महत्वाचे वृत्त क्रमांक 216
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत
नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वितरण
बालेवाडी, पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
नांदेड येथील कार्यक्रमात खासदार डॉ. अजित गोपछडे यांची उपस्थिती
घरकुलांचे बांधकाम गतीने होण्यासाठी प्रयत्न करणार : मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
#नांदेड दि. २२ फेब्रुवारी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे येथील बालेवाडीतील प्रधानमंत्री आवास योजना कार्यक्रम आज नांदेडच्या शेकडो लाभार्थ्यांनी नांदेड वरून दृकश्राव्य माध्यमातून बघितला. नांदेड जिल्ह्यातील १लक्ष २० हजार लाभार्थ्यांना आज पहिला हप्ता देण्यात आला. खासदार डॉ. अजित गोपछडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आदींची यावेळी उपस्थिती होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील २० लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि १० लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात आले. यानिमित्ताने नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात जिल्हाभरातील लाभार्थी एकत्रित आले होते.
नांदेड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत एकूण एक लक्ष एकोणपन्नास हजार लाभार्थी मंजूर आहेत. त्यापैकी आज १लक्ष २० हजार लाभार्थ्यांना १५ हजारचा पहिला टप्पा बहाल करण्यात आला. त्यांच्या खात्यात थेट हा पैसा जमा झाला. यावेळी अनेक लाभार्थ्यांनी शासनाने तातडीने यासंदर्भात निर्णय घेतल्याचा आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी एक लक्ष २० हजार रुपये देण्यात येतात. त्यातील पहिला टप्पा आज १५ हजाराचा या लाभार्थ्यांना देण्यात आला. तर याच वेळी १ लक्ष ४९ हजार लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले उर्वरित लाभार्थ्यांना देखील हा हप्ता मिळणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले.
नियोजनभवनातील या कार्यक्रमाला खासदार डॉ.अजित गोपछडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार,संजय कोडगे, सचिन उमरेकर आदीसह शेकडो लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी बालेवाडी, पुणे येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण लाभार्थ्यांना दाखविण्यात आले.
सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात एक लक्ष 49 हजार घरकुलांना मंजुरी दिली आहे. यापैकी एक लक्ष 20 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत केला जात आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेतून ज्यांना घर मिळाले आहेत त्यांना आणखीनही सुविधा उपलब्ध केल्या जातील. प्रत्येकाच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी वेळोवेळी या योजनेचा पाठपुरावा केला जाईल. सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल कोणीही या लाभापासून वंचित राहणार नाही असेही यावेळी खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून लाभार्थ्यांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात निवडक लाभार्थ्यांना मंजुरी आदेश आणि व काही लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.
***