Friday, December 8, 2023

 रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडीचे काम करण्यासाठी वाहतुकीस प्रतिबंध

 

पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडीचे काम करण्यासाठी बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळेपुढील रस्त्यापर्यत रेल्वे अंडर ब्रिज 357 ए मधून जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंधीत करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.  

 

दिनांक 9 डिसेंबर 2023 ते  7 जानेवारी 2024 या कालावधीत पर्यायी मार्ग (जाणे-येणेकरीता) कामठा रोड ते नमस्‍कार चौक दरम्‍यानच्‍या रोड वरील विद्यमान मालटेकडी ओव्‍हर ब्रीज राहील. तर देगलूर नाका-बाफना टी पॉईंट या रस्‍त्‍यावरील विद्यमान बाफना रोड ओव्‍हर ब्रिज असा राहील. या  मार्गावरील वाहतुक वळविणे व पर्यायी मार्गाने ती सोडण्याबाबत अटी व शर्ती जिल्हादंडाधिकारी कार्यालयाची समक्रमांकीत अधिसुचना 9 ऑक्टोंबर 2023 मध्‍ये नमुद केल्याप्रमाणे कायम असतील, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

0000 

 वृत्त   

 

नवमतदार नोंदणीसाठी

सोशल मिडिया स्टार्स करणार जनजागृती

  

·  नवमतदारांनी नाव नोंदणीसाठी पुढे येण्याचे

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 33 लाखांपेक्षा अधिक आहे. या लोकसंख्येपैकी एकुण मतदारांची संख्या लक्षात घेता नवमतदार युवकांची संख्या ही 60 हजारांपेक्षा अधिक असायला पाहिजे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी निवडणूक विभाग ग्रामपातळीपासून प्रयत्नशील आहे. नवमतदारांच्या जागृतीसाठी ब्लॉगर्स, व्लॉगर्स, युट्यूबर्स, विविध समाज माध्यमात कार्यरत सोशल मिडिया स्टार्स यांनी जनजागृतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

नांदेड जिल्ह्यातील विविध सोशल मिडिया अर्थात समाज माध्यमांवर अपूर्व ठसा उमटविणाऱ्या युवा-युवती समवेत ब्लॉगर्स, व्लॉगर्स, युट्यूबर्स समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, कॉमेडी क्रियेटर गजानन गिरी, कल्पना खानसोळे, व्हिडिओ क्रियेटर माधवी लोकरे, डिजीटल कन्टेंड क्रियेटर  जयपाल गायकवाड, इशान खान, सय्यद अमीर, सय्यद सोहेल, सिद्धेश्वर पडघन, नासेर सानी, महमंद मुश्रफ, अँकर श्रृती आकोलकर, आदी उपस्थित होते.

 

आयुष्यात पहिल्यांदा मतदान करण्याची अनुभूती ही वेगळीच असते. मी रूरकी येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी होतो. आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार बजावतांना होणाऱ्या आनंदाला आपण पारखे होऊ नये यासाठी घरची परवानगी न घेता 2 हजार 400 कि.मी.चा प्रवास करून मी गावी पोहचल्याची आठवण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बोलतांना सांगितली. काही युवक मतदानाच्या यादीत आजघडीला जरी नसले तरी सोशल मिडियावर ते नक्कीच आहेत. हे लक्षात घेता साक्षरतेच्यादृष्टिने समाज माध्यमांचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून मतदानाला पात्र असूनही ज्यांनी अजून मतदान कार्ड तयार केलेले नाहीत त्यांनाही या प्रक्रियेशी जुळून घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी जयपाल गायकवाड, कॉमेडी क्रियेटर गजानन गिरी, अँकर श्रृती आकोलकर, इशान खान, नासेर सानी यांनी आपले अनुभव ठेवून मतदार साक्षरतेसाठी आम्ही उत्सूक असल्याचे सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सर्वांचे आभार मानले.

