"इतिहास केवळ पुस्तकात वाचायचा नसतो, तो अनुभवायचा असतो!
Wednesday, February 18, 2026
महाराष्ट्र के गौरवशाली इतिहास में और देश की स्वतंत्रता के ७७ वर्षों के बाद, आज एक स्वर्ण क्षण साकार हो रहा है। हिंदू धर्म और मानवता की रक्षा के लिए दिल्ली के चांदनी चौक में गुरु साहिब द्वारा दी गई महान शहादत को समर्पित, महाराष्ट्र शासन द्वारा इस भव्य समागम का आयोजन किया जा रहा है।
'हिंद-दी-चादर' समागम की भव्य तैयारियां: भक्ति के लिए सज रही है नवी मुंबई!
वृत्त क्र. 226
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणारे वैविध्यपूर्ण प्रकार सादर
नांदेड, दि. 18 फेब्रुवारी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे दुसऱ्या दिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते.
यावेळी शाहिर प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. डॉ. मुरलीधर हंबर्डे प्रस्तुत “शिवगौरव-लोककला पर्व” कार्यक्रमात किर्तन, गोंधळ, पोवाडा', शौर्यगीत, धनगरी लोकगीत, असा बहारदार अस्सल महाराष्ट्राच्या मातीतील लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या लोककला प्रकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला.
या सांस्कृतिक कार्यक्रमात इंजि. ह.भ.प. प्रविण जाधव पिंपळदरीकर महाराज व त्यांचा संचाने किर्तन तर ऋषी माटालकर व त्यांचा संच यांनी पोवाडा सादर केला. संदिप गोंधळी व त्यांचा संचाने गोंधळ सादर केले. लोकगीतामध्ये धनगरी लोकगीत साजरे केले. शिवनेरीवर शिवबा जन्मला हे शौर्यगीत प्रशांत चित्ते यांनी सादर केले.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी, नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य, आदर्श, स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रभावी दर्शन घडविणारा हा कार्यक्रम आज सादर करण्यात आला. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मान्यवर तसेच विद्यार्थी व युवक-युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
0000
वृत्त क्रमांक 225
नांदेड शहरात वाहतुकीसाठी पर्याय मार्ग
नांदेड, दि. 18 फेब्रुवारी :- नांदेड शहरात गुरूवार 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंतीच्या अनुषंगाने शहराच्या विविध भागातून मिरवणुका निघणार असून मुख्य रस्त्यावर मिरवणूकांच्या व वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत एक दिवसाकरीता तात्पुरत्या स्वरुपात पुढील पर्यायी मार्गावरील वाहतूकीस वळण देऊन बदल करण्यात आला आहे.
वाहतुकीकरीता बंद असलेले मार्ग
जुना मोंढा-देना बँक-महावीर चौक-तरोडेकर मार्केट-वजिराबाद चौक-कलामंदिर-शिवाजीनगर ते आय.टी.आय. चौकापर्यंत जाण्या-येण्यासाठी वाहतूक पुर्णपणे बंद राहील.
राज कॉर्नर कडून आय.टी.आय.कडे येण्यासाठी राजकॉर्नर वर्कशॉप टी पॉईंट-श्रीनगर ते आय.टी.आय. पर्यंत डावी बाजू वाहतुसाठी बंद राहणार आहे.
तर राज कॉर्नर ते तरोडा नाक्याकडे जाण्यासाठी डावी बाजू वाहतुकीसाठी बंद राहील.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
जुना मोंढा ते राज कॉर्नर मार्गावरील वाहतुक अबचलनगर- यात्रीनिवास - साठेचौक- नार्गाजुना टी पाँईट - आनंदनगर - भाग्यनगर- वर्कशॉप कॉर्नर-राज कॉर्नर ते पुढे जाण्या येण्यास वापर करतील.
वजिराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक वजिराबाद चौक - तिरंगाचौक - पोलीस मुख्यालय कॉर्नर- लालवाडी अंडरब्रिज- शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईंटकडे जाण्या येण्यासाठी वापर करतील.
रविनगर जुनाकोठा,गोर्वधनघाट पुलावरुन नांदेड शहरात येणारी वाहतुक तिरंगाचौक - पोलीस मुख्यालय कॉर्नर- लालवाडी अंडरब्रिज - शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करतील.
राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कॉर्नर - वर्कशॉप कॉर्नर -भाग्यनगर- आनंदनगर- नागार्जुना टी पॉईंट- अण्णाभाऊ साठे चौक- यात्री निवास पोलीस चौकी-अबचलनगर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापर करतील.
यानुसार 19 फेब्रुवारी 2026 रोजी मिरवणुक दरम्यान वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी या पर्यायी मार्गाची ही अधिसुचना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये निर्गमीत केली आहे.
00000
वृत्त क्रमांक 224
रसायनशास्त्र पेपरला जिल्हयातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबीत
परीक्षा कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही- जिल्हाधिकारी
नांदेड, दि. १८ फेब्रुवारी:- दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. या दिवशी देखिल जिल्हयातील 109 केंद्रांवर बैठे पथका मार्फत झूम वेबकास्टद्वारे पुर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण करण्यात आले होते.
आजच्या पेपरला उमरी तालुक्यातील नूतन उच्च माध्यमिक विदयालय, येथील परीक्षा केंद्रावर नियुक्त बैठे पथक प्रमुख व सदस्य गैरहजर असल्यामूळे त्यांना निलंबीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी संबंधित विभागांना दिले. यामध्ये बैठे पथक प्रमुख विस्तार अधिकारी कृषी नरहरी मुंजाळ, बैठे पथक सदस्य केंद्रप्रमुख मोहन भोसले, ग्राम महसूल अधिकारी पांडूरंग गुब्रे हे बैठै पथकातील सदस्य परीक्षेच्या केंद्रावर गैरहजर होते. तसेच त्यांनी कोणतीही पुर्वसूचना दिली नाही. यामुळे संबंधितांना परीक्षा कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कर्तव्यात कसूर केल्याने सेवेतून निलंबीत करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना निर्देश जिल्हाधिकारी कर्डीले यांनी दिले आहेत.
आजच्या सकाळच्या रसायनशास्त्र पेपरला एकुण 24406 परीक्षार्थ्यांपैकी 24073 परीक्षार्थी उपस्थित होते.
याप्रमाणे उपस्थितीची टक्केवारी 98.64 होती. तर दुपारच्या राज्यशास्त्र पेपरसाठी एकुण 13207 परीक्षार्थ्यांपैकी 12594 उपस्थित होते. याप्रमाणे दुपारच्या पेपरला उपस्थितीची टक्केवारी 95.36 होती.
प्रत्येक केंद्रांवर बैठे पथकामार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेराद्वारे पुर्णवेळ परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. यामुळे स्व.संगितादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा दहेली तांडा ता.किनवट येथील परीक्षा केंद्रावर एक विदयार्थी गैरप्रकार करतांना आढळून आल्यामुळे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी त्याचेविरुध्द मंडळ नियमाप्रमाणे कारवाई करुन तसा अहवाल मंडळाकडे पाठविला. तसेच सदर केंद्रावर मंडळाच्या निर्देशाप्रमाणे तसेच कॉपीमुक्त अभियानाचा भाग म्हणून उर्वरीत प्रश्नपत्रिका सीसीटीवीच्या निगराणीत ठेवण्यात आल्या नाहीत, परीक्षार्थ्यांना व्यवस्थित तपासून सोडले नाही, अधिकचा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला नाही यास संबंधित केंद्रसंचालक श्री गुटटे यांना जबाबदार धरून त्यांना निलंबीत करण्यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापनास निर्देश दिले आहेत.
स्व.संगिता देवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दहेली तांडा ता.किनवट येथील मूळ मुख्याध्यापक पांडूरंग आडे यांनी सदर केंद्र परिसरात आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिले नसल्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे संबंधितांना सेवेतून निलंबीत करण्यासाठी संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांना कळविले आहे.
तसेच संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविदयालय, पेठवडज ता.कंधार येथील परीक्षा केंद्रावर दोन विदयार्थी गैरप्रकार करतांना आढळून आल्यामुळे उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी त्यांचेविरुध्द मंडळ नियमाप्रमाणे कारवाई करुन तसा अहवाल मंडळाकडे पाठविला आहे. तसेच संबंधित दहेली तांडा व पेठवडज येथील केंद्रसंचालकांना तडकाफडकी बदलून इतर केंद्रसंचालकांची त्यांचे जागेवर नियुक्ती केली आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.
