Wednesday, December 27, 2023

 वृत्त क्र. 895 

दि. 27 डिसेंबर, 2023

 

ऑनलाईन व्यवहारात सतर्कता आवश्यक

-         अनिल जवळेकर

 

·         जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :-  इंटरनेटच्या सुविधेमुळे मोबाईलवर ऑनलाईन खरेदी सुविधा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन खरेदी-विक्री व्यवहारांना मोठया प्रमाणात चालना मिळाली आहे. ऑनलाईन व्यवहारात काहींच्या पदरी फसवणूक पडते. ग्राहकांनी स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी जागरुक राहून खात्री करुनच ऑनलाईन व्यवहार करावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर यांनी केले.  

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या ॲड. शलाका ढमढेरे, आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष अरविंद बिडवई, जिल्हा संघटक ॲड. आनंद बळवंतराव कृष्णापूरकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, जिल्हा सहसंघटक डॉ. सायन्ना मठमवार आदींची उपस्थिती होती.

 

आपण प्रत्येक क्षणाक्षणाला ग्राहक म्हणून आपली भूमिका पार पाडत असतो. सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येकजण वेळेअभावी आपले कामे तत्परतेने करण्यावर भर देऊन सोशल माध्यमसह ऑनलाईन व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांनी खरेदीसह पैशाच्या देवाण-घेवाणचा ऑनलाईन व्यवहार अधिक दक्ष राहून केला पाहिजे. ग्राहकांनी कायद्यानुसार आपले हक्क व कर्तव्याची जाणीव ठेवून फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार नोंदवावी. याबाबतची सर्व माहिती घेवून कायदेशिर कार्यवाही करण्याचे अधिकार ग्राहकांना दिले आहेत. तक्रार निवारण केंद्रात तक्रार करताना आपल्या व्यवहाराबाबत सबळ पुरावे-पावत्या याची माहिती तक्रारी सोबत देणे ग्राहकांना बंधनकारक असल्याचे आयोगाचे अध्यक्ष अनिल ब. जवळेकर यांनी स्पष्ट केले. ऑनलाईन व्यवहारात पासवर्ड, ओटीपी गोपनीय ठेवावेत. जेणेकरुन आपली माहिती हॅक होणार नाही याची काळजी ग्राहकांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.  

 

ग्राहकांच्या हक्क व कर्तव्याची जनजागृती आवश्यक

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

आपण रोजच कुठल्या न कुठल्या भूमिकेत ग्राहकांची भूमिका पार पाडत असतो. ग्राहकांच्या भूमिकेत वावरत असताना ग्राहकांचे काही हक्क व कर्तव्य आहेत. ग्राहकांमध्ये या हक्क व कर्तव्याची जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

सध्या इंटरनेटच्या वापरामुळे अनेक ग्राहक जागरूक आहेत. परंतु सध्याच्या धावपळीच्या काळात सर्वाना कमी कालावधीत कामे पार पाडावयाची असतात. त्यामुळे अनेकजण डिजीटल व्यवहार करण्यावर भर देतांना दिसून येत आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करतांना जागरुकता बाळगून या व्यवहारासंबंधी संपूर्ण माहिती घेवूनच व्यवहार करावेतअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

प्रत्यक्ष केलेल्या खरेदीपेक्षा ऑनलाईन खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ग्राहकांचे शोषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक व्यक्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कायद्यानुसार आपले हक्क व कर्तव्य पार पाडावीअसे जिल्हा सहसंघटक डॉ. सायन्ना मठमवार यांनी सांगितले.

 

सध्याचे युग हे डिजीटल युग असून या युगात प्रत्येकांनी सर्तक व सजग राहून खरेदी करावी. ग्राहक चळवळ समजून घ्यावी. फसव्या जाहिराती पासून दूर राहावे. पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी सावध राहून पुढे येवून तक्रार नोंदवावी. तरच पदार्थ व वस्तुच्या भेसळीला आळा बसेल असे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. दीपक कासराळीकर यांनी मार्गदर्शन केले.

 

मागील 5 ते 10 वर्षापासून ऑनलाईन व्यवहारात मोठया प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. कोरोना काळात जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार झालेले असून या काळातच फसवणूकीचे प्रकारही जास्त प्रमाणात झालेले आहेत. ऑनलाईन फसवणूक कशी होते याबाबत ॲड. आनंद कृष्णापुरकर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास याबाबत ग्राहक पोलीस अधिक्षक कार्यालयात स्थापन केलेल्या सायबर सेलची मदत घेता येते असेही त्यांनी सांगितले.

 

कमी दरात वस्तूचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ॲप, लिंकची खात्री करुनच ग्राहकांनी डिजीटल व्यवहारास पसंती द्यावी, असे जिल्हा अध्यक्ष अरविंद बिडवई यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले यांनी केले. सुत्रसंचालन आणि आभार मधुकर फुलवळ यांनी मानले.

0000










No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...