Monday, June 11, 2018


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश
नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यात शुक्रवार 22 जून 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 8 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 जून 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 11 :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे प्रवेश सत्र ऑगस्ट 2018 साठी 22 व्यवसायांमध्ये 776 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्रताधारक इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
या अभ्यासक्रमात प्रामुख्याने आर्कि. असिस्टंट, आरेखक स्थापत्य, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, फौंड्रीमन, मशिनिस्ट, मेसन, मेकॅनिक मोटार व्हेइकल, पेंटर जनरल, सुईंग टेक्नोलॉजी, शिट मेटल वर्कर, टूल ॲन्ड डाय मेकर, टर्नर, वेल्डर, वायरमन आदी व्यवसायांचा यात समावेश आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000


जिल्हाधिकारी कार्यालयात
आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 11 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 12 जून 2018 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने केले आहे.
0000


शासनाच्या विविध योजनेचा लाभ
वंचितांपर्यंत पोहचवावा
- राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे  
नांदेड, दि. 11 :- शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व विभागांनी वंचितापर्यंन्त पोहचवाव्यात. ग्राहक हा राजा समजून त्यांची फसवणूक होवू नये यासाठी सर्व स्तरातून प्रबोधन करण्याचे आवाहन केले. ग्राहक चळवळीत अधिकाधिक लोकांनी सक्रिय व्हावे, असे निर्देश राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण वसंतराव देशपांडे यांनी दिले .  
नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, समिती सदस्य संजय भोसरीकर , संजय जोशी , तहसीलदार किरण अंबेकर तसेच समिती सदस्य, जिल्हा परिषद, कृषि, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महावितरण यांच्यासह समिती सदस्य, प्रतिनिधी, जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण वसंतराव देशपांडे म्हणाले की, ग्राहक जागृतीसाठी विविध पातळ्यावर कार्य होत आहे. ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा सत्वर देण्याचा प्रयत्न करीत आहे. वस्तू खरेदी करताना तीची किंमत, वजन आणि प्रमाणाबाबत माहिती घेवून ग्राहकांनी जागरुक राहून खरेदी करावी . ग्राहकांनी खरेदी करतेवेळी आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घेवून खरेदी करावी. सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांच्यात समन्वय असणे फार महत्वाचे असते. 
तसेच ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने 1986 चा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्यातंर्गत ग्राहकांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न विभाग करीत आहेत. ग्राहकांच्या काही तक्रारी असतील, तर त्या जिल्हा पुरवठा अधिकारी अथवा त्या विभागाच्या विभाग प्रमुख यांच्याकडे लेखी सादर कराव्यात . त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ग्राहकांच्या सुविधासाठी टोल फ्री क्रमांक 1800-222-365 असा आहे. या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकता. ही सुविधा 24 तास कार्यरत आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील , तर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाद मागता येते. यावेळी शैक्षणिक सुविधाचाही उहापोह करण्यात आला.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या मासिक बैठकीस सक्षम अधिकारी यांनी आपल्या सोबत संचिका फाईल सोबत ठेवावी. तसेच त्याचा अहवालही यासोबत पाठविण्यात यावा. ग्राहकांचे प्रश्न तात्काळ सोडविता यावेत यासाठी पाठपुरावाही करण्यात यावा. तसेच समिती सदस्यांनी समन्वयाने कामे करावीत , असेही राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले.  या बैठकीत विविध विषयांची जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी सादरी करणाद्वारे माहिती यावेळी दिली.
0000


माजी सैनिकांची बैठक
नांदेड, दि. 11 :- औरंगाबाद येथील ब्रिगेडियर डी के पत्रा, स्टेशन कंमाडर हे बुधवार 13 जुन रोजी ई.सी.एच.एस व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे भेट देणार आहेत. माजी सैनिकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून  चर्चा  करणार आहेत. जिल्हयातील माजी सैनिकांची बैठक बुधवार 13 जुन रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सकाळी 10.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. माजी सैनिकांनी विशेषत: विरनारी, विरमाता-पिता व संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी  केले आहे.
00000



जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 49.67 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यात सोमवार 11 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 49.67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 794.69 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 171.21 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 18.33 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 11 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 75.63 (240.76), मुदखेड- 82.67 (304.67), अर्धापूर- 58.67 (215.67), भोकर- 92.75 (281.75), उमरी- 69.67 (148.99), कंधार- 42.33 (155.00), लोहा- 57.00 (175.98), किनवट- 22.71 (102.70), माहूर- 28.00 (125.25), हदगाव- 35.57 (232.29), हिमायतनगर- 39.33 (231.67), देगलूर- 15.50 (52.16), बिलोली- 46.20 (120.80), धर्माबाद- 57.00 (130.32), नायगाव- 50.80 (153.00), मुखेड- 20.86 (68.28). आज अखेर पावसाची सरासरी 171.21 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2739.29) मिलीमीटर आहे.
00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...