0000








 अभ्यासासोबत खेळांनाही महत्व द्या

-         मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल 

·          मतदार जागृती व स्वच्छता मोहिमेत युवकांचा सहभाग आवश्यक

 

नांदेड, (जिमाका) दि. 8 :- युवकांनी आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी समाजाचे दडपण न बाळगता निर्भयपणे आपल्या आवडीचे जे क्षेत्र आहे त्यात काम केले पाहिजे. आपला वेगळे मार्ग निवडले पाहिजेत. नव्या दिशा, नवीन संधी शोधून नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता स्वत:च्या अंगी रुजवून निरोगी आरोग्यासाठी अभ्यासासोबत खेळाला ही प्राधान्य युवकांनी दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात विभागीय युवा महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, राज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी आदी तसेच लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील युवा महोत्सवात सहभाग नोंदविलेल्या युवकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

 

सध्याचा युवक नैराश्य, समाजाचे दडपण घेवून शिक्षणाचे मार्ग शोधण्यावर भर देताना दिसून येत आहेत. युवकांच्या यशस्वी जीवनासाठी कामात कल्पकता, स्वावलंबन, निरोगी आरोग्य यातच यशस्वी जीवनाचा मार्ग असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले. आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. हे वर्ष साजरे करीत असताना सामाजिक जबाबदारीने मतदार जागृती व परिसराची स्वच्छता या मोहिमेत प्रत्येकांनी सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले. आपल्या घरासह, परिसराची स्वच्छता व मतदान यादीत नाव नोंदविण्याचा प्रत्येकानी संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले.

 

युवा महोत्सवात युवकांचा सर्वागिण विकास करणे, देशाची संस्कृती व परपंरा जतन करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे, तणधान्याचे महत्व, शिक्षण, उद्योग व्यवसाय या सोबतच शेती या व्यवसायाशी युवकाची ओळख करुन देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्व पटवून देणे या बाबीवर युवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या युवा महोत्सवात सामाजिक जाणीवासोबत तृणधान्याचे महत्व, तसेच या भागात जे पिकते तेच खाण्यावर प्रत्येकांनी भर दिला पाहिजे असे स्पष्ट मत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी युवकांना सांगितले. यासोबत 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक युवकांनी मतदानासाठी जागरुक राहून मतदान ओळखपत्र काढून घ्यावे. तसेच मतदान करण्यासाठी जबाबदारीने पुढे यावे, असे आवाहन राज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केले.

 

या विभागीय युवा महोत्सवात लातूर विभागातील धाराशिव, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यातील अंदाजे 300 युवक व युवती स्पर्धक सहभागी होणार आहेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रुती रावणगावकर यांनी तर आभार क्रीडा विभागाचे संजय बेत्तीवार यांनी मानले.

 

या विभागीय युवा महोत्सवात सांस्कृतिक कला प्रकार, कौशल्य विकास, संकल्पना आधारीत स्पर्धा, युवा कृती इत्यादी कलाकृतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच लावणी, गोंधळ, समुह लोकनृत्य, वैयक्तीक सोलो लोकनृत्य, लोकगीते यांचा समावेश असणार आहे. कथा लेखन, पोस्टर, वत्कृत्व, फोटोग्राफी स्पर्धा आणि संकल्पनावर आधारित स्पर्धा, युवा कृतीमध्ये हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रोडक्ट इत्यादी कलाकृतीचे सादरीकरण होणार आहे.

 

या विभागीय युवा महोत्सवासाठी विविध कलाप्रकाराचे परिक्षक म्हणुन प्रा.संदीप काळे, प्रा.पंकज खेडकर, डॉ.संदेश हटकर, प्रा.शुभम बिरकुरे, प्रा. शिवराज शिंदे, पांचाळ, डॉ. सिध्दार्थ नागठाणकर, श्रीमती कविता जोशी, डॉ.सिध्दार्थ नागठाणकर, कविता जोशी, जाहीर उमेर, डॉ. पुरण शेटटीवार, डॉ.बालाजी पेनुरकर, डॉ.मनिष देशपांडे, डॉ.संदपि काले, डॉ.पांडुरंग पांचाळ आदीनी काम पाहिले.

