Thursday, August 19, 2021

मराठा समाजातील युवकांसाठी नोकऱ्या, शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच

सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी

मुंबई, दि. 19 : मराठा समाजाच्या हितासाठी राज्य शासनाने केवळ गांभीर्याने विचारच केलेला नाही तर अनेक मुद्द्यांवर कार्यवाही देखील केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भोसले समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली असून, अद्याप ती न्यायप्रविष्ट आहे, आणि त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना विनंती

राज्य विधानमंडळाने देखील आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता घटनेत योग्य ती सुधारणा करावी अशी शिफारस केंद्र सरकारला ठरावाद्वारे केली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र देण्यात आले असून प्रत्यक्ष एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भेटले देखील आहे.  

कायम स्वरूपी नियुक्त्याचे शासन निर्णय जारी

सन 2014 च्या ईएसबीसी अध्यादेशानुसार 14.11.2014 पर्यंत उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशापर्यंत देण्यात आलेल्या नियुक्त्या कायम करण्याबाबत 5 जुलै,2021 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर निवड मंडळांना सूचना देणारा शासन निर्णय काढण्यात आला आहे,

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास 9.9.2020 रोजी स्थगिती देईपर्यंत एसईबीसी वर्गातून शासन सेवेत केलेल्या नियुक्त्या कायम करण्याबाबत 15 जुलै,2021 रोजी शासन निर्णय काढला आहे. 

एवढेच नव्हे तर एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचा लाभ घेण्यासाठी अराखीव उमेदवारांकरीता (खुला प्रवर्ग) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरीता 10% जागा आरक्षित करण्याबाबत सुधारीत शासन निर्णय 31 मे,2021 रोजी काढला आहे. 

6 जुलै,2021 च्या शासन निर्णयान्वये पदभरतीकरीता सुधारीत बिंदुनामावली विहित केली आहे.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण अथवा अराखीव (खुला प्रवर्ग) विकल्पाबाबत ईडब्ल्युएस प्रमाणपत्र व नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र देणेकरिता दि.6 जुलै,2021 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे.

अधिसंख्य पदांबाबत विचार

  15 जुलै,2021 च्या शासन निर्णयानुसार जे उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहतील त्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मिळाल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून अशा उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव विहित कार्यपद्धतीनुसार सादर करण्यात येणार आहे. 

मराठा समाजाच्या अन्य मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2020-21 साठी मुळ अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये तंत्र शिक्षणाकरीता रू.600/- कोटी व उच्च शिक्षणासाठी रू.71.57 कोटी अशी एकूण र.671.57 कोटी तरतूद उपलब्ध करण्यात आलेली होती. तसेच आर्थिक वर्ष 2021-22 करीता योजनेसाठी रू.702/- कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे. सन 2019-2020 मध्ये 36584 विद्यार्थ्यांना रु.69.88 कोटी इतकी शिष्यवृत्ती देण्यात आली. सन 2020-2021 मध्ये 21550 विद्यार्थ्यांना रु.52.27 कोटी इतकीशिष्यवृत्ती देण्यात आली.

डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचे लाभ  - ही वसतीगृह निर्वाह भत्ता योजना मराठा समाजासह खुल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लागू आहे. सन 2019-20 मध्ये 8484 विद्यार्थ्यांना रु.17.25 कोटी इतकी रक्कम निर्वाह भत्त्यापोटी देण्यात आली. सन 2020-21 मध्ये 1011 विद्यार्थ्यांना रु.2.43 कोटी इतकी रक्कम निर्वाह भत्त्यापोटी देण्यात आली. या योजनेसाठी आवश्यक तो निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येईल.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह योजना -मराठा विद्यार्थ्यांसाठी 23 जिल्ह्यांमध्ये वसतिगृहे उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, सातारा (कराड), सांगली(मिरज), कोल्हापूर, नाशिक (2 वस्तीगृहे), औरंगाबाद(2 वस्तीगृहे),बीड, लातूर, अमरावती व नागपूर या 14 ठिकाणी वसतिगृहांकरीता संस्था व इमारती अंतिम झाल्या असून या 14 वसतीगृहांचे लवकरात लवकर उद्घाटन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वसतिगृहांची एकूण प्रवेश क्षमता 2252 इतकी आहे.

