बिलोली, भोकर ग्रामीण रुग्णालयाचा
शासनाच्या "कायाकल्प" पुरस्काराने गौरव
नांदेड दि. 13 :- ग्रामीण रुग्णालय बिलोली व भोकर यांना
शासनाकडून उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा "कायाकल्प-2016-17" या
पुरस्काराचे वितरण आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत
यांच्या हस्ते प्रत्येकी एक लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र या स्वरुपात देऊन नुकतेच गौरविण्यात
आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवार 10 जुलै रोजी पार पडला. यावेळी
खासदार अरविंद सावंत, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर
सिंग, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
पुरस्काराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम म्हणाले की, हा केवळ संस्थानाचा गौरव नसून त्यासाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी
यांचा आहे. येत्या वर्षी नांदेड
जिल्ह्याला अधिकाधिक पारितोषिक मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करु. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी राज्यस्तरीय
पुरस्कार मिळणे ही आनंदाची बाब असून
नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय सेवांची गुणवत्ता उंचावली जाईल. पुरस्काराचे श्रेय जिल्हा गुणवत्ता आश्वासन चमुचे असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे
म्हणाले, सातत्य व चिकाटी हा गुरुमंत्र
अवलंबून प्रथमवर्षीच राज्यस्तरावर 17 व्या स्थानी
आहोत. या पुरस्कारासाठी डॉ.
कंदेवाड व डॉ. बि. पी. कदम (जिल्हा शल्य चिकीत्सक) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले
तसेच या पुरस्काराचे श्रेय ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते. पुढील
काळात सातत्य राखून आणखी सुधारणा करु असे सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार यांनी,
ही आमच्यासाठी गौरवाची बाब असून असेच
कार्य करून पुढील काळात राज्यात अव्वल स्थानी येण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.
राज्यस्तरीय ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय प्रवर्गात ग्रामीण रुग्णालय बिलोली दहाव्या क्रमांकावर तर ग्रामीण रुग्णालय भोकर सतराव्या
क्रमांकावर आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागाची मान उंचावली आहे.
तसेच जिल्हास्तरावर एकूण 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पारितोषिक जाहीर झाला आहे ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी, सरसम,
अर्धापूर, मालेगाव व तुप्पा
यांचा समावेश आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यांच्या हस्ते नुकतेच ग्रामीण रुग्णालय बिलोली व भोकर यांना ISO २००९:२०१५ नामांकनाचे
प्रमाणपत्र देण्यात आले होते.
महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय संस्थांची चार स्तरीय तपासणी करून तेथे सर्व सोई-सुविधा, स्वच्छता, बायोमेडिकल
वेस्ट मॅनेजमेंट, कर्मचारी यांची प्रशिक्षणे
व त्यांचा वापर या सर्व बाबींचा
बारकाईने निरीक्षण करून सर्वोत्कृष्ट आरोग्य संस्थांना कायाकल्प हा पुरस्कार शासनामार्फत दिला जातो.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, वैद्यकीय अधीक्षक
डॉ. इंगळे,
डॉ. लखमावार, जिल्हा
गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. साईप्रसाद शिंदे,
भोकर
वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप लोखंडे सोबत सोएल रब्बानी, विनोद बोधगीरे
व विठ्ठल शेळके उपस्थित होते.
000000