वृत्त क्र. 873
माहितीअधिकार प्रकरणात तत्परता आवश्यक - डॉ.हाटकर
जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार दिन साजरा
नांदेड दि. २७ सप्टेंबर - माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त अर्जांची कार्यवाही तत्परतेने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माहिती अधिकार कायदा अभ्यासक अभिवक्ता डॉ. भीमराव हाटकर यांनी केले.
आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. माहिती अधिकार कायद्याबाबत सर्वसामान्य नागरीकांत जाणीव जागृती होण्यासाठी प्रशासकिय पातळीवर दरवर्षी २८ सप्टेबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करुन माहितीचा अधिकार दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी दिनांक २८ रोजी शासकिय सुट्टी असल्याने शासन निर्देशानुसार शुक्रवार दिनांक २७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकारी दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबरला कार्यालयामध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे.
पुढे बोलताना माहिती अधिकार कायद्याची निर्मिती, वेळोवळी झालेले बदल, बदलाच्या अनुषंगाने समाजमन व प्रशासकिय घटकांच्या मानसिकतेतील बदल अधोरेखीत केला. माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे.त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांनी माहितीचा अधिकार अर्जांची हाताळणी संवेदनशीलता व कर्तव्यभावनेने करावी असे आवाहन हाटकर यांनी केले.
व्याख्यानानंंतर कर्मचा-यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर ,उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, तहसिलदार विपीन पाटील, विकास बिरादार नायब तहसिलदार मकरंद दिवाकर, जया अन्नमवार, नयना कुलकर्णी, यांचे सह अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
00000