Monday, April 10, 2017

नागपूर मधील डिजीधनच्या निमित्ताने
शुक्रवारी जिल्हा-तालुका-ग्रामस्तरीय कार्यक्रम
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण
नांदेड दि. 10 :- प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे शुक्रवार 14 एप्रिल 2014 रोजी देशातील शंभरावा डिजीधन मेळावा होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील तालुका तसेच ग्रामस्तरापर्यंत रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांच्या जनजागृतीबाबत कार्यक्रम, विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहेत. त्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांच्यासह विविध बँकाचे अधिकारी, प्रतिनीधींची उपस्थिती होती.
बैठकीत प्र. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी गावपातळी, तालुकास्तर, उपविभागीय आणि जिल्हास्तरावरील डिजीधन उपक्रमांच्या आयोजनाबाबत निर्देश दिले. प्रत्येक गावातील नागरी सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींमध्ये, तसेच सेतू केंद्र, तालुकास्तरावर आणि उपविभागस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील कार्यक्रमांत बँक अधिकारी कॅशलेस व्यवहारांबाबत सादरीकरण, माहिती देतील. काही व्यापारी, व्यावसायिकांना प्वाईंट ऑफ सेल्स (पीओएस) मशिन्सचे वितरणही या दिवशी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध व्यापारी, व्यावसायीक, उद्योजक यांच्या संघटना, त्यांचे पदाधिकारी यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोजित विविध स्पर्धांचे, कॅशलेस व्यवहारांबाबत उल्लेखनीय काम करणारे घटक, आधार सिडींग, मोबाईल सिंडीग आणि मोबाईल बँकींगबाबत जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करणाऱ्या घटकांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने काही स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार 14 एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत या डिजीधन उपक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता नागपुरातील कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधीत करतील. त्यांच्या या भाषणाचेही थेट प्रक्षेपण, दूरचित्रवाणी, वेबकास्टिंगच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी संबंधित घटकांनी वेळेत नियोजन करावे, विविध उपक्रमांचे आयोजन करावे, तसेच कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करावेत असे  निर्देशही बैठकीत देण्यात आले.

0000000
नांदेड विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक भरती
नांदेड दि. 10 :- नांदेड जिल्ह्यातील टपाल खात्यांतर्गत ग्रामीण डाक सेवक भरती करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी 6 मे 2017 पर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावेत असे आवाहन नांदेड डाक विभागाचे डाक अधीक्षक यांनी केले आहे.
भरतीबाबतचे पात्रता निकष तसेच पदांबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर https://indianpaost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline उपलब्ध असल्याचेही या निवेदनात म्हटलेले आहे.

0000000
अनोळखी महिलेच्या मृत्यूबाबत
पोलीसांचे आवाहन  
नांदेड, दि. 10  :-  अनोळखी महिला वय अंदाजे 65 वर्षे असून रंग काळा, शरीर बांधा सडपातळ, उंची 5 फुट 4 इंच, पोशाख ब्लाऊज हिरव्या रंगाचे, डाव्या हातावर गोंधलेले आहे पण काय आहे ते समजून येत नाही. केस काळे, पांढरे लांब असा वर्णनाची अनोळखी महिला मरण पावली आहे. या अनोळखी महिलेची माहिती असल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथील पोलीस हे. कॉ. व्ही. के. शिंदे यांचा भ्रमणध्वनी 9075479885 व 02462-256520 या दूरध्वनीवर संपर्क साधावा , असे आवाहन शिवाजीनगर नांदेड पोलीस स्टेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000
संजय गांधी निराधार अनुदान योजना
समितीची बुधवारी बैठक
          नांदेड, दि. 10नांदेड शहर महानगरपालिका हद्दीतील (संगायो / इंगायो / श्राबायो ) या विशेष सहाय्य योजनेंतर्गत प्राप्त अर्जाच्या छाननीसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्ष जम्मूसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बुधवार 12 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. सर्व अर्जदारांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार संजय गांधी निराधार योजना शहर नांदेड यांनी केले आहे.

