Tuesday, June 22, 2021

  

दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, विषय व तत्सम माहितीमधील दुरुस्त्यांबाबत शिक्षण मंडळाचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  यावर्षी दहावी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली नाहीत. मात्र सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थीनिहाय गुणदान करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक व अनुषंगिक तपशील माध्यमिक शाळांना उपलब्ध करुन दिलेला आहे. या तपशीलामधील विषय / माध्यम, फोटो, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थान, इतर तत्सम दुरुस्त्या असल्यास याबाबत संबंधित शाळांनी प्रचलित पद्धतीप्रमाणे संबंधित विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व माध्यमिक शाळा यांनी आपल्या स्तरावर सुचित करावे. सर्व विभागीय मंडळांनी यासंदर्भातील दुरुस्त्या विभागीय मंडळातील / निर्धारित गणकयंत्र विभागामार्फत करुन राज्य मंडळाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्य मंडळाच्या गणकयंत्र विभागाकडे पाठवाव्यात. या दुरुस्तीबाबत सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

0000

 

 

 


 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत योग दिन उत्साहात साजरा

नांदेड (जिमाका) दि. 22 :- येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर साजरा करण्यात आाला. यावेळी संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार, उपप्राचार्य एस. एस. परघणे, प्रबंधक राठोड तसेच मार्गदर्शक योगगुरु तथा माजी गट निदेशक आर. डी. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

योगगुरु केंद्रे यांनी विविध आसनाच्या माध्यमातून योग, आसन, सुर्यनमस्कार, प्राणायाम कसे करावे याचे पुर्ण मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिकासह सुर्यनमस्कार, ताडासन, नौकासन, वज्रासन, पद्मासन, उतान पादासन, कपालभाती, शितली प्राणायाम तसेच यौगिक सूक्ष्म क्रिया इत्यादी योगासने करुन घेतली. या शिबिराचा लाभ संस्थेतील शिल्प निदेशक, बेसिक कॉस्मेटोलॉजी या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी घेतला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकरी एम. जी. कलंबरकर, संजीवनी जाधव, संघटनेचे अध्यक्ष एन. एस. सोलेवाड, संजय आन्नेवार, गटनिदेशक मोतेवार, बर्गे, भारती, केदार, बिहाउत, मांजरमकर, शिंदे, गिरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक नेहा नोमुलवार, इम्रान शेख, महेश पांचाळ, कैलाश जेठेवाड, अजय तांबोळी, सचिदानंद शिंदे, निखील थोरात यांचे सहकार्य मिळाले.

00000

 

शासकीय तंत्रनिकेतन येथे समुदेशन केंद्राचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे 2021-22 या वर्षासाठी दहावी / बारावी पदविका प्रवेश प्रक्रिया संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी समुदेशन केंद्राचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले. तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पदविका प्रवेश प्रक्रिया जास्तीत जास्त विद्यार्थीभिमुख करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांनी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तसेच पदविका शिक्षणाचे महत्व, भविष्यातील नोकरीच्या संधी याबाबतची माहिती पालकांना व विद्यार्थ्यांना देण्यासाठी समुदेशन केंद्र संस्था स्तरावर सुरू करण्यात येत आहेत. 

कोविड-19 ची पार्श्वभूमी असतानाही गतवर्षी तंत्रनिकेतन मधील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. यावर्षी तंत्रनिकेतन मधील प्रवेशासाठी केवळ दहावीचे गुणच ग्राह्य धरण्यात येणार असून वेगळी प्रवेश परिक्षा (सीईटी) असणार नाही. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन यासाठी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे समुदेशन केंद्राचे उद्घाटन केले आहे. 

तज्ज्ञ प्राध्यापक याठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा असे प्राचार्य डॉ. गर्जे यांनी यावेळी सांगितले. यावेळी विज्ञान विभागातील प्राध्यापक व प्रवेश समितील अधिकारी प्रा. एस. आर. मुधोळकर, प्रा. डॉ. ए. ए. जोशी, प्रा. ए. एन. यादव, प्रा. ए. बी. दमकोंडवार, प्रा. व्ही. एम. नागलवार, प्रा. एन. एस. देशमुख, प्रा. डॉ. जी. एम. डक, प्रा. ए. बी. राठोड, प्रा. के. एस. कळसकर, प्रा. डॉ. एस. व्ही. बेटीगेरी, प्रा. डॉ. डी. कोल्हटकर, प्रा. एस. जी. दुटाळ, शेख. म. जाविद.अ. आर. के. देवशी उपस्थित होते.



00000

 

26 जून रोजी सामाजिक न्याय दिन

नांदेड (जिमाका) दि. 22 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2021 रोजी सामाजिक न्याय दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधीत विभागांना निर्देश दिले आहेत. 

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय 28 एप्रिल 2006 व शासन परिपत्रक 14 जुलै 2003 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिक्षक नांदेड, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, शिक्षण अधिकारी (निरंतर), शिक्षण अधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा क्रीडा अधिकारी, तंत्रशिक्षण प्राचार्य, व्यवसाय व प्रशिक्षण प्राचार्य यांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार परिपत्रकानुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

000000

 

18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला डोस व दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 23 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 11 केंद्रावर कोविशील्डचा 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको या 11 केंद्रावर प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस दिला जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 15 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 20 जून पर्यंत एकुण 4 लाख 94 हजार 522 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 21 जून पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 89 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 34 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. तसेच कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

परिवहन कार्यालयाच्या ऑनलाईन प्रणालीचा

गैरवापर केल्यास होणार कारवाई 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी परवाना ऑनलाईन द्धतीने देण्यात येत आहे. या लोकभिमुख सोयी-सुविधांचा गैरवापर होऊ नये यासाठी या प्रणाली आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणारा अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्तीवर आवश्यक ती पोलीस कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावतीने केली जाणार आहे. या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम 19 (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. 

नागरिकांच्या सोयीसाठी  तसेच कोव्हिड -19 पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने देण्याची प्रणाली राज्य शासनाने नुकतीच सुरू केली आहे. या कार्यप्रणालीद्वारे राज्यातील काही ठिकाणी अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

वास्तविक केंद्र मोटार वाहन नियम 11 अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहि केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा उद्देश संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे चिन्हांचे वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व ही माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे जबाबदार वाहन चालक निर्माण होण्यास मदत होते. या प्रणालीचा वापर करतांना पालकांनी त्यांच्या पाल्यास या परिक्षेचे महत्त्व पटवून दयावे तसेच प्रणालीचा गैरवापर होणार नाही यांची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. 

नव्याने सुरु झालेल्या प्रणालीवर राज्यात जवळपास 16 हजार 920 शिकाऊ अनुज्ञप्ती तर सुमारे 400 नवीन वाहन नोंदणी करण्यात आली आहे. 

त्याचबरोबर जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफे या सुविधेचा गैरवापर करतील अशा संस्थविरुद्ध पोलीस कारवाई करुन महा ई-सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी इंटरनेट कॅफेविरुध्द पोलीस विभाग (सायबर सेल) यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. नागरिकांनी असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. या प्रणालीमध्ये नागरिकांना येणाऱ्या काही अडचणी जसे आधारकार्ड क्रमांक त्यावरील माहिती, फोटोग्राफ हे सारथी प्रणालीवर चुकीच्या द्धतीने दिसत असल्यास अथवा प्रदर्शित होत नसल्यास इत्यादी बाबी या राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (एनआयसी) दिल्ली पुणे यांच्याशी समन्वय साधुन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...