Friday, September 23, 2022

 नांदेड जिल्ह्यात 87 पशुधन लम्पी बाधित   

84 हजार 968 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 87 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडिला नांदेड जिल्ह्यातील 20 गावे लम्पी बाधित आहेत. या 20 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन 10 हजार 138 एवढे असून यातील 87 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. याचबरोबर उर्वरीत पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 138 एवढी आहे. यात 20 बाधित गावे पकडून ही संख्या 158 एवढी होते. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावामधील पशुधन संख्या ही 48 हजार 320 एवढी आहे. बाधित व परिघातील सर्व गावांची पशुधन संख्या ही 58 हजार 458 एवढी आहे. आज लसीकरणाच्या मोहिमेत 40 हजार 5 एवढे लसीकरण झालेले आहे. उपलब्ध लसमात्रा ही 2 लाख 60 हजार एवढी आहे. एकुण प्रागतिक लसीकरण 84 हजार 968 एवढे झाले असून मृत पशुधन संख्या 2 वर आहे. गंभीर आजारी असलेल्या पशुधनाची संख्या 15 एवढी आहे.

 

पशुपालकांनी घाबरून न जाता गोठ्यातील स्वच्छता व पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

0000

 राष्ट्रीय पोषण माह निमित्त

स्त्री रुग्णालयात पोषण आहाराबाबत जागृती 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- महिलांमधील आरोग्याचे असंख्य प्रश्न हे त्यांच्या पोषण आहाराशी निगडीत असतात. सुदृढ महिला जशी सुदृढ बाळाला जन्म देऊ शकते त्याच धर्तीवर सुदृढ पोषण आहार हा चांगल्या आरोग्याला तेवढाच आवश्यक असतो. महिलांनी आपल्या भोवताली सहज उपलब्ध असणाऱ्या पालेभाज्या, डाळी, मोड आलेली धान्य, त्या-त्या काळात निसर्गात उपलब्ध असलेली फळे याचा आहारात समावेश करणे तेवढेच आवश्यक असते, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले. 

स्त्री रुग्णालय, श्याम नगर, नांदेड येथे राष्ट्रीय पोषण महा 2022 निमित्त रुग्णालयात महिलांमध्ये पोषण विषयक आहाराच्या जागृती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर, डॉ. एन. बोराटे, डॉ. राजेश बुट्टे, डॉ. ललिता सुस्कर, डॉ. सुनील पल्लेवाड, डॉ. मोहिनी भोसीकर, डॉ. राम मुसांडे, डॉ. देशमुख, डॉ. गुरुतवाड, डॉ. आयनीले, डॉ. लवटे, डॉ. हत्ते, डॉ. आवटी, डॉ. शिवकाशी धर्मले, आहार तज्ञ उर्मिला जाधव, गजानन माने तसेच स्त्री रुग्णालय नांदेड येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पोषण माह निमित्त स्त्री रुग्णालयातर्फे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्यासाठी पोषण विषयक माहिती देणारी प्रदर्शनी लावण्यात आली. नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोषणावर आधारित नाटिका सादर करून पोषणाचे जीवनातील महत्त्व पटवून दिले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी स्पर्धा व पोषणमूल्यांनी भरपूर पदार्थ बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली.  

0000

 माता सुरक्षित तर घर सुरक्षित

अभियानाचा नवरात्रोत्सवात प्रारंभ

-    जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

महिलांच्या आरोग्याचा होणार जागर 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  आरोग्य विभागाच्यावतीने महिला आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्यामध्ये आरोग्याबद्दल जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष अभियान हाती घेतले आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचा शुभारंभ येत्या 26 सप्टेंबर रोजी केला जाणार आहे. या अभियानात 18 वर्षावरील महिला, माता यांच्या आरोग्य तपासण्या केल्या जातील. संबंधित यंत्रणानी या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाबाबत बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी      डॉ. नीना बोराडे, डॉ. बुट्टे, डॉ. संतोष चौधरी, डॉ. अरुणा देशमुख, सलीम जुनेद, बाळासाहेब चौधरी, सुभाष खाकरे इ. अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी  डॉ. नीना बोराडे यांनी या मोहिमेचे उद्दिष्ट सांगितले.  या योजनेअंतर्गत महिलांना उपचारासोबत समुपदेशन केले जाणार आहे.

