Wednesday, December 27, 2023

 वृत्त क्र. 898

  

जलजीवन मिशनचे 15 कंत्राटदार काळ्या यादीत

387 कंत्राटदारांवर दररोज 500 रुपयाचा दंड

 

· जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल

यांनी समितीच्या शिफारशीवर केले शिक्का मोर्तब

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील प्रत्येक घरांना नळांने पिण्याचे पाणी पोहोचावे या उद्दात्त हेतूने केंद्र व राज्य सरकारने हर घर नल से जल ही योजना सप्टेंबर 2020 पासून सुरू केली. नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या योजनेतून सुमारे 1 हजार 234 योजनांद्वारे हे काम सुरू होते. यातील सुमारे 387 योजनांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी कामाची गती संथ व दिरंगाईने सुरू ठेवल्याने त्यांच्या विरूद्ध अटी व शर्तीनुसार कारवाई करण्याचा बडगा अखेर जिल्हा परिषदेने उचला. यात 387 कंत्राटदारांना अटी व शर्तीनुसार दिलेल्या मर्यादेपेक्षा जितका अधिक विलंब लागेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसाला 500 रुपये दंड ठोठावला जाईल. या कंत्राटदारा व्यतिरिक्त 15 कंत्राटदारांनी दिलेल्या निकषाप्रमाणे वेळेत काम सुरूच न केल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेने काळ्या यादीत टाकले.

 

नांदेड जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे हे काम दिलेल्या अटी व शर्तीनुसारच व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी एक स्वतंत्र समिती नेमली होती. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा अधिकारी या सदस्यांची ही समिती होती. या समितीने जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेतला. त्यात 387 कंत्राटदारांसह इतर 15 कंत्राटदार यांचा निष्काळजीपणा उघड झाल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना सादर केला होता.  त्यांनी तो जशास तसा स्विकारून कारवाईवर शिक्का मोर्तब केले.

 

हर घर नल से जल या संकल्पनेतून जिल्ह्यातील 1 हजार 540 गावात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणी देऊन दर दिवशी 55 लिटर शुद्ध पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सदर उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत रितसर प्रक्रिया पूर्ण करून हे काम कंत्राटदारांना बहाल केले होते.

0000

 वृत्त क्र. 897

 

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

गुरूवार 28 डिसेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह कळंब जि. यवतमाळ येथून मोटारीने रात्री 9.15 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.

 

शुक्रवार 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथून मोटारीने माहूरगडकडे प्रयाण. सकाळी 8.45 वा. माहूरगड येथे आगमन व दर्शन. सकाळी 9.30 वा. माहूरगड येथून मोटारीने आर्णी मार्गे डिग्रज जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.  

00000

 

 कृषी सेवक पदाची ऑनलाईन परीक्षा

16 व 19 जानेवारी, 2024 रोजी

लातूर, दि.20 (विमाका) :  शासनाच्या 18 ऑक्टोबर, 2023 रोजीच्या आदेशानुसार  पेसा क्षेत्रातील  पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्र विभागातील जाहिरातीत नमुद कृषी सेवकाच्या एकूण 159 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा आय.बी.पी. एस या कंपनीमार्फत 16 व 19 जानेवारी, 2024 रोजी राबविण्यात येणार आहे. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र आय. बी. पी. एस संस्थेकडून संबंधीतास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासाठी सरळसेवा पेसा व नॉन पेसा क्षेत्र पदभरतीसाठीची जाहिरात 11  ते 14 ऑगस्ट, 2023 या कालावधीत विभागस्तरावरून प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

****

वृत्त क्र. 896

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत

15 जानेवारी पर्यंत जिल्ह्यात संपृक्तता मोहिम  

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील पी. एम. किसान योजनेतील बँक खाते आधार संलग्न नसलेले, ई-केवायसी प्रलंबित असलेले, स्वयं नोंदणी लाभार्थींची मान्यता प्रलंबित असलेले व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी, भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणे व गावातील नवीन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी याबाबत 15 जानेवारी 2024 पर्यंत जिल्ह्यात संपृक्तता मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 

 

या विशेष मोहिमेत आधार सिडींगसाठी पोस्ट खाते, सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी) व बँक व्यवस्थापन यांचा प्रभावीपणे उपयोग करावा.  तर ई-केवायसी करीता ग्रामस्तरी नोडल अधिकारी (व्हीएनओ) व सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) यांच्या मार्फत कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्हीएनओ) नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक गावासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्हीएनओ) नियुक्त असणार आहेत. ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्हीएनओ) म्हणून ग्रामपातळीवरील अधिकारी (कृषि सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक) नेमणूक करण्यात आली आहे.

 

बँक खाते आधार संलग्न नसलेले, ई-केवायसी प्रलंबित असलेले, स्वयंनोंदणी लाभार्थ्यांची मान्यता प्रलंबित असलेले व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी, भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणे व गावातील नविन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी अशी सर्व कामे आता गावातच पूर्ण होतील त्यासाठी तालुका किंवा जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज नाहीअसेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.  