 

हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार,.प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, उत्तम कांबळे, मोहन पवार,  सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले. या युवा महोत्सवाचा नांदेड जिल्हयातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

 0000






 जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी डिसेंबर 2023 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन

रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मंगळवार 12 डिसेंबर 2023 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रआनंदनगर रोडबाबानगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com किंवा 02462 (251674)वर संपर्क साधावाअसे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी. उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावाअसेही  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

00000

 वृत्त

 

युवकांनो शिक्षणासह स्वयंरोजगाराकडे वळा

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज जिल्हास्तरीय सादरीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- सेवा क्षेत्राशी निगडीत मोठ्याप्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. या संधीला साध्यात रूपांतर करण्यासाठी प्रत्येक युवकांनी पुढे आले पाहिजे. यात नाविन्यता शोधली पाहिजे. आपल्या ज्या कल्पना आहेत त्याला तंत्रकुशलतेची जोडही दिली पाहिजे. केवळ अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाच नाविन्याचा शोध घेता येऊ शकतो हे मनातून काढून टाकत इतर अभ्यासक्रमाच्या युवकांनी स्वयंरोजगारासाठी पुढे वळा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील सामाजिक शास्त्र संकुल येथे आयोजित या कार्यक्रमास संचालक डॉ. घनश्याम येळणे, सहायक संचालक रेणुका तम्मलवार, इनोवेशन इनक्यूबेशन सेंटरचे संचालक डॉ. एस. जे. वाडेर, सीईओ डॉ. कौस्तुभ दास, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते.

 

कोणतीही नाविन्यपूर्ण कल्पना ही सुरूवातीला वेडेपणाच्या संशयात अडकलेली असते. लाईटच्या बल्पाचा शोध लावतांना एडीसन यांना समाजाने सुरूवातील वेड्यातच काढले होते. पौराणिक कथामध्ये आरशात पाहून स्वत:शी संवाद साधण्याचे दाखले आजच्या काळात प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलिंगपर्यंत प्रत्ययास आले आहेत. कोणतीही कल्पना प्रत्यक्ष साकारेपर्यंत आपली जिद्द युवकांनी सोडली नाही पाहिजे. आपण जे काही करू त्यात सहजता व गुणवत्ता येण्यासाठी प्रयत्नशील रहा. तुमच्या मदतीसाठी विद्यापिठात इनक्यूबेशन सेंटर, कौशल्य विकास विभाग, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयटीआय सारखी केंद्र तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत. तुम्ही विश्वासाने पुढे आल्यास या भागातील युवकही औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.

 

युवकांच्या प्रगतीसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. छोट्यातल्या छोट्या जागेपासून, भांडवलापासून आपल्याला काय करता येईल याचा प्रयत्न युवकांनी केला पाहिजे. आज निरमा, बिस्लरी सारखे मोठे झालेले ब्रँड कधीकाळी अतिशय छोट्या जागेतून सुरू झालेले होते. नंतर त्यांचा विस्तार वाढला. छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून जे काही सुरू करता येईल ते सुरू करण्यावर युवकांनी भर द्यावा, असे डॉ. घनश्याम येळणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, इनोवेशन इनक्यूबेशन सेंटरचे संचालक डॉ. एस. जे. वाडेर, सीईओ डॉ. कौस्तुभ दास यांची समयोचित भाषणे झाली. सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा तीन टप्यांमध्ये पार पडली. पहिल्या टप्यात प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रचार, प्रसार, विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभाग करून घेण्यासाठी आवाहन व स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयीन स्तरावर कल्पनांची सादरीकरण व तिसरा टप्पा जिल्हास्तरवर उत्कृष्ट नवसंकल्पना निवडणे हा होतो. याअंतर्गत महाविद्यालय स्तरावरून 12 विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय चॅलेंज स्पर्धेकरीता झाली. 9 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. श्रीमती स्मिता नायर यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. परिक्षक म्हणून सचिन कुमार राका, डॉ. सुयश कठाडे हे उपस्थित होते.

00000





वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...