Monday, October 4, 2021

 सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत

गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी 

मुंबई दि. 4 : गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रोत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दि. ७ ते १५ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान नवरात्र / दुर्गापुजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 

कोवीड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने "ब्रेक द चेन" अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. 

यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. 

नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमे / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी तसेच देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी.

विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल. 

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे सोहळा बघण्याची व्यवस्था करावी. 

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक आहे.

0000000

 

 

 परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 4 : उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने सन 2021-22 यावर्षातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. खुल्या प्रवर्गातील पदव्युत्तर, पदविका, पीएचडी अभ्यासक्रमासाठी किंवा परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या अशा 20 विद्यार्थ्यांना आपल्या मूळ कागदपत्रासह www.foreignschoolarship2021.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज 18 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यत करावा अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. वि. रा. मोरे यांनी दिली. 

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत कला, वाणिज्य, विज्ञान, व विधी अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी दोन संच मंजूर केले आहे.शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी ही योजना राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 वगळता पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देय राहील. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 8 लाखापर्यत असणे आवश्यक आहे. 

लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर अर्ज करताना मुळ कागदपत्रे सांक्षाकिंत प्रतीसोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे, साक्षांकित प्रतीसोबत विभागीय कार्यालयात सादर करावेत.तसेच तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाचे अर्ज तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाकडे सादर करावे असे नांदेड येथील उच्च शिक्षण विभाने पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

 

 जिल्ह्यातील 103 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 103 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 5 ऑक्टोंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल, खडकपुरा, या 19 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 4 ऑक्टोंबर 2021 पर्यंत एकुण 15 लाख 44 हजार 407 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात कोविड लसींचासाठा पुढील प्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 13 लाख 23 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 31 हजार 520 डोस याप्रमाणे एकुण 16 लाख 54 हजार 550 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 नांदेड जिल्ह्यात एक कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 652 अहवालापैकी 627 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. आज रोजी एकही पॉ‍झिटिव्ह रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 327 एवढी झाली असून यातील 87 हजार 660 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 15 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 1 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 15 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 9, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, व्यक्ती उपचार घेत आहेत.

 जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 35 हजार 862

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 32 हजार 414

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 327

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 660

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-25

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 7 ऑक्टोंबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेरील

धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी

ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदशक सूचना जारी 

नांदेड (जिमाका) दि.4 :- कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोंबरपासून अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनच्या आत जर एखादे धार्मिक स्थळ अथवा प्रार्थना स्थळ असेल तर त्यास उघडण्याची परवानगी नसे. यासंदर्भात नांदेडचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. 

 धार्मिक स्थळासाठी या आहेत अटी

धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थनास्थळे 7 ऑक्टोंबर 2021 पासून केवळ कंटेनमेंट झोनच्या बाहेरील उघडण्यास अनुमती राहील. त्‍या-त्‍या धार्मिक स्थळांच्या, सार्वजनिक प्रार्थनास्थळाच्या ट्रस्ट, बोर्ड, प्राधिकरणाने ठरवलेल्या वेळेनुसारच उघडण्याची परवानगी असेल. कोणत्याही व्यक्तीला प्रवेशासाठी फेस मास्क घालणे, सामाजिक अंतर, थर्मल स्कॅनिंग आणि हँड वॉश किंवा सॅनिटायझरची तरतूद अनिवार्य राहिल.  धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळांना व तेथील अधिकारी/कर्मचारी, सेवकांना कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळणे बंधनकारक आहे. यात स्थानिक प्राधिकरण व त्‍यांचे अधिकारी हे संबंधित धर्मगुरु, पुजारी,भावीक यांचेशी चर्चा करून, स्‍थानिक परिस्थिती विचारात घेऊन, या मार्गदर्शक तत्त्वांमध्‍ये आणखी काही निर्देश जोडू शकतील. याचबरोबर सामाजिक अंतर आणि खबरदारीचे सर्व निकष पाळणे बंधनकारक राहतील. कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ट उपाययोजना व्यतिरिक्त, स्वीकारल्या जाणाऱ्या विविध सामान्य, सावधगिरीच्या उपायांचा समावेश करण्‍यात आला आहे.  

