्रीमती यु. आर. कवटीकवार, मंडळ कृषी अधिकारी दशरथ शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी गोविंद बामनपल्लेह, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांचा उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत अधिकारी, कर्मचारी व CSO प्रतिनिधींनी जलतारा कामे कशा पद्धतीने राबविली, काम करताना कोणत्या अडचणी आल्या व त्या कशा सोडविल्या, याबाबत अनुभव कथन करण्यात आले.

कार्यक्रमास पाणी फाऊंडेशनची टीम उपस्थित होती. पाणी फाऊंडेशनचे प्रविण काथवटे यांनी Farmer Cup संदर्भात माहिती देत सादरीकरण केले. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. माधुरी रेवणवार यांनी शेतीतील लागवड खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी शेतउपयोगी तंत्रज्ञानाचा वापर व कृषी विज्ञान केंद्रातील प्रात्यक्षिक भेटींबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नायब तहसीलदार जयशंकर इटकापल्ले, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, नोडल अधिकारी चेतन जाधव, MIS समन्वयक रूपेश झंवर, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, Coffee with Collector उपक्रमासाठी आमंत्रित अधिकारी-कर्मचारी व CSO प्रतिनिधी, पाणी फाऊंडेशन टीम तसेच संपूर्ण जिल्हा नरेगा टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती.

उपस्थित सर्वांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत जलतारा चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.







  वृत्त क्रमांक 1305 १८ डिसेंबरपासून माळेगाव यात्रेला सुरुवात भव्य कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांसाठी सर्वांगीण सुविधा मुख्य कार्यकारी अधिकारी...