 

या मोहिमेची माहिती जिल्ह्यातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी इत्यादींमार्फत घरोघरी देण्यात येईल. महिलांनी या शिबिरात आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी इ. उपस्थित होते.

0000

 राज्य सेवा हक्क आयुक्त

डॉ. किरण जाधव यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ.किरण जाधव यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

सोमवार 26 सप्टेंबर 2022 रोजी सायं. 6.15 वा. नांदेड येथे  आगमन व मुक्काम. मंगळवार 27 सप्टेंबर 2022 रोजी  सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 38 विभागाच्या जिल्हा प्रमुखांची बैठक व सेतु सुविधा / आपले सरकार सेवा केंद्रास भेट व मुक्काम. बुधवार 28 सप्टेंबर 2022 सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत नांदेड जिल्हा परिषद सभागृहात सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी जि.प.खाते प्रमुख यांची बैठक व सायंकाळी लातूरकडे प्रयाण करतील.

00000

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री

डॉ. तानाजी सावंत यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

शनिवार 24 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वा. बीड येथून नांदेडकडे प्रयाण. सायं. 4 वा. नांदेड येथे आगमन. सायं. 4.30 वा. पक्षीय  कार्यक्रमास उपस्थिती.  स्थळ- नांदेड शहर. सायंकाळी 6 वा. नांदेड येथून लातूरकडे प्रयाण करतील.

00000

लेख

                                                                           

पिकांना उपद्रव करणाऱ्या गोगलगायीचे नियंत्रण !

गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रीय असतात. अनुकूल वातावरण आणि खाद्याच्या उपलब्धतेमूळे त्यांची वाढ झपाटयाने होते. सद्यपरिस्थितीत बऱ्याच ठिकाणी सोयाबिन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबिन, कापूस यासारख्या पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. ही कीड अनेक पिकांना उपद्रव करत असल्यामूळे गोगलगायीचे एकात्मिक व सामुहिक पध्दतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यावर कृषि विभागाने काही उपाययोजना सूचविल्या आहेत जेणेकरुन नुकसान टाळता येईल.

गोगलगायीची ओळख :  गोगलगाय मृदुकाय, अपृष्ठवंशीय, उदरपाद वर्गातील प्राणी आहे. तीच्या 35 हजारापेक्षा अधिक जातींची नोंद करण्यात आली आहे. गोगलगायी गर्द, करडया, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. काही जातींमध्ये शरीरावर कवच असते. यालाच शंखी असेही म्हणतात. या गोगलगायी जायंट स्नेल नावाने परिचित आहेत. शास्त्रीय नाव अचेटीना पुलिका आहे. त्या विषारीही असू शकतात.

जीवनक्रम : प्रौढ शंखीची लांबी 15 ते 17 सें.मी. असते. जीवनक्रम साधारणत: तीन वर्षाचा असून या कालावधीत मादी एक हजार अंडी घालते. प्रत्येक मादी शंखी पिकाच्या खोडा शेजारील मुळाजवळ किंवा बांधाला 3 ते 5 सेंमी खोलीचे छिद्र करते. याद्वारे माती भूसभूसीत बनवून तीन ते चार दिवसात 100 ते 400 अंडी घालते. 17 दिवसापर्यंत अंड्यातून पिले बाहेर येतात. त्यांची वाढ पूर्ण होण्यास 8 महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागलो. या काळात पिले पिकांचे अतोनात नुकसान करतात. त्यांची कार्यक्षमता रात्रीच्या वेळी अधिक असून, दिवसा सावलीत पानांखाली किंवा ओल्या जागी आढळतात.

प्रसार : याचा प्रसार शेतात वापरण्यात येणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर ट्राली, प्लॉस्टीक ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळू, कलम रोप, बेणे तसेच अन्य निविष्ठाद्वारे होते. गोगलगाय जमिनीखालील रहिवासी आहेत. खोड किंवा जंतूनी तयार केलेल्या भेगा आणि बोगदे वापरुन त्या पसरतात. पावसाळयात ढगाळ वातावरणात कमी प्रकाश, जास्त पाऊस म्हणजे आर्द्रता कमी तापमान (0 ते 32 अंश सेल्सिअस) या किडीला पोषण आहे. दव पडलेल्या रात्री किंवा पावसानंतर संक्रमन जास्त होते. बहुतेक प्रजाती थोडी थंडी सहन करुन करु शकतात आणि वसंत ऋतूत पुन्हा सक्रीय होतात. शंखी गोगलगायी चार ते पाच महिने अन्न पाण्याशिवाय जगू शकतात.