एस.ई.बी.सी विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित 150 विद्यापीठांमध्ये शिक्षण

सामाजिक न्याय विभागामार्फत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते व त्यावर 40 कोटी रुपये खर्च करण्यात येतात. सामाजिक न्याय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यामार्फत विविध प्रवर्गासाठी ज्या योजना राबविण्यात येतात. त्या धर्तीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक,‘सारथी’ यांनी आढावा घेऊन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना ‘सारथी’मार्फत राबविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सारथी संस्थेला मजबूत करणे सुरु

सारथी संस्थेचे उपकेंद्र कोल्हापूरला सुरु केले आहे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या 8 ठिकाणी विभागीय कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत.पुणे येथे ४१६३ चौ मी जमीन संस्थेला दिली असून ४२ .७० कोटी रक्कमेस बांधकामासाठी मान्यता दिली आहे.नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथील देखील जमिनीचे प्रस्ताव  सादर झाले आहेत.  

चालू आर्थिक वर्षात सारथीला रू.150/- कोटी इतका निधी दिला असून विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आवश्यकतेनुसार आणखी निधी देण्यात येईल.

सारथी संस्थेकरीता कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नियमित स्वरुपाच्या व बाहययंत्रणेव्दारे भरावयाच्या पदांसाठी मान्यता दिली आहे. 

2019-20 मध्ये सारथी मार्फत राबविलेल्या योजना-

पीएचडी, एमफील विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती

सन 2019-20 मध्ये लक्षित गटातील Ph.D / M. Phil करणाऱ्या 501 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात आली, स्पर्धा परीक्षा अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोग प्राथमिक परीक्षेसाठी 225 विद्यार्थ्यांना व राज्य लोकसेवा आयोग प्राथमिक परीक्षेसाठी 125 विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची रक्कम देण्यात आलेली आहे .IBPS अंतर्गत 586 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले,MESCO मार्फत 13 विद्यार्थ्यांना सैनिक पूर्व परिक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले. RTTC-BSNL Smart  City अंतर्गत 153 विद्यार्थ्यांनाप्रशिक्षण देण्यात आले.UGC-NET,SET परिक्षेसाठी 268 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

2020-21 मध्ये सारथी संस्थेमार्फत राबविलेल्या योजना

केंद्रीय लोकसेवा आयोग प्राथमिक 2021परीक्षा- उतीर्ण झालेले सारथीचे 77 विद्यार्थी व इतर 165 असे एकूण 242 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु.50,000/- प्रमाणे एकूण रु.121लक्ष रक्कमेचे विद्यावेतन देण्यात आले आहे.

मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 59 विद्यार्थ्यांना विद्यावेतनचे प्रत्येकी रु.25,000/- एकरकमी याप्रमाणे रु.14.75लक्ष अनुदान देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी अभिरुप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. 

डिसेंबर 2020 मध्ये 251 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांचे नवीदिल्ली व पुणे येथील प्रशिक्षण संस्थेत ऑनलाईन प्रशिक्षण जानेवारी2021ते जून 2021 या कालावधी मध्ये पूर्ण झाले व त्यांना आतापर्यंत रु 1.36लक्ष विद्या वेतन (Stipend) रक्कम देण्यात आले आहे.

पोलीस भरती प्रशिक्षण: एकूण 7565 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण करिता नोंदणी केली आहे. CSMNRF-2020 साठी 342 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील 241 पात्र विद्यार्थ्यांना 23 ते 27 मार्चला मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. 207 विद्यार्थी मुलाखतीस उपस्थित होते व विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. यापैकी 192 विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे सादर केली आहेत व त्यांची अंतीम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. मुलाखतीस उपस्थित राहू न शकलेल्या 34 विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात आली. त्यापैकी 11 विद्यार्थी हजर होते. उर्वरीत 23 विद्यार्थी फेरसंधी देऊनही मुलाखतीसाठी उपस्थित राहिले नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाची छपाई

सारथी संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाची 50 हजार प्रती छपाई करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. तसेच बालभारती, पुणे यांना या स्मृतीग्रंथाच्या छपाईसाठी देण्यात आलेल्या रु. 63 लक्ष या अग्रीम रकमेस वित्त विभागाकडून मान्यता मिळाली आहे. सारथी संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या 50 हजार प्रती छपाई करण्याकरिता बालभारतीला आदेश देण्यात आले आहे. या ग्रंथाच्या 50 हजार प्रतींचे विविध शासकीय/निमशासकीय संस्था, ग्रंथालये, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/महाविद्यालये यांना विनामुल्य वाटप करण्यात येणार आहे.

