Thursday, November 17, 2022

 तंबाखू नियंत्रण पथकामार्फत

भोकर येथे 15 विक्रेत्यांवर कारवाई 

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- भोकर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने भोकर येथे अचानक धाडी टाकली. या धाडीत 15 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली असून या विक्रेत्यांना 9 हजार 300 रुपयाचा दंड आकारला आहे.

 

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पी. एन. बाचेवाड आदी होते.

 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीयनिमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

 भूमि अभिलेख विभागाची गट क सरळसेवा

भरती परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर कालावधीत


नांदेड (जिमाका) दि. 17 :- भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 9 डिसेंबर 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर प्रक्रीयेतील पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा सोमवार 28 नोव्हेंबर ते बुधवार 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर होणार आहे.

परीक्षा पध्दतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक 14 नोव्हेंबर पासून विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी, असे औरंगाबादचे भूमि अभिलेख उपसंचालक अनिल माने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 9 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. सदर अर्जदाराना विभागाकडून 28 फेब्रुवारी ते 13 मार्च 2022 या कालावधीत छाननी करुन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. छाननी अर्ज प्रक्रीयेत उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमानुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत. अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रीयेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची 4 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (संगणक आधारित चाचणी)28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशाबाबत विभागाच्या संकेतस्थळावर https://mahabhumi.gov.in लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे असेही उपसंचालक भुमि अभिलेख औरंगाबाद प्रदेश औरंगाबाद कार्यालय यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्याचे निर्देश

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षितपणे ऊस वाहतूक करण्यासाठी कापडाचे परावर्तक किंवा रिफलेक्टीव टेप (रेडीयम) लावण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी त्यांच्या वाहनास कापडाचे परावर्तक किंवा रिफलेक्टीव टेप (रेडीयम) लावल्याशिवाय वाहतूक करु नये. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये होणाऱ्या वाहतूकीमध्ये दोन ट्राली एकत्र करुन होणारी वाहतूक धोकादायक व बेकायदेशिर असून वाहनामध्ये अतिरिक्त भार झाल्यास त्यांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या हेड समोर मोठया प्रमाणात शोभेच्या वस्तु लावण्यात येतात. त्यामुळे वाहनचालकास वाहन चालविताना समोरचे वाहन पाहण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनावर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी त्यांच्या वाहनासमोरील भागामध्ये शोभेच्या वस्तु लावण्यात आलेल्या असल्यास त्या काढून टाकाव्यात.

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनास रिफलेक्टीव टेप (रेडीयम) किंवा कापडाचे परावर्तक शुक्रवार 18 नोव्हेंबर पर्यत लावावेत. शनिवार 19 नोव्हेंबरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. ज्या वाहनास रिफलेक्टीव टेप (रेडीयम) किंवा कापडाचे परावर्तक लावलेले नाही त्यांचे विरुध्द मोटार वाहन कायदयानुसार कारवाई करण्यात येईल. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी वाहनामध्ये ऊस भरीत असताना वाहन रस्त्यावर उभे करु नये. वाहनामध्ये ऊस भरत असताना अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावर वाहन उभे करण्यात येतात त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होतात. त्याबाबत वाहनधारकांनी योग्य ती दक्षता घेऊनच योग्य रीतीने वाहन चालवावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
00000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...