नुकसानीचा प्रकार : गोगलगाय विविध 500 वनस्पतीवर उपजिवीका करते. जमीनीवर पडलेली पिवळी पाने , फुले, फळे, जनावरांचे शेण, शेणखत, कागदी पूठ्ठा तसेच कुजलेल्या कचऱ्यावरही जीवनक्रम व्यतीत करतात. विशेषत: कोवळया पिकांवर गोगलगायीचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

एकात्मिक नियंत्रण : प्रतिबंधात्मक उपाय-गोगलगायीचे वास्तव मुख्यत: बांधावरील गवतावर असल्याने शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, पालापाचोळा, तण काढून शेत नेहमी स्वच्छ ठेवावेत. आडवी -उभी नांगरट करुन सुप्तावस्थेतील गोगलगायींना जमिनीच्या पृष्ठभागावर आणावे. म्हणजे त्या सुर्याच्या उष्णतेने मरतील वा पक्षी त्यांचे भक्षण करतील. प्राणघातक नसणारे सापळे उदा. जुने ओले केलेले गोणपाट आणि लाकडी फळया लावाव्यात. फळझाडाच्या खोडाला 10 टक्के बोडो पेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत.

मशागतीय उपाय : संध्याकाळी व सुर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी प्लॉस्टीकचे हातमोजे घालून गोळा करुन साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात किंवा रॉकेल मिश्रीत पाण्यात बुडवून माराव्यात. अंडी खोडा शेजारील मूळाजवळ किंवा बांधाला तसेच ढिगाखाली 100 ते 200 च्या पुजंक्याने घातलेली असतात. ती पाढंरट रंगाची साबुदाण्याच्या आकाराची असतात. ती नष्ट करावीत. शेतात ठराविक अंतरावर गवताचे ढीग किंवा गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी अंथरावेत. सकाळी पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी जमा करुन नष्ट कराव्यात.

शेतातील मुख्य पिकांवर प्रादुर्भाव करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूची किंवा चुन्याची भुकटी यांचा चार इंच लांबीचा पटृा किंवा राखेचा सुमारे दोन मीटर लांबीचा पट्टा बांधाच्या शेजारी पसरुन टाकावा. पाऊस असल्यास किंवा जमिन ओली असल्यास हा उपाय फारसा प्रभावी ठरत नाही.

जैविक उपाय :  गोगलगायींच्या नैसर्गिक शत्रुंचे संवर्धन करावे. उदा. कोंबडी, बदक, घुबड

रासायनिक उपाय : लहान शंखी गोगलगायी असल्यास त्यावर मिठाची फवारणी किंवा कॅल्शियम क्लोराईडचा वापर करावा. मेटाल्डिहाईड 5 टक्के पावडरची पिकांवर धुरळणी करावी अथवा त्याच्या गोळया शेतात ठेवाव्यात. शंखी गोगलगायी प्रामुख्याने पपई व झेंडुच्या रोपांकडे आकर्षित होतात. त्यामूळे  मेटाल्डिहाईड गोळया पपईच्या पिवळया पानांजवळ ठेवतात. सेंद्रिय शेतीत नियंत्रणासाठी फेरिक फॉस्फेटवर आधारित गोळया वापराव्यात.

सामुहिक उपाय महत्वाचे : गोगलगायींची भिन्नता जीवन चक्रामूळे केवळ रासायनिक नियंत्रणाद्वारे गोगलगायी नियंत्रणात येत नाहीत. शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी गोगलगायींचा उपद्रव टाळण्यासाठी सामूहिकरीत्या व एकात्मिक पध्दतीने निर्मूलन करणे हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे.

 

अलका पाटील, 

माहिती सहाय्यक,

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

0000                                             

 दहावी, बारावी परीक्षेचे

संभाव्य वेळापत्रक जाहीर   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये आयोजित केली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतुने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे तयार करण्यात आले आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी ते सोमवार 20 मार्च 2023 या कलावधीत होईल. तर इयत्ता 10 वी लेखी परीक्षा गुरुवार 2 मार्च ते शनिवार 25 मार्च 2023 या कालावधीत होईल. दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. 

परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. 

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात, असे राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...