00000
वृत्त क्र. 223
बारावी परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक उपाययोजना
विशेष भरारी पथकाची कारवाई
नांदेड दि. १८ फेब्रुवारी :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) मार्च–2026 ही परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वंकष नियोजन व कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या स्पष्ट आदेशानुसार जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर विशेष भरारी पथके (Flying Squad) नियुक्त करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विशेष भरारी पथकाने कंधार तालुक्यातील पेडवडज येथील संत नामदेव महाराज ज्युनिअर कॉलेज या उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रावर आज अचानक भेट देऊन तपासणी केली.
तपासणीदरम्यान परीक्षा सुरू असताना संपूर्ण प्रक्रियेची बारकाईने पाहणी करण्यात आली. पर्यवेक्षकांची उपस्थिती, परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची सुरक्षितता तसेच परीक्षेतील शिस्त यांची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी दोन परीक्षार्थी कॉपी करत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याने संबंधित परीक्षार्थींवर तत्काळ नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करून सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, अनैतिक मार्ग किंवा शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिला आहे.
परीक्षा काळात सर्व परीक्षा केंद्र प्रमुख, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण जबाबदारीने व दक्षतेने काम करणे बंधनकारक असून कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता स्वतःच्या कष्टावर व प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी. पालक, शिक्षक व नागरिकांनीही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून कॉपीमुक्त परीक्षा अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर अशा प्रकारच्या अचानक तपासण्या सुरू राहणार असून परीक्षा प्रक्रियेची पवित्रता, विश्वासार्हता व गुणवत्तेचे मूल्य जपण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
०००००
वृत्त क्र. 222
मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजनेला वेग”
अतिक्रमणमुक्त, बारमाही रस्त्यांसाठी शासनाची कडक भूमिका; नुकसान केल्यास फौजदारी कारवाई
नांदेड दि.१८ फेब्रुवारी:-ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मजबूत, दर्जेदार व बारमाही शेत/पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कंधार येथे विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कंधार येथे संबंधित अधिकारी व यंत्रणांची बैठक घेऊन कामकाजाला गती देण्याच्या सूचना दिल्या.
या योजनेअंतर्गत शेतात जाणारे व शेतीमाल वाहतुकीसाठी वापरले जाणारे पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मजबुतीकरण करण्यात येणार आहे. रस्ते वर्षभर वापरण्यायोग्य राहतील यासाठी गुणवत्ता नियंत्रणाची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
शेत/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, क्रमांकन, अतिक्रमण हटविणे व कायदेशीर कारवाई ही कामे ग्रामपंचायत, महसूल विभाग व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून केली जाणार आहेत.
रस्ता तयार झाल्यानंतर त्याचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई केली जाणार आहे. वारंवार नुकसान केल्यास भारतीय न्याय संहिता कलम 129 अन्वये कठोर कारवाईची तरतूद आहे.
ही योजना ग्रामीण दळणवळण सुलभ करून शेती विकासाला चालना देणारी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने दूर करून योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा समिती सदस्य सचिव विलास नरवटे यांनी केले आहे.
०००००
वृत्त क्र. 221
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी यूडीआयडी व आधार संलग्नीकरण तात्काळ करावे
नांदेड दि.१८ फेब्रुवारी :- राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनांनुसार विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड संलग्नीकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले वैश्विक ओळखपत्र (UDID Card), आधार कार्ड तसेच बँक खात्याची छायांकित प्रत तात्काळ संगणकीय कार्यालय, शहर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे सादर करावी.
निर्देशांचा विचार करूनही संबंधित कागदपत्रे सादर न केल्यास होणाऱ्या गैरसोयीस तसेच अनुदान बंद झाल्यास संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
तरी सर्व संबंधित दिव्यांग बांधवांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून योजनांचा लाभ अखंडित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
वृत्त क्रमांक वसरणी येथील महाराजस्व शिबिरात १४७४ प्रमाणपत्रांचे वाटप महाराजस्व शिबिराच्या माध्यमातून प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचतेय ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...