00000000
नांदेड पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा
नांदेड, दि. 10  :-  पोलीस भरतीची लेखी परीक्षा रविवार 16 एप्रिल 2017 रोजी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत पोलीस मुख्यालय मैदान नांदेड येथे होणार आहे. उमेदवारांनी सकाळी 5 वा. पोलीस मुख्यालय नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी केले आहे.
लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी सोबत चेस्ट क्रमांक, ओळखपत्र आणावे. उमेदवारासोबत पाण्याची बाटली, फळे, कॅप आणु शकतात. मोबाईल फोन किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत आणू नये. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 56 पोलीस शिपाई रिक्त पदांची भरतीसाठी मैदानी चाचणी नुकतीच पोलीस मुख्यालय येथे पार पडली. 1 : 15 याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या www.nandedpolice.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निकालाविषयी काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी 48 तासात लेखी अर्जासह पोलीस उपअधीक्षक (मु.) नांदेड यांना भेटावे.

0000000
सामाजिक समता सप्ताहात गुरुवारी
प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचे व्याख्यान
नांदेड, दि. 10  :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता "काल , आज आणि उद्या" या विषयावर  सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचे व्याखान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे गुरुवार 13 एप्रिल 2017 रोजी सकाळी 11 वा. आयोजीत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा जात पडताळणी  समितीचे प्रादेशिक उपायुक्त जे. एम. शेख  हे राहणार आहेत. नांदेडकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.                   

000000
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची
17 एप्रिल रोजी बैठक, तक्रारी देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 10 :-  जिल्ह्यातील  शासनाच्या  कोणत्याही  कार्यालयामध्ये  चालू  असलेल्या  किंवा आजपर्यंत  केल्या  गेलेल्या  भ्रष्टाचाराबाबत  कोणाची  काही  तक्रार  असल्यास  अथवा एखाद्या कार्यालयामध्ये चालू असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी  स्वरुपात  तक्रार सोमवार 17 एप्रिल 2017  रोजी आयोजित  जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीच्या  बैठकीत  सादर  करावी , असे  आवाहन नांदेड जिल्हाधिकारी  तथा  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीचे  अध्यक्ष  यांच्यावतीने  करण्यात  आले.     
येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हाधिकारी  यांचे निजी कक्षात सोमवार 17 एप्रिल 2017 रोजी  दुपारी 4  वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत  निवेदन  लेखी  स्वरुपात  प्रत्यक्ष  उपस्थित  राहून  सादर  करावे  लागेल.  हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मूलन  समिती  नांदेड  या  नावाने  सबळ  पुराव्यासह  दोन  प्रतीत  सादर  करावे  लागेल.
या  बैठकीसाठी  सर्व  विभागांचे  प्रमुख  अधिकारी  उपस्थित  राहणार   असल्यामुळे  आपल्या  निवेदनाची तातडीने दखल  घेवून  शासनाच्या  नियमानुसार   भ्रष्टाचार  करणाऱ्या  अथवा भ्रष्टाचारास  वाव  देणाऱ्या  जबाबदार  अधिकारी  व कर्मचारी  यांच्याविरुध्द  कार्यवाही  करण्यात  येईल,  असे  आवाहनही  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीतर्फे  करण्यात  आले आहे.

00000000
एमएचटी-सीईटीसाठी परीक्षेच्या
नियोजनाबाबत बैठक संपन्न
नांदेड दि. 10 :- आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या तीनही व्यावसायिक  अभ्यासक्रमासाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा गुरुवार 11 मे 2017 रोजी होणार आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यात 8 हजार 3 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा नांदेड शहर आणि परिसरातील 27 केंद्रावर होणार. या परीक्षेच्या नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. निवासी उपजिल्हाधिकारी  जयराज कारभारी यांनी परीक्षेच्या नियोजनाबाबत आढावा घेतला.
बैठकीस पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, तहसिलदार ज्योती पवार, परीक्षेसाठी नियुक्त जिल्हा संपर्क अधिकारी प्राचार्य पी. डी. पोपळे, सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी डी. एम. लोकमनवार, व्ही. बी. उश्केवार, एस. आर. मुधोळकर, ए. बी. दमकोंडवार,  उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. एस. जोशी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. एच. आर. गुंटूरकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता ए. ए. सौदागर, राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक अधिकारी प्र. स. नेहूल आदींची उपस्थिती होती.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन परीक्षा केंद्र, तेथील सुविधा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त अशी अनुषांगीक बाबींबाबत सर्व यंत्रणांनी काटेकोर  नियोजन करावे, असे निर्देश दिले. यावेळी झालेल्या चर्चेत परीक्षेसाठी केंद्र समन्वयक तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत तसेच परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्याच्या 2 मे व 9 मे 2017 रोजीच्या प्रशिक्षणाबाबतही चर्चा झाली.
            0000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...