सामान्‍य प्रतिबंधात्मक उपाययोजना

 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, अनेक व्‍याधीने ग्रस्‍त असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  धार्मिक संस्थांनी त्‍यानुसार लोकांना जागृत करण्‍यानुषंगाने योग्‍य ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.  कोविड 19 चा धोका कमी करण्यासाठी सामान्य प्रतिबंधात्मक उपायांमध्ये, साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचा समावेश आहे.  या उपाययोजना सर्व ठिकाणी (कामगार आणि अभ्यागत) प्रत्येक वेळी पाळणे आवश्यक आहे.  

अभ्‍यंगतांनी सार्वजनिक ठिकाणी किमान 6 फूट अंतर राखणे बंधनकारक राहील. अभ्‍यंगतांनी मुखपट्टी (फेस कव्हर)/मास्क वापरणे अनिवार्य राहील.   अभ्‍यंगतांचे हात अस्‍वच्‍छ नसले तरी, साबणाने वारंवार हात धुणे आवश्‍यक राहील. (कमीत कमी 40-60 सेकंदांसाठी) शक्य असेल तेथे अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर्सचा वापर करणे आवश्‍यक राहील. (कमीतकमी 20 सेकंदांसाठी).   अभ्‍यंगतांनी श्वसनाशी संबंधीत नियम काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यामध्ये खोकताना आणि शिंकताना टिशु, रुमाल, कोपराने तोंड आणि नाक झाकणे आणि वापरलेल्या टिशुची योग्य विल्हेवाट लावणे, इत्‍यादींचा समावेश आहे. 

 

 सर्वांनी आपल्‍या आरोग्‍याचे स्‍वतः निरीक्षण करणे आवश्‍यक राहील आणि कोणत्याही आजाराची माहिती लवकरात लवकर, राज्य आणि जिल्हा मदत कक्षाकडे नोंदवणे बंधनकारक राहील. सार्वजनिक धार्मिक स्‍थळ परिसरात थुंकण्यास सक्त मनाई राहील, याचे उल्‍लंघन केल्‍यास स्‍थानिक प्रशासनाकडून दंडात्‍मक कार्यवाही केली जाईल.  सर्वांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावा आणि वापर करावा. 

 

धार्मिक स्थळ व प्रार्थना स्थळांनी खालीलप्रमाणे व्‍यवस्‍था सुनिश्चित करणे आवश्‍यक

परिसरात हात स्वच्छ (साबणाने धुणे/सॅनिटायझ) करणे आणि थर्मल स्क्रीनिंग करण्‍याची व्‍यवस्‍था  आवश्‍यक राहील.  केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच परिसरात परवानगी देण्‍यात यावी.   फेस कव्हर / मास्क वापरणा-या व्यक्तींनाच प्रवेश देण्‍यात यावा.    कोविड-19 बद्दल प्रतिबंधात्मक उपायांवर आधारीत पोस्टर्स / प्रदर्शन फलक ठळकपणे प्रदर्शित करावेत.  कोविड -19 साठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जनजागृती करण्‍यासाठी दृक श्राव्‍य  (ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप) साधनांचा सर्व प्रार्थनास्थळांवर नियमितपणे वापर करावा. 

अभ्यागतांची ठरावीक अंतरावर विभागणी करुनच प्रवेश देण्‍यात यावा. स्‍थानिक अधिका-यांसह (जिल्‍हाधिकारी/महानगरपालिका/न.पा./स्‍थानिक प्राधिकारी इ.) ट्रस्‍ट/मंडळाव्‍दारे सदर इमारतीची संरचना व क्षमता लक्षात घेऊन त्‍या प्रमाणे लोकांना गटाने प्रवेश द्यावा.  अभ्‍यंगतांनी पादत्राणे शक्यतो स्वतःच्या वाहनातच उतरवावीत. आवश्यकता असल्यास त्‍या व्यक्ती/कुटुंबासाठी अभ्‍यांगतांच्‍या जबाबदारीवर स्वतंत्र स्लॉटमध्ये पादत्राणे ठेवण्‍याची व्‍यवस्‍था, स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक व्‍यवस्‍थापनांने करावी. 

 पार्किंगच्‍या ठिकाणी आणि परिसराबाहेर गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. सदर ठिकाणी योग्यरित्या सामाजिक अंतर, नियमांचे पालन करण्‍यात यावे.  परिसराच्या बाहेर असलेली दुकाने, स्टॉल, कॅफेटेरिया इत्यादी ठिकाणी प्रत्‍येक वेळी सामाजिक अंतराचे नियम आणि सर्व संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जाईल याची दक्षता घेणे आवश्‍यक राहील. अभ्‍यंगताच्‍या रांगा व्यवस्थापन करण्यासाठी आणि परिसरात सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे अंतर ठेवून विशिष्ट खुणा/चिन्‍ह केल्या जाव्‍यात. 