विविध परीक्षांचे नि:शुल्क प्रशिक्षण

याशिवाय केंद्रीय नागरी सेवा स्पर्धा परीक्षा(UPSC-CSE) 2022 प्रशिक्षण,  महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत आयोजित दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (PSI,STI, ASO) परीक्षापुर्व नि:शुल्क ऑनलाईनप्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Engineering Services) स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण, कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत अराजपत्रित (Non Gazetted)पदाच्या स्पर्धा परीक्षापूर्व नि:शुल्क ऑनलाईन प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा (CJJD & JMFC) नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमः

15000 विद्यार्थ्यांना या वर्षी सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण देऊन त्यातील 70% विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, असा निर्धार सारथी संस्थेने केला आहे व त्या दृष्टीकोनातून कामकाज सुरु आहे.

2021-22 मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये विभागीय मुख्यालय असलेले जिल्हे प्रथम टप्यात घेण्यात येतील व त्यानंतर ही योजना इतर जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोर्स व प्रशिक्षण संस्था निवडून पाठविण्याबाबत सांगण्यात आले आहे. 

तारादूत योजना

तारादुतांची नियुक्ती करून लक्षित गटासाठी सारथी आणि राज्य शासनाच्या संबंधित योजना राबविण्यात येण्याचे ठरले असून त्यासंदर्भात नियुक्तीसाठी प्रस्ताव दिला आहे. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ -अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून सन 2018 पासून रु.1825 कोटी इतक्या निधीचे वाटप केलेले असून महामंडळास आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आतापर्यंत 27 हजार 924 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.तसेच रु.134.26कोटी रुपयांची व्याज प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे. कृषि, दुग्धविकास, ट्रॅक्टर, ट्रक व इतर व्यवसायांसाठी कर्जवाटप करण्यात आले आहे.

कोपर्डी प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयात अपील प्रलंबीत आहे. कोरोना काळानंतर दि.2 ऑगस्ट,2021 पासून उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे. याबाबत उच्च न्यायालयामध्ये महाधिवक्ता, शासकीय अभियोक्ता यांनी हे प्रकरण त्वरीत सुनावणीसाठी घेणेबाबत विनंती करण्यास सांगण्यात आले आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांच्या १४ वारसांना नोकरी

एस.टी.महामंडळात 14 वारसांना नियुक्त्या देण्यात आल्या असून 8 सेवेत रूजू झाले आहे. 6 वारस काही अवधीनंतर रुजू होणार आहे.3 वारसांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केली नाही. 11 वारस निकषांत बसत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी निकष शिथिल करण्याचा प्रस्ताव महामंडळाने शासनास सादर केला आहे. त्यावर शासनामार्फत लवकरच निर्णय घेण्यात येईल. 5 वारसांनी इतर कारणांस्तव आत्महत्या केल्या असल्यामुळे ते नोकरी देण्यास पात्र ठरत नाहीत. 5 वारसांनी महामंडळातील नोकरी नाकारली आहे. 2 वारसांबाबत जिल्हाधिकारी व पोलीस विभागाचा अहवाल प्रलंबित आहे. 1 वारसाने नोकरीसाठी अद्याप अर्ज केलेला नाही.

आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या १७ कुटुंबियांना आर्थिक मदत-

मृत्यूमुखी पडलेल्या 17 मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य प्रदान करण्यात आलेले आहे. उर्वरीत वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सत्वर मुख्यमंत्री कार्यालयास पाठविण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

आंदोलकांवरील 199 खटले न्यायालयातून प्रत्यक्ष मागे घेण्यात आले आहेत. 109 खटले मागे घेण्याची विनंती संबंधित न्यायालयाकडे विचाराधिन आहे. 16 प्रकरणात आरोपींनी नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यामुळे त्यांच्यावरील खटले मागे घेण्यात आलेले नाहीत.            

