Monday, March 1, 2021

 नांदेड जिल्ह्यात 90 व्यक्ती कोरोना बाधित तर दोघांचा मृत्यू   

       1 हजार 231 अहवालापैकी 1 हजार 133 निगेटिव्ह  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- सोमवार 1 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 90 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 65 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  54 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 231 अहवालापैकी 1 हजार 133 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 744 एवढी झाली असून यातील 22 हजार 329 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 601 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 21 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

रविवार 28 फेब्रुवारी 2021 रोजी नंदिग्राम सोसायटी नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर जुना कौठा नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 600 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 38, कंधार तालुक्यांतर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 2, खासगी रुग्णालय 9 असे एकूण 54 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.04 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 43, हिमायतनगर तालुक्यात 1, देगलूर 2, किनवट 8, नांदेड ग्रामीण 5, हदगाव 2, अर्धापूर 2, हिंगोली 2 असे एकुण 65  बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 17, किनवट तालुक्यात 2, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 4 असे एकूण 25 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 601 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 69, किनवट कोविड रुग्णालयात 25, मुखेड कोविड रुग्णालय 8, हदगाव कोविड रुग्णालय 6, महसूल कोविड केअर सेंटर 45, देगलूर कोविड रुग्णालय 10, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 232, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 73, खाजगी रुग्णालय 93 आहेत.   

सोमवार 1 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 145, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 36 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 31 हजार 887

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 3 हजार 660

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 744

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 329

एकुण मृत्यू संख्या-600                           

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.04 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-601

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-21.    

0000

 

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात

ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 मार्चपर्यंत वाढ

नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी बुधवार 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे. 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये दि. 1 मार्च 2021 रोजीच्या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश 31 ऑक्टोंबर, 4, 1528 नोव्हेंबर, 30 डिसेंबर 2020 आणि 29 जानेवारी 2021 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात बुधवार 31 मार्च 2021 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. 

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 1 मार्च 2021 रोजी निर्गमित केले आहेत.

00000

 

कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रलंबित पात्र शेतकऱ्यांना

आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 1 :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र 11 हजार 500 शेतकऱ्याची सातवी यादी 1 जानेवारी 2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 7 हजार 681 शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आधार प्रमाणिकरण केले नाही. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे. 

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019" ही 27 डिसेंबर 2019 च्या शासननिर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2019 रोजी रुपये 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय समिती तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी. 

नांदेड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी 2 लाख 7 हजार 36 शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. सदर बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी शासनाने कर्जमाफी पात्र असणाऱ्या 1 लाख 94 हजार 216 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात  आली आहे. त्यापैकी 1 लाख 86 हजार 535 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केली आहे. आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेल्या शेतकऱ्यापैकी 1 लाख 79 हजार 628 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम 1 हजार 229.22 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. 

आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हा तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्याव्यात असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे.

0000

 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नांदेड दौरा

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

मंगळवार 2 मार्च 2021 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 7.05 वा. हैद्राबादकडे प्रयाण करतील. सकाळी 8.25 वा. हैद्राबाद विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.50 वा. हैद्राबाद विमानतळ येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.50 वा. त्यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथून शासकिय वाहनाने लोहा तालुक्यातील जामगा शिवणीकडे प्रयाण करतील. सकाळी 11.45 वा. जामगा शिवणी येथे आगमन व पिडित कुटुंबियांची भेट. दुपारी 1.15 वा. शासकिय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.45 वा. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे आणि नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासमवेत कोरोना निर्मुलनाबाबत हाती घेतलेल्या विविध उपाययोजनाबाबत चर्चा. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 4 वा. डॉ. आंबेडकरनगर नांदेड येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6.35 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 7.40 वा. विमानाने हैद्रबादकडे प्रयाण. रात्री 8.45 वा. हैद्राबाद विमानतळ येथे आगमन. रात्री 10.55 वा. विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...