अभ्यागतांसाठी शक्यतो स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. प्रवेशासाठी रांगेत उभे असताना प्रत्‍येक वेळी किमान 6 फूट शारीरिक अंतर ठेवणे व पुजेच्‍या जागेच्‍या व्‍यवस्‍थापनाची पुर्णतः जबाबदारी धार्मिक स्‍थळाच्‍या व्‍यवस्‍थापनाची राहील. अभ्‍यांगतांनी आवारात प्रवेश करण्यापूर्वी हात आणि पाय, साबण आणि पाण्याने स्‍वच्‍छ धुवावेत. अभ्‍यांगतांना बसण्याची व्यवस्था अशा प्रकारे केली जाईल की पुरेसे सामाजिक अंतर राखले जाईल. एअर-कंडिशन / वेंटिलेशनसाठी, CPWD च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे ज्‍यामध्‍ये असे निर्देश आहेत की, सर्व वातानुकूल उपकरणांचे तापमान सेटिंग 24-30 डिग्री सेल्सिअसच्‍या श्रेणीत असावे, सापेक्ष आर्द्रता 40-70 डिग्री सेल्सिअसच्‍या श्रेणीमध्ये असावी. ताज्‍या/नैसर्गिक हवेचा स्‍त्रोत शक्‍य तितका असावा आणि क्रॉस वेंटिलेशन पुरेसे असावे. 

अभ्‍यांगतांना प्रार्थना स्‍थळावरील मूर्ती/पवित्र पुस्तके इत्यादींना स्पर्श करण्याची परवानगी नाही. धार्मिक स्‍थळांच्‍या ठिकाणी मोठ्या मेळाव्‍याला/जमावास बंदी कायम आहे. संसर्ग पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, शक्य तिथे रेकॉर्ड केलेले भक्ती संगीत/गाणी वाजवली जाऊ शकतात आणि गायन किंवा गायन गटांना परवानगी देऊ नये. अभ्‍यंगतांनी एकमेकांना शुभेच्छा देताना शारीरिक संपर्क टाळावा. अभ्‍यंगतांनी एकत्रित प्रार्थनेसाठी चटई टाळली पाहिजे आणि अभ्‍यंगतांनी स्‍वतःची प्रार्थना चटई किंवा कापडाचा तुकडा आणला पाहिजे जो ते त्यांच्याबरोबर परत घेऊन जाणे क्रमप्राप्‍त आहे.  धार्मिक स्‍थळाच्‍या आत अभ्‍यंगतांसाठी प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्‍यादी कोणतेही भौतिक अर्पण सदृश्‍य कृती करु नये.

 स्‍थानिक, दैनंदिन नियोजनकर्त्‍यांनी परिसरामध्ये स्वच्छते संबंधाने व स्‍वच्‍छता गृहांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन ती स्‍वच्‍छ ठेवणे आवश्‍यक राहील.  धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाने वारंवार साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे.  धार्मिक / प्रार्थना स्‍थळांच्‍या परिसरातील जमीन, फरशी व इतर बाबतीत वारंवार स्‍वच्‍छता धार्मिक स्‍थळ प्रशासनाने करावी.  स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक स्‍थळांच्‍या व्‍यवस्‍थापकाने, अभ्‍यागतांनी आणि कर्मचा-यांनी चेहऱ्यावरील कव्हर / मास्क, सोडलेले हातमोजे यांची योग्‍य विल्‍हेवाट लावण्‍याचे सुनिश्चिती केली पाहिजे. प्रार्थनास्‍थळावरील पुजारी आणि कर्मचा-यांना कोविड-19 सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे आणि कामावर येण्‍यापूर्वी / रुजू होण्‍यापूर्वी, स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक स्‍थळांच्‍या व्‍यवस्‍थापकांनी त्‍यांची साप्‍ताहिक कोविड चाचणी करणे आवश्‍यक आहे.  स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक स्‍थळांच्‍या व्‍यवस्‍थापकानी स्‍वच्‍छतागृह आणि जेवणाच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नियमावलीचे पालन होण्‍याच्‍या दृष्‍टीने धार्मिक स्‍थळांचे ठिकाणी प्रवेश दिली जाणारी संस्‍था, उपलब्‍ध जागा आणि सामाजिक अंतर इ. संबंधाने प्रत्‍येक धार्मिक / प्रार्थना स्‍थळाच्‍या व्‍यवस्‍थापनाने संबंधीत जिल्‍हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे हमीपत्र देणे बंधनकारक असेल. 

