Friday, June 5, 2020

वृत्त क्र. 520



खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीसाठी
बिबिएफ प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न
            नांदेड, दि. 5 :-  खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीसाठी मुदखेड तालुक्यातील मेंडका येथे बिबिएफ प्रात्यक्षिक प्रशिक्षण गंगाधर चंदलवाड यांच्या शेतात आज आयोजीत करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकाला मुदखेड तालुका कृषि अधिकारी आर. एन. शर्मा, कृषि पर्यवेक्षक जी. पी. वाघोळे, कृषिताई श्रीमती गंगासागर बालाजी आक्कमवाड, कृषि सहाय्यक श्रीमती ए. एस. मोरे, तालुका तंत्र व्यस्थापक (आत्मा) व्ही. बी. गिते व शेतकरी उपस्थित होते.
            तालुका कृषि अधिकारी आर. एन. शर्मा म्हणाले, बिबिएफ तंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास एकरी बियाणे मात्रा 18 ते 22 किलो पर्यंत लागते. तसेच पाऊस अधिक झाल्यास सरीवाटे अतिरिक्त पाणी निघुन जाते. पावसात खंड पडल्यास सरीत मुरलेले पाणी पिकाला उपलब्ध होते. या तंत्रामुळे हवा खेळती राहुन पिकाची वाढ जोमदार होते. फवारणीच्या वेळेस रिकाम्या जागेचा वापर होतो, असेही त्यांनी सांगितले.  
यावेळी बियाण्यांची पेरणी करतांना बिज प्रक्रीया करुन करावी. यामध्ये थमरोलचा वापर करावा. प्रथम बुरशी नाशक नंतर किटक नाशक व शेवटी रायझोबिएम कल्चरचा वापर करावा, असे मार्गदर्शन श्री. वाघोळे यांनी केले.
या प्रात्यक्षिकाला उपस्थीत शेतकऱ्यांपैकी होस्ट फार्मर चंदलवाड यांनी सदर तंत्रज्ञान वापरणार असल्याचे सांगून इतरांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सुत्रसंचलन कृषि सहाय्यक  श्रीमती ए.एस.मोरे यांनी केले तर आभार दत्ता आन्नमवाड यांनी मानले.
000000


वृत्त क्र. 519



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 5 :- जिल्ह्यात बुधवार 17 जून 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 6 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 17 जून 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

वृत्त क्र. 518


जिल्ह्यात कोरोना बाधितामध्ये 7 व्यक्तींची भर
आजपर्यत 126 बाधितांनी केली कोरोनावर मात
नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोरोना बाधिताच्या संख्येत आज 7 बाधित व्यक्तींची भर झाली असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 7 बाधितामध्ये माहूर तालुक्यातील पलाईगुडा गावातील 33 वर्षे वयाचा एक पुरुष, तर नांदेड येथील नईआबादी शिवाजीनगर  व खय्युम फ्लॅाट परिसरातील 6 बाधित व्यक्ती आहेत. त्यापैकी 3 पुरुष अनुक्रमे वय वर्षे 26, 50, 50 आणि 3 स्त्री अनुक्रमे वय वर्षे 13, 23, 42 आहे. आतापर्यंत बरे झालेली व्यक्तींची संख्या 126 आहे.  
नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधित संख्या आता 189 झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवार 5 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 48 अहवालापैकी 37 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. सद्यस्थितीत रुग्णालयात 55 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील 3 बाधिताची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52  65 वर्षांच्या दोन स्त्री बाधित तर 38 वर्षाचा एक पुरुष बाधित आहे.
आतापर्यंत एकूण 189 बाधितापैकी 8 बाधितांचा मृत्यू झाला असून 126 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 55 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 बाधित , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 42 बाधित, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4 बाधित तर माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर एका बाधितांवर  उपचार सुरु आहेत.  
कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 42 हजार 349, घेतलेले स्वॅब 4 हजार 316, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 825, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 7, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 189, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 171, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 55, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 126, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 55, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 71 एवढी आहे.
दिनांक 4 जून रोजी प्रलंबित असलेल्या 73 स्वॅब तपासणी अहवालापैकी 48 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 25 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 5 जून रोजी 46 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
वाढत्या संख्येला अधिक घाबरुन न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...