००००


 

जिल्ह्यातील 86 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 86 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 20 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, स्त्री रुग्णालय, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर स्त्री रुग्णालय येथे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, धर्माबाद, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय माहूर या केंद्रावर 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 39 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 14 प्राथमिक आरोग्य केद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 18 ऑगस्ट 2021 पर्यंम एकुण 9 लाख 20 हजार 635 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 17 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 7 लाख 50 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 44 हजार डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 94 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित तर 

9 कोरोना बाधित झाले बरे     

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 512 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 712 एवढी झाली असून यातील 88 हजार 3 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 49 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 660 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, लोहा तालुक्यात अंतर्गत 2, कंधार 1  अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 असे एकूण 9 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 9 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 9 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 49 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 11, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 32, नांदेड जिल्ह्यातील तालुके अंतर्गत गृह विलगीकरण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 94 हजार 280

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 91 हजार 391

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 712

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 3

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 660

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.1 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-3

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-49

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

सुधारित वृत्त

 कृषी प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- शेती व शेतपूरक उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मूल्यवर्धी साध्य करता येईल. गटशेतीद्वारे शेतकऱ्यांनी मिळून पुढाकार घेतल्यास त्यातून सर्वांचे हित साध्य करता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. देगलूर तालुक्यातील विविध उपक्रमांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी भेटी दिल्या, त्यावेळी ते बोलत होते. 

या भेटीत त्यांनी काठेवाठी येथील मिनी दाळमिल प्रकल्प, गीर गाय प्रकल्प, बायोगॅस युनिट, बांबू लागवड, पेरू, सोयाबिन मुग कापुस पिके, मौजे होट्टल येथील पेरू फळपिक व पावर टिलर, कांदा पैरणी यंत्र, देगलूर येथील लाकडी घाणा तेल युनिट व बन्नाळी येथील चेरी प्रक्रीया युनिट आदी उपक्रमांची पाहणी केली. यावेळी करडई पिकामध्ये राज्य स्तरावर बक्षिस मिळालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

शेतकऱ्यांना शेतपूरक उद्योगात जसे पेरू पासून जाम जेली, कडधान्यापासून डाळी, करडई भूईमुगा पासून तेल, दुधापासून तूप, श्रीखंड, दही असे दुग्धजन्य पदार्थ असे विविध प्रक्रिया उद्योग उभारून चांगल्या प्रकारे ते विक्री करता येऊ शकतात, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.   

यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषि अधिकारी एम के सोनटक्के, तहसीलदार विनोद गुंडमवार, पोलिस निरीक्षक भगवान धबडगे, गटविकास अधिकारी मुक्कावार, तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे, मंडळ कृषि अधिकारी गिरी, सोनकांबळे, कृषि अधिकारी इढोळे, मंडळ अधिकारी इज्जपवार, कृषि पर्यवेक्षक सुरेश कावाटवाड, शेतकरी सुर्यकांत पोतुलवार, साहेबराव बोने, नारायण पाटील, बसवंत बिरादार, सायलू सुर्यवंशी, आदित्य एकलारे, राजू शिवणे पाटील, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक व शेतकरी आदींची उपस्थिती होती.

00000



 

कोविड योद्धा किशोर कुऱ्हे यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गौरव 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर अशोकराव कुऱ्हे यांचा सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मागील दोन वर्षांपासून कोविड-19 काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल रविवार 15 ऑगष्ट रोजी स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.  

यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.

000000



 

सद्भावना दिवससामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. याअनुषंगाने सामाजिक ऐक्य पंधरवडा हा 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. विविध धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धींगत करुन हिंसाचार टाळण्यासाठी हा पंधरवडा साजरा केला जातो. त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. 

सद्भावना दिवससामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 9 ऑगस्ट 2021 रोजी निर्गमीत केलेल्या शासन परिपत्रकातील सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रम साजरा करुन कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

00000 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...