यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ
आज देवस्वारी व पालखी पूजन
नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी माळेगाव येथे स्थानिक देवस्थानच्यावतीने तिथीनुसार देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे. या सोबतच दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेचा शुभारंभ होणार आहे.
प्रशासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची प्रसाधनगृहाची, स्वच्छतेची आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांसाठी सुविधा संपर्क केंद्र ही उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहा व स्थानिक ग्रामपंचायत माळेगावचे कर्मचारी या काळात यात्रेमध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्धतेची खातरजमा करतील, गावकऱ्यांच्या मदतीने यात्रेकरूंना उत्तम सोयी सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न करतील अशा पद्धतीचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत.
या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून यावेळी यात्रेकरूच्या संरक्षणाची व सुरक्षेची अधिक कडक व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेमध्ये साध्या वेषातील पोलीस दल मोठ्या प्रमाणात तैनात आहे. खिसेकापू ,अवैध दारू विक्री या दोन बाबींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून नांदेड सोबतच आजूबाजूच्या ठिकाणावरून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.
दूरून येणारे भावीक, यात्रेकरू, दुकानदार तसेच बाहेर राज्यातून येणारे पशुपालक, व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असून पोलिसांना यात्रेच्या काळात विविध ठिकाणी तैनातीचे आदेश दिले गेले आहे.
शासकीय कार्यक्रम पुढे ढकलले
माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 26 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात दुखवटा असल्यामुळे माळेगाव येथील यात्रेतील सर्व शासकीय कार्यक्रम २ जानेवारीपासून घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे.
दुखवटा एक जानेवारीला संपल्यानंतर 2 जानेवारीपासून नियमित नियोजित कार्यक्रम नव्या वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आज पालखी महोत्सव
तथापि, पारंपारिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानमार्फत तिथीनुसार निघणारी 29 डिसेंबरची देव स्वारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे 29 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
अन्य कार्यक्रम २ जानेवारीपासून
दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जाते. तथापि दुखवटामुळे
29 तारखे नंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून आता सर्व कार्यक्रम 2 जानेवारीपासून होणार आहे. ( १ जानेवारी नंतर ) 29 तारखेपासून यात्रा नियमित सुरू असेल. मात्र जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित काही कार्यक्रमांमध्ये उलटफेर करण्यात आला आहे.
२ जानेवारीपासूनचे कार्यक्रम
जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.
2 जानेवारीला सकाळी दहा वाजता अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन होईल.
महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी 11 वाजता दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे.
लावणी कार्यक्रम २ जानेवारीलाच
तर दुपारी ३ वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वीच्या नियोजनातही लावणी महोत्सव हा दोन तारखेलाच होता. हे सर्व कार्यक्रम 2 जानेवारी रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी घेण्यात येणार आहे.
3 जानेवारीला सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल.
४ जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२वाजता शंकर पटाचे ( बैल जोडी,बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे.
5 जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर 5 जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी, भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे. राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.
००००००