00000

 वृत्त क्र. 895 

दि. 27 डिसेंबर, 2023

 

ऑनलाईन व्यवहारात सतर्कता आवश्यक

-         अनिल जवळेकर

 

·         जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :-  इंटरनेटच्या सुविधेमुळे मोबाईलवर ऑनलाईन खरेदी सुविधा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन खरेदी-विक्री व्यवहारांना मोठया प्रमाणात चालना मिळाली आहे. ऑनलाईन व्यवहारात काहींच्या पदरी फसवणूक पडते. ग्राहकांनी स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी जागरुक राहून खात्री करुनच ऑनलाईन व्यवहार करावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर यांनी केले.  

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या ॲड. शलाका ढमढेरे, आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष अरविंद बिडवई, जिल्हा संघटक ॲड. आनंद बळवंतराव कृष्णापूरकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, जिल्हा सहसंघटक डॉ. सायन्ना मठमवार आदींची उपस्थिती होती.

 

आपण प्रत्येक क्षणाक्षणाला ग्राहक म्हणून आपली भूमिका पार पाडत असतो. सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येकजण वेळेअभावी आपले कामे तत्परतेने करण्यावर भर देऊन सोशल माध्यमसह ऑनलाईन व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांनी खरेदीसह पैशाच्या देवाण-घेवाणचा ऑनलाईन व्यवहार अधिक दक्ष राहून केला पाहिजे. ग्राहकांनी कायद्यानुसार आपले हक्क व कर्तव्याची जाणीव ठेवून फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार नोंदवावी. याबाबतची सर्व माहिती घेवून कायदेशिर कार्यवाही करण्याचे अधिकार ग्राहकांना दिले आहेत. तक्रार निवारण केंद्रात तक्रार करताना आपल्या व्यवहाराबाबत सबळ पुरावे-पावत्या याची माहिती तक्रारी सोबत देणे ग्राहकांना बंधनकारक असल्याचे आयोगाचे अध्यक्ष अनिल ब. जवळेकर यांनी स्पष्ट केले. ऑनलाईन व्यवहारात पासवर्ड, ओटीपी गोपनीय ठेवावेत. जेणेकरुन आपली माहिती हॅक होणार नाही याची काळजी ग्राहकांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.  

 

ग्राहकांच्या हक्क व कर्तव्याची जनजागृती आवश्यक

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

आपण रोजच कुठल्या न कुठल्या भूमिकेत ग्राहकांची भूमिका पार पाडत असतो. ग्राहकांच्या भूमिकेत वावरत असताना ग्राहकांचे काही हक्क व कर्तव्य आहेत. ग्राहकांमध्ये या हक्क व कर्तव्याची जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

सध्या इंटरनेटच्या वापरामुळे अनेक ग्राहक जागरूक आहेत. परंतु सध्याच्या धावपळीच्या काळात सर्वाना कमी कालावधीत कामे पार पाडावयाची असतात. त्यामुळे अनेकजण डिजीटल व्यवहार करण्यावर भर देतांना दिसून येत आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करतांना जागरुकता बाळगून या व्यवहारासंबंधी संपूर्ण माहिती घेवूनच व्यवहार करावेतअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

प्रत्यक्ष केलेल्या खरेदीपेक्षा ऑनलाईन खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ग्राहकांचे शोषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक व्यक्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कायद्यानुसार आपले हक्क व कर्तव्य पार पाडावीअसे जिल्हा सहसंघटक डॉ. सायन्ना मठमवार यांनी सांगितले.

 

सध्याचे युग हे डिजीटल युग असून या युगात प्रत्येकांनी सर्तक व सजग राहून खरेदी करावी. ग्राहक चळवळ समजून घ्यावी. फसव्या जाहिराती पासून दूर राहावे. पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी सावध राहून पुढे येवून तक्रार नोंदवावी. तरच पदार्थ व वस्तुच्या भेसळीला आळा बसेल असे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. दीपक कासराळीकर यांनी मार्गदर्शन केले.

 

मागील 5 ते 10 वर्षापासून ऑनलाईन व्यवहारात मोठया प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. कोरोना काळात जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार झालेले असून या काळातच फसवणूकीचे प्रकारही जास्त प्रमाणात झालेले आहेत. ऑनलाईन फसवणूक कशी होते याबाबत ॲड. आनंद कृष्णापुरकर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास याबाबत ग्राहक पोलीस अधिक्षक कार्यालयात स्थापन केलेल्या सायबर सेलची मदत घेता येते असेही त्यांनी सांगितले.

 

कमी दरात वस्तूचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ॲप, लिंकची खात्री करुनच ग्राहकांनी डिजीटल व्यवहारास पसंती द्यावी, असे जिल्हा अध्यक्ष अरविंद बिडवई यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले यांनी केले. सुत्रसंचालन आणि आभार मधुकर फुलवळ यांनी मानले.

0000










  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...