परिसरात संशयित किंवा पुष्टीकृत प्रकरण असल्यास, स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक स्‍थळ व्‍यवस्‍थापनाने करावयाची कार्यवाही.  आजारी व्यक्तीला एका खोलीत किंवा परिसरात ठेवा जेथे ते इतरांपासून अलिप्त राहतील.   जोपर्यंत डॉक्‍टर्स व्‍दारे तपासणी होत नाही, तो पर्यंत अशा व्‍यक्‍तींचा चेहरा मास्‍कव्‍दारे झाकलेला असावा.  ताबडतोब जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल/क्लिनिक) ला कळवा किंवा राज्य किंवा जिल्हा मदत कक्षास संपर्क करावा.   नामांकित सार्वजनिक आरोग्य प्राधिकरण (जिल्हा RRT/उपचार करणारे चिकित्सक) द्वारे जोखीमीचे मूल्यांकन केले जाईल आणि प्रकरणाच्या व्यवस्थापना संदर्भात पुढची कार्यवाही सुरू केली जाईल.  जर एखादी व्‍यक्‍ती पॉझिटिव्‍ह आढळल्‍यास त्‍याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरणाची गरज या संदर्भात पुढची कार्यवाही सुरु केली जाईल. तथापि संपूर्ण इमारतीचे/परिसराचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. 

यासंदर्भात जिल्‍हाधिकारी यांनी दिलेल्‍या निर्देशानुसार ज्‍या  धार्मिक स्‍थळ/ प्रार्थना स्‍थळांच्‍या ठिकाणी दररोज 100 पेक्षा जास्‍त भाविक दर्शनासाठी/ प्रार्थनेसाठी येत असतात त्‍या ठिकाणी दररोज (कोविड-19) लसीकरणाचे आयोजन करण्‍यात यावे असे स्पष्ट केले आहे.  यासाठी संबंधीत धार्मिक स्‍थळ/ प्रार्थना स्‍थळ व्‍यवस्‍थापकांनी महानगरपालिका क्षेत्रासाठी महानगरपालिकेशी तर ग्रामीण भागामध्‍ये वैद्यकीय अधिक्षक, जिल्‍हा रुग्‍णालय/उपजिल्‍हा रुग्‍णालय/ग्रामीण रुग्‍णालय, तालूका आरोग्‍य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (प्रा.आ.केंद्र/ उपकेंद्र) यांचेशी संपर्क साधून त्‍याची व्‍यवस्‍था करुन घेण्‍याचे निर्देश दिले आहेत. 

महसूल व वन विभाग महाराष्‍ट्र शासन यांनी त्‍यांचे पुरवणी आदेश दिनांक  17 जून 2021 मध्‍ये कोरोना 19 प्रादुर्भाव व आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पुढीलबाबी स्पष्ट केल्या आहेत. 

 मेळावे : पाचपेक्षा अधिक मानविजमाव एका विशिष्‍ट कारणास्‍तव जमा झाल्‍यास तो मेळावा या व्‍याख्‍यात बसतो. कुठल्‍याही व्‍यापक विचार पुर्वगृह दूषीत न ठरता यामध्‍ये विवाह, खाजगी संमेलन, निवडणूक प्रचार-प्रसार, सोसायटी बैठका, धार्मिक कार्य, मनोरंजनात्‍मक कार्यक्रम, क्रिडास्‍पर्धा, सामाजिक मेळावे इत्‍यादींचा समावेश होतो. यासंबंधाने कुठल्‍याही स्‍पष्‍टीकरण संबंधाने DDMA यांचा निर्णय अंतिम असेल. हि बाब, याशिवाय कुठल्‍याहि नियमावलीखाली एका विशिष्‍ट प्रयोजनार्थ दिल्‍या गेलेल्‍या मेळाव्‍यांसाठी देखील लागू होईल. 

कोविड-19 चा प्रादुर्भाव असे पर्यंत मोकळी पटांगने उपलब्‍ध जरी असली अशा स्थितीतही 100 पेक्षा जास्त लोकांच्या मेळाव्यावर पूर्ण बंदी राहिल. परंतू असे की यात राज्य किंवा स्थानिक सरकारच्या वैधानिक स्वरूपाचे मेळाव्‍यांचा समावेश नसेल.  वैधानिक स्वरूपाचे स्थानिक सरकारचे मेळावे घेण्‍यासाठी - स्‍थानिक प्राधिकरणे जशी, शहरी विकास विभाग आणि ग्रामीण विकास विभागांनी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे, आणि दि.4 जून 2021 चे आदेश पालन करणे आवश्‍यक राहिल. संबंधित स्थानिक प्राधिकरणाने DDMA च्या पूर्वपरवानगीशिवाय इच्छित असलेल्या कोणत्याही प्रयोजनासाठी  SDMA/UDD/RDD कडून पूर्व परवानगी घेणे क्रमप्राप्‍त आहे. कोणत्याही बांधकाम केलेल्‍या जागेचा वापर हा 50 टक्के पेक्षा जास्त क्षमतेने करता येणार नाही.   कोणत्याही खुल्या जागेचा वापर हा 25% पेक्षा जास्त क्षमतेने करता येणार नाही.  कोणत्याही एका मेळाव्याचा कालावधी हा 3 तासांपेक्षा जास्त नसावा.  जर एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मेळाव्यांचे नियोजन असेल, तर दोन मेळाव्‍यांच्‍या आयोजनामध्‍ये पुरेसा अवधी हा मेळाव्‍यास येणा-या आणि बाहेर जाणाऱ्या लोकांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही, या प्रमाणात असावा तथापि कोणत्याही दोन मेळाव्यांच्‍या आयोजनामध्‍ये वापरात आलेले स्‍थळ निर्जंतुकीकरण करणे, स्वच्छ करणे हे सुनिश्चित करण्यासाठी या दोन संमेलनांमध्ये किमान अंतर असणे आवश्यक आहे. 

 कोणत्याही आस्थापना जेथे मेळावे होत असतील तेथील सर्व कर्मचारी हे एकतर पूर्णपणे लसीकरण झालेली असावीत किंवा कोविड-19 साठीच्‍या निर्देशीत चाचणीमध्‍ये कोविड-19 निगेटिव्‍ह अहवाल असणारी असावीत.  जिथे मेळावे होत आहेत त्‍या आस्‍थापना यांनी अस्तित्‍वात असलेल्‍या सर्व SOP चे पालन करणे बंधनकारक असेल.  उक्‍त नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास दंडात्‍मक कार्यवाही प्रस्‍तावित करण्‍यात येईल आणि अशी चुक वारंवार होत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास, कोविड-19 पूर्णपणे संपुष्‍टात येईपर्यंत सदरची आस्थापना पूर्णपणे बंद करण्‍याची कार्यवाही करण्‍यात येईल. 

दिनांक 4 जून 2021 मध्‍ये विनिर्देशीत केलेल्‍या प्रशासनिक पातळीवर कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखणे अनुषंगाने दिलेली स्‍तर 3, स्‍तर 4 व स्‍तर 5 ची प्रमाणके असलेल्‍या भागात मेळाव्‍यावर पूर्ण बंदी असेल. मेळाव्‍यामध्‍ये खान-पान होणार असेल तर मास्क काढण्‍यास परवानगी असेल परंतु रेस्‍ट्रॉरंटसाठी जे मार्गदर्शक तत्‍व/नियम लागू आहेत त्‍यांचे तंतोतंत पालन करणे क्रमप्राप्‍त राहिल. (कोविड-19 साठीच्‍या विनिर्देशीत स्‍तर 3, स्‍तर 4 व स्‍तर 5 प्रादुर्भाव पातळी असलेल्‍या भागात मेळाव्‍यावर संपूर्णतः बंदी असेल. तथापि स्‍तर 2 चा प्रादुर्भाव असलेल्‍या भागात 50% ऐवढ्या क्षमतेपर्यंतच खान-पानास परवानगी असेल व स्‍तर 1 करीता नियमीत परवानगी असेल.).  हॉटेल्‍स, पर्यटन स्‍थळे या बाबतीत कोविड-१९ प्रादूर्भाव स्‍तर संबंधाने दिनांक 17 जून 2021 रोजीच्‍या पुरवणी आदेशामध्‍ये विनिर्देशीत केलेल्‍या सर्व निर्देशीत बाबी त्‍या-त्‍या परिस्थितीत अंमलात येतील. 

या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका/नगर पंचायत मुख्याधिकारी यांची राहिल. सदरील आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी/कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी (Incident Commander) उपजिल्हाधिकारी व  तहसिलदार यांची राहिल असेही जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...