Wednesday, February 20, 2019


बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांनी
घ्यावयाची दक्षता
नांदेड, दि. 21 :-   फेब्रुवारी / मार्च 2019 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेत विद्यार्थ्यांनी काय करावे व काय करु नये याबाबत घ्यावयाची दक्षता संदर्भात विभागीय सचिव लातूर विभगीय मंडळ लातूर यांनी माहिती दिली आहे.
परीक्षेत विद्यार्थ्यांने घ्यावयाची दक्षता पुढील प्रमाणे आहे. परीक्षा दालनात प्रत्येक पेपर सुरु होण्यापुर्वी 30 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे. स्वत:च्या बैठक क्रमांकावरच बसावे. उत्तरपत्रिकेवरील पृष्ठ क्र. 2 वरील सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर विहित केलेल्या जागेत बैठक क्रमांक, (अंक व अक्षरी) केंद्र क्रमांक, दिनांक, विषय, माध्यम लिहून स्वाक्षरी करावी. बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर तो तपासून बैठक क्रमांक स्वत:चाच आहे याची खात्री करावी. स्वत:च्या हातानेच उत्तरपत्रिकेवर दिलेल्या विहित जागेतच बारकोड स्टिकर चिकटवावा. फॉर्म क्रमांक 1 वर स्वत:च्या बैठक क्रमांकासमोरच स्वाक्षरी करावी. उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे देण्यापुर्वी विद्यार्थ्यांनी स्वत: मुख्य उत्तरपत्रिकेवर तसेच घेतलेल्या सर्व पुरवण्यांवर होलोक्राफ्ट स्टिकर चिकटविणे आवश्यक आहे.  
दुसऱ्याच्या बैठक क्रमांकावर बसू नये. दुसऱ्याचा बारकोड स्वत:च्या उत्तरपत्रिकेवर चिकटवू नये. असे केल्यास विद्यार्थी पूर्णत: जबाबदार राहील. बारकोड स्टिकर कोणत्याही प्रकारे खराब करु नये. केल्यास हा गैरप्रकार समजण्यात येईल. उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय कुठलाही अनावश्यक मजकूर, स्वत:चे नाव, पत्ता, बैठक क्रमांक, देवदेतांची नावे, पास करण्याची धमकी / विनंती तसेच चिन्हांकित खुणा करुन कोणत्याही प्रकारे ओळख दर्शविण्याचा प्रयत्न करु नये. केल्यास हा गैरप्रकार समजण्यात येऊन नियमानुसार संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द ठरविण्यात येईल. विद्यार्थ्यांनी पुरवणी स्टेपल करु नये. केल्यास गैरमार्ग समजण्यात येईल. पुरवणी बांधण्यासाठी पांढऱ्या दोऱ्या व्यतिरिक्त अन्य रंगाचे दौरे वापरु नयेत. वापरल्यास गैरमार्ग समजण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
00000


दहावी परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांच्या कलचाचणीस मुदतवाढ
नांदेड, दि. 21 :-  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2019 च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढ दिलेली असून ज्या नियमित व खाजगी विद्यार्थ्यांची अद्याप कलचाचणी घेतलेली नाही, अशा सर्व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी कलचाचणी पुर्ण करुन घ्यावी व कोणताही विद्यार्थी कलचाचणी व अभिक्षमता चाचणी पासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यात 7 मार्च 2019 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


दहावी व बारावी परीक्षा केंद्र
परिसरात 144 कलम  
नांदेड दि. 21 :- जिल्ह्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (दहावी) केंद्रावर 1 ते 22 मार्च 2019 या कालावधीत व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (बारावी) केंद्रावर 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/ एस.टी.डी/ आय.एस.डी/भ्रमणध्वनी/फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्गमीत केला आहे.
000000


हमीदराने कापूस खरेदीसाठी  
भोकर, तामसा येथे केंद्र सुरु  
नांदेड दि. 21 :- हमीदराने कापुस खरेदी करण्यासाठी नांदेड विभागात भोकर व तामसा येथे केंद्र सुरु करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी कापूस विक्री करतांना सातबारा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची सुसप्ष्ट छायांकित प्रत सोबत आणावी, असे आवाहन कापुस पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक नांदेड यांनी केले आहे.
हंगाम 2018-19 मध्ये कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून राज्याचे मर्यादेत हमी दराने कापूस खरेदी करण्यासाठी झाली आहे. कापुस पणन महासंघाद्वारे संगणकीय कार्यप्रणाली विकसीत केली असून याद्वारे शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कापसाची रक्कम थेट त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्री करतांना येणाऱ्या प्रतिनिधी किंवा स्वत:सोबत शेतकऱ्यांचे नाव असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची सुसप्ष्ट छायांकित प्रत सोबत आणावी, असेही आवाहन केले आहे.
000000


ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 20 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
शुक्रवार 22 फेब्रुवारी 2019 रोजी परळी जि. बीड येथून वाहनाने नांदेड विमानतळ येथे रात्री 9 वा. आगमन व खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री
नितीन गडकरी यांचा दौरा
नांदेड दि. 20 :- केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग, जहाजबांधणी आणि जलसंधान, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
शुक्रवार 22 फेब्रुवारी 2019 रोजी नागपूर विमानतळ येथून विशेष विमानाने सकाळी 10.50 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अहमदपूर जि. लातूरकडे प्रयाण करतील. दुपारी 1.25 वा. अहमदपूर जि. लातूर येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.30 वा. नांदेड विमानतळ येथून जबलपूरकडे विशेष विमानाने प्रयाण करतील.
000000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...