Saturday, June 27, 2020


वृत्त क्र. 581   
कोरोनातून 5 व्यक्ती बरे
नवीन 18 व्यक्ती बाधित  
नांदेड (जिमाका) दि. 27 :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 5 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 349 बाधितांपैकी एकूण 275 व्यक्ती कोरोनातून बरे झाले. शनिवार 27 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 80 अहवालापैकी 62 अहवाल निगेटिव्ह तर 18 नवीन बाधित व्यक्ती आढळले.   
नवीन बाधितांमध्ये विष्णुपुरी येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 62 वर्षाचा 1 पुरुष, बोरबन परिसरातील 55 वर्षाची 1 महिला, गोकुळनगर येथील 58 वर्षाची 1 महिला, बिलालनगर येथील 6 वर्षाची 1 मुलगी, नाथनगर येथील 22 वर्षाची 1 महिला, भगतसिंघ रोड येथील 52 वर्षाची 1 महिला, पिरबुऱ्हानगर येथील 19 व 20 वर्षाच्या 2 महिला व 3 वर्षाचा 1 बालक, उमरकॉलनी येथील 28 व 60 वर्षाच्या 2 महिला, लेबरकॉलनी येथील 34 वर्षाचा 1 पुरुष, देगलूरनाका शिवनगर नांदेड येथील 64 वर्षाची 1 महिला, नायगाव ताकबीड येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, गॅस गोडाऊन लोहा येथील 52 वर्षाची 1 महिला व 55 वर्षाचा 1 पुरुष आणि चंद्रभागानगर कंधार येथील 44 वर्षाच्या 1 महिलेचा यात समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.  
58 बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय 50  55 वर्षाच्या दोन महिला बाधित व 38, 42, 67 व 75  वय वर्षाचे 4 बाधित पुरुषांचा यात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 58  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 13, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 39, एक बाधित नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1  बाधित व्यक्ती उपचार घेत असून 3 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 27 जून रोजी 115  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 536,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 133,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 311,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 18,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 349,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 16,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 275,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 58,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 115 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000



वृत्त क्र. 580   
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 74 शेतकऱ्यांच्या तक्रारीवर
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतली सुनावणी
नांदेड (जिमाका) दि. 27 :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंतर्गत पोर्टलवर प्राप्त आक्षेपावर निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समिती कार्यरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडून तक्रार निवारणाची प्रक्रिया 26 जून पासून सुरु झाली. जिल्हास्तरीय समितीच्या दोन बैठका झाल्या असून जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालया व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत 74 शेतकऱ्यांच्या पोर्टलद्वारे प्राप्त तक्रारी, आक्षेपावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुनावणी घेतली. या ऑनलाईन कॉन्फरन्स सुविधेमुळे नांदेड येथे जाण्या-येण्याचा प्रवास करावा लागत नसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019" ही दि. 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे.  1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच अल्पमुदत पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2019 रोजी 2 लाख रुपयापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता त्यानंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी स्थगित होती. त्यानंतर 18 जून पासून आधार प्रमाणिकरण सुरु करुन योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.
नांदेड जिल्ह्यात एकूण 1 लाख 85 हजार 983 शेतकऱ्याची कर्ज खाती या योजनेंतर्गत प्राप्त झाले असून आधार प्रमाणिकरणसाठी 1 लाख 63 हजार 894 शेतकऱ्यांची संकेतस्थळावर यादी प्राप्त झाली आहे. त्यापैकी 1 लाख 12 हजार 867 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर 51 हजार 27 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. आधार प्रमाणीकरण करतेवेळी शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती रक्कम किंवा आधार क्रमांक याबाबत आक्षेप घेतल्यामुळे पोर्टलद्वारे जिल्हास्तरीय समितीकडे आजपर्यत प्राप्त तक्रारीची संख्या 716 आहे. या 716 तक्रारीपैकी र नमूद केल्याप्रमाणे 74 आक्षेपकर्त्याच्या तक्रारीची सुनावणी घेण्यात आलेली आक्षेपाबाबत कार्यवाही चालू आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.  
00000

वृत्त क्र. 579


कोरोना नियंत्रणासाठी पोलिसांनी दिलेल्या
योगदानाचा ना. चव्हाण यांनी केला गौरव
नांदेड (जिमाका) दि. 27 :- कोणत्याही गावाची चांगली प्रतिमा ही त्या गावातील सामाजिक सौहार्दावर, धार्मिक एकोप्यावर, एकात्मतेवर अवलंबून असते. या एकोप्याला, एकात्मतेला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बांधव आहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. समाजाची सुरक्षितता घेत असतांना राज्यातील 37 पोलिस जवानांना आजवर कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. पोलिसांना कुटुंबांची अधिक काळजी घेता यावी व कुटुंबासमवेत राहता यावे यादृष्टिने सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अर्धापूर येथे उभारले जाणारे हे पोलिस स्टेशन आणि येथील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल हा याच प्रयत्नांचा भाग असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. अर्धापूर येथील पोलिस स्टेशन इमारतीचे व पोलिस निवासी संकुलाचे भुमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, अर्धापूर नगरपालिकेच्या अध्यक्षा सुमेरा बेगम शेख लायक, उपनगराध्यक्षा डॉ. पल्लवी लंगडे व मान्यवर उपस्थित होते.
अर्धापूर शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला
5 कोटीचे विशेष अनुदान
अर्धापूर शहरातून नागपूर-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 गेला असल्याने या महामार्गासाठी अर्धापूर शहरातील व ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या जमिनी यासाठी उपयोगात आल्या. सदर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्याने यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्या बाधितांना राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार मोबदला मिळावा यासाठी येथील जनतेची अनेक दिवसांपासून मागणी होती.  या न्याय मागणीचा विचार करुन आता राष्ट्रीय महामार्गाच्या नियमाप्रमाणे सुयोग्य मोबदला बाधितांना दिला जाणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. याचबरोबर अर्धापूर शहरातील रस्ते विकास व इतर अत्यावश्यक कामांसाठी नगरविकास विभागाकडून 5 कोटी रुपयांचे विशेष अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. या अनुदानातून शहराच्या विकासाचा मार्ग आता अधिक प्रशस्त होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाबाबत जनतेनेही अधिक सुरक्षितता बाळगून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.    
अर्धापूर येथील पोलिस स्टेशनची इमारत अत्यंत जुनी झाल्याने त्याठिकाणी नवीन इमारत बांधणे आवश्यक होते. पोलिस यंत्रणेच्या प्रशासकीय सुविधेसाठी या इमारतीची अत्यावश्यकता होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या या नवीन बांधकामात पोलिस ठाण्याची इमारत, निवास संकुलाचा समावेश आहे. या संकुलात इमारत प्रकार दोनचे 40, प्रकार तीनचे 6 आणि प्रकार चारचे एक असे एकुण 47 निवासस्थाने आहेत. या निवासी संकुलासाठी 11 कोटी 93 लाख 96 हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता आहे. तर पोलिस स्टेशनच्या इमारतीसाठी 3 कोटी 40 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